जीवनात तेच काम करा जे तुम्हाला आवडतं..

Submitted by पशुपत on 14 June, 2019 - 01:39

गेले कित्येक वर्षे विविध व्यासपीठांवर एक विचार अतिशय जोरात व्यक्त होताना आपण सर्वांनी पाहिला आहे.
"जीवनात तेच काम करा जे तुम्हाला आवडतं.."
हे सांगण्यासाठी , तरूण मुलांवर ठसवण्या साठी विविध कथा आणि दाखलेही दिलेले असतात.
उदाहरणादाखल , लता बाईंनी जर रूढ व्यवसाय किंवा जीवनपद्धती अवलंबली असती तर ? सचिनने शाळा - कॉलेज - नोकरी केली असती तर ? अमिताभ जर नोकरीत समाधानी राहिले असते तर ? भीमसेन जी संगीत शिकण्यासाठी घर सोडून पळून गेले नसते तर ?
तर ते "लता दीदी" आणि " सचिन", "अमिताभ","भीमसेन" होऊ शकले नसते. या व्यक्तींची उदाहरणे आणि आदर्ष डोळ्यासमोर ठेवा.. या पारंपारिक ,नोकरी व्यवसाय या चक्रात पडू नका. "तुम्हाला काय मनापासून आवडतं तेच करा !"

मला सुरुवातीला हे ऐकले तेव्हा खूप प्रेरणादाई वाटले होते... पण जसे जीवनरहाटीचे अनुभव येत गेले तसे हे 'Preeching' मुळात कुठे तरी फसलेले किंवा 'फसवे' आहे असा अंदाज येऊ लागला..
आणि तर्कसंगत विचार करू लागल्यावर मात्र हे पूर्ण चुकिचे मार्गदर्शन आहे हे स्पष्ट होऊ लागले.

असे आदर्ष ठेवणे हे अगदीच बरोबर आहे ! त्यांच्या उदाहरणाने प्रेरणा घेऊनच आपण झपाटून परिश्रम करून उच्चतम पदावर पोहोचू शकू !
पण हे सगळ्यांना करणे शक्य आहे का ?
हा साप-शिडीचा खेळ आहे.
यात यशापासून वंचित ठेवणार्या भरपूर शक्यता निसर्गानेच वाटेत पेरून ठेवल्या आहेत !
सर्वप्रथम तुमच्यात ती नैसर्गिक देणगी आहे का ? तिला पोषक असे वातावरण तुमच्या भोवती आहे का ? त्यासाठी लागणारे त्या प्रतीचे मार्गदर्षन / शिक्षण तुमच्या पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे का ? तुमची स्वतः ची त्या कोटीचे परिश्रम घेण्याची शारिरिक आणि मानसिक क्षमता आहे का ?
आणि हे सगळे निश्चित मिळाले तरी शेवटी नशिबाचे फासे तुमच्या बाजूने पडणार का , हे तर कोणीच सांगू शकत नाही.

त्यामुळे ज्यांना नेहमीचे जीवन जगण्यासाठी अर्थार्जनाची गरज नाहिये , आणि ज्यांच्यात तो Spark आणि धमक आहे अशांनीच या वाटेकडे थेट वळावे.

आणि बाकीच्यांनी सर्वप्रथम अर्थार्जनासाठी आवश्यक असलेले जे गुण आपल्या जवळ आहेत ते जाणून त्या सुयोग्य व्यवसायात - नोकरीत पडून जीवनात भक्कम पणे उभे रहावे.. आणि मग पूर्ण धडाडीनेच यात पडावे..
अर्थात हे झालेमाझे वैयक्तिक मत.
आणि हो !
अपल्याला फक्त यशस्वी झालेले लतादीदी , सचिन , अमिताभ आणि भीमसेनजी च माहिती आहेत !
सचिन आणि अमिताभ बनण्याच्या नादात किती जणांची काय अवस्था झाली हे सांगणारे नाहियेत कोणी !

"३ इडियेट्स " या चित्रपटात हे अतिशय सहजपणे प्रेक्षकांच्या नकळत प्रभावीपणे मांडले आहे

शेवटी ,मला तुकाराम महाराजांच्या अभंगातली ओळ आठवते.
'आधी सोज्वळ करावा मारग
चालता ते मग गोवी नाही '

या संदर्भातली वाचकांची मते जाणून घ्यायला निश्चित आवडेल !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अनुमोदन पशुपत जी. मलाही असेच अनेकजण जे सचिन वा लता (ही उदाहरणे ठरलेली असतात म्हणून) बनण्याची आस घेऊन प्रत्यक्षात मात्र तितकी उंची गाठू शकले नसतील त्यांचाच विचार येतो. 3 idiots वर हाच आक्षेप घ्यावासा वाटतो कारण आवडतं ते करून अपेक्षित आर्थिक सुस्थिती वा सन्मान मिळेलच असे नाही. आवडला लेख. छानच मीमांसा केली आहे. अर्थात आशावाद ही चांगला मांडलाय.

