खरडवही.....भाग १

Submitted by अतरंगी on 26 May, 2019 - 06:19

रोजच्या जगण्यात अनेक छोटे मोठे प्रसंग घडत असतात. त्यातले काही प्रसंग, तेव्हा मनात आलेली भावना कुठे तरी खोलवर रुतुन बसते. तसं बघायला गेलं तर त्यात फार काही विशेष नसते, पण त्यावर लिहावेसे वाटते. अगदी महत्वाचे नाही, फार काही उदात्त किंवा थोर नाही. तरी पण असेच आयुष्यात लक्षात राहिलेल्या छोट्या मोठ्या प्रसंगांची नोंद...... असंच, उगीचंच.....

१.
रोजचंच सगळं.....
पावणे पाचचा गजर... सगळं उरकून ५.३५ ला मेस हॉलला नाश्ता. तो उरकुन ६.१० ला ऑफिसला निघायचं होतं. रोजचाच दिनक्रम असला तरी आजचा माझा मूड वेगळा होता. नाश्ता करता करता पण उगीचंच सगळयांचे निरीक्षण करत बसलो होतो. दरवाजातून येणारा प्रत्येक जण, त्यांनी कार्ड पंच केल्यावर मशिन मधून येणारे कृत्रीम thank you. कुठे कुठे काही टेबल्सवर चाललेल्या गप्पा, सिरॅमिकच्या प्लेटस बाउल, स्पून, फोर्क चे आवाज..
माझा नाश्ता संपतच आला होता, त्यात समोरचे दोन जण नाश्ता संपवून, ट्रे घेऊन उठले. त्यांच्या ट्रे मधले अर्धवट सोडलेले पदार्थ बघून नजर नकळत स्वतःच्या ट्रे कडे गेली. भुर्जी मधून काढून टाकलेल्या मिरच्या, अंड्याची टरफले, त्यातले पिवळे बलक, संत्र्याची सालं, बिया, रोटी ची काढून टाकलेली कड सगळं डोळ्यांना खुपलं. घरी असल्यावर आपली प्लेट किती स्वच्छ असते, कोणी यात जेवलं की नाही प्रश्न पडावा. आपण किती अभिमानाने सांगतो की, माझ्या ताटात जेवण झाल्यावर कण सुद्धा सापडणार नाही. मग इथेच आपली प्लेट इतकी अस्वच्छ का? उद्या पासून अंड्याची टरफले, संत्र्याची साले टाकायला एक सेपरेट बाउल घ्यायला हवा....

आपण प्लेट ठेवायला जातो तेव्हा बाकीच्यांचे पण ट्रे/ प्लेट्स दिसतात. किती प्लेट्स मध्ये उरलेले, तोंड पण न लावता फेकलेले पदार्थ, ग्लास मधे उरलेले पाणी, ज्युस, दुध असतं.... एवढं सगळं अन्न वाया घालवताना या लोकांना काहीच कसं वाटत नाही?

ट्रे ठेवल्यावर ते उचलून धुवायला टाकायला एक माणूस ठेवलाय... त्याला स्टाफने आणून ठेवलेले ट्रे मधले उरलेले पदार्थ फेकायचे आणि प्लेट, बाउल धुवायला टाकायचे हेच काम दिलंय. त्याला कसे वाटत असेल रोज ह्या प्लेटस/बाउल रिकामे करताना? रोज एवढे अन्न फेकून देताना?

दररोज सकाळ संध्याकाळ एवढ्या सगळ्या प्लेट्सचे खरकटे काढून त्याला जेवायची वासना तरी होत असेल का? जेवताना तो खरेच मन लावून जेवत असेