नाचणीची आंबील ( रागी सूप)

Submitted by मनीमोहोर on 3 May, 2014 - 09:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

होळी झाली की " उन्हं तापायला लागली गो ss. आता, आंबीलीच पीठ भिजवायला सुरवात करायला हवी, म्हणजे पोरांच्या अंगावर घामोळं, गळवं काही उठणार नाही " असं मनाशी म्हणत आंबील करण्याची तयारी केली जाते त्या आंबीलीची रेसिपी मी सांगणार आहे. नाचणीची आंबील हे आदिवासी लोकांचे प्रमुख अन्न आहे आणि असं ही वाचलेलं स्मरतयं की त्यांना मीठाचा वापर माहित नसल्यामुळे ते चवीसाठी आपल्याच हाताचा अंगठा चोखतात. घाबरू नका आपण मीठ वापरणार आहोत या रेसिपीत. नाचणी सारख्या पौष्टिक पदार्थापासून बनलेली, आंबवल्यामुळे पचायला अधिकच हलकी झालेली, न्यूनतम उष्मांक आणि मसाले असूनही चवीष्ट असलेली, उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देणारी अशी ही नाचणीची गरम गरम आंबील. एक शिक्रेट सांगते आंबील म्हणाल तर तरुण पिढी आणि लहान मुलं बोट लावणार नाहीत पण "रागी सूप" असे नाव दिलेत तर मिटक्या मारत खातील.
साहित्य

अर्थातच नाचणीचं पीठ ( बाजारात तयार मिळते. सत्व नाही पीठ. ) , मीठ, हिंग आणि पाणी

क्रमवार पाककृती: 

आम्बील करण्यासाठी आधी कल्चर करणे आवश्यक आहे, त्याची कृती अशी.

एका काचेच्या छोट्या बोल मध्ये चार चहाचे चमचे नाचणीचे पीठ घेऊन ते भ़ज्यांच्या पीठा इतपत सरबरीत भि़जवून चोवीस तास ठेवून द्यावे. चोवीस तासांनंतर त्यात आणखी चार चमचे पीठ घालून परत भज्यांच्या पिठाइतपतच सरसरित भिजवून आणखी चोवीस तास ठेवून द्यावे. चोवीस तासांनंतर म्हणजे प्रोसेस सुरु केल्यापासून अठ्ठेचाळीस तासानी ( दोन दिवसानी) ते पीठ फुगून वर आलेले दिसेल. हे झाले कल्चर तयार. लगेच वापरायचे नसेल तर हे फ्रीज मध्ये ठेवू शकता. दह्याच्या विरजणासारखे ५-६ दिवस आरामात रहाते. ते असे दिसते.
From mayboli
प्रत्यक्ष आंबील करताना
एका पातेल्यात साडेतीन कप पाणी उकळावयास ठेवावे. त्यात चवीप्रमणे मीठ आणि चिमटीभर हिंग घालावा. अर्धा कप पाण्यात वरील कल्चर पैकी साधारण निम्मे कल्चर चांगले मिक्स करावे आणि ते उकळी आलेल्या पाण्यात गॅस मंद करून घालावे व सतत ढवळत रहावे नाहीतर गुठळ्या होतात. दोन उकळ्या आल्या की पिठाचा रंग बदललेला दिसेल. म्हणजे आंबील तयार झाली. पातळ पिठल्या इतपत कन्सीटंसी ठेवावी. घट्ट वाटली तर पाणी घालता येते पण पात्तळ झाली तर काही करता येत नाही म्हणून पाणी बेतानेच घालावे. तयार झालेली आंबील
From mayboli

वाढणी/प्रमाण: 
माणशी अंदाजे एक कप
अधिक टिपा: 

