लव्ह इन ट्रबल भाग- 9

Submitted by स्वरांगी on 4 June, 2019 - 05:25

लव्ह इन ट्रबल भाग- 9

अप्पासाहेब अनुचं घर न्याहाळत होते..अनु हॉलच्या एका कोपऱ्यात उभी राहून घाबरून त्यांच्याकडे पाहत होती.. अप्पासाहेबांचं लक्ष हॉलच्या दाराकडे गेलं..तिथेच त्या दिवशी शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता..ते आठवून त्यांच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या..त्यांनी एक जळजळीत कटाक्ष अनुकडे टाकला..ते हळूहळू पावलं टाकत अनुसमोर आले..
“ ज्या घरात माझ्या मुलाचा खून झाला त्याच घरात मजेत खात पित राहायची हिंमतच कशी झाली तुझी??!! माझा मुलगा तुझ्यामुळे गेला आणि तरीही तू अजून जिवंत आहेस??!!” अप्पासाहेब दात ओठ खात म्हणाले..
“ मलाही तुमच्या मुलासोबत जे घडलं त्याबद्दल वाईट वाटतंय.. आणि मी हे मनापासून बोलतेय.. पण मी खरंच काहीही केलेलं नाहीये!!!”
“ मला माहितेय तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण तरीही मी न केलेल्या गुन्ह्याची कबुली मी नाही देऊ शकत तुम्हांला..”अनु अप्पासाहेबांसमोर हात जोडून म्हणाली..
“ तू खून केला नाहीस हे सांगणारा एकही पुरावा मला मिळालेला नाही!!” अप्पासाहेब रागाने म्हणाले..
“माफ करा सर, पण मी खून केला आहे हे सांगणाराही एकही पुरावा नाही मिळालाय..” अनु शांतपणे म्हणाली..
“पुरावा होता!!! जर त्या कुलकर्णी वकिलाने मध्ये मोडता घातला नसता ना तर तू आत्ता जेलमध्ये सडत असतीस!!!” अप्पासाहेब त्वेषाने म्हणाले..
“ तो पुरावा बनावट होता सर!!” अनु त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होती..तिचे ओठ बोलताना थरथरत होते..
“ काय??!!” अप्पसाहेब रागाने लाल झाले होते..
“ मला माफ करा सर.. खरं तर मी निर्दोष आहे हे मला सिद्ध करून दाखवायची गरज नाही पण तरीही मी ते करेन!! माझ्यासाठी!! माझ्या आईसाठी आणि कुलकर्णी सरांसाठी!!!” अनु निश्चयाने म्हणाली पण तरीही तिच्या आवाजाला कंप सुटला होता..
“ मी खऱ्या गुन्हेगाराला पकडेन आणि शुभमला न्याय…”
“खबरदार!!!! जर माझ्या मुलाचं नाव घेशील तर!!” अप्पासाहेबांनी अनुवर हात उगारला..अनु दचकून दोन पावलं मागे सरकली..तिचे दोन्ही हात प्रतिकार करायला आपोआप पुढे आले..पण ती प्रचंड बिथरली होती..तिचे हातपाय लटपटू लागले!!! सर्वांगाला घाम फुटला!!!
