वळीव-१

Submitted by हरिहर. on 30 May, 2019 - 06:38

आज सुट्टी असल्याने मला फारशी घाई नव्हती. फक्त पोळ्या केल्या तरी पार्थचे आणि गार्गीचे काम भागणार होते. बाप लेकी दुध पोळी आवडीने खातात. दुपारी काहीतरी घाट घातला की झाले. पार्थ सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता, दोन पोळ्या होईतोवर तो आला असता. मी एका बाजुला थोडी वेलची पुड टाकुन दुध गरम करायला ठेवले होते व दुसरीकडे पोळ्या करत होते. मागे फ्रिज उघडल्याचा आवाज आला. मला जरा आश्चर्य वाटले. पार्थ कसा काय इतक्यात आला? त्याला काही विचारावे म्हणून मी मागे पाहीले तर गार्गी फ्रिजमधुन काहीतरी काढत होती. तिने फ्रिजचे दार बंद केले आणि किचनओट्यावरचे सामान जरा बाजुला करुन हातातल्या सफरचंदाचा लचका तोडत ती टुनकन उडी मारुन ओट्यावर बसली. ही तिची नेहमीची सवय. इतरवेळी मी हसुन लेकीच्या गालाला पिठाचा हात लावला असता. पण आज माझ्या कपाळावर आठ्या आल्या.
मी जरा तुटक आवाजात म्हटले “किती वेळा सांगितले जीजी ओट्यावर बसत जाऊ नकोस अशी म्हणून. आणि पारोश्याने तर अजिबात नाही. जा अगोदर अंघोळ उरक. बाबा येईल इतक्यात”
गार्गी अगदी ठेवणीतला लडीवाळ आवाज काढत म्हणाली “असं काय गं अनू! मला आवडतं येथे बसुन तुझ्याशी गप्पा मारायला आणि तुला नुसतं पहायला सुध्दा. अन् सकाळीच अंघोळ झालीय माझी. तु लाटून दे, मी चटकन भाजते पोळ्या”
हे बोलताना ती गॅस लायटरचा टक टक आवाज करत होती. कमाले या पोरीची. रविवार असुन सकाळीच अंघोळ काय करतेय, पोळ्या भाजते काय म्हणतेय, काही समजेना. आज स्वारीचे काहीतरी काम असणार. तसही तिचे ते लायटर वाजवणे मला जरा अस्वस्थपणाचेच वाटले होते.
मी तिच्याकडे पक्कड सरकवत म्हटलं “झाल्यात माझ्या पोळ्या करुन. तू ते टक टिक करायचे थांबव आधी आणि हे दुधाचे भांडे घेऊन जा बाहेर. मी आलेच”

गार्गी भांडे बाहेर घेवून गेली. मीही तिच्या मागे पोळ्यांचा डबा घेवून बाहेर आले. समोरच पार्थ सेंटरटेबलवर पाय ठेवून सोफ्यावर निवांत बसला होता. बसला कसला, चक्क पसरला होता. “शिस्त म्हणून नाही अजिबात. रविवार म्हणजे काय वाटते दोघांना समजत नाही मला. अंगी नसलेला आळस मुद्दाम अंगात आणायचा, पसारा करायचा, नेहमीची कामे मुद्दाम उशीरा करायची किंवा करायचीच नाहीत, या गोष्टींमधे कसला आलाय सुट्टीचा आनंद? नाहीतर काय?” असल्या नको त्या विचारांनी अगदी वावटळ उठवली होती मनात. अशाच विचारात गुंतले तर ते ओठावर येतील की काय याची मला भिती वाटली. मन ताळ्यावर आणत आणि आवाज कमालीचा शांत ठेवत मी म्हणाले “अरे पार्थ, तू कधी आलास? आणि घामेजल्या अंगाने लोळतोय काय असा सोफ्यावर? उठ, अंघोळ उरक. मी पुन्हा दुध गरम करुन देणार नाही हां”
एवढा शांतपणा ठेवूनही शेवटचा ‘नाही हां’ जरा चढ्या आवाजातच आला असावा. कारण ‘काय वैतागे’ असा चेहरा करत, कानातले हेडफोनचे बोळे काढत पार्थ पाय ओढतच बाथरुमकडे गेला. मॉर्निंग वॉकवरुन आल्यावर फक्त दहा मिनिट सोफ्यावर बसला असेल पण एक पिलो जाग्यावर राहीली नव्हती. पानपतावर धारातिर्थी पडल्यासारख्या सगळ्या पिलो इकडे तिकडे माना टाकून पडल्या होत्या. मला आज सगळंच खटकत होतं.

गार्गीने बाऊल काढुन टेबलवर घेतले होते. मला काही खायचे नव्हतेच. एखादे सफरचंद चालले असते. नावाला अंग ओले करुन पार्थ आला. तोवर गार्गीने त्याच्या बाऊलमधे पोळी अगदी बारीक चुरुन ठेवली होती. फोर्कने एक केळे कुस्कुरुन दिले होते. पार्थने खुर्ची ओढली आणि गार्गीने त्याच्या बाऊलमधे दुध ओतुन चमचा त्याच्या पुढे केला. तिची ही तत्परता पाहुन त्यालाही जरा आश्चर्य वाटले असावे. त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मीही फक्त ओठ बाहेर काढले. मलाही गार्गीचे काय चालले होते सकाळपासुन ते समजत नव्हते. गार्गीचेच काय, मला माझेच काय चालले होते ते उमजत नव्हते. गार्गीने पोळी गुंडाळून रोल केला आणि मगामधल्या दुधात बुडवला. ते पहाताच माझ्या मनात आलेच “काय एकेक तऱ्हा आहेत हिच्या”
मी कुरबुरत म्हणालेही “अगो कुस्करुन खा की पोळी व्यवस्थित. हे काय रोल करुन खातेस? मला नाही आवडत अजिबात”
तरीही रोलचा मोठा तुकडा दातांनी तोडत, बोबड्या आवाजात गार्गी म्हणाली “हे काय गं अनु! मी सकाळपासुन पहातेय. तुझा सकाळपासुनच मुड बरा नाहीए अजिबात. लहान लहान गोष्टींवरुन कुरबुर सुरु आहे तुझी”
पार्थचे आमच्याकडे लक्षच नव्हते. तो चमच्याने दुधपोळी खात होता आणि दुसऱ्या हाताने फोनची स्क्रिन वर खाली फिरवत होता.
गार्गीने त्याच्याकडे मोर्चा वळवत म्हटलं “बाबा, तू काय करतोय आज? कुठे जाणार आहेस का”
पार्थ मान हलवत म्हणाला “नक्की नाही अजुन. तुझं काही काम होतं का? येईन मी सोबत”
गार्गी तिच्या चेअरवरुन उठली आणि पार्थच्या शेजारच्या चेअरवर बसत म्हणाली “माझं नाहीए काही काम. पण तू आज अनुला मुव्हीला का घेवून जात नाहीस? ती नाही का, तुला खुप दिवस पहायची होती, ती मुव्ही लागलीए. मी करते हवं तर बुकिंग”
पार्थचे लक्ष अजुन मोबाईलमधेच होते. मान वर न करताच तो म्हणाला “कोणती मुव्ही गं?”
आता मात्र गार्गीने पलिकडे वाकुन त्याचा मोबाईल घेतला आणि बंद करत म्हणाली “असा कसा आहेस रे बाबा तू? मी तुला सरळ सरळ सुचवतेय की अनुला घेवून जा आज दिवसभर बाहेर कुठे तरी. मुव्ही वगैरे पहा. तर कुठे आणि कोणती काय विचारत बसलास लगेच. की मुद्दाम करतोस असं?”
सकाळपासुन मला जरा अस्वस्थच वाटत होते, पण गार्गीची बडबड ऐकुन मात्र आता माझा मुड खराब व्हायला लागला. मी उठुन उभी राहीले आणि खुर्चीची पाठ घट्ट धरुन म्हणाले “मी कुठे जायचे आणि नाही जायचे ते परस्पर कसे ठरवताय तुम्ही दोघे? मी कुठेही जाणार नाहीए जीजी. माझे एक दोन लेख राहीलेत तसेच, ते पुर्ण करणार आहे आज. आणि हे काय सारखं ‘अनु अनु’ लावलं आहेस? कित्ती वेळा तुला सांगितलय की आई म्हण म्हणुन?”
माझ्याही नकळत माझा आवाज चढला. ते ऐकुन पार्थही जरा गडबडला. गार्गीच्या हातावर थोपटत तो मला म्हणाला “असं काय करतेस अनु? काय झालंय? खरच बरं वाटत नाहीए का तुला? गार्गीवर कशाला चिडतेय उगाच?”
