पुन्हा एकदा ....रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन...

Submitted by अतुल ठाकुर on 12 June, 2019 - 19:01

hqdefault_5.jpg

पावसाळी गाणं म्हटलं की हटकून दरवेळी आठवतं ते लताचं "रिमझिम गिरे सावन". खरं तर आठवतं म्हणणं बरोबर नाही कारण या गाण्याचा कधी विसरच पडत नाही. इतकं ते मनाला व्यापून राहिलं आहे. अनेकदा वाटतं या गाण्याची आपल्याला इतकी ओढ का बरं वाटते? आपण जुन्यात रमणारे आहोत म्हणून? तसं असेलही कदाचित. मला या गाण्याबद्दल जी ओढ वाटते त्याची तुलना स्त्रियांना माहेरची जी ओढ वाटते तिच्याशी कराविशी वाटते. काहीतरी कायमचं दूर गेलं आहे. तेथे नातं आहे. पुन्हा जाताही येईल पण खरंच पुन्हा त्या दिवसात जाता येईल का? त्या जुन्या मैत्रिणी, ती शाळा, तो रस्ता, ते शिक्षक शिक्षिका तसेच भेटतील का? ते आई बाबा तरी इतक्या वर्षांनी तसेच असतील का? आणि खरं म्हणजे आपण तरी तसेच राहतो का? आपणही बदललेले असतोच की. त्यामुळेच ती एक अनामिक हुरहुर वाटत असते. सतत वाटत राहते. आणि म्हणूनच जुन्याची ओढ वाटते आणि "रिमझिम गिरे सावन" ची ही.

जुनी मुंबई ती उरलेली नाही. हे गाणं जेथे छायाचित्रित झालंय तो भाग आमच्या झेवियर्सच्या आसपासचाच. आता मेट्रोसाठी तो भाग खोदून ठेवलाय. फुटपाथवर पत्र्याच्या शेडस बांधल्या आहेत. काही वर्षांनी कदाचित आझाद मैदानच दिसणार नाही. मग तिथे पाण्याचं थारोळं साचणार कसं आणि त्यात अमिताभ आणि मौशमी पावसाची मजा लुटणार कसे? आता ते कुठलासा चमत्कार होऊन पुन्हा तरुण होऊन आले तरी तसे धाऊ शकणार नाही. मेट्रोसाठी खोदलेले खड्डे मध्ये येतील. आताचा अमिताभ आणि आताची मौशमी कदाचित मुंबईत पावसात मनमुराद भिजण्याऐवजी कुठल्यातरी वर्षासहलीला किंवा ट्रेकला जाऊन तेथे मोबाईलने फोटो काढतील आणि ते इन्स्टाग्रामवर टाकण्याची घाई करतील. त्यांच्या भिजण्याचाही इव्हेंट होईल. थोडक्यात काय तर मुंबईचे जुने रुप आता बदलत चालले आहे. आणि माणसांचेदेखिल. जाऊ देत. आपल्याला पावसाचाही आनंद लुटायचा आहे आणि गाण्याचाही.

लताच्या आवाजाने चिंब भिजल्याचा अनुभव येतो हे मी वारंवार लिहिले आहे. तसे त्या आवाजात एका नवथर तरुणीची कोवळीकही जाणवते. आवाजात अशी कोवळीक आणणे फक्त लताबाईच करु जाणे अशी माझी नम्र समजूत आहे. दरवेळी येणारा पावसाळा यावेळी वेगळा का वाटतो याचं त्या तरुणीला कोडं पडल्यासारखं वाटतं आणि त्याचं उत्तरही तिला माहीत आहे. कारण यावेळी ती प्रेमात आहे आणि "तो" तिच्या बरोबर आहे. त्यामुळे यावेळचा पावसाळा तिला "महकल्यासारखा" आणि "बहकल्यासारखा" वाटतो. प्रेमात पडल्यावर जाणारा प्रत्येक क्षण हा सुगंधी आणि धुंदी आणणारा असतो हे तो अनुभव घेतलेल्यांना वेगळ्याने सांगायची गरज नाही. येथे या गाण्यात या जोडप्याने ही एकमेकांच्या प्रेमात असल्याची भावना इतकी सहज आणि परिणामकारकरित्या दाखवली आहे की मुळात अमिताभ आणि मौशमी अभिनय करतात असे वाटतच नाही.