“ काय माहीत शुभमने तुझ्यात असं काय पाहिलं !! पण तुला बघून कळतंय की तूच माझ्या मुलाला फसवलं असणार!! पण लक्षात ठेव, कोर्टातून जरी तू सहीसलामत सुटली असशील, तरी मी तुला सुखाने जगू नाही देणार!! आयुष्यभर तुला तू केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करावं लागेल..तू बघंच!! मी तुला काय काय भोगायला लावतो ते!!” अप्पसाहेबांच्या डोळ्यातून अंगार बरसत होता…

अभिजित advocate बर्व्यांच्या ऑफिसमध्ये आला..आजपासून तो पुन्हा बर्व्यांकडे काम करणार होता..नवीन ऑफिस घेईपर्यंत तो इथेच काम करणार होता..बर्व्यांनीच दम देऊन त्याला बोलवून घेतलं होतं..अभिजितने दार उघडून आत पाऊल टाकलं तोच पुष्करने चकमकी असलेला फुगा त्याच्या डोक्यावर फोडला आणि पीपीsssss करत पिपाणी वाजवत त्याचं स्वागत केलं…अभिजीतला खरं तर त्याचं तोंडही पहायचं नव्हतं पण दोघांचीही टेबल्स एकाच केबिनमध्ये होती.. अभिजीतचा चेहरा पाहण्यासारखा झालेला..आणि पुष्कर जाम खुश होता…

अनुने तिचे प्रयत्न सुरू केले होते..गुन्हेगाराला पकडण्यासाठी काहीही करायला ती तयार होती..तिने सगळ्यात आधी न्युज पेपरमध्ये , “ शुभम फडके यांच्या खुनाबद्दल काहीही माहिती कळल्यास १२३४५६७८९० या नंबरवर फोन करा!!” या मथळ्याखाली जाहिरात दिली.. रस्त्यावर ठिकठिकाणी याच मजकुराचे होर्डिंग्स लावण्यासाठी ऑर्डर्स दिल्या…पोस्टर्स प्रिंट करून जागोजागी चिकटवायला दिली…अनुने सगळ्या बाजूनी शोध घ्यायला सुरुवात केली…
ही सगळी कामं झाल्यावर अनु सगळ्यात आधी जिथे तिच्या घरापासून लांब, दुसरा चाकू मिळाला तिकडे निघाली तेव्हा संध्याकाळ झाली होती…ती त्या जागी पोचली…रस्त्यालगतच गवताळ भाग आणि थोडी झाडी होती.. आजूबाजूला वस्ती नसल्याने कसलीच वर्दळ नव्हती..सगळीकडे पूर्ण शांतता होती…अनुने इकडे तिकडे पहात काही मिळतंय का याचा शोध घ्यायला सुरुवात केली.. गवतात,झाडीत काही क्लू मिळतोय का हे पाहू लागली.. काही ठिकाणी गवत उपटून, कुठे कुठे जमीन उकरून काही वेगळी गोष्ट मिळतेय का ते पाहू लागली..खूप वेळ बघूनही तिला काहीच मिळालं नाही..आता बऱ्यापैकी अंधार पडला होता..
“ गुन्हेगाराने अगदी बरोबर जागा शोधून काढली होती, हत्याराची विल्हेवाट लावायला!!” अनु मनातच म्हणाली..तोच तिला कुणाचीतरी चाहुल लागली..तिने मागे वळून पाहिलं..लांबून कुणीतरी तिथेच येत होतं..अनुने चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण दिसेना..
“ तोच खुनी तर नसेल?!!!” अनघा मनात म्हणाली.. आणि तीने हाताच्या मुठी आवळून समोर धरल्या.. जर काही झालंच तर ती तयारीत उभी होती…ती व्यक्ती हळूहळू जवळ आली..अनु आता सावध होती…
“ अनघा!!??”
“ कुलकर्णी सर!!?” अनु आश्चर्याने म्हणाली.. तो अभिजित होता..अभिजीतही अनुला तिथे पाहून चकित झाला...इतका वेळ रोखून ठेवलेला श्वास अनुने सोडला आणि धाप टाकत ती सरळ खाली बसली…
“ काय हो सर तुम्ही!!! घाबरवलंत ना मला!!! तुम्ही का नाही सांगितलं की तुम्ही कोण आहात ते??” अनु वैतागुन म्हणाली..
“अरे!! तू विचारलंच नाहीस मला!!” अभिजित तिच्याकडे येत आश्चर्याने म्हणाला..
“ तरी काय झालं?? या सुनसान जागी आलात तर सांगायला नको??!!” अनु वैतागलेलीच होती..
“ म्हणजे तुला काय म्हणायचंय?!! मी येता जाता सगळ्यांना माझं नाव सांगत फिरावं?!! समोरच्याने मला विचारलं नाही तरी??” आता अभिजीतही भडकला…
“ ही जागा इतकी निर्मनुष्य आहे !! मला वाटलं तो खुनीच आला की काय!!!” अनु म्हणाली.. दोघही उगाचच एकमेकांशी भांडत होते..