त्याचे बोलणे ऐकुन मी गप्प झाले पण माझे धुमसने त्याच्या लक्षात आले. तो सावकाश उठला आणि त्याने मला खांद्याला धरुन चेअरवर बसवले. ग्लासात पाणी ओतुन माझ्या हातात देत तो नुसताच माझ्या शेजारी बसुन राहीला. गार्गीने निमुटपणे पोळीचा उरलेला रोल उलगडला आणि दुधात कुस्करला. तिलाही ‘आई नक्की कशाने चिडली आहे अचानक?’ हे लक्षात नसेल आले. भाबडी पोरं. तिला दुधात पोळी कालवताना पाहून मला एकदम भरुनच आलं. पाणी पिता पिता मला उगाचच हुंदका फुटला. डाव्या डोळ्यातुन नकळत एक टप्पोरा अश्रू गालावरुन ओघळला. काहीही कारण नसताना आजची प्रसन्न सकाळ मी एकदम तणावाखाली घेतली होती. लाडका नवरा आणि एवढी गोड लेक माझी, माझ्यामुळे विनाकारण दुखावली होती. आता काही केले तरी रविवारची ती आमची ‘खास’ तार आज जुळणार नव्हती. मी खुप विचार करुनही मला काय झाले होते ते नक्की समजत नव्हते. मी डोळे न पुसताच पार्थकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. त्यानेही अगदी मुकपणे नुसत्या डोळ्याने मला आश्वस्त केले. त्याचं असं मनापासुन समजुन घेताना पाहुन मला एकदम धिर आल्यासारखे झाले. मी गार्गीकडे पाहीले. तिने उरलेली पोळी संपवली होती आणि खरकटा हात तसाच ठेवून माझ्याकडे पहात होती.
मी तिच्याकडे पाहुन नेहमीचं हसले तेंव्हा फुरगटून म्हणाली “गेला का तुझा फेरा येवून? गेला असेल तर सांग म्हणजे मी माझा सुरु करते आता”
वातावरण जरा निवळतय हे पाहुन पार्थ हसत उठला आणि बाऊल, दुधाचे भांडे उचलुन किचनमधे गेला.
आतुनच त्याचा आवाज आला “झारा, लाटणे वगैरे काही आयुधे लागली तर सांगा गं बायांनो”
पण त्याचा विनोद ऐकुनही गार्गी हसली नाही. तशीच टप्पोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात राहीली. तिचेही डोळे पानावले होते. तिच्या आवाजातला लटका रुसवा मला जाणवला. त्याबरोबरच “मला खरच तुम्हा दोघांना काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे” हा टोनही अगदी खोल कुठेतरी जाणवून गेला. शेवटी आई होते मी तिची. माझी लेक मला नाही कळणार मग कुणाला कळणार! नेहमी स्पष्ट बोलणाऱ्या गार्गीने आज सकाळपासुन जे नमन लावलं होतं त्यावरुन मला एक मात्र लक्षात आलं होतं की तिच्या मनात जे चाललं आहे ते येताना सोबत काही तरी वादळ नक्की घेऊन येणार होतं. काय असेल? सकाळ पासुन आपल्याला जे अस्वस्थ वाटत होते, उगाच हळवं व्हायला होत होतं ते सगळे म्हणजे या अज्ञात आगंतुकाची तर चाहूल नसेल? मी कशी माझ्यातच गुंतले इतकी आज की लेकीला काही बोलायचेय हेच माझ्या लक्षात आले नाही? मला स्वतःचाच राग आला. गार्गीकडे पाहुन एकदम माझ्या आईचीच आठवण झाली. मी लगबगीने हातातला ग्लास बाजुला सारुन उठले. तिचा दुध-पोळीचा खरकटा तळहात एका हातात घट्ट दाबून धरुन दुसऱ्या हाताने तिला कव घातली आणि पोटाशी ओढत विचारले “काय झालं ग जीजे? माझंच मेलीच लक्ष नव्हतं आज बघ. काय झालं बाळ, मला नाही सांगणार?”