मौशमीचे त्याच्या लांबलांब ढांगा टाकत चालण्याशी जुळवून घेणेही किती सुरेख वाटते. तिचे ओला पदर तोंडाला लावणे, आपल्या प्रियकराचा हातात सहजपणे हात देणे, तितक्याच सहजपणे त्याचा हात हातात घेणे, त्याला बोटाने काहीतरी दाखवणे सारेच विलोभनीय. अमिताभ तर तिला जवळपास खेचतच पाण्यात खेळवत असतो. हा सामान्य परिस्थितीतला तरुण आहे. श्रीमंत मित्राचा सूट घालून तिला भेटायला आला आहे. त्याची प्रेयसी मात्र खरोखर श्रीमंत आहे. मौशमीने सारी श्रीमंती विसरून आपल्या प्रियकराबरोबर पावसात मनमुराद भिजायचे ठरवलेले दिसते. त्याला ते माहित आहे आणि त्यामुळे तो ही तिच्या सहवासाचा आनंद घेत चिंब होत आहे. काही जण काही गाण्यात इतके सुंदर का दिसतात हे कोडे मला कधीही उलगडले नाही. येथे पावसाळी गाणे. हिन्दी चित्रपटांच्या नियमाप्रमाणे नायिकेला ओलेती दाखवण्याची संधी. पण मौशमी चिंब भिजूनही "तशी" वाटत नाही. उलट गाण्यात ती अधिकाधिक देखणी आणि निरागस वाटत राहते.

बच्चनसाहेब ज्या सहजतेने या गाण्यात रस्त्यावर चालले आहेत, धावले आहेत तसे किती जणांना चालता, धावता येईल काय माहित. अमिताभच्या चालण्या धावण्यातही अभिनय असतो असे मला नेहेमी वाटते. म्हणूनच "डॉन" चित्रपटातील धावण्याचा अंदाज वेगळा आणि येथे प्रेयसीला हात धरून आपल्या वेगाने धावायला लावतानाचा अंदाज वेगळा. हे प्रेमात पडल्याने आणखिनच सुरेख दिसणारं जोडपं मध्येच एकमेकांशी काहीतरी बोलत असतं. ते पाहून अनेकदा वाटतं काय बोलत असतील ती दोघं? त्यातच मध्ये मौशमीचं ते लोभस हसणं. मरिन ड्राईव्हला ती धक्क्यावरून चालते आणि अमिताभ फुटपाथवरून, तिचा हात हातात घेऊन. त्यावेळी एक लाट धक्क्यावर फुटताना दाखवली आहे. असं वाटतं पावसाळ्यातल्या देखण्या मुंबईने या जोडप्याचं प्रेम पाहून त्यांच्याबद्दल ओढ वाटून त्यांना आणखिनच चिंब करायचं ठरवलं आहे. या गाण्यात पावसाचा आणि त्या देखण्या मुंबईचाही रोमान्स सुरु आहेच. त्यामुळे एका प्रेमात पडलेल्या प्रेयसीच्या मनाची अवस्था, प्रेमात पडलेल्या दुसरीलाच कळणार.

खरंच स्त्रीसाठी माहेरची ओढ म्हणजे काय असते याची काहीशी कल्पना मला या गाण्यामुळे येते. काहीतरी कायमचं निसटलं आहे. त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो. तो आता "रिमझिम गिरे सावन" सारख्या गाण्यातच शक्य आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलादेखील हे गाणे बघायला खूप आवडते. बहुतेक तेंव्हा अमिताभ मोठा हिरो नसावा, कारण सर्वसामान्य लोक खूप दिसतात आणि त्यांना कौतुक किंवा आश्चर्य वाटत नाहीय अमिताभ चे.