“ तू तर माझ्या आधीपासून इथे आलीयस ना? इथे काय करतेयस??” अभिजितने विचारलं…
“ मी इथे गुन्हेगाराबद्दल काही मिळतंय का ते बघायला आलेले..तुम्ही…” बोलता बोलता अनुने चमकून अभिजितकडे पाहिलं..
“ तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून तुम्ही इथे आलात?!!” अनुने आनंदाने विचारलं..
“ तुझी काळजी?? अजिबात नाही!!” अभिजित अनुची नजर चुकवत म्हणाला..
“ हम्म..तुम्ही माझी काळजी का कराल!!” अनु उदास होत म्हणाली आणि उठू लागली..तेवढ्यात ती धडपडली आणि जमिनीवर पडणार एवढ्यात अभिजीतने तिचा हात धरला…आणि तिला पडता पडता सावरलं…अनु अभिजीतकडे पहातच राहिली…अभिजीतही तिच्याकडेच पहात होता..थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की त्याने बराच वेळ अनुचा हात पकडून ठेवलाय..त्याने लगेचच अनुचा हात झटकला…अनु कशीबशी तोल सावरून उभी राहिली..थोडा वेळ कुणी काहीच बोललं नाही…मग अभिजीतने घसा खाकरला आणि तो चालू पडला..अनु त्याला जाताना पाहून हसली आणि तिथून जायचंच असल्याने तीही त्याच्या मागून निघाली..
“ सर तुम्ही इथे का आला होता??तुम्ही सांगितलंच नाही!!” थोड्या वेळ सोबत चालल्यावर अनु म्हणाली…
“ आजपर्यंत मी ज्या ज्या केस घेतल्या त्या सगळ्या solve केल्यात..आणि गुन्हेगाराला पकडून दिलंय..या केसशी आता माझा काही संबंध नसला तरी मी ही केस अर्धवट सोडू शकत नाही..जिथपर्यंत मी खऱ्या गुन्हेगाराला पकडत नाही,त्याला शिक्षा होत नाही तिथपर्यंत मी स्वस्थ नाही बसू शकत..” अभिजित म्हणाला..
“ मी मला शक्य होईल ती सगळी मदत करायला तयार आहे सर!! फक्त तुम्ही सांगा!” अनु उत्साहाने म्हणाली..
“ बाकीचं जाऊदे..तू म्हणाली होतीस की तुला कोर्टाबाहेर तुला ते गाणं ऐकू आलं तुला खात्री आहे की तो खुनी कोर्टात हजर होता तुझी केस ऐकायला..त्यासाठी मी कोर्टातलं cctv फुटेज मागवलंय..ते बघ आणि त्यातला खुनी कोण आहे हे ओळख म्हणजे मला पुढचं काय ते बघायला..” अभिजित चालता चालता म्हणाला..गेल्या वेळी जेव्हा अनु त्याला भेटली तेव्हाच तिने हे सांगितलं होतं अभिजीतला..
“ पण मी त्याचा चेहरा नाही पाहिलाय!!” अनु गोंधळून म्हणाली..अभिजित जागच्या जागी थांबला…
“म्हणजे ?? तूच म्हणालेलीस ना, तू भेटलीयस त्याला म्हणून?!!” अभिजित आश्चर्याने म्हणाला..
“ हो मी भेटलेय!! पण ते त्या गाण्या through!!! पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो सायकल वर होता आणि चेहऱ्यावर मास्क होता..आणि कोर्टात मला फक्त ते गाणं ऐकू आलं..मी पाहिलं नाही त्याला!!” अनु अभिजीतला समजावत म्हणाली..अभिजितने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि सुस्कारा सोडला..
“ बरं ते सगळं जाऊदे..तो खुनी सायकलवरून पास झाला ना तुला?ती सायकल कशी होती ??” अभिजितने काही माहिती मिळेल या आशेने विचारलं…
“ ती सायकल नेहमीच्या सायकलसारखी होती..दोन चाकी..त्यात काही वेगळं मला आठवत नाही!!” अनु शांतपणे म्हणाली…आता अभिजितने डोकं धरलं आणि तो हळूहळू हसू लागला…अभिजित आता जोरजोरात हसत होता…त्याला एवढं हसताना पाहून अनुही हसू लागली..
