‘ती ’ पहिली रात्र !

Submitted by साद on 12 June, 2019 - 00:54

मित्रहो, लेखाच्या शीर्षकावरून लेखाबद्दल काय अंदाज वाटतोय? तुम्ही चाणाक्ष असल्याने बहुधा ओळखलेच असेल. अहो, जेव्हा एखादा मध्यमवयीन पांढरपेशा माणूस ‘पहिल्या रात्री’चे वर्णन करायला उत्साहाने बसलाय तेव्हा ‘ती’ रात्र ही त्याच्या लग्नानंतरचीच पहिली रात्र असणार, दुसरे काय ! माझ्या आयुष्यातील तो प्रसंग अगदी नाट्यमय आणि रंजक होता. काही पारंपरिक गोष्टींना छेद देऊन आम्ही दोघांनी ती रात्र मस्तपैकी साजरी केली होती. त्याचेच हे अनुभवकथन.

थेट मुद्द्याला येण्यापूर्वी माझ्या लग्नाची थोडी पार्श्वभूमी सांगतो. तेव्हा माझे पदव्युत्तर शिक्षण चालू होते. त्यामुळे अर्थातच मी व्यावहारिक अर्थाने ‘पायावर उभा’ वगैरे नव्हतो. त्यामुळे मीहून लग्नासाठी अजिबात उत्सुक नव्हतो. पण ध्यानीमनी नसताना एका ठिकाणाहून विचारणा झाली. मी जमेल तितका निरुत्साह दाखवला पण त्या मंडळींनी माझा पिच्छा पुरवला आणि मग मी सपशेल हरलो ! त्याकाळी समाजात पदव्युत्तर शिक्षण चालू असतानाच लग्न करणारे बऱ्यापैकी लोक असायचे. त्यामुळे फार काही ‘विचित्र’ वाटले नाही. मग ते ‘बघणे’ वगैरे प्रकार झाले आणि अखेर तिने व मी मनापासून होकार दिला. मग झाले तर, लग्न जमले आणि काही कौटुंबिक कारणास्तव ते महिन्यानेच करायचे पण ठरले.

आता लग्न कोणत्या पद्धतीने करायचे हा कळीचा प्रश्न. मला नोंदणी पद्धत आवडेल असे मी जाहीर करून टाकले. पण हाय ! सगळीकडचा कानोसा घेता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. माझ्या प्रस्तावाला मी वगळता कोणाचाच पाठींबा नव्हता. तेव्हा एका बाजूस फक्त माझेच मत असलेला पक्ष तर दुसऱ्या बाजूस प्रचंड बहुमतवाला विरोधी पक्ष ! मग ‘ति’ला जरा चुचकारून पाहिले पण काय उपयोग नाही. तिने देखील बहुमताच्याच बाजूने जाणे पसंत केले. त्यामुळे माझ्यासाठी सुटकेच्या सर्व वाटा बंद झाल्या. आता मी त्या धार्मिक विधींतून जावे लागणार या कल्पनेने अस्वस्थ होतो, पण करतो काय? हळूहळू त्याची मानसिक तयारी सुरु केली. पण तेव्हाच मनात एक निर्धार केला. लग्नाचे दिवशी मंगल कार्यालयात जे काही होईल ते मुक्काट सहन करायचे. पण, रात्री तिथून का एकदा घरी आलो की मग मात्र पूर्ण आपल्याच मर्जीने वागायचे. आम्ही दोघे आणि आमची पहिली रात्र यांच्या दरम्यान अन्य कुणाचे विचार वा मते आडवी येता कामा नयेत. हाच तो तारुण्याचा जोश. बस्स. मग त्यादृष्टीने मनात एक बेत आकार घेऊ लागला. आता तो माझ्या मनात कसा आला हे कळण्यासाठी एक पार्श्वभूमी सांगितली पाहिजे.

