पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३४.राज (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 17 June, 2019 - 07:41


raaz1.jpg

पावसाचं आणि काही गोष्टींचं खास नातं आहे. पावसाचे ढग जमू लागले की भटक्या लोकांना ट्रेक्सचे वेध लागतात. तर आमच्यासारख्या बैठ्या लोकांना खमंग कांदाभजी आणि वाफाळत्या चहाचे. कोणी पुस्तकवेडा एखादी मर्डर मिस्टरी घेऊन बसतो. तर एखादा चित्रपटवेडा एखादी थ्रिलर मुव्ही शोधायला लागतो. मुंबईत सध्या पडतोय तो पाऊस वायू चक्रीवादळामुळे का मान्सून सुरु झाल्यामुळे ह्या वादात निदान मला तरी खास इंटरेस्ट नसल्याने (पडतोय ना! झालं तर मग. गुटलीया कायको गिननेका?) मी नेटवर एखादा गोल्डन एरा थरारपट शोधायच्या मोहिमेला लागले. खरं तर ह्या मालिकेच्या निमित्ताने त्यातले बरेचसे पाहून झालेत तरी लिस्टमध्ये काही नावं शिल्लक आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे १९६६ साली आलेला सिप्पी फिल्म्सचा - ‘राज’. हा चित्रपट मला बरेच दिवसांपासून पहायचा होता. का ते नंतर येईलच. आधी चित्रपटाचं कथानक पाहू.

चित्रपटाच्या सुरुवातीला लॉंगशॉटमध्ये एक आलिशान हवेली (म्हणजे खरं तर हवेलीचं मॉडेल!) दिसतो. बरीच रात्र झालेय. कुठूनसे मोठ्या घंटेचे आवाज ऐकू येतात. तोंड झाकलेला एक माणूस त्या हवेलीभोवतीच्या जागेत फिरत असतो. तिथला एक चोरदरवाजा उघडून तो आधी तळघरात आणि तिथून हवेलीच्या आतल्या भागात शिरतो. तिथे हवेलीचा मालक आपल्या छोट्या मुलीशी खेळत बसलेला असतो. तो माणूस सुरा भोसकून त्याचा त्याच्या मुलीसमोरच खून करतो. मुलीचं रडणं ऐकून तिची आई पारो खोलीत येते. नवऱ्याचा खून झालेला बघून ती किंकाळी फोडणार इतक्यात एक दुसरा माणूस तिचं तोंड दाबतो. हवेलीत शिरलेला तो माणूस असतो राजा सरकार नाथ. त्याने खून केलेला माणूस त्याचा मोठा भाऊ असतो. पारोने आपल्याला धोका देऊन आपल्या मोठ्या भावाशी त्याच्या पैश्यांसाठी लग्न केलं अशी समजूत करून घेऊन त्याने हे सगळं केलेलं असतं. पण खरं तर पारोचं त्याच्यावर कधीच प्रेम नसतं. तो पारोला त्याच तळघरात बंदी बनवून ठेवतो. तिची आणि तिच्या मुलीची ताटातूट करतो.

वर्षं उलटतात. सरकार नाथचा राग आणि सुडाची भावना दोन्ही कायम असतात. एक दिवस तो पारोला सांगतो की १८ वर्षांपासून मला जी संधी हवी होती ती मिळाली. तुझ्या मुलीचं वाटोळं करून मी आपला बदला पुरा केला. मी तिच्या प्रियकराला मारून टाकलंय. आता तीही ह्यापुढे सुखाने जगू शकणार नाही. त्याचं हे बोलणं पुरं होतंय तोच पारोला आपल्या मुलीचे प्रियकराला साद घालणारे आर्त स्वर ऐकू येतात आणि तिच्या काळजाचं पाणी पाणी होतं.

ते आर्त स्वर अजून एका व्यक्तीला व्याकुळ करतात. तेही भारतात नव्हे तर पार परदेशात. आफ्रिकेत राहणाऱ्या सुनीलला दर रात्री एकच स्वप्न पडत असतं. त्यात त्याला दिसत असतं ‘विरान नगर’ नावाचं एक स्टेशन, तिथे असलेल्या हवेलीचा घुमट आणि त्यात उभ्या असलेल्या एका तरुण सुंदर स्त्रीची आकृती. तिच्या गाण्याचे सूर त्याला अस्वस्थ करून सोडतात. सकाळी उठून तो ते एकच चित्र काढत असतो. त्याचा मित्र रॉकी त्याला जेव्हा त्याबद्दल विचारतो तेव्हा सुनील म्हणतो की हे स्टेशन भारतात कुठेतरी आहे आणि मी ते नक्की शोधून काढणार. अर्थात रॉकी त्याच्याबरोबर निघतो.