“ मला वाटंत होतं की तू मला चांगला क्लू सांगणारेस!! तू काय बोलणार हे ऐकायला मी किती उत्सुक होतो!!!” अभिजित हसत हसत टाळ्या वाजवत म्हणाला..ते पाहून अनुही जोरजोरात हसू लागली…
“ तुझ्यामुळे माझा निद्रानाश झालाय!! रात्रभर झोप नाही लागत मला!!! आणि मी बावळटासारखा इकडे तिकडे भटकतोय त्या खुनीला पकडण्यासाठी!!” अभिजित अनुवर खेकसला..
“ पण सर मी म्हटलं होतं तुम्हाला मी बघून घेईन म्हणून!! मी पकडेन खुनीला!!” अनु त्याला समजावत म्हणाली..
“ कसं पकडणारेस तू??? बोल ना!! कसं पकडणारेस तू???” अभिजित तिच्यावर ओरडला..
“ तुमच्या अशा बोलण्यावरून वाटतं,की तुम्हाला माझी खूप काळजी आहे..” अनु अभिजीतकडे पहात म्हणाली..
“ हो मला काळजी होती तुझी..तू काम केलंयस महिनाभर माझ्यासोबत..मला जबाबदारी वाटत होती तुझी म्हणून मी केलं सगळं..” अभिजित न राहवून म्हणाला..अनु आनंदली..
“ पण आता नाही..आता मी तुझी काळजी नाही करणार..So please live safely.. and good bye!!!” अभिजित गंभीरपणे म्हणाला..आणि तिथून निघाला.. अनुचा चेहरा उतरला होता..दोघंही आतापर्यंत मेन रोडवर आले होते..अभिजितने सरळ टॅक्सी पकडली आणि तो तिथून निघून गेला..अनु तो गेला त्या दिशेने अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहत राहिली…

अनुने दिलेले फ्लेक्स आता ठीकठिकाणी लागले होते…जाणारे येणारे त्या फ्लेक्सकडे पाहत होते आणि दुर्लक्ष करून जात होते..तोच एक तरुण सायकलवरून तिथून जात होता..फ्लेक्सकडे लक्ष जाताच त्याने सायकलचे ब्रेक दाबले आणि तो तिथे थांबला..फ्लेक्स वाचून त्याने त्यावर असलेला अनुचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केला..त्याने पुन्हा एकदा फ्लेक्सकडे पाहिलं आणि गूढ हसला..आणि शिट्टी वाजवत सायकलवरून निघाला..

दिवस असेच जात होते..अभिजित रोज खाली मान घालून ऑफिसमध्ये यायचा आणि असेल ते काम करून खाली मान करून निघून जायचा..अनुने तिच्या ओळखीच्या काकांना कसंबसं convince करून तिच्या ऑफिस साठी छोटीशी जागा घेतली…वेळेवर भाडं देण्याच्या शब्दावर त्यांनी तिला जागा दिली..
अनुने ऑफिस सुरू केलं खरं पण तिला लोकांचा फारसा रिस्पॉन्स मिळत नव्हता..बऱ्याचशा केस अशा येत होत्या ज्यात लोकांचे चोरी, मारामारी असे क्रिमिनल रेकॉर्डस् होते.. काही जणांनी तर अनुला हेही विचारलं की तुम्ही एवढा खून करून सहीसलामत कशा सुटलात!!! आम्हालाही काही वेगळा मार्ग असेल तर सांगा!! Judge साहेबांना काही चिरीमिरी देता येईल काय?!! हे असले client बघून अनुला स्वतःचं करियर कठीणच वाटू लागलं…त्यात ती जिथे राहत होती तिथले मालकही तिला जागा खाली करण्यासाठी तिच्या मागे लागले होते…शेवटी हो नाही हो नाही करत तिने नाईलाजाने ती जागा खाली केली.. तिच्याकडे जे काही थोडेफार पैसे होते त्यातले बरेचसे तिने आईला देऊन टाकले..त्यामुळे ती स्वतःसाठी दुसरंही काम शोधत होती पण तिला यश येत नव्हतं…या एका केसमूळे तिचं सगळं आयुष्यच खडतर झालं होतं…

एक दिवस अनु अशीच काही कामासाठी बाहेर पडली..हातात पर्स घेऊन ती फुटपाथवरून चालत होती…संध्याकाळची वेळ असल्याने फूटपाथवर तशी गर्दी होती…आजूबाजूने भाजीवाले ओरडत होते..त्यांच्यातून वाट काढत काढत हळूच एक मुलगा अनुपर्यंत पोचला..अनु स्वतःच्याच विचारात चालत होती..तोच त्याने पटकन मागून येऊन तिच्या हातातली पर्स हिसकावून घेतली आणि जोरात पळू लागला…अचानक हाताला हिसका बसल्याने अनु कळवळली..