दोन महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राचे लग्न झाले होते. त्याचेही पदव्युत्तर शिक्षण चालू होते. तोही माझ्याप्रमाणेच पालकांच्या लहानशा भाड्याच्या घरात राहत होता. त्या काळातील शहराच्या मध्यवस्तीतील अशी घरे ही सामान्य वास्तूरचनेची असत. किंबहुना त्यांच्या रचनांना खाजगीपणाचे वावडे होते. त्यामुळे अशा घरात एक ज्येष्ठ जोडपे असताना जर तरुणाचेही लग्न झाले तर मग नव्या जोडप्याची कुचंबणा होई. तरीदेखील पंचविशीतील आपल्या मुलाने लग्न करून मोकळे व्हावे असे काही पालकांना वाटत असे. तर माझ्या या मित्राने लग्नानंतरची पहिली रात्र मुक्तपणे साजरी करण्यासाठी एक युक्ती काढली.
त्याने त्या रात्रीसाठी सरळ एका हॉटेलची खोली आरक्षित केली होती. तिथे त्याचा मधुचंद्र मस्तपैकी पार पडला. त्याची रसभरीत वर्णने त्याने आम्हाला ऐकवली होती. एवढेच नाही तर “काही करून पहिली रात्र ही मस्तपैकी हॉटेलातच घालवा, फार धमाल येते, घरी थांबाल तर बोअर व्हाल. आणि एक लक्षात ठेवा. पहिली रात्र ही पहिलीच असते, ती कधी ‘दुसर्यांदा’ येत नाही”, असा अनुभवी सल्ला दिला होता. आता हे सगळे ऐकल्यावर मला त्याचा हेवा वाटणे साहजिक होते. मी त्याच्याच पठडीतील असल्याने मीही पहिल्या रात्री त्याच मार्गाने जावे असे ठरवले.

हा विचार सोपा होता पण कृतीमध्ये अडथळे संभवत होते. त्यातला पहिला म्हणजे दोन्ही घरच्या ज्येष्ठांचे पारंपरिक विचार. ‘ति’ला पटवणे फारसे अवघड नव्हते, तरीपण फार आधी सांगणेही इष्ट नव्हते. लग्नाचे दिवशीचा कार्यक्रम असा होता. सकाळी लग्न, दुपारची जेवणे आणि संध्याकाळी स्वागत समारंभ. ते सगळे संपल्यावर आमचे एक नातेवाईक आम्हाला त्यांच्या कारने आमच्या घरी सोडणार होते. आमच्याकडे एक स्कूटर वगळता अन्य कोणतेच वाहन नव्हते. आम्ही रात्री उशीरा कार्यालयातून घरी परतणार आणि मग पुढे तासभर तरी घरी नातेवाइकांचा वावर असणार. मग सगळे पांगल्यावर मी घरी माझा बेत सांगणार आणि मग आम्ही दोघांनी घरून पलायन करायचे ! असा सगळा गुंतागुंतीचा मामला होता. पण इच्छाशक्ती जबरदस्त असल्याने पुढील नियोजनास लागलो.

आता सगळा बेत पूर्ण एकट्याने निभावण्यापेक्षा एखाद्याच्या मदतीची गरज भासली. मग गेलो एका मित्राकडे. तो एक भटक्या आणि हरहुन्नरी होता. तो एका पायावर मदतीस तयार झाला. मी त्याला म्हटले की रात्री आम्हाला हॉटेलला निघायला बराच उशीर होईल. तर माझ्या स्कूटरऐवजी कारची सोय होते का बघ. त्याने हसत ती जबाबदारी घेतली.
आता लग्नाला एक आठवडाच बाकी होता. हॉटेल बुक करायचे होते. त्याकाळी बुकिंग म्हणजे प्रत्यक्ष जाऊन एक दिवसाचे पैसे भरावे लागत. ऑनलाईन हा शब्दच अस्तित्वात नव्हता. एका शांत भागातले हॉटेल निवडले आणि तिथे गेलो. ‘आम्ही नवरा-बायको येणार आहोत” असे सांगून खिशातून पैसे काढले. पण त्याआधी तिथला माणूस म्हटला की पूर्ण पत्ता लिहा. मी माझा पत्ता लिहू लागलो तोच तो म्हणाला, “अहो, आम्ही याच गावातल्या लोकांना खोली देत नाही. कुठलातरी परगावचा पत्ता लिहा”. हे अजबच होते ! मग जरा डोके खाजवून एका लांबच्या नातेवाईकांचा पत्ता लिहीला. आतापर्यंत स्वतःच्याच गावात कशाला मरायला हॉटेलवर राहायला गेलो होतो ? त्यामुळे ही नवीनच माहिती कळाली. आता खोली पक्की झाली.