सचिन आणि अमिताभ बनण्याच्या नादात किती जणांची काय अवस्था झाली हे सांगणारे नाहियेत कोणी>>>> सचिन, अमिताभ, लता बनायला जाल तर नक्कीच तोंडावर पडाल, कारण ही सगळी माणसं ऑलरेडी त्या जागेवर आहेत, तो ठोकळ्यांचा गेम असतो ना ठराविक ठोकळा एका जागी बसला की दुसरा त्याच आकाराचा ठोकळा तिथे बसत नाही, असंच काहीसं आहे हे.सचिन सचिन झाला, तो डॉन ब्रॅडमन नाही झाला. बाकी तुमच्या सगळ्या लेखासोबत सहमत.

सचिन, अमिताभ बनायला जाऊ नका पण लता बनायला जाणे सेफ बेट आहे....हिट झालात तर मजा आहेच, नाही झालात तरी तूनळी, इंस्टा, एफबी वरती विडिओ टाकून पैसे कमवू शकता मजबूत.

आणि बाकीच्यांनी सर्वप्रथम अर्थार्जनासाठी आवश्यक असलेले जे गुण आपल्या जवळ आहेत ते जाणून त्या सुयोग्य व्यवसायात - नोकरीत पडून जीवनात भक्कम पणे उभे रहावे.. आणि मग पूर्ण धडाडीनेच यात पडावे.. >> +1
पशुपत जी आपल्या विचारांशी सहमत. आपण जरा डोळसपणे पाहिले तर आपल्याला असे बरेच लोक दिसतील. कदाचित ते वर उल्लेख केलेल्या कलाकरान एवढे यशस्वी नसतील, पण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळाल्याने समाधानी नक्कीच असतील.

आपल्या मुलाचे/मुलीचे कौशल्य, मनोनिग्रह लक्षात घेऊन पालकांनी दोन्ही विचारांचा समन्वय साधायला हवा.
वर कला, क्रिडाक्षेत्रातील उदाहरणे आहेत. पण बाबा आमटे, डॉ. बंग, कलाम, किरण बेदी अशी अनेक उदाहरणेही आहेत ज्यात शिक्षण महत्वाचे आहे.
त्यामुळे पालकांनी मुलांना रेसमधे न उतरवता त्यांच्या आवडत्या विषयांचा अभ्यास करु द्यावा. इतर विषयांमधे पासींगपुरते मार्क्स मिळाले तरी पुरेसे आहेत.

सगळ्यांंचे विचार वाचून बरे वाटले.
शाली , ते तर आवडीचा विषय म्हणून आयुष्य भर करता येईल
बुन्नू , 'यशस्वी होणे' म्हणजे नेमके काय यावर वेगळा लेखच लिहायला हवा.
सुलू , you said it.
प्राचीन, अँमी धन्यवाद
च्रप्स ..तोही पर्याय उत्तम.
बोकलत , खरे आहे तुमचे.

बरोबर आहे पशुपत.
आवडीचे काम करून पुढे जायलाही प्रचंड इच्छाशक्ती, योजना, डेडिकेशन आणि अथक परिश्रम लागतात.
त्यात प्रस्थापित कला, खेळ वगैरे क्षेत्रांमध्ये भयंकर स्पर्धा आहे, इतर दिग्गजांमूळे त्यातील यशाचे मानक किती उंचावून ठेवले आहेत. तेव्हा अशा क्षेत्रात तर एकदमच कसोटी लागेल.