१) एक चमचा पीठाची साधारण एक कप आंबील तयार होते.
२) आयडियली ही उन्हाळ्यात आमरसाच्या जेवणात सर्वात शेवटी घेतात कारण हिची नैसर्गिक आंबट चव इतकी मस्त असते की त्या नंतर काहीही दुसरे खाऊ नये असे वाटते. पण आपण न्याहारीला किवा दुपारी चार वाजता ही घेऊ शकता. थोडी मोठी छोटी मुले कल्चर तयार असेल तर आपली आपण ही करुन घेऊ शकतात. मॅगी सारखी पण मॅगी पेक्षा कितीतरी पट पौष्टिक आणि चवदार ही
३) ह्या कल्च्ररचा आंबटपणा ते जसं जुनं होतं तसा वाढत जातो म्हणून आपल्या आवडीप्रमाणे कल्चरची मात्रा आणि आंबवण्याचा वेळ कमी जास्त करावा. जस आपण दह्याच्या बाबतीत करतो तसं. हे काही कठीण नाही अजिबात. एक दोन दिवसात ते आपल्याला सहज जमेल.
४) अगदी थोडा आंब्याच्या लोणच्याचा खार किंवा अगदी दोन चमचे ताक घातले तर हिची चव अजून खुलते. काहीही न घालून सुध्दा छान लागते.
५) ही गरम गरमच खावी.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई, कोकणातील पारंपारिक रेसिपी आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो, फीडबॅक द्यायचं राहून गेलं.
मस्तं लागली आंबिल.
एकदा अशी वर लिहिलीय तशीच केली आणि एकदा लसूण, आलं कुटून घालून केली.

दोन्हीवेळा मस्तं लागली
धन्यवाद!

आमच्यात आधल्या दिवशी किंवा सकाळी भिजवुन लगेच करतात.>>> अनिल चेम्बुर आम्ही ही कल्च्ररच फक्त दोन दिवस ठेवतो नंतर एक दिवसच आधी भिजवतो

साती, आंबील करायला जमली आणि आवडली ही खूप छान वाटल

देशावर ज्वारीची आंबील करतात असं ऐकून आहे पण माहित नाही कशी करतात ते. आमच्याकडे कोकणात नाचणीचीच करत्तात.>> मला ज्वारीचीच माहित आहे!! महालक्ष्मीच्या नैवेद्याला करतात. रेसिपी लिहीन नंतर

उन्हाळा आलाय - धागा वर काढतेय
मला आंबील करायचीय. पण एक शंका :: कल्चर करताना सद्ध्याच्या उन्हाळ्यात पण ते बाहेर ठेवायचे ना?

हो बाहेरच ठेवायचे , तरच कल्चर तयार होईल. खूप उन्हाळा असेल तर लवकर तयार होईल कल्चर एवढेच.

विरजण लावलेले दूध बाहेर ठेवले तरच त्याचं दही बनतं तसच आहे हे.

ममो हजार धन्यवाद. आंबील माझी पण फेवरीट. पण मी ताकात नाचणी चा पीठ मिक्स करून ते सगळं शिजवून मग किंचित मीठ घालुन पिते.
अवांतर, सध्या सावरडो ब्रेड वर प्रयोग सुरु आहेत. त्याचं कल्चर बनविण्याची पद्धत पण जवळपास अशीच आहे. जगाच्या दोन कोपर्यतल्या दोन पद्धती, पण मुळातली विचारधारा किती सारखी आहे. रच्याकने, माझी टिचर रोमानियन आहे.

तयार झालेल्या कल्चरमधलं निम्मं वापरलं की उरलेल्या निम्म्या कल्चरमधे अजून चार चमचे पीठ घालून ठेवून द्यायचं का? परत दुसऱ्या दिवशी सेम कृती ना?
आमच्याकडे आई नुसतं पीठ, हिंग, मीठ घालून शिजवून मग ताक घालून पातळ करते.

तयार झालेल्या कल्चरमधलं निम्मं वापरलं की उरलेल्या निम्म्या कल्चरमधे अजून चार चमचे पीठ घालून ठेवून द्यायचं का? परत दुसऱ्या दिवशी सेम कृती ना? >> हो एकदा केलेलं कल्चर पाच सहा दिवस चालत मग परत करावं लागतं .

आभा, छान माहिती. मस्त लिहिलं आहेस.

मनीमोहर यांनी सांगितल्याप्रमाणे मी काल ज्वारीच्या पीठाचे आंबील केले होते. उन्हाळ्यामुळे पीठ २४ तासच भिजवले. आंबील करताना मस्त आंबुस वास घरभर दरवळला. चव तर अप्रतिम होती. Bw

DJ थँक्यू , रेसिपी आवडली म्हणून.

ज्वारीच्या पिठाची मी अजून केलेली नाहीये पण आता नक्की करून बघेन.

Pages