अखेर लग्नाआधीचा दिवस उजाडला. मग आम्ही सगळे कार्यालयात. संध्याकाळचे विधी वगैरे उरकले. मग रात्री उशीरापर्यंत ती आणि मी गप्पा मारत बसलो होतो. आता मला थोडे अपराधी वाटू लागले. उद्या रात्रीच्या प्रकाराची मी तिला काहीच कल्पना दिली नव्हती. तरी पण म्हटले की थेट सांगण्यापेक्षा थोडी गम्मत करू. मी तिला म्हणालो, “ आता उद्या तू माहेर सोडून आमच्याकडे येणार. सुरवातीस तुझी कुचंबणा होईल आणि टेन्शनही असेल याची मला जाणीव आहे. पण उद्याची आपली रात्र ही नक्की स्वर्गीय असेल हे समज. ती तुझ्यासाठी एक सरप्राईज असणार आहे, हे नक्की!” त्यावर तिने फक्त मंद स्मित केले.

मग लग्नाचा दिवस उजाडला. सर्वकाही यथासांग पार पडले. संध्याकाळी स्वागत समारंभादरम्यान मात्र जोरदार पाऊस पडत होता. माझा तो कारवाला मित्रही उशीराने आला आणि त्याने अंगठा उंचावून मला सगळे ठीक असल्याची खूण केली. शेवटी सगळे उरकून घरी यायला निघालो. माझ्या मित्राने आमच्यामागून तासाने यायचे ठरले होते. घरी पोचलो. जे काही उरलेसुरले सोपस्कार असतात ते झाले. मग ते कारवाले आणि अन्य नातेवाईकही पांगले.

आता वेळ आली होती घरी गौप्यस्फोट करायची. थोडे टेन्शन आले होते. पण मनाशी म्हटले,” शेवटी हा आमच्या आनंदाचा प्रसंग आहे, होऊन होऊन काय होणार आहे ते बघूच”. मग पुढचा बेत जाहीर केला. आजच्या रात्री सर्वांनाच पूर्ण मोकळीक असावी, आम्हा दोघांना उद्या कितीही उशीरा उठता येईल, वगैरे गोलमाल बोललो. सगळ्यांना आश्चर्य वाटले पण कोणी मोडता घातला नाही. एकीकडे भुरभूर पाऊस तर पडतच होता.

थोड्या वेळाने माझ्या मित्राची हाक आली आणि आम्ही घरातून बाहेर पडलो. बाहेर पाहतो तर हा गडी त्याची जुनीपानी अ‍ॅम्बॅसेडर कार घेऊन आला होता. त्याच्या बरोबर अजून एकजण वेगळी स्कूटर घेऊन आला होता. मी काही विचारायच्या आत मित्र म्हणाला, “ अरे यार, आज माझी गाडी जरा आचके मारतीये. जर काही बिघाड झाला तर घाबरू नका. हा दुसरा गडी आपल्या मागोमाग स्कूटरने येतोय. त्याच्याजवळ २ पावसाळी कोट पण आहेत. जर का या कारने दगा दिलाच तर तुम्ही दोघे सरळ त्याची स्कूटर घेऊन निघा !” आता मात्र आम्ही हसतहसत कपाळावर हात मारला. सुदैवाने त्याची कार किल्लीने स्टार्ट झाली आणि पुढे कुठलेही विघ्न न येता आम्ही मुक्कामी पोचलो.
..
वाचकहो, आता हॉटेलच्या खोलीत आम्ही पोचल्यानंतरचा वृत्तांत काही सांगत बसत नाही. कारण तो आपल्या सगळ्यांचा सारखाच असतो ! ती रात्र आमच्यासाठी मुक्त, बेधुंद, स्वर्गीय ...वगैरे होतीच. त्याची तुम्हालाही कल्पना आहेच.