ट्रेनमधून उतरताच स्टेशनचा बोर्ड पाहून सुनील अवाक होतो. ‘विरान नगर’ चं ते स्टेशन हुबेहूब त्याने स्वप्नात पाहिलेल्यासारखंच असतं. रॉकीला सामान उचलायला कोणीतरी हमाल शोधायला सांगून तो स्टेशनमास्टरकडे राहायच्या सोयीबद्दल चौकशी करायला जातो. सुनीलला पाहताच स्टेशनमास्टर म्हणतो ‘अरे कुमारसाहेब, तुम्ही कधी आलात? तुम्ही इथे यायला नको होतं. इथे तुमच्या जीवाला धोका आहे’. त्याने ‘कुमार’ असं संबोधल्यामुळे सुनील चक्रावतो. तो बाहेर येतो तेव्हा रॉकीने आणलेला टांगेवाला सुनीलला पाहताच टांगा घेऊन पळून जातो. दुसरा टांगा घेऊन हे दोघे ‘सरकार नाथ गेस्ट हाउस’ ला पोचतात तेव्हा रोज १० रुपये भाड्यावर खोली द्यायला तयार असलेला तिथला नोकर सुनीलला पाहून 'एकही खोली रिकामी नाही' असं म्हणतो. वैतागलेला रॉकी त्याला कारण विचारतो तेव्हा तो 'मी राजासाहेबांच्या हुकुमाविरुध्द जाऊ शकत नाही' असं म्हणतो. सुनीलला पाहून आणखीही काही गावकरी तिथून काढता पाय घेतात. सुनील जर कधी भारतात आलेलाच नाही तर हे लोक त्याला ‘कुमार’ का म्हणताहेत आणि त्याला एव्हढे घाबरताहेत का तेच दोघांना कळत नाही. आता ह्या अनोळखी गावात रहायचं कुठे ह्या विवंचनेत ते असताना सुनीलला पुन्हा कोणीतरी ‘कुमार’ म्हणून हाक मारतं. एका लाल गाडीशेजारी रात्रीच्या वेळेला छत्री घेऊन उभा असलेला एक माणूस सुनील आणि कुमारला आपल्यासोबत चला म्हणतो. सुनील अर्थातच त्याला ओळखत नाही तेव्हा तो माणूस चकित होतो. ‘मी तर तुझा मित्र आहे’ असं तो सुनीलला म्हणतो. पूर्ण गोंधळलेले हे दोघे त्याच्यासोबत गाडीत बसून जातात तेव्हा कोणीतरी लपून हे सर्व पहात आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही.


raaz5.jpg

हे दोघे त्या माणसाच्या घरी पोचतात तेव्हा घंटेचा आवाज ऐकू येतो. तो माणूस कुमारला सांगतो की हा हवेलीच्या घंटेचा आवाज आहे. मी गावकऱ्यांना सांगत होतो की तू पुन्हा येशील. पण मला सगळ्यांनी वेड्यात काढलं. पण बघ, तू आलास की नाही पुन्हा. घंटेचा आवाज ऐकून कुमार लगेच बाहेर पडतो. त्याला स्वप्नात ऐकू येत असतं तेच गाणं त्याला आता ऐकू येऊ लागतं. हवेलीच्या घुमटात तीच तरुणीची आकृती दिसू लागते. तो तिचा पाठलाग करतो पण त्याला तिचा चेहेरा दिसत नाही. वाटेत एके ठिकाणी एका शुभ्र फुलांच्या ताटव्याजवळून जाताना मात्र त्याला एक जीवघेणी वेदना जाणवते. का ते त्याला कळत नाही. शेवटी थकून तो घरी येतो तेव्हा त्याची वाट पाहत असलेला तो माणूस त्याला म्हणतो की सरकार नाथ यायच्या आधी ह्या गावातून निघून जा नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे. थकलेला, बेजार झालेला सुनील खोलीत जाऊन झोपेच्या आधीन होतो. पण स्टेशनवर त्याच्यावर पाळत ठेवून असलेला माणूस इथेही पोचतो. तो खिडकीतून सुनीलच्या खोलीत प्रवेश करतो पण त्याचवेळी रॉकी तिथे आल्याने पळून जातो. गडबडीत पळून जाताना त्याच्या हातातून पडलेला चाकू मात्र सुनील आणि रॉकीच्या हाती लागतो.