“ माझी पर्स!!!” अनु जोरात ओरडली…
“ चोर !!! चोर!!! चोर!!! पकडा त्याला!!!” अनु ओरडत त्याच्या मागे कशीबशी धावू लागली… तो मुलगा खूप पुढे गेला होता...तो आता मेन रोडवरून धावू लागला होता..पण आता अनुनेही स्पीड पकडला होता..हळूहळू दोघांमधलं अंतर कमी होऊ लागलं…अनु शाळेत आणि कॉलेजमध्ये running champion होती..त्यात त्याने अनूची पर्स चोरली त्यामुळे ती जीव तोडून पळत होती त्याला पकडायला…तो मुलगा पुढे धावत आता पुढच्या गल्लीत वळला… अनुही त्याच्या मागे गल्लीत शिरली.. आता धावत धावत अनुने हात पुढे केला आणि त्याची कॉलर पकडली… आता त्या दोघांच्यात झटापट सुरू झाली...अनुने तिची पर्स खेचायला सुरवात केली..
“ माझी पर्स चोरतोस काय रे!!! थांब आता तुला पोलिसांच्याच ताब्यात देते!!! हेच धंदे करतोस का रे तू??” अनु ओढाओढी करताना त्याच्यावर ओरडत म्हणाली.. आता तो मुलगा घाबरला..त्याला माल हातचा जाऊ द्यायचा नव्हता… त्याने अनुचा हात पकडून जोरात झटकला.. आणि तिच्यापासून स्वतःला सोडवलं…आणि आता शेवटचा प्रयत्न म्हणून खिशातून चाकू बाहेर काढला…
“ बर्याबोलानं पर्स सोड नाहीतर तुझं काई खरं नाही कळलं?!!” असं म्हणून त्याने तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला..अनु दचकून थोडीशी मागे झाली पण लगेचच तिने तिच्या हाताच्या मुठी आवळल्या आणि समोर धरून बॉक्सिंगच्या पोझमध्ये आली..तो मुलगाही सावध झाला…आता अनु काही करणार एवढ्यात मागून तिच्या खांद्यावर दोन हात आले….
“ थांब अनु!!! काही करू नकोस!!” तो अभिजित होता..त्याने दोन्ही हातानी अनुला खांद्याला धरून पकडून ठेवलं..
“ तू मागे हो..” अभिजित अधिकाराने म्हणाला..
“ सर तुम्ही!!” अनुला आश्चरर्याचा धक्काच बसला… ती मागे झाली..अभिजीतला आलेलं पाहून तो मुलगा आणखीनच बिथरला..त्याने चाकू घट्ट पकडला आणि तो अभिजीतवर धावून गेला..त्याला आपल्यावर धावून येताना पाहून अभिजीतही पुढे सरसावला..त्याने झटकन चोराचा वार चुकवत त्याचा चाकू पकडलेला हात घट्ट पकडला आणि त्याला जोरात उचलून जमिनीवर आपटलं… तो मुलगा वेदनेने कळवळला…अनुने अविश्वासाने त्या मुलाकडे पाहिलं आणि तिची नजर अभिजीतकडे वळली…तिचे डोळे विस्फारले गेले..तो तिच्याकडेच पहात होता..