(पुर्ण काल्पनिक)
क्रमश:
वळीव-२

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई - पत्नी - गृहिणी यांचा सूर गवसलाय तुम्हाला शाली. किती सहजपणे लिहिले आहे या भूमिकांतून. अगदी रिलेट झालं हो.
पु. ले. शु.

आई - पत्नी - गृहिणी यांचा सूर गवसलाय तुम्हाला शाली. किती सहजपणे लिहिले आहे या भूमिकांतून. अगदी रिलेट झालं हो.
पु. ले. शु.

किती गोड लिहिलय...एका पुरुषाने असं बाईच्या, आईच्या भुमिकेत येउन लिहिणं खरच कौतुकास्पद आहे.
कुठलेही वाक्य कृत्रीम नाही वाटले.
पुढे लिहा लवकर

शालीकाका छान खुलवलीय कथा. आवडली. Happy वाचताना दृश्यं समोर तरळत गेली. तुमचं सगळंच लिखाण चित्रदर्शी असतं. पहिल्या वाक्यापासूनच वाचकाला पात्रं रोजच्या ओळखीतली वाटू लागतात.. त्यामुळे आजकाल नेहमी प्रतिसाद द्यायला जमत नसलं तरी तुमचं आवर्जून वाचतेच Happy

कथानक पुढे काय वळण घेणार, याची उत्सुकता लागलीये. Happy

बाकी गार्गीची आई माझ्या आईहून कमीच चिडचिड करते Proud

छान सरजी!
पुढील भागाची उत्सुकता....
मोजकेच लेखक आहेत, ज्यांचं लेखन वाळवंटातल्या आसर्‍याप्रमाणे भासते... Happy

ग्रेट. खूप छान. तुम्ही वर्णन तर खूप छान करताच अगदी डोळ्यासमोर चित्र उभं रहातं. पण दुसर्‍याच्या मनात शिरता का तुम्ही? एक पुरुष असून बाईच्या भावना खूप छान मांडल्या आहेत. अगदी एखाद्या बाईनी लिहील्यासारख्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

वळीव आलाय बयो ची आठवण आली शीर्षक वाचून... आणि ती कथा वाचल्यानंतर दरवेळी जेव्हा वळीवाचा उल्लेख येतो त्या दरवेळी..

तुमची कथा पण मस्त पकड घेतेय!

छान लिहिलंय

एक सूचना, बघा पटली तर, शीर्षकात भाग क्रमांक टाकाल का??
तुमची कथा बघून वाचायला घेतली, पण शेवटाला कळले की क्रमशः आहे. शक्यतो मी क्रमशः कथा वाचत नाही, कारण माबोवर भरपूर अपूर्ण कथा आहेत, किंवा भाग खूप उशिरा येतात. सो कथा पूर्ण झाली अन वेळ असेल तर सगळे भाग एकत्र वाचते.
जर अजून कोणी माझ्यासारखे करत असतील तर शिर्षकातून कळले की क्रमशः आहे तर बरे असे वाटते.

अर्थात, तुम्ही असे कराच असे नाही, कृपया गैरसमज नसावा☺️

प्रतिसादांसाठी सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!
वळीव या कथेत कथासुत्राला फारसे महत्व नाहीए. "आम्हा बायकांचे काय कळणारे तुला" हे बायकोचे धृवपदासारखे वाक्य ऐकुन विचार केला की असंही काही लिहुन पाहू. बघू जमतय का? अर्थात एकदा असा प्रयत्न या अगोदरही केला होता. कधी नव्हे ते प्रतिसादांची वाट पाहतो आहे. Happy

दोनच भाग असल्याने मुद्दाम शिर्षकात तसा उल्लेख केला नाही.