सकाळी रॉकी सुनीलच्या खोलीत येतो तेव्हा सुनील तिथे नसतो. पण दोन तरुणी, बेला आणि इंदू, मात्र कुमारबाबुला शोधत आलेल्या पाहून तो बुचकळ्यात पडतो. सुनील गावात असलेल्या सरकार नाथच्या खाणीत जातो तेव्हाही तिथल्या लोकांच्या हैराण नजरा त्याचा पाठलाग करत राहतात. ‘कुमार, कुमार’ ही कुजबुज त्याचा पिच्छा सोडत नाही. त्यात त्या मजुरांवर लक्ष ठेवणारा एक माणूस, ठाकूर सिंग, त्याला पाहून एकदम त्याच्यावर हल्लाच करतो. का तर म्हणे त्याने मजुरांसमोर त्याचा अपमान केला होता. बेला सुनीलला वाचवते. तो टांगेवाला, बन्सी, लपून हे सारं बघत असतो. मात्र सुनीलचं त्याच्याकडे लक्ष जाताच तो पळून जातो. बेला सुनीलला सांगते की बन्सीचा तुझ्यावर खूप जीव होता पण तू अचानक गायब झाल्यापासून ‘तुला मारून टाकलंय’ असंच काहीबाही बडबडायला लागला होता. सुनील तिच्या ह्या बोलण्याची संगती लावतोय तेव्हढ्यात ती त्याला विचारते की तू सपनाला भेटलास का? तुला बघून तिला खूप आनंद होईल. सुनीलला कळतं की सपना नावाचं हे आणखी एक कोडं आता आपल्याला सोडवावं लागणार आहे.

मात्र ठाकूर सिंग जेव्हा घरी जाऊन आपल्या बापाला, म्हणजे सरकार नाथच्या दिवाणजीला, सांगतो की ‘मी आज कुमारला खूप धुतलं’ तेव्हा त्याचा बाप म्हणतो की हे शक्यच नाही कारण कुमार परत येऊच शकत नाही.

त्या रात्री पैंजणाच्या आवाजाचा पाठलाग करत जाताना सुनीलला एक तरुणी दिसते. हीच सरकार नाथची मुलगी सपना असते. तीही सुनीलला ‘कुमार’ म्हणून हाक मारते आणि आपण त्याची वाट बघत असल्याचं सांगते. सुनील तिला सांगतो की मी इथे कधीच आलेलो नाहीये. मला काही आठवत नाही. तेव्हा ती त्याला त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल, ते कसे प्रेमात पडले त्याबद्दल सांगते. सरकार नाथला सपनाचं एका मामुली खाणकामगाराच्या प्रेमात पडणं साफ नामंजूर असतं. तो तिला बाहेर पडायची बंदी घालतो. तिने आपल्याला दगा दिला अशी कुमारची जवळपास खात्री होते पण ती भेटायला येते आणि ते पाहून खवळलेला सरकार नाथ कुमारला चाबकाने फोडून काढतो. गाववाल्यांनाही धमकी देतो की संध्याकाळपर्यंत कुमारला गाव सोडून जायला सांगितलं आहे. आणि कोणी त्याला मदत केली तर त्याचाही जीव घेतला जाईल. तरी बन्सी बेशुद्ध कुमारला सोडवतो पण वैद्य-हकीम-डॉक्टर कोणाच्याही इलाजांचा काही उपयोग होत नाही. डॉक्टर तर अल्टीमेटम देतात की दोन तासांत कुमार शुद्धीवर आला नाही तर तो वाचणार नाही. सपना हवेलीतून कशीबशी निसटते आणि कुमारपाशी येते. तिचा आवाज ऐकून तो शुद्धीवर येतो. पण सपनावर डोळा असलेला ठाकूर सिंग ती कुठे आहे हे सरकार नाथला सांगतो. सरकार नाथ ‘तुमचं लग्न लावून देतो’ असं खोटं सांगून सपनाला घेऊन जातो आणि तिला हवेलीत पुन्हा एकदा कोंडतो (ह्याला बहुतेक लोकांना कोंडण्यासाठीच देवाने जन्माला घातलं असावं!).

सपना एव्हढं सगळं सांगते तरी सुनीलला काहीही आठवत नाही. शेवटी ती कुमारने तिला दिलेलं लॉकेट त्याला काढून दाखवते. त्यात कुमारच्या आईचा फोटो असतो म्हणे. ते लॉकेट पाहून सुनील चक्रावतो कारण ते त्याचंच लॉकेट असतं. सुनील आणि सपना दोघांच्याही लक्षात येत नाही की सुनीलच्या खोलीत सुरा घेऊन शिरलेला माणूस हे सगळं लपून बघत असतो. (ह्याचा जन्म झालाय लपून लोकांचं बोलणं ऐकण्यासाठी!)


raaz3.jpg

बिचाऱ्या रॉकीला हे सगळं काय चाललंय तेच समजत नसतं. तो सारखा खोदून खोदून सुनीलला विचारत असतो की तू आफ्रिकेतून चार महिने गायब होतास तेव्हा इथे आला होतास का? सुनीलने त्या ४ महिन्यांची डायरी ठेवलेली असते. (ती त्याने भारतात का आणलेली असते ते त्यालाच ठाऊक!). पण जेव्हा आपण ते ४ महिने भारतात नव्हतो हे सिद्ध करायला तो ती रॉकीला आणून दाखवतो तेव्हा ४ जून ते ४ ऑक्टोबर मधली पानं नेमकी फाडलेली असतात.

