आपली माती ... आपली झाडं | लेखिका - केतकी घाटे, मानसी करंदीकर

Submitted by नानबा on 28 June, 2018 - 03:51

आपली माती ... आपली झाडं
लेखिका - केतकी घाटे, मानसी करंदीकर (Founders & Managing Partners, oikos for ecological Services)

आपण गुलमोहर, स्पॅथोडिया, टॅबोबिया इत्यादी सुंदर फुलणारी "परदेशी" झाडे लावतो. आणि त्यांच्या देखणेपणाविषयी आवर्जुन कौतुक करतो. तेव्हा मनात असा विचार येतो की पळस, पांगारा, तामण, राईकुडा, नाणा ह्या तितक्याच सुंदर फुलणार्‍या स्थानिक/स्वदेशी झाडांकडे दुर्लक्ष का व्हावे? ह्यात कुठेही "स्वदेशी - परदेशी" चा हेका न ठेवता, पर्यावरणाच्या दृष्टीने समजावून घेण्याचा सरळ मुद्दा आहे.

एखाद्या प्रदेशात निसर्गतः असणार्या वनस्पती म्हणजे स्वदेशी किंवा स्थानिक आणि मुद्दाम आणून लावलेल्या वनस्पती म्हणजे परदेशी किंवा अस्थानिक. भारताविषयी बोलायचे झाले तर आपल्याकडे हर एक प्रदेशाला ह्या स्थानिक झाडांचा विशिष्ट वारसा लाभला आहे. अतीपावसाच्या प्रदेशातील वर्षभर हिरवीगार रहाणारी झाडे असोत किंवा वाळवंटातील खुरट्या वनस्पती असोत, प्रत्येक भागातील बदलत्या हवामानाप्रमाणे वनस्पतींची रचनाही बदलते. त्यानुसार त्यांचे पर्यावरणाशी असलेले नातेही बदलते. ह्या वनस्पतींच्या समृद्धतेमुळे अनेक प्राणी आणि जिवांना आसरे मिळतात, जीवचक्रे सुरू होतात आणि नैसर्गिक संसाधनांना बळकटी येते. ह्यामुळेच स्वदेशीच्या पुढे जाऊन स्थानिक वनस्पतींचे महत्त्व लक्षात घेणे जास्त गरजेचे. स्थानिक परिसंस्थांशी निगडीत अशा वनस्पतींची जोपासना करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या निसर्गाचे संवर्धन करणेच आहे.

परंतु गेल्या अनेक वर्षापासून निलगिरी, सुबाभूळ, ग्लिरीसिडिया, ऑस्ट्रॅलियन अॅकेशिया इत्यादी परदेशी झाडांनाच आपण प्राधान्य देत आहोत. ह्याचे साधे कारण त्यांची उपलब्धता आणि पटकन मिळू शकणारी हिरवाई हे जरी असले तरी त्यामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेतले जात नाहीत. बर्याचदा ह्या परदेशी वनस्पती आपल्या मुळच्या जंगलांची आंतररचना बिघडवतात. आपल्याकडे अशा प्रकारचा शास्त्रीय अभ्यास जरी झाला नसला तरी काही निरिक्षणातून हे सुचित होते की ह्या वनस्पती आजूबाजूंच्या झाडांच्या वाढीवर, पुनरुज्जीवनावर परिणाम करतात. आपल्याकडे बर्याचशा भागात र्‍हासाची प्रक्रिया सुरू झाली असल्याने तिथे ह्या वनस्पती पटकन पसरतात आणि हळू हळू त्यांचे एकेरी पट्टे तयार होऊ लागतात. खूपदा त्या तणाप्रमाणे पसरू लागतात. उदा. टणटणी/घाणेरी (Lantana Camara) किंवा सुबाभूळ इत्यादी सारख्या वनस्पती सर्वत्र खूप पसरत आहेत. त्यांच्या बीया सहज रुजत असल्याने त्यांना आळा घालणे कठीण होते. तसेच ह्या परदेशी झाडांच्या एका प्रकारच्या लागवडीने मुळच्या जंगलाप्रमाणे असलेले विविध स्तर तयार होत नाहीत. पण तरीही आपल्याकडे पाश्चात्य देशांचे अनुकरण करून अशा प्रकारची एकेरी लागवड करण्याचा प्रघात सुरूच आहे. खरेतर लागवड करताना आपल्या विषुववृत्तीय हवामानातील ऋतुबदल आणि जैवविविधता ह्या मुख्य गोष्टींचा विचार करणे गरजेचे. जवळपास १७००० प्रकारची फुलणारी झाडे वाढू शकणार्या भारताच्या व जवळपास ४००० प्रकारची झाडे वाढवू शकणार्या महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण भूमींवर आपण ह्या काही १०-१५ परदेशी वनस्पतींनी मर्यादा घालत आहोत.