अहो च्रप्स, पिक्चर मध्ये तो अमिताभ नाहिये, सामन्य माणूसच आहे. सामन्य माणसाला बघुन कशाला कोणाला आश्चर्य वाटले?

हा सिनेमा जंजीर/शोले/दीवार नंतर आलेला आहे, जेंव्हा बच्चनसाहेब ऑलरेडी टॉपवर होते. या गाण्यातले सगळे सीन्स (अगदी गेट वे, हुतात्मा चौक, मंत्रालय, क्रॉस/ओवल मैदान, मरीन ड्राइव वगैरे) या भागातली रोजची रहदारी बघता, बहुतेक रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ऐन पावसात शूट केले असावेत. माझ्या मते गर्दी अगदि तुरळक आहे, कारण मुंबईकर नविन लग्न झालेलं असल्या शिवाय अशा पावसांत सहसा बाहेर पडत नाहि... Wink

अमित - अ‍ॅक्च्युअली तो पॉइण्ट बरोबर आहे. अमिताभ च्या नंतरच्या चित्रपटांत अनेकदा शूटिंग पाहायला जमलेली गर्दी एडिट करता न आल्याने सीन मधे तशीच आलेली आहे. खुद्दार मधल्या या गाण्यात इथून पुढे साधारण मिनीटभर सहज दिसेल. बाजूने जाणार्‍या बसमधून सुद्धा एकजण अर्धा बाहेर आला आहे Happy

मात्र या पिक्चरचे शूटिंग रेंगाळले असावे. या गाण्यात अमिताभचा लुक प्रि-जंजीर वाटतो, त्यामुळे हे गाणे बरेच आधी शूट झाले असावे. एकूणच मंझिल मधे अनेकदा जाणवते की दोन वेगळ्या काळातील शूटिंग आहे, कारण अमिताभचा आधीचा व नंतरचा लुक अनेकदा मिक्स होतो. उदा: हेच गाणे तो स्वतः म्हणतो त्याचे शूटिंग नंतर झाले असावे. कारण तो लुक १९७९ साली जेव्हा हा पिक्चर रिलीज झाला साधारण तेव्हाचा आहे. यू ट्यूब वर 'रिमझिम गिरे' सर्च केलेत तर दोन्ही क्लिप चे फोटो एकापाठोपाठ एक दिसतात, तेथे लगेच लक्षात येइल. आणि शूटिंग कथेच्या क्रमाने होतेच असे नाही, त्यामुळे कथेत या गाण्याच्या बर्‍याच आधी असलेल्या अमिताभच्या गाण्यात त्याचा लुक नंतरचा आहे Happy

प्री-जंजीर लुक
नंतरचा लुक Happy

व्हाट्सएप वरून साभार -

*रिमझिम गिरे सावन" वाली मौसमी चॅटर्जी*

मौसमी चॅटर्जी आणि अमिताभचा “मंझिल” पिक्चर तुम्हाला आठवतोय ?
हो तोच “रिम झिम गिरे सावन“ फेम. ! आज त्या सिनेमाच्या निर्मितीच्या कहाणी सोबत त्याच्यातील त्या हिट गाण्याच्या शूटिंगच्या वेळची अधिकृत कहाणी ... तुमच्यासाठी ...

