एस.टी. ची एक्काहत्तरी..!

Submitted by DJ.. on 31 May, 2019 - 07:50

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेस सुखाचा प्रवास घडवणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनची बस अर्थात आपली एस.टी. १ जुन ला ७१ वर्षांची होत आहे. गेल्या ७१ वर्षांत काळानुरुप रुपडे बदललेल्या पण सामान्य जनतेच्या प्रवासाच्या आकांक्षा आपल्या परीने पुर्ण करणार्‍या राज्य मार्ग परिवहन महामंडळास खुप खुप शुभेच्छा..!!

शेजारच्या गावात हॉस्पिटलमधे जन्मल्यानंतर २ दिवसांनी मला पहिल्यांदा घरी आणले ते एस.टी.ने. त्यामुळे एसटीशी आपोआप नाळ जुळली Bw . माझ्या लहानपणी अगदी श्रीमंत लोकांकडे असलेली एखाद-दुसरी फियाट पद्मिनी नाहीतर अँबॅसिडर कार किंवा बुलेट-स्कूटर सोडली तर एस.टी. शिवाय कोणतेही प्रवासी वाहन रस्त्यावर दिसायचे नाही. गावातील एस.टी. स्टँडवर आलेल्या एस.टी. बसमधे उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासाला जाण्याचे सुख काय असते ते मी पुरेपुर उपभोगले आहे.

जन्माला आल्यापासुन प्रवासाची आवड निर्माण करणार्‍या एसटीने मला आजवर अगदी लाखो किलोमिटर फिरवले. प्रवासासाठी आता भरपुर पर्याय उपलब्ध असतानाही एसटीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. संधी मिळेल तेव्हा मी एसटीने प्रवास करण्यास अतिशय उत्साही असतो.

आज एसटी खरेच लोकाभिमुख झालेली दिसते. एसटीची सर्वसाधारण बस (लाल बस) आता सफेद-लाल रंगाच्या बस मधे परावर्तित झाली आहे आणि तीत आरामदायी सिट्स आल्या आहेत. हिरव्या-पांढर्‍या रंगाच्या निमआराम बसमधे आता पुशबॅक सिट्स आहेत. शिवनेरी आणि मल्टीअ‍ॅक्सल अश्वमेध सारख्या अत्यंत आरामदायी वातानुकुलीत बसेस पुणे-मुंबई रुटवर प्रवासी खेचण्यात आजही प्रतिष्ठेचे स्थान टिकवुन आहेत. राज्यातील कानाकोपर्‍यात माफक दरात वातानुकुलीत प्रवास घडवणार्‍या शिवशाही बसेस अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत.

काळानुरुप कात टाकणार्‍या एसटीने गेल्या ७१ वर्षात अमुलाग्र बदल घडवुन आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!

ST.jpg
साधीबस (लाल बस)^

newST.jpg
अपग्रेडेड साधीबस^

Asiad_1.jpg
निमाअराम बस^

Shivaneri_1.jpg
शिवनेरी बस^

Ashwamedh_1.jpg
अश्वमेध बस^

Shivashahi.jpg
शिवशाही
STlogo.jpg
एस.टी. चा लोगो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एसटीचा लोगो आता थोडासा बदललाय. खाली अजून एक रिबन भगव्या रंगाची असून त्यावर जय महाराष्ट्र लिहिलेले आहे.>> ते खुसपट सरकार बदललं की आपोआप निघेल. गेल्यावेळेस पण साध्या बसच्या पिवळ्या पट्ट्याला भगवा केला होता जो सरकार बदललं की मूळ पदावर आला होता.

मुंबायी, पंडरपूर, बार्षी, तुलाजापूर, बसवाकलियान>> ते कर्नाटक वाले मुद्दाम असे करतात. खिजवण्यासाठी.