पुढच्या वैवाहिक जीवनात अर्थातच, ‘पहिली रात्र ही पहिलीच असते, ती कधी ‘दुसर्यांदा’ येत नाही’, हे पुरेपूर पटलेले होते ! यथावकाश स्वताचे घर, हवीतशी बेडरूम ही सर्व सुखे मिळाली तरी आजही या कशाला ‘त्या’ रात्रीची सर येत नाही, हे खरेच.
........
तर ही झाली माझ्या पहिल्या रात्रीची कहाणी. तुमचेही असे काही त्या रात्रीचे अनुभव असतीलच याची खात्री आहे. कुणाची स्वतःच्या घरातच असेल, कुणाची माझ्यसारखीही असेल, तर कुणाला काही कारणाने ती साजरी करण्यात अडचणीही आल्या असतील. तेव्हा मोकळे व्हा आणि प्रतिसादांतून लिहा, असे आवाहन करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही आवडलं. लग्न झालेल्या दिवशीच सुहागरात उताविळपणा दाखवतो. एवढी घाई करायची काय गरज होती.‌

तुमच्याकडे लग्नानंतर वरात, कुलदैवताला जाणे, पुजा असले सोपस्कर नसतात वाटतं..!
या सोपस्करानंतर नवरा-नवरी थोडेतरी कंफर्टेबल होतात.. त्यानंतरच रात्र रंगवता येते.. उगीच घायकुतीला आल्यासारखी लग्नाच्या रात्रीच असा प्रकार करणे म्हणजे मला तरी अशक्य वाटते.

मागे एकदा पेपरच्या बातमी मधे एका 'जाती'च्या प्रथेप्रमाणे पहिल्या रात्री 'पंच', मुलाकडचे, मुलीकडचे नवरा-नवरीच्या रूमच्या बाहेर बसतात.. आणि त्यांना 'सबुत' दाखवावा लागतो हे वाचले तेव्हा माझ्या अश्चर्याला पारावार उरला नव्हता..!! Biggrin Biggrin Biggrin

सर्वांना धन्यवाद.
विषय सर्वांना आवडेल असे नाही. पण ज्यांना आवडेल त्यांनी स्वानुभव जरूर लिहा.

विषय विषयाला चालना देणारा असल्याने प्रतिसाद येणार नाहीतच आणि आले तर ते योग्यही नाही. असो... पहिली रात्र कशीही साजरी करा मात्र लिहिल्याप्रमाणे लॉजवर जाणार तर खात्रीपूर्वक चांगल्या ठिकाणी जावे आणि तरीही हिडन कॅम डिटेक्शनचे सर्व सोपस्कार पार पाडल्यनंतरच रूमचा वापर करावा असे आताचा वाईट काळ म्हणता बोलावे लागेल.
( बाकी ते आयडी प्रूफ वगैरे खबरदारी तर आवश्यक आहेच )

तुमच्याकडे लग्नानंतर वरात, कुलदैवताला जाणे, पुजा असले सोपस्कर नसतात वाटतं..! >> हेच विचारणार होते.

आमचे लग्न लव कम अरेंज. ४ वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते त्यातील २ वर्षे मी होणाऱ्या सासरी नेहमीच जात असे. मुद्दा काय तर आमचे सगळ्यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. लग्नानंतर माझ्या सोबत करवली म्हणून माझी मैत्रीण आलेली सासरी.तिला पण सगळे खूप चांगले ओळखत होते. पहिल्या रात्री आम्ही दोघी व नणंद माळ्यावर तर घरातील इतर व पाहुणे मंडळी खालच्या खोलीत असे झोपायचे ठरले होते. नवरा आपला झोपायच्या आधी गुडनाईट म्हणायला वर आला आणि गप्पा मारत बसलेला तेव्हा साबांनी दरडावून त्याला झोपायला खाली बोलवले Lol