शाली, आता आम्हां बायकांचे इतर काही कळेल का माहीत नाही पण चिडचिड आणि प्रेमळ चिडचिड नक्की कळली आहे असं म्हणता येईल. ::स्मित

परकाया परप्रवेश सिद्धि तुला नक्कीच प्राप्त झालीये.

फारच सुंदर तर्‍हेने भावभावनांचे चित्रण केलंय. पुढील भाग लवकर देणे. Happy

चांगली सुरुवात. पुढील भागाची उत्सुकता आहे.
पण पार्थ आणि गार्गी ही नावं भाऊबहिणीची वाटतात बापलेकीपेक्षा Wink म्हणजे असं, की पार्थ, अथर्व, आर्य या नावांची मुलं तिशीच्या पुढे गेलेली असतील असं वाटत नाही. अर्थात अपवाद असतील, मी आपलं जनरल निरीक्षण सांगितलं.

हो वावे. मलाही एकवेळ असं कन्फ्युजन झालं वाचताना. विशेषतः पार्थ ने नाश्ता करताना जे वर्णन आहे ते वाचून. (एवढा सरळ वागणारा नवरा कसा काय असं वाटल्याने) :डोळा मारणारी बाहुली.

पार्थ आणि गार्गी ही नावं भाऊबहिणीची वाटतात बापलेकीपेक्षा >>>+१
मलाही नातेसंबंध समजले नव्हते. एक मुलगी तिचं नाव गार्गी. मधेच पोळ्या करणार्‍या बाईला अनु म्हणते. (आईला नावाने हाक मारणारी मुलं मी अजुन पाहिली नाहीत म्हणुन मी आधी अनु कोण असेल ह्याचे तर्क लावत होते. मग कळलं. जरा ऑड वाटलं ते. गार्गीचं वय १८-२० च्या दरम्यान असावं असं गृहीत धरते)
मग पार्थ नावाचा बाबा येतो. त्याचंही वागणं अगदी शहाण्यासारखं. Happy
पार्थसाठी गार्गी पोळीचा चुरा करुन ठेवते बोलमधे इथे पुन्हा पार्थ कोण गार्गी कोण असा संभ्रम झाला.
आईला डीप्रेशन असावं असं वाटलं. बोलमधे दुधात चुराडा करुन पोळी खाणार्‍या मोठ्या माणसाचा राग न येता नीटपणे रोल करुन मगात बुडवुन खातेय तर ते एकेक तर्‍हा वाटतंय. Happy
संवादही जरा जड कृत्रिम वाटले. सहजता नाही. झीम च्या सिरीयलीतला प्रसंग वाटला.
मला अशा संवादांची आणि माझ्या आणि घरातल्या सदस्यांच्या अशा गोड वागण्याची सवय नाहीये म्हणुन असेल. Happy

हलके घ्या. माझा प्रतिसाद सिरीयसली घेणार नाहीतच तुम्ही तसंही. Happy
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

सस्मित >> ++१
कथा छान आहे. फक्त आईला नावाने हाक जरा ऑड वाटलं. त्यामुळे त्या एकमेकांच्या नक्की कोण आहेत कळेना. मला वाटलं की सावत्र आई आहे का जिचे वय साधारण गार्गीपेक्षा थोडे मोठे आणि म्हणून मैत्रिणी असल्या सारखी नावाने हाक.
नाश्ता म्हणून चक्क दूध पोळी खाणारी टिनेज (?) मुलगी बघून आश्चर्य वाटले.

मला तर गार्गीच्या वयाचा अंदाज आलाच नाही.

<<रोलचा मोठा तुकडा दातांनी तोडत, बोबड्या आवाजात गार्गी म्हणाली “>>>> हे वाक्य वाचून मला तरी ती टीनेज वाटत नाही

वळीव आलाय बयो ची आठवण आली शीर्षक वाचून... आणि ती कथा वाचल्यानंतर दरवेळी जेव्हा वळीवाचा उल्लेख येतो त्या दरवेळी..

तुमची कथा पण मस्त पकड घेतेय! >>>+१

Pages