वरील सर्व मुद्दे विचारात घेता, शक्य तिथे जास्तीत जास्त प्रमाणात ही स्थानिक वनस्पती संपदा वाढवणे गरजेचे वाटते. अन्यथा आपल्या कितीतरी जाती नैसर्गिक भागात वाढत असलेल्या माणसाच्या हस्तक्षेपामुळे नष्ट होत आहेत. हे टाळण्याकरताच ह्या वनस्पतींचे विविध उपयोग लक्षात घेऊन त्या प्रमाणे लागवड करणे महत्त्वाचे. ह्या करता प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ते खालील प्रमाणे असू शकतातः

१. माझी जमीन नाही, मी काय करू शकते/शकतो?
अ) स्थानिक झाडांविषयी जाणीवपूर्वक ओळख करून घेणे, त्यांच्या फुलण्या फळण्याच्या नोंदी ठेवून त्यांची प्राणी पक्षांची असणारी नाती शोधून काढणे.
ब) ह्या झाडांविषयी सतत बोलणे व इतरांना माहिती देणे
क) घरातल्या, शेजारच्या लहान मुलांची ह्या झाडांशी ओळख करून देणे.
ड) मोठ्या प्रमाणात जलद पसरणार्या परदेशी झाडांच्या नोंदी करून त्या माहितीची इतरांबरोबर देवाणघेवाण करणे.

२. माझी जमीन आहे, मी काय करू शकते/शकतो?
अ) सर्वप्रथम जमीनीची सद्यस्थिती (र्‍हासाची पायरी) ओळखून नैसर्गिक संसाधनांचे (natural resources) पुनरुज्जीवन करून मगच लागवड करणे हितकारक. जमिनीवरची मुळची विविधता जपली जाणे अत्यंत गरजेचे. त्याबरोबरीने गवतं वाढवावीत. प्रथम कणखर, दुष्काळ/र्‍हास सहन करू शकणार्‍या, जमिनीवर नत्र वाढवणार्‍या वनस्पती लावाव्यात व नंतर इच्छित लागवड करावी.
ब) जमीन कुठल्या हवामानाच्या/पावसाच्या प्रदेशात आहे हे जाणून घेऊन नंतर झाडे निवडावीत. महाराष्ट्रात साधारणतः तीन प्रकारचे पावसाचे प्रदेश दिसतात : अती पाऊस, मध्यम पाऊस, कमी पाऊस. प्रकारानुसार झाडांची निवड बदलेल.
क) जमिनीच्या वापराप्रमाणे (land use) स्थानिक झाडांची निवड करावी. उदा. फार्म हाऊस, पर्यटन स्थळ, टाऊनशीप, इन्डस्ट्री, वनीकरण (reforestation), व्यावसायिक लागवड (commercial plantation) उदा. औषधी, इमारती लाकूड, वनउपज (डिंक, तेल, साल, फायबर, फळं वगैरे) इत्यादी विविध गरजांप्रमाणे व जागेप्रमाणे आपल्याकडे स्थानिक वनस्पती वाढवता येऊ शकतात.

------------------------------
लागवडीकरता एक नमुना
मध्यम पावसाच्या प्रदेशातील फार्म हाऊस करता खालील झाडे लावता येऊ शकतील - सुंदर फुलणारी (पळस, पांगारा, बहावा, तामण), फळं देणारी ( तोरण, करवंद, अमोनी, जांभूळ, बिब्बा), सुवासिक (कुंती, खुरी, नाणा, कुसर), औषधी (वेखंड, तुळस, अडुळसा, गवती चहा), जमिनीलगत वाढणारी (मंडुकपर्णी, दुर्वा), कुंपणाकरता (मेंहदी, निर्गुडी, अडुळसा).
--------
लेखिका - केतकी घाटे, मानसी करंदीकर (Founders & Managing Partners, oikos for ecological Services)
लेखिकांच्या परवानगीने प्रकाशित.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखिकाद्वय माहिती आहेत. पुस्तक चांगलं असेलच अशी खात्रीही आहे पण पुस्तकाविषयी अधिक माहीती वाचायला आवडेल.

हर्पेन , वावे, हा लेख त्यांनीच लिहिला आहे.
आता पावसाळयाच्या तोंडावर अनेकांना वृक्षारोपण करावेसे वाटते, अशा वेळेस सर्वांसमोर गाईडलाईन असावी म्हणून इथे प्रकाशित केला आहे.

हर्पेन , वावे, हा लेख त्यांनीच लिहिला आहे.
आता पावसाळयाच्या तोंडावर अनेकांना वृक्षारोपण करावेसे वाटते, अशा वेळेस सर्वांसमोर गाईडलाईन असावी म्हणून इथे प्रकाशित केला आहे.