भरीला भर म्हणून आता सरकार नाथ गावात परत येतो. ठाकूर सिंग लगेच त्याला कुमार परत आल्याची बातमी देतो. ह्या सगळ्या रहस्याचा छडा लावायचा चंग बांधलेला सुनील बन्सीला धरून ‘तू मला बघून का पळून जातोस’ असा खडा सवाल करतो. तेव्हा बन्सी त्याला सांगतो की कुमार शेवटी सरकार नाथला भेटायला गेला तेव्हा सरकार नाथच्या आदेशावरून त्याच्या दिवाणजीने कुमारला मारून त्याचा मृतदेह जंगलात पुरला आणि हे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं.

आता घटना वेगाने घडू लागतात. सरकार नाथ सपनाचं लग्न एका श्रीमंत पण वेड्या माणसाशी ठरवतो. बन्सीचा खून होतो. इतकंच काय तर त्याचा आळ सुनीलवर येतो. आणि कुमार मेलाय, तो परत येऊ शकत नाही हे सिद्ध करायला सरकार नाथ त्याला पुरलेली जागा खोदतो तेव्हा हिंदी चित्रपटांच्या महान परंपरेला जागून तिथून लाश गायब झालेली असते.....यानेकी सोचो Happy

तर मंडळी.....ही झाली चित्रपटाची कथा. सुनीलला स्वप्नात विरान नगरचं स्टेशन आणि सपना का दिसत असतात? त्याचा आणि कुमारचा काही संबंध असतो काय? कुमारचा मृतदेह कोण गायब करतं? सुनीलचा पाठलाग करणारी व्यक्ती कोण असते? बन्सीला कोण मारतं? सपनाची तिच्या आईशी भेट होते का? सपना आणि कुमारच्या प्रेमकहाणीचं काय होतं? ह्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मी लेखाच्या शेवटी देईनच पण ती तुमची तुम्हाला शोधायची असतील तर चित्रपट पाहायला हरकत नाही. मूळ चित्रपटाच्या किंवा त्याच्या आता उपलब्ध असलेल्या प्रतीच्या संकलनात असलेल्या दोषांमुळे काही प्रसंगांची संगती मध्येमध्ये लागत नाही. आपल्याला पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत (तशी ती कुठल्या हिंदी चित्रपटात मिळतात म्हणा!) पण तरी आपलं मनोरंजन करण्यात चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी झालाय असं मला तरी वाटतं.


raaz2.jpg

ह्या चित्रपटाच्या कास्टबद्दल केव्हा एकदा लिहिते असं मला झालंय. का माहित आहे? ह्यातली नायकाची भूमिका राजेश खन्नाने केली आहे. तसं पाहिलं तर १९६६ सालचा चेतन आनंदचा ‘आखरी खत’ हा त्याचा पहिला चित्रपट. पण त्याची बहुतांश कथा, निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी, एका छोट्या मुलाभोवती फिरते. राजेशला त्यात फार मोठा रोल नसावा. ह्या चित्रपटात मात्र श्रेयनामावलीत शेवटी बबिता आणि राजेश दोघांना introduce करण्यात आलंय. राजेशचा नायक म्हणून हा पहिला चित्रपट म्हणूनच मला खास करून पाहायचा होता. आणि समस्त जनहो, राजेश ह्यात इतका म्हणजे इतका क्युट दिसलाय की चित्रपटाच्या सुरुवातीला आफ्रिकेतल्या रात्रीच्या सीनमध्ये तो झोपेतून दचकून उठतो तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया ‘हाय मै मर जावा गुड खाके’ ही आणि दुसरी ‘ह्याची समजूत काढायला मी तिथे का नाही?’ अशी झाली. Wink कुठल्याही इन्फेक्शनची पर्वा न करता मी त्याला लिटरभर रक्त सांडून पत्र लिहिलं असतं इतकं गोड हसतो तो ह्या चित्रपटात. आता अभिनयाचं म्हणाल तर नायिकेसोबतची छेडखानीची, मिश्कील, romantic दृश्ये त्याने सहजतेने केली आहेत. पण एखाद्या व्यक्तीला लोकांनी दुसर्याच नावाने ओळखायला, हाक मारायला सुरुवात केली तर त्याचा/तिचा जो गोंधळ उडेल तो दाखवताना तो चांगलाच कमी पडलाय. गाण्यांच्या सिच्युएशन्समध्येही चेहेऱ्यावर नक्की काय भाव आणायचे ह्याबाबत तो बराच गोंधळलेला वाटतो. सरकार नाथ कुमारला चाबकाने फोडून काढतो त्या सीनमध्ये topless राजेशला पाहून पाप्याचं पितर साधारण कसं दिसत असेल ह्याची कल्पना येते Proud सपना झालेली बबिता ही अभिनेत्री मला कधी फारशी आवडली नाही. (इतक्या माठ चेहेऱ्याच्या बाईचं नाव काय सपना ठेवायचं? तीव्र निषेध!) चेहेऱ्यावर सदोदित नाटकी लाडिक भाव. इथे तर त्या भावाचाही अभाव आहे. दुष्काळच म्हणा ना. तिच्या चेहेऱ्यात (आणि अभिनयात!) कधी कधी विमी नटीचाही भास होतो एव्हढं सांगितलं तरी पुरे.