“ तू कराटे चॅम्पियन असलीस तरी मीपण काही कमी नाही!!” अभिजित म्हणाला…

पुढे सगळं झालं…अभिजीतने पोलिसांना कळवलं..पोलीस आले, त्यांनी चोराला पकडलं..अनुला तिची पर्स मिळाली…अनु जेव्हा त्या चोराच्या मागे गल्लीत पळाली त्याचवेळी अभिजित तिथून जात होता…त्याने तिला पळताना पाहिलं…आणि त्याने कार रस्त्याच्या कडेला थांबवली…आणि उतरून तोही त्यांच्या मागे धावला..त्यामुळेच तो ऐन वेळी तिथे अनुच्या मदतीला पोहोचला…
“ Thank you so much sir!!! मला वाटलं नव्हतं तो चोर एकदम चाकू वैगरे काढेल.. थँक्स टू यु!! मला हेल्प केल्याबद्दल..”अनु अभिजीतला मनापासून म्हणाली…
“ Thank you काय त्यात!! आणि सगळं क्रेडिट तुझंच तर आहे.. तुझ्यामुळेच तर त्या चोराला अटक झाली..तू जे धाडस केलंस ते दुसऱ्या कुणी केलं नसतं कदाचित..” अभिजित तिला समजावत म्हणाला..
“ Thank you sir for appreciation!!” अनू हसून म्हणाली..
“ चला आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल स्टेटमेंट द्यायला!!” अभिजित तिथून निघत म्हणाला..
“ तुमच्या लक्षात आलं का सर?? तुम्ही माझ्याशी casually बोलताय!! म्हणजे तुमचा माझ्यावरचा राग गेला ना??!” अनु त्याचा अंदाज घेत म्हणाली..
“ मी कधी असं म्हणालो…” अभिजित म्हणाला…आणि अनुचं तोंड वाकडं झालं…

पोलीस स्टेशनमधली सगळी procedure complete केल्यानंतर अनु आणि अभिजित बाहेर पडले तेव्हा रात्रीचे 8 वाजून गेले होते..
“ Address सांग मी तुला सोडतो..” अभिजित कारकडे जात अनुला म्हणाला..अनु पाहतच राहिली त्याच्याकडे..
“ माझ्यासाठी एवढं सगळं केल्यानंतरही सर अजूनही मला मदत करतायत..त्यांचा माझ्यावर राग असणं सहाजिकच आहे, पण या गोष्टीचा खूप त्रास होतो मला.. कितीही ठरवलं की सरांबद्दल असा विचार मनात नाही आणायचा तरी तसा विचार मनातर येतोच..” अनु विचार करत होती.. अभिजितने कारचा हॉर्न वाजवला तेव्हा ती भानावर आली आणि त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली…
“ तुम्हाला माझं तोंडही पहायचं नव्हतं तरी तुम्ही माझ्यासाठी त्या खुनीचा शोध घ्यायचा प्रयत्न करताय..मला माहितेय मला जे तुमच्याबद्दल वाटतं ते एकतर्फी आहे..मला खूप आवडता सर तुम्ही!! पण हे मी तुम्हांला नाही सांगू शकत… कारण मला माहितेय..तुम्ही नाही विचार करणार माझ्याबद्दल तसा..” अनु अस्वस्थ झाली होती..या छोट्या छोट्या भेटींनी तिला आनंद तर होत होता..पण त्याहीपेक्षा दुःख जास्त होत होतं तिच्यामुळे अभिजीतला त्रास झाल्याचं.. अभिजित ड्राईव्ह करत होत..तिने त्याच्याकडे पाहिलं आणि मनात एकच गोष्ट ठरवली…अभिजीतला विसरून जायचं!!! पूर्णपणे!!
“ तुझं ऑफिस या एरियात आहे??” अभिजित इकडे तिकडे पहात म्हणाला..त्याने एका जागी गाडी थांबवली..
“ इथेच आहे ना तुझं ऑफिस??” त्याने अनुला विचारलं..अनु तिच्या विचारांतून भानावर आली..तिने बाहेर पाहिलं..
“ हो इथेच आहे.. लिफ्टसाठी thank you सर!!!” अनुने आभार मानले आणि ती गाडीतून उतरली..ती बिल्डिंगच्या दिशेने जाऊ लागली आणि अभिने गाडी स्टार्ट केली.. तोच काही आठवून ती पुन्हा गाडीपाशी आली…
तिला परत आलेलं पाहून अभिजीतने खिडकीची काच खाली केली…
“ सर..मला हे सांगायचंय की मी जे तुमच्याशी हसून खेळून बोलते त्याबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका..मला तुमच्याविषयी काही वाटत नाही!!