मंझिल पिक्चर रिलीज जरी १९७८-७९ ला झाला तरी मुळात तो प्रचंड रखडलेला पिक्चर होता...
त्याचे शूटिंग “जंजीर”(१९७२) यायच्या अगोदर म्हणजे अमिताभ जेव्हां कोणीही नव्हता तेव्हां सुरू झाले होते..
अमिताभला हा पिक्चर जया भादूरीने त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिचे वजन वापरुन, दिग्दर्शक बासू चटर्जीला अमिताभला घ्यायची गळ घालून मिळवून दिला होता...
त्यात अमिताभचे क्रेडिट शून्य होते... पण नेमके झाले असे की, जंजीरच्या अगोदरचे अमिताभचे तेव्हांचे आलेले जवळपास सगळे पिक्चर इतके सपाटून आपटले होते की,
या पिक्चरच्या निर्माता त्रिकुटाने सिनेमाचे थोडेफार शूटिंग झालेले असताना सुद्धा सगळेच पैसे डुबायचा धोका नको म्हणून इतर निर्मात्यांनी जसे अमिताभ सोबतचे सिनेमे त्या काळी बंद केले होते तसा त्यांचा हा सिनेमा देखील डबा बंद करून टाकला. कारण निर्माते म्हणून एकतर त्यांचा हा पहिला सिनेमा, आणि तो सुद्धा त्यांनी बासू चटर्जी केवळ कमी पैशात सिनेमा करतो म्हणून सुरू केलेला असा ..

पण १९७२ ला अमिताभचा प्रथम 'जंजीर' आला. नंतर ७३ साली मजबूर,७५ साली दीवार आणि नंतर शोले आला आणि सगळी गणितंच बदलून गेली..

नुसत्या अमिताभच्या एकट्याच्या नावावर पिक्चर चालायचे दिवस आले...
त्यामुळे त्या मंझिलच्या निर्माता त्रिकुटास त्यांनी त्यांच्या डबाबंद केलेल्या पिक्चरची आठवण झाली .... त्यांनी बासूला गळ घालत,अमिताभचे पाय धरत पुन्हा पिक्चर सुरू करायला लावलं आणि त्या मुळेच निर्मिती दरम्यान मधे गेलेला प्रचंड कालावधी हा चित्रपट पहाताना लगेच लक्षात येतो...

सुरवातीचा अमिताभ आणि सुरवातीची मौसमी यांच्या तब्येती आणि नंतरच्या तब्येती यात बर्‍यापैकी तफावत आहे तर असा हा निर्मिती दरम्यानचा कंटीन्यूटी नसलेला अमिताभचा पिक्चर १९७९ ला रिलीज झाला आणि विशेष म्हणजे निर्मात्याचे “अमिताभ लाटेत “ फक्त त्याच्या एकट्याच्या नांवावर उखळ पांढरे करून गेला...

त्याच सिनेमातील गाजलेले हे खालील गाणे “रिम झिम गिरे सावन “ मौसमीला आणि अमिताभला जेव्हा पब्लिक ओळखत नव्हते तेव्हाचे होते ...
ते गिरगाव चौपाटी आणि फोर्ट मधे सलग तीन दिवसाच्या खर्‍याखुर्‍या पावसात शूट झाले होते ...
त्या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ हा पडेल हीरो म्हणून निर्मात्यांमध्ये अप्रिय होता पण त्या काळातील इतर हिरोइन्सला मात्र तो जया (भादूरी)ची प्रॉपर्टी आहे हे माहीती असूनही त्यांच्यासाठी तो “हॉट प्रॉपर्टी” होता.
आणि मौसमी सुद्धा त्याला अपवाद नव्हती...
ती पण अमिताभ वर लट्टू होतीच त्या मुळे तिचे आणि अमिताभचे सूर सुद्धा त्या काळी मस्त जमले होते.

या गाण्याच्या शूटिंगच्या तिसर्‍या म्हणजे शेवटच्या दिवशी ते जवळपास संपत आले असतांना दुपारच्या लंचब्रेक मधे मौसमी दिग्दर्शक बासू चटर्जी जवळ बोलली की,
“हे इतके मस्त जमून आलेले प्रेमगीत पडद्यावर हीरो-हिरोईन गात आहेत असं तुम्ही दाखवणार आहात पण केवळ हात हातात घेण्यापलीकडे त्यांच्यात असणारी जवळीक पडद्यावर व्यक्त होतांना दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम दाखवण्या साठी गाण्यात अमिताभने मला किमान उचलून घेतलंय एवढं तरी तुम्ही दाखवाच... मला ते या गाण्यात हवंय असा तिने जणू हट्टच धरला .....