लेख आवडला.
रुमाल, बॅग किंवा जवळच लहान मूल सुद्धा खिडकीतून टाकून जागा सांभाळली जाते.>>> +१
लहान मूल >> मी सातवी पर्यंत बुटका आणि किडकिडीत असल्याने मामाच्या गावाहून परत येताना, मामा मला नेहमी खिडकीतून आत चढवून आमच्या सीटा धरायला लावायचा Happy

शिवशाही अगदीच बेभरवशी गाडी आहे. त्याचे कारण म्हणजे ह्या गाडीचे ड्रायव्हर, एसटी महामंडळाचे नसून खासगी आहेत. ह्या गाड्यांचे अपघाताचे प्रमाण देखील जास्त आहे.

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना सर्वसामन्य लोकांना परवडेल अश्या दरात वातानुकुलित 'गरिब रथ' नावाची गाडी त्यांनी सुरु केली तीच संकल्पना वापरुन शिवसेनेच्या दिवाकर रावतेंनी ही गाडी सुरु केली. मात्र ह्या गाडीचा दर्जा त्यांना सांभाळता आला नाही.

निम्म्या शिवशाही महामंडळाच्याच मालकीच्या आहेत. खासगी कंत्राटदरांच्या नाकात वेसण घलुन महामंडळाने शिवशाहीचा प्रवास बर्‍यापैकी स्ट्रीमलाईन केला अहे.

एकदा सोलापूरहून पुण्याला येताना, १२.५०ची लागलेली हिरकणी सोडून फक्त तीनशे पन्नास रु. टिकीट व एसी आहे म्हणून शिवशाहीत जाऊन बसलो आणि पस्तावलो ह्या गाडीला सुटण्याच्या वेळेचे काहीच बंधन नाही जेंव्हा गाडी संपूर्ण भरली तेंव्हाच सुटली. आणि स्वारगेटला पोहचली ती लाल-डब्याच्या स्पिडने. या शिवशाहीपेक्षा हिरकणी किती तरी सरस आहे.

सोलापुर रुटबद्दल कल्पना नाही. परंतु कोल्हापुर-सांगली कडे जाणार्‍या शिवशाही 'बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल' या तत्त्वाने चालवल्या जातात की काय एवढ्या काटेकोर असतात. गर्दीपण बर्‍यापैकी असते. स्वारगेट पासुनच सिट्स फुल असतात थोडेफार शिल्लक असलेच तर कात्रजला भरते.

दादर, बोरिवली, ठाणे कडे जाणार्‍या शिवनेरी देखील कधी रिकाम्या दिसत नाहीत. वाकड पर्यंत उरलेले सिट्स भरतातच. मला तर वाटते एसटी चा इतर रुटवर झालेला तोटा या ४-५ रुटवर भरुन निघतो की काय..! Uhoh

मस्त लेख अजून विस्तृत हवा होता. आठवणींना उजाळा मिळाला. मी जवळपास अश्वमेध सोडून सगळ्या गाड्यांनी प्रवास केलाय भरपूर. शाळेत असताना विद्यार्थ्यांना सुटीत सवलत मिळायची. शाळेतून फाॅर्म भरून मुख्याध्यापकांची सही घेऊन तो फाॅर्म विभागीय कार्यालयात देऊन सवलत मिळावयचो. पाव व अर्ध्या भाड्यात प्रवास करायला हा आटापिटा आनंदाने करायचो आम्ही चौघही भांवडं मामाच्या गावाला जाण्यासाठी. नागपूर ते औरंगाबाद रेल्वेचा पर्याय नसल्याने एसटीनेच प्रवास करावा लागायचा.सोळा सतरा तास लागायचे पण सीटा ऐसपैस असल्याने जाणवायचं नाही. अशियाड आल्यावर जरा कमी वेळ लागायचा.
वावे म्हणते तसं काही अडचण तर दुसर्या एसटीने सोय करायचे. एवढ्यात प्रवास न केल्याने माहिती नाही.
मला आता त्या गावाचं नांव आठवत नाहीये पण ते गांव वाहून गेल्याचं एसटमुळेच कळलं होतं ना .
एसटी महामंडळाला शुभेच्छा!