raaz4.jpg

सरकार नाथ ही खलनायकी भूमिका सप्रू ह्या अभिनेत्याने (माझी पिढी ह्याला तेज आणि प्रीती सप्रूचे पिताश्री म्हणून ओळखते) नेहमीच्या टेचात साकारली आहे. तरी त्याला पाहताना मध्येमध्ये ‘साहब, बीबी और गुलाम’ मधले मंझले बाबू विरान नगर मध्ये आलेत का काय असं वाटतंच. पारो म्हणजे रत्नमाला काही पटली नाही. रत्नमालाला सदोदित आईच्या (रडक्या!) भूमिकेत पाहून सवय झालेली. तिच्या प्रेमात पागल होऊन कोणी खून वगैरे करेल ये बात कुछ हजम नही हुई. बहूतेक सरकार नाथ पिऊन डोक्यावर पडला असावा. बाकी भूमिकात आय. एस. जोहर (रॉकी – ह्याच्या तोंडी ‘यानेकी सोचो’ हे पालुपद दिलंय), लक्ष्मी छाया (बेला), असित सेन (बन्सी), हरीन्द्रनाथ चटटोपाध्याय (लाल गाडीतला माणूस), कमल कपूर (सुनीलचा पाठलाग करणारा माणूस) आणि मीना टी (इंदू) दिसतात. हो आणि, ठाकूर सिंगची भूमिका करणाऱ्या राहुल नावाच्या अभिनेत्यालाही ह्या चित्रपटात introduce केलं गेलंय. नावाच्या भाऊगर्दीच्या शेवटी एखाद्याला असं introduce केलेलं मी तरी प्रथमच पाहिलंय.

अकेले है चले आओ आणि दिल संभाले संभलता नही आज तो ही दोन गाणी आवडीची. बाकी मला तरी खास वाटली नाहीत.

चित्रपटात कच्चे दुवे भरपूर आहेत. त्याबाबतीत लिहिताना चित्रपटाचा रहस्यभेद अपरिहार्य आहे. त्यामुळे हा चित्रपट पहाणार असाल तर पुढे वाचू नका.

.......
.......
.......

कच्चे दुवे पाहण्याआधी चित्रपटाच्या रहस्याची उकल जाणून घेऊ. कुमार आणि सुनील जुळे भाऊ असतात. सुनील आफ्रिकेत असतो. तो आणि त्याचा मित्र (जो नंतर सुनीलचा पाठलाग करत असतो) भारतात कुमारला भेटायला आलेले असतात. कुमारची हत्या होते त्या रात्री त्यांना कुमार जखमी असून नदीपल्याडच्या गावात आहे एव्हढं कळतं. ते तिथे चाललेले असतात तेव्हा कुमार सरकार नाथला भेटायला निघालेला असतो. सरकार नाथच्या एक माणसाने कुमारच्या डोक्यात काठी घालून त्याला बेशुद्ध केल्याचं त्यांना दिसतं. सुनीलचा मित्र सुनीलला मदत आणायला पाठवतो पण सरकार नाथ त्यालाच कुमार समजून त्याची हत्या करवतात आणि त्याला पुरून टाकतात. काठीचा घाव बसल्याने कुमारची स्मृती जाते म्हणून त्याला सुनील म्हणून आफ्रिकेला रवाना केलं जातं. थोडक्यात मरतो तो सुनील आणि आफ्रिकेहून परत येतो तो कुमार.