आता बासूची पंचाईत झाली ..
कारण एक तर मौसमी पडली सिनेमाची नायिका ..
त्यातून तिने स्वतःहून ही केलेली मागणी.
पण सिनेमाच्या स्टोरीत मात्र नायक-नायिकेची अशी अंगाची झटा-झटी अपेक्षित नाही कारण नायक –नायिका एकमेकाला प्रथमच भेटत असल्याने त्यांची इथवर मजल गेलेली दाखवणे हे गाण्यात दाखवता येत नव्हते ...
पण तिकडे मौसमी तर हटून बसलेली ... या सगळ्या मधली सर्वात महत्वाची गम्मत म्हणजे इकडे अमिताभला, म्हणजेच चित्रपटाच्या नायकाला दिग्दर्शक आणि नायिके मधे काय शिजतंय ह्याच्यातील ओ का ठो माहीत नाही ... तो पूर्णपणे अनभिज्ञ ...
आणि बासूला ते अमिताभ जवळ सुद्धा बोलता येईना. शेवटी त्याने सुवर्ण मध्य साधत गाण्यात अमिताभने मौसमी त्या फोर्ट मधील समुद्र कठड्या वरून चालताना तिला हात देत व नंतर वरुन खाली उतरवताना तिला उचलून खाली ठेवले आहे असे गाण्यात दाखवले व दिग्दर्शक या नात्याने त्याच्या नायिकेचा “हट्ट” पूर्ण केला ... गाण्यात तो प्रसंग साधारण पावणे दोनव्या मिनिटाला येतो...
आणि तो जसा घडला तसाच ठेवलाय....
पहा तर मग...

मला माहितीये,
हे गाणे तुम्ही आजवर बर्‍याचदा ऐकले आणि बघितले आहे पण आता त्या अमिताभने मौसमीला “उचलून घेतलेल्या” शॉट साठी तुम्ही ते आत्ता परत पहाणार ...

मलादेखील हे गाणे बघायला खूप आवडते. बहुतेक तेंव्हा अमिताभ मोठा हिरो नसावा, कारण सर्वसामान्य लोक खूप दिसतात आणि त्यांना कौतुक किंवा आश्चर्य वाटत नाहीय अमिताभ चे
मला कधीतरी एका गोष्टीचे कुतुहल वाटते. समजा दुरवर अगदी दिसणार नाही अशा ठिकाणी किंवा गाडीत कॅमेरा ठेवला आणि नायक नायिका सर्वसामान्य वेशभूषा करून बाहेर पडले तर गर्दीत लोक त्यांना ओळखतील का? अनेकदा मुंबईकर कामावर्जाण्याच्या किंवा घरी जाताना नेहेमिची लोकल पकडण्याच्या गडबडीत असतात.

अप्रतिम लिहिलंय...
फारएण्ड, कटप्पा तुमचेही प्रतिसाद, माहिती भारी...

मस्त गाणे आणि मस्त आठवणी.
माझेही हे गाणे कधी काळी फार आवडते होते. पण नंतर आमच्या पिढीच्या ह्या दुसर्‍या गाण्याने त्या आवडीवर एकदमच मात केली. Proud

*रिमझिम गिरे सावन" वाली मौसमी चॅटर्जी* >> ही मौशुमी रिमझिम च्या मेल वर्जन वाल्या गाण्यामधली आधी आठवते Happy

नंतर आमच्या पिढीच्या ह्या दुसर्‍या गाण्याने त्या आवडीवर एकदमच मात केली. >> right.