छान लेख.
एसटी नेहमी आपली वाटलीये.
लहानपणी लाल डाब्ब्यापासुन आता शिवशाही पर्यंत एसटीनेच गावी जातो.
क्वचित प्रायव्हेट बस. पण त्यात एसटीची मजा आणि सुरस्क्षितता नाही.

मी एस टी ने दोनदाच प्रवास केला. गर्दीचा धसका घेतला होता. एकदा १९८९ साली दादारहून पुण्याला जाताना. तेंव्हा टीव्ही वर महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण चा सीन होणार असल्याने त्या वेळी गर्दी नसेल म्हणून एस टी ने गेलो. अहो आश्च र्यम्! अनेक शिटा शेवट पर्यंत रिकाम्या! भारतातील जनता एकूण देवधर्माकडे वळलेली असावी.
दुसर्‍या वेळि तर जाम मजा - अंबेजोगाईला कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेलो होतो. एस टी ने जाणे हे सर्वात सोयीचे. त्या वेळी बस उलटून खड्ड्यात पडली. तो अनुभव वेगळाच. मायबोलीवर दहा वर्षांपूर्वी लिहीला होता!

तो अनुभव वेगळाच. मायबोलीवर दहा वर्षांपूर्वी लिहीला होता!
नवीन Submitted by नन्द्या४३ on 1 June, 2019 - 17:24
<<

त्या लेखाचा दुवा देता येईल का ?

माफ करा. हे दुवा देणे वगैरे मला जमत नाही. त्याला खूप अक्कल व माहिती लागते. माझ्याकडे दोन्ही नाही.
शिवाय ते वर्णन विनोदी होते असे इतर लोकांनी म्हंटल्यामुळे मला कळले की ते विनोदी आहे. मी आपला एक अनुभव म्हणून लिहीले होते. एस टी वरचाच धागा असावा!

छान लेख! भारतात होते तेव्हा एसटीने प्रवास नेहमी होत असे. आरक्षण करुन केलेला थेट प्रवास असो किंवा खेड्यातल्या शेडही नसलेल्या साध्या थांब्यावर हात दाखवून पकडलेली धूळ भरलेली एसटी असो एसटीचा प्रवास नेहमीच सुरक्षित वाटायचा. कधी रुट माहितीचा नसला किंवा नेहमीची गाडी चुकली तरी 'अमुक गाडीने इथपर्यंत जा, तिथून पुढे.....' वगरे माहिती कंट्रोल ऑफिसात व्यवस्थित मिळायची. गाडी बिघडली तर त्या मार्गावरील दुसर्‍या गाडीत सोय लावायचे. बरेचदा शहरातून गावी अर्जंट निरोप, काही सामान पाठवायचे असेल तरी लोकं एसटी स्टँडवर जायचे. आपल्या गावी जाणार्‍या एसटीच्या फलाटावर कुणी परीचित किंवा काही वेळा तर अगदी जुजबी तोंडओळख असलेल्या व्यक्तीसोबत निरोपाची चिठ्ठी, औषधे, बाळासाठी फॉर्म्युला वगैरे विश्वासाने पाठवली जायची. भारतात असताना एसटीच्या खेडोपाडी पसरलेल्या जाळ्याला मी फार गृहित धरले होते. इथे अमेरीकेत पब्लिक ट्रान्सस्पोर्ट्ची वानवा अनुभवली तेव्हा एसटीची फार आठवण यायची, अजुनही येते. देशात येते तेव्हा शक्यतो एसटीने फिरते.
एसटीला खूप शुभेच्छा!

लेख आवडला.

गावी जाताना एसटीचा प्रवास घडलाय . त्या टिपिकल हिरव्या रेक्झिन गाद्या , ही बस कुठे जाईल अशी विचारणारे घोळके वगैरे आठवलं

मस्त लेख
आम्ही बस ला लालपरी म्हणायचो .

धन्यवाद ए आदि..!

आम्ही एस.टी. च म्हणायचो.. आमच्या गावाकडे अजुनही 'यष्टी'च म्हणतात Bw

Pages