मला पडलेले प्रश्न असे - सुनील आफ्रिकेत बऱ्यापैकी सधन दिसत असतो पण कुमार भारतात मजुराची कामं का करत असतो? कुमार सपनाला आपल्या आईचा फोटो असलेलं लॉकेट देतो पण जुळ्या भावाबद्दल काहीच का सांगत नाही? का त्याला सुनीलबद्दल माहितच नसतं? स्मृती हरवलेला कुमार आफ्रिकेत सुनील म्हणून कसं निभावून नेतो? तो स्वत:ला नंतर सुनील समजू लागला असेल तर आपला एक जुळा भाऊ होता ह्याची जाणीव करून देणारे फोटो म्हणा, पत्रं म्हणा काहीही त्याला कसं मिळत नाही? कारण सुनीलला कुमारबद्दल माहिती असते. कुमार किती काळाने परत भारतात येतो? सुनीलचा मित्र असणारा तो माणूस कुमारच्या खोलीत सुरा घेऊन रात्री का शिरतो? सुनीलच्या डायरीची पानं कोणी फाडलेली असतात? का?

अर्थात ह्या प्रश्नावलीच्या जोडीला गोल्डन एरातले चित्रपट पाहताना पडणारे नेहमीचे प्रश्न आहेतच. उदा. साधा खाणकामगार असलेला कुमार बरयापैकी कपडे घालून कसा फिरत असतो? बघावं तेव्हा सपनाची वाट बघत बसलेला असतो तर काम कधी करतो? वगैरा वगैरा वगैरा.....असो. त्रिकालाबाधित सत्य हे की असल्या प्रश्नांची उत्तरं अनादिअनंत कालापर्यंत बापड्या प्रेक्षकांना मिळणार नाहीत.

तसंही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायलाच पाहिजे असा अट्टाहास करायला आपण वेताळपंचविशीमधला वेताळ थोडेच आहोत? Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. पारो म्हणजे रत्नमाला काही पटली नाही. रत्नमालाला सदोदित आईच्या (रडक्या!) भूमिकेत पाहून सवय झालेली. तिच्या प्रेमात पागल होऊन कोणी खून वगैरे करेल ये बात कुछ हजम नही हुई. बहूतेक सरकार नाथ पिऊन डोक्यावर पडला असावा.>>>> Rofl

मस्त लिहीलय स्वप्ना. राज मधली गाणी गाजलीत. पण राज मध्ये आशा पारेख आहे असे मला उगीच वाटायचे. तरी सिनेमा मी बघीतलेला नाही, आता टिव्हीवर आला तर बघेन.

सिनेमा पहाण्यापेक्षा तुमच्या लेखातून तो वाचायला जास्त धमाल येते. एखादा पाहीलेला सिनेमा तुमचा लेख वाचून पुन्हा पाहीला तर कसा वाटेल याचा विचार करुन हसू येतय.
मस्तच लिहिलय.

स्वप्ना, किती सुंदर लिहिलंय. आणि तू चांगलं जरी लिहिलं नसत ना, तरीही मला लेख आवडला असता, फक्त माझ्या RK साठी.
भलेही तो माझ्या आधीच्या पिढीतील असेन, भलेही तो माझ्या आईलाही आवडत असेन, पण त्याच्यावरच प्रेम तसूभरही कमी होत नाही.

ह्या चित्रपट बद्दल कधी ऐकलं नव्हतं . काल युट्युब वर डाऊनलोड करून पाहिला केवळ राजेश खन्‍नामूळे.

एकतर रिळे संपली असावीत म्हणून कुठल्याही रहस्याचा भेद केला गेला नाही किंवा यु ट्यूबवर चित्रपट कापला असणार. नाहीतर आफ्रिकेतून आलेल्या सुनीलच्या जागी कुमारला परत कोण घेऊन गेला? मित्र म्हणवणारा असा शत्रूसारखा पाठलाग करत फिरतो? यानेकी सोचो स्वतःच उद्योग सोडून कुमार उर्फ सुनीलसोबत भारतात येतो याचाच अर्थ तो सुनीलचा जुना मित्र असणार. मग त्याला सुनीलच्या जागी कुमार आलाय हे माहीत असणार.

जाऊदे, प्रश्न खूपच जास्त आहेत. काय काय लिहिणार.

राजेश खन्ना त्या काळाच्या तुलनेत खूपच हँडसम दिसतो.
अजून आकर्षक दिसण्यासाठी स्वतःला कसे प्रेसेंट करायचे हे तो नंतर शिकला असणार. चित्रपटात त्याचे नवखेपण खूप उठून दिसते आणि त्याच्या त्या जगप्रसिद्ध अदांचा त्याला शोध लागला नव्हता हेही लक्षात येते. बहुतेक आराधनात त्याला शोध लागला असणार.