मला रिमझिम गिरे सावन किशोरदा च्या आवाजातलं version च आवडतं ऐकायला.. आणि तेच आठवतं नेहमी Happy

लेखात आलेल्या पाऊस, मुंबई, अमिताभ, हे गाणे, नोस्टलजिया इ इ कुठल्याच विषयात मला रुची नाही (हे गाणे बघितलेदेखील नाहीय अजून एकदाही, आताचा श्रद्धा चा प्रतिसाद वाचून वाटतय कि हे ड्युएट आहे, मगतर मी हे गाणं ऐकलदेखील नाहीय Rofl ) पण
च्रप्स, फारएण्ड, व्हाट्सऍप फॉरवर्डचा प्रतिसाद वाचनीय आहेत.

नैसर्गिक पावसात शूटिंग करताना कॅमेरा, लाईट्स (वापरले असतील तर) वगैरे कसे वाचवतात पावसापासून?

अतुल, मस्त लिहीलाय लेख. पाऊस अप्रतीम आहे यातला. विशेष म्हणजे त्या काळातली मुंबई पहायला मिळाली हेच खूप आहे. कारण आमची धाव लहानपणी पुणे- जळगाव पर्यंतच मर्यादीत. Proud अमिताभ आणी किशोरकुमार हे हृदयात कोरले गेल्याने हे गाणे कायम स्मरणार राहीलेले.

हो, आणी पाऊस म्हणले की हेच गाणे आठवणार हो. जसे पाऊस म्हणले की भजी, माळशेज घाट, लोणावळा वगैरे आठवते. Proud

सुंदर लेख आहे. खरोखर ह्या गाण्यात किशोरदांनी जो आवाजाचा बाज वापरला आहे तो ऐकून चिंब भिजल्यासारखाच प्रत्यय येतो (गाणं न बघताही). फार आवडतं गाणं आहे हे.
सगळे प्रतिसाद छान आहेत.

लेख खुप आवडला Happy पावसाच्या गाण्यांची प्ले-लिस्ट ह्या गाण्याशिवाय अपूर्ण आहे!

माझेही हे गाणे कधी काळी फार आवडते होते. पण नंतर आमच्या पिढीच्या ह्या दुसर्‍या गाण्याने त्या आवडीवर एकदमच मात केली. >>>१००% सहमत

सुंदर!
मी हे लताच्या आवाजातलं गाणं त्या मानाने उशिरा ऐकलं. पाहिलं तर त्याहून उशिराने. मुळात माहिती होतं ते किशोर कुमारच्या आवाजातलं गाणं. आणि ते खूप खूप आवडतं. पण हे लताच्या आवाजातलं ऐकल्यापासून हेच जास्त आवडायला लागलं.
प्रतिसादही मस्तच आहेत सगळेच. आता हे गाणं परत एकदा बघायलाच हवं Happy

ॲमी, नक्की ऐकून बघ ही दोन्ही गाणी.

हायझेनबर्ग, अहाहा! काय छान गाणं आहे तेसुद्धा! त्या काळातल्या विशिष्ट दिवसांची आठवण झाली Happy

चांगलं लिहिलेय

हे गाणं ऑटोफे . सध्या मोबाईलची रिंगटोन हेच गाणं आहे

> ॲमी, नक्की ऐकून बघ ही दोन्ही गाणी. > फक्त लताच्या आवाजात आहे का हे? की ड्यूएट आहे?
ऐकेन आणि बघेनही कधीतरी मूड झाला तर. तशी मला वाकड्यातिकडया दातांची मौसमी बरी वाटते. अमिताभ आणि मौसमीचा कुठलातरी रहस्य चित्रपट पौगंडवयात कधीतरी पाहिला होता तेव्हा आवडला होता. पण मला एकंदरच याकाळातल्या (७०-८० दशक) चित्रपटाबद्दल ममत्व वाटत नाही...

दोन वेगवेगळी गाणी आहेत. एक किशोर कुमारच्या आवाजातलं आणि दुसरं लताच्या आवाजातलं. फक्त मुखडा सारखा आहे आणि चाल जवळजवळ सारखी आहे. अंतरे वेगवेगळे आहेत.