सहमत. लेख आवडला. माझ्या लेकीच्या डोक्यातून हे खूळ काढण्यासाठी केलेली धडपडही आठवली. खरोखरच “जीवनात तेच काम करा जे तुम्हाला आवडतं” हा एक अतिरंजित (हाईप्ड ?) विचार आहे आणि तो इथे अमेरिकेत तरी करियर निवडीच्या निमित्ताने १०वी /११वीच्या अर्धवट वयाच्या मुलांसमोर शाळांमधल्या काउन्सिलरकडून इतक्या जोरकसपणे मांडला जातो की त्याविरोधात मुलांना समजावणे कठीण जाते.
केवळ ईजिप्तच्या पिरॅमिडसमध्ये रस आहे , म्हणून लेकीला ‘त्यावेळी’ archaeologist व्हावेसे वाटत होते पण तिथल्या खडतर प्रदेशात, विषम हवामानात अथक काम करण्याची क्षमता तिने कधीच अजमावलेली नव्हती. तिची अंगकाठी अाणि एकूणच सुखवस्तू राहणीमानाकडे असलेला कल बघता हे प्रकरण तिला झेपणारे नाही आणि यात वेळेची आणि आमच्या पैशाची नासाडी होणार हे आम्हा नवराबायकोला स्पष्ट दिसत होते. Happy
शाळेतल्या मैत्रिणींचे आईवडिल (आमच्यापेक्षा!) किती ‘कूल’ आहेत हे वारंवार ऐकूनही संयम ठेवून संवाद चालू ठेवणे आणि तिच्या कलाने दुसऱ्या पर्यायांचा शोध घेत रहाणे इतकेच हातात होते. आमच्या आपसातल्या बऱ्याच चर्चासत्रांनंतर सुदैवाने ती एका पर्यायासाठी राजी झाली आणि त्यात तिला इतकी रूची निर्माण झाली की पुढे तिने त्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय स्वत:च घेतला आणि ईजिप्तचा विषय कायमचा मागे पडला! आता त्या चर्चा आठवल्या की तिलाच हसू येते. पिरॅमिडस बघायला मात्र जायचे आहे एकदा Happy
(टीप: ही पोस्ट लिहिताना कुणाही archaeologists ना दुखावण्याचा किंवा कमी लेखण्याचा हेतू नाही. उलट त्यांच्या कामाविषयी अादरच आहे. ही पोस्ट लेखाशी संबंधित स्वानुभव म्हणून लिहिली आहे.)

चंद्रा =अनुमोदन. विशेषतः असे कूल आईवडील कोणी खरंच असतात का हेही पडताळून बघावसं वाटतं. कदाचित मुलांच्या हट्टापायी हे जबरदस्तीने दाखवलेलं कूल पण असण्याची शक्यता आहे.

लेखाशी सहमत.
आवडत्या क्षेत्रात काम करण्याचा माझा स्वानुभव आहे. भले पैसा कमी कमावल्या जात आहे (खाउन पिऊन सुखी) पण मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे.

<<आवडीचे काम करून पुढे जायलाही प्रचंड इच्छाशक्ती, योजना, डेडिकेशन आणि अथक परिश्रम लागतात<< +100

इथे एक शेर आठवला...
वो चंद ही लोग थे जिनके जुनूँ को पनाह मिली...
और जो पागल हुए उनका कोई हिसाब नहींं..!

चंद्रा ,तुम्ही कोणत्या दिव्यातून गेलात याची कल्पना करू शकतो... तुमच्या धैर्याची आणि चिकाटी चे खरंच कौतुक आहे.. मुलांच्या मनातून उतरणे हे फार कटू असते.

पटले.
रत्नाकर मतकरींची याच आशयाची गोष्ट आहे.बाप कडक, सक्तीने कॉर्पोरेट जॉब करायला लावला म्हणून खंत करणारा मुलगा आपल्या मुलाला अभ्यास न करता त्याचा आवडता गायनाचा छंद जोपासायला लावतो आणि त्यातून विशेष पैसे आणि स्थैर्य न मिळाल्यावर मुलगा बापाच्या निर्णयाला दोष देतो.
सध्या याच तत्वांचा वापर करून त्या कलेत फार चांगलं नसलेल्या मुलांना स्वप्न विकणं आणि आपला पैशाचा ओघ चालू ठेवणारे क्लास वाले आजूबाजूला दिसतात.

माझ्या मनातही 'आवडते ते काम करा' आणि 'जे कराल ते आवडीने करा' ह्या बाबत विचारांचा गोंधळ होता.
पण मध्यंतरी सदगुरु जग्गी वासुदेव ह्यांचा एक व्हिडीयो पाहण्यात आला आणि ह्या संदर्भात त्यांचे विचार मला पटले. कोणत्या तरी सेलेब्रिटीने त्यांना विचारले होते की It is always said, 'do what you love' and 'love what you do' which of the two is the right thing. His answer was 'simply do what is needed'.

प्रत्येकाच्या स्थिती-कालानुसार प्रत्येकाने हे मनात बाळगले पाहिजे की त्या त्या वेळेला जे जे करणे गरजेचे आहे / कर्तव्य आहे ते ते तेव्हा तेव्हा केले पाहिजे. प्रत्येकाचा स्थिती काल बदलू शकतो (किंबहुना आपण तो बदल घडवूनही आणू शकतो) आणि मग त्याप्रमाणे काय करायला हवे किंवा काय करायला मिळेल ते ही बदलेल.

Doing what you love is freedom. Loving what you do is happiness.
One needs to decide whether he would rather be free or happy.
पोट भरलेलं असलं की जे आवडेल ते काम करता येतं.