बबीताबद्दल काय बोलणार? ती पूर्ण मंदबुद्धी दाखवलीय. (रिकामी) बॅग घेऊन ती घर सोडून येते तेव्हा 'का उठलीयेस बाई तू प्रियकराच्या जिवावर' विचारावेसे वाटले.

अकेले है चले आओ.... ऑल टाइम फेवरीट. राजेशवर चित्रित झाले हे माहीत नव्हते. Happy

चित्रपट थोडा गोव्यातील खाणीत व थोडा बर्फाळ शिमल्यात चित्रित झालाय. तेव्हा खाणकामगाराना इतका पगार मिळायचा हे चित्रपटामुळे कळले. राजेश इस्त्रीचा शर्ट, त्यावर स्कार्फ, त्यावर वेगवेगळे कोट, कडक इस्त्रीची पॅन्ट, खाली चकचकीत पोलिश केलेले लेदर शूज वगैरे थाटात सतत वावरतो. एकातरी दृश्यात त्याला अगदीच दगड फोडताना नाही तरी जेसीबी किंवा ट्रक चालवताना दाखवायला हवे होते. गेलाबाजार डोक्याला गमछा गुंडाळून, हातात एलुमिनियम डब्बा घेऊन कामावर जाताना जरी दाखवले असते तरी चालले असते.

ठाकूर सिंग ची भूमिका करणारा एकटा राहुल काय तो गांभीर्याने काम करताना दिसला. बिचार्याला परत कधीही संधी मिळाली नाही व नवखेपणा उठून दिसणारे बबिता, राजेश स्टार झाले Sad

'प्यार किया तो मरणा क्या' पॅरोडीसॉंग छ्यागीतात पाहिले होते कधीतरी. अकस्मात इथे बघायला मिळाल्याने थोडा आनंद नक्कीच झाला.

रच्याकने, तेव्हा चित्रपटात लोक स्वतःचेच कपडे वापरायचे काय? राजेशने घातलेले कोट व स्कार्फ त्याच्या नंतरच्या चित्रपटातही पाहिले आहेत. बबिताचा पांढरा घागर पोलका तिने नंतरही वापरलाय.

राजेशने घातलेले कोट व स्कार्फ त्याच्या नंतरच्या चित्रपटातही पाहिले आहेत. बबिताचा पांढरा घागर पोलका तिने नंतरही वापरलाय.>>> साधनाताई किती बारकाईने पिक्चर पाहतेस! कमाल आहे. Lol

अप्पा, राजेश खन्नाची मी जबरदस्त फॅन आहे. त्याच्यासारखा रोमँटिक हिरो कधी झाला नाही, होणार नाही. तो त्याच्या स्पेशल अदा करत कॅमेऱ्याच्या डोळ्यात वाकून पाहायचा तेव्हा समस्त स्त्रीवर्गाला तो त्यांच्याच डोळ्यात वाकून पाहतोय असा भास व्हायचा. इतर रोमँटिक हिरो रोमान्स करतानाही स्वतःच्याच प्रेमात असलेले स्पष्ट दिसते, राजेश कायम समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात बुडालेला वाटायचा. असो. मी या विषयावर किती वाहात जाईन हे मला सांगता येणार नाही Happy Happy

आणि बबितासारखा भयंकर ड्रेसिंग सेन्स असलेली बाई मी पाहिली नाही. तिने फक्त 19 चित्रपट केले असे नेटवर वाचले. पण चित्रपटगणिक तिचा ड्रेसिंग सेन्स अजून घसरत गेला. त्यामुळे तिचे कपडे लक्षात राहीले Happy

काल रात्री 'आखरी खत' बघितला. आजच्या काळाच्या मानाने खूप स्लो वाटेल पण अतिशय सुंदर चित्रपट आहे. चेतन आनंदने दिग्दर्शित केला आहे. सगळ्यात सुंदर काम 15 महिन्याच्या मुलाचे झालेय. त्याच्याकडून कसे काम करून घेतले आणि तेही इतक्या कमी कालावधीत हा प्रश्न पडतो. लहान मुले भराभर वाढतात, त्यामुळे दोन तीन महिनयात चेहऱ्यात फरक दिसतो आणि इथे तर तीन दिवसात कथा घडते हे दाखवायचे होते. 'बहारो, मेरा जीवनभी संवारो' हे एकच गाणे माहीत होते. रफीचे 'कुछ और देर ठेहर जाओ' हे एकदम वेगळे, अनवट गाणे काल पहिल्यांदा ऐकले. राजेश खन्नाचा रिलीज झालेला पहिला चित्रपट. तो अजिबात नवखा वाटत नाही (राजमध्ये वाटतो तसा), खूप चांगला अभिनय केलाय.