खरंच स्त्रीसाठी माहेरची ओढ म्हणजे काय असते याची काहीशी कल्पना मला या गाण्यामुळे येते. काहीतरी कायमचं निसटलं आहे. त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो. अगदी खर .
लेख अफलातुन लिहिलाय तुम्ही अतुल.

कटप्पा- तुम्ही लिहिलेली अधिकृत कहाणी ही मस्तच.

छान लिहलंय. पावसाळा आला की हे गाणे हटकून आठवतेच आणि हा लेख वाचण्याआधी दोन दिवस हे गाण गुणगुणत होतो.
रच्याकने, लेखात आझाद मैदानाचा उल्लेख आला आहे पण फोटो मात्र ओव्हल मैदानातील दिसतोय. ओव्हल मैदानाच्या आजूबाजूचा परिसर जसा त्या काळी होता तसाच आजच्या काळीसुध्दा आहे.

छान आहे लेख.

पहिलं पाऊस जेव्हा पडतं, तेव्हा नकळत माझ्या मनात साधना वर चित्रीत झालेलं ओ सजना बरखा बहार आयी .... हे गाण येतं आणि त्या नंतर देव साहेबांवर चित्रीत झालेलं रिम झीम के तराने लेके आयी बरसात हे गाणं.

आधीही इथे मायबोलीवर ह्या गाण्याविषयी कोणी लिहिले असे का वाटतेय?
गाण्याविषयी काय बोलावे.. ‘रिमझिम पावसातला नितळ कोवळा रोमान्स’ म्हणजे हेच गाणे. अगदी गुणगुणणं सुरु होवुन हळूच ओठाच्या कोपर्‍यात हसु आणणारं. हे माझ्या बाबांच म्हणणं आठवलं कारण त्यांचा आणि आईचा मैत्रीचा हाच काळ होता, नविन नातं आणि मुंबईतला अनुभलेला पाउस.
माझ्यासाठी, आपल्या लाडक्या व्यक्तींची वरची गोड आठवण, श्रवणीय कोमल गीत आणि पावसातली मुंबई अश्या संमिश्र भावनेसाठी आठवतं.
पण आपल्या काळाचं म्हणाल तर, ‘ सावन बरसे.. ‘
ह्या गाण्यातला सीन आहे, अतिशय मेहनत घेवुन, पावसात चिंब भिजलेली सोनाली वाट पहात असते आणि तितक्यात तिला अक्षय्कुमार दिसतो. त्याच्या डोळ्यात एकदम चमक दिसते तिला बघुन आणि ती मात्र लाजुन डोळे खाली करते. क्युट. अगदीच रीलेट होतं हे. Happy
( आता नक्कीच हे गाणं बघा.. ९० ची मुंबई)
हरीहरनला जरा माफ कराच त्याच्या मद्रासी उच्चारासाठी

पावसाळी गाणं म्हटलं की हटकून दरवेळी आठवतं ते लताचं "रिमझिम गिरे सावन">>> अगदी हेच. सगळ्यात आधी आठवणारं गाणं. त्यानंतर बरीच गाणी आली पावसाची. पण माझ्या मनात पहिला मान ह्याच गाण्याचा. Happy
छान आहे लेख.

पावसाळी गाणं म्हणून मला आठवते ते "खामोष" सिन्हाचे , 'बरखा रानी जरा जमके बरसो , मेरा प्रीतम जा ना पाए झूमकर बरसो ' हे मुकेंशच्या आवाजातले गाणे.. त्यातला पाऊस रौद्र आणि मनसोक्त आहे , त्याला शहरीपणाचा स्पर्श नाहिये ...

आणि तसेच दुसरे गाणे
हाय हाय ये मजबूरी , 'ये मौसम और ये दूरी ....मेरा लाखोंका सावान जाए'...हे झीनत आमन चे गाणे

Pages