मी आत्ता पासून तुमच्यापासून चार हात लांबच राहीन..त्यामुळे तुम्हाला माझा कसलाही त्रास होणार नाही..” अनु म्हणाली..
“ तुला नक्की काय म्हणायचंय??” न कळून अभिजीतने विचारलं. त्याचा चेहरा गोंधळलेला होता..
“ मला हे सांगायचंय की मला तुम्ही आवडत नाही..माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आदर आहे बाकी दुसरं काही नाही..माझ्या चेहऱ्यावर तसं दिसत असेल पण तसं काही नाही..एवढंच सांगायचं होतं मला..आणि ड्राईव्ह सेफली!!” अभिजित काही बोलणार त्याआधीच अनु जिन्याकडे धावली आणि धडाधड पायऱ्या चढू लागली..
अनु जिना मुसमुसतच चढून वर आली…ऑफिसचं दार उघडून ती धावत जाऊन तिच्या टेबलापाशी गेली आणि तिने खुर्चीत स्वतःला झोकून दिलं..अनु ओक्साबोक्शी रडत होती..
“ मी त्याला सांगूही शकले नाही की माझं किती प्रेम आहे त्याच्यावर..”अनु रडत रडतच स्वतःशी म्हणाली.. अनु खूप दुःखी झाली होती..तिने अश्रूंना आपली वाट मोकळी करून दिली आणि टेबलवर डोकं टेकून ती खूप वेळ रडली…
थोड्या वेळाने तिच्या रडण्याचा आवेग ओसरल्यावर तिने डोकं वर करून इकडे तिकडे पाहिलं..सगळ्या खोलीत काळोख होता..ती ऑफिसमध्ये आली तीच रडत..त्यामुळे light लावायचा लक्षातच नाही राहिलं…तिने टेबलवर पाहिलं..टेबलवर एक बॉक्स होता..बाहेरून येणाऱ्या थोड्याशा उजेडातच तिला तो दिसला..तिने तो बॉक्स जवळ ओढून उघडला..
त्यात अनुने छापायला दिलेल्या पोस्टरची एक कॉपी होती… तिने ती कॉपी नीट निरखून पहिली..आणि पोस्टर उलटं करून पाहिलं..त्यावर लिहिलं होतं..
“ If you are keep looking for me , I will find you first!”
अनुला आठवलं..’ शुभम फडके यांच्या खुनाबद्दल काहीही माहिती कळल्यास १२३४५६७८९० या नंबरवर फोन करा!! असा मजकूर असलेलं पोस्टर तिने स्वतः एक ठिकाणी भिंतीवर चिकटवलं होतं..आणि त्या एकाच पोस्टरवर उजव्या कोपऱ्यात छोटा स्मायली काढला होता…तेच पोस्टर आत्ता तिच्या हातात होतं.. याचाच अर्थ तो खुनी तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होता….अनुला आत्ता हे सगळं कळलं..आणि तिच्या हातातून पोस्टर गळून पडलं…अनुच्या अंगावर काटा आला.. पूर्ण खोलीत शांतता आणि काळोख पसरला होता…
तोच तिच्या कानांवर घोगऱ्या आवाजात शब्द पडले..
“ If you are keep looking for me, I will find you first!!”
क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

लव्ह इन ट्रबल भाग- 8
https://www.maayboli.com/node/70118
लव्ह इन ट्रबल भाग- ७
https://www.maayboli.com/node/70025
लव्ह इन ट्रबल भाग- ६
https://www.maayboli.com/node/69994
लव्ह इन ट्रबल भाग- ५
https://www.maayboli.com/node/69974
लव्ह इन ट्रबल भाग- ४
https://www.maayboli.com/node/69957
लव्ह इन ट्रबल भाग- ३
https://www.maayboli.com/node/69948
लव्ह इन ट्रबल भाग- २
https://www.maayboli.com/node/69937
लव्ह इन ट्रबल भाग- १
https://www.maayboli.com/node/69925

छान