आखरी खतला आमच्या घरात स्पेशल स्थान होते. आईने पाहिलेला हा पहिलाच चित्रपट, त्याआधी तिला चित्रपट हा प्रकार ऐकूनही माहीत नव्हता. त्यामुळे कित्येक वर्षे याची कथा घरात ऐकलेली आहे. हिरो- हेरॉईन वगैरे लोक असतात हे माहीत नव्हते, त्यामुळे स्टोरी सांगताना राजेशचा उल्लेख कायम चौकडीच्या शर्टवाला म्हणून व्हायचा Happy Happy

किल्ली, रश्मी, शाली, फेरफटका, rmd, अनघा, महाश्वेता,देवकी, अ‍ॅमी, अज्ञातवासी धन्यवाद Happy

साधना, अगदी अगदी. राजेश आणि बबिताबद्दलच्या पोस्टला अनुमोदन. मी आखरी खत पाहणार नाही. मागे ब्लॅक आणि व्हाईट चॅनेलवर लागला होता. तेव्हा ते छोटंसं पोर रस्त्यावर इथेतिथे झोपलेलं असतं असा काहीतरी सीन पाहून पोटात खड्डा पडला. Sad शेवट चांगला असला तरी माझ्याच्याने काही बघवला जाणार नाही.

हो, ट्रॅकवर दोन लाकडी पट्ट्यांमध्ये मूल झोपलेय व वरून ट्रेन धडधडत जाते हा एक सिन आहे. ममा, ममा एवढेच बोलता येत असते त्याला. बघताना खूप वाईट वाटते आणि खूप भीतीही.

मुंबईतले बरेचसे शूटिंग माहीमच्या चर्चभोवती व त्याच्या समोर थोडे पुढे असलेल्या बांबूच्या वखारीत झाले आहे. त्याला लागूनच पुढे येणारा बांदऱ्याचा एसवी रोड, तिथली मशीद, बांद्रा स्टेशन हा परिसर पण दिसतो. बांबू वखारीच्या पुढे माहीम कॉजवेचा समुद्र होता, कोळ्यांच्या बोटी होत्या, समुद्राच्या लाटांसकट किनारा होता, जिथे लोक संध्याकाळी फिरत असत. हे सगळे चित्रपटात आहे, आता तिथे रिकलेम केलेली जागा व त्यावरची घरे आहेत. 50-55 वर्षांपूर्वीच्या मोकळ्या ढाकळ्या मुंबईचे विलोभनीय चित्रण यात आहे.

मुलाची आई वखारीत बांबूआड लपून मुलासोबत लपाछपी खेळत असे, आई गेल्यावर त्या रिकाम्या वखारीत ममा ममा हाक मारत फिरणारा बन्टु बघून भरून येते.

मस्त लिहलंय

सिनेमा पहाण्यापेक्षा तुमच्या लेखातून तो वाचायला जास्त धमाल येते << +100

स्वप्ना, नेहमीप्रमाणेच छान लेख. पण लेख वाचतांन डोळ्यांसमोर सारखा सुनिल दत्त येत होता. आणि, " पण एखाद्या व्यक्तीला लोकांनी दुसर्याच नावाने ओळखायला, हाक मारायला सुरुवात केली तर त्याचा/तिचा जो गोंधळ उडेल " sunil dutt wld hv nailed this!

> पण लेख वाचतांन डोळ्यांसमोर सारखा सुनिल दत्त येत होता. > +१ Lol

बादवे स्वप्ना, तू सिनेमा कुठून डाऊनलोड करते? मी परवा युट्युबवरून प्यासा डाउनलोड केला, रिझोल्युशन 720p दिसत असूनही लॅपटॉपवर बघताना खूप ब्लर दिसतोय. हाय क्वालिटीचे काळेपांढरे सिनेमे कुठे मिळतील?

खरंच मस्त लिहीता तुम्ही ही पिक्चर ची सिरीज.
सिनेमा पहाण्यापेक्षा तुमच्या लेखातून तो वाचायला जास्त धमाल येते << बरोबर.

तो त्याच्या स्पेशल अदा करत कॅमेऱ्याच्या डोळ्यात वाकून पाहायचा तेव्हा समस्त स्त्रीवर्गाला तो त्यांच्याच डोळ्यात वाकून पाहतोय असा भास व्हायचा. इतर रोमँटिक हिरो रोमान्स करतानाही स्वतःच्याच प्रेमात असलेले स्पष्ट दिसते, >>>>>बरोबर, , for example देव आनंद Happy ( खरंतर हा माझा लाडका हिरो. But आहे ते आहे Happy ).