पवन बावरी

Submitted by Asu on 17 June, 2019 - 01:40

पवन बावरी

वाऱ्याची मंद झुळूक अंगी
साजण सय घेऊन यावी
काळे कुंतल चेहऱ्यावरती
नभाआड चंद्र झाकून जावी

मनी आठवून छैल छबिला
रंगीन याद उमलून यावी
अलगद काटा अंगी फुलता
स्वये स्वतःला मिठी मारावी

झुळूक होऊन फुला छळावे
बागेमध्ये स्वछंद पळावे
पंख पसरून धुंद मनाचे
निळ्या आकाशी उंच उडावे

पांघरूनि सखी रात्र काळी
चांदण्यांना मस्त हूल द्यावी
चांदोबाच्या गाडीत बसुनि
नभांगणाची सहल करावी

हिंडून फिरून रात्र काळी
सूर्य रथावर उडी मारावी
उतरून क्षितिजी उषःकाली
सागरात मस्त बुडी मारावी

पवन बावरी पवन होऊनि
आसमंतात विरून जावी
जगता जगताही कधीतरी
दुनियेची ऐसी सैर करावी

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!
नभाआड चंद्र झाकून जावी>>>येथे चंद्रकोर हवय का?

शालीजी नमस्कार,
जर आपण 'जाणे' हे क्रियापद चंद्राच्या संदर्भात वापरले तर आपले म्हणणे बरोबर आहे. म्हणजे 'चंद्र झाकला जावा' किंवा 'चंद्रकोर झाकली जावी' असे.
परंतु माझी कविता झुळुकीबद्दल असल्याने या कवितेत 'झुळूक यावी आणि ती चंद्र झाकून जावी' असे आहे. म्हणजे थोडक्यात, जाणे हे क्रियापद चंद्राबद्दल नसून झुळुकीबद्दल आहे. त्यामुळे कवितेच्या आशयानुसार 'जावी' हे जास्त बरोबर वाटते. आपले म्हणणेही चुकीचे आहे असे नाही.
आपल्यासारखे बारकाईने अर्थ समजून कविता वाचणारे रसिक आज-काल कमीच. अशीच आस्था व आपुलकी माझ्या कवितेबद्दल असू द्यावी.
आपल्या सूक्ष्म निरीक्षणाबद्दल धन्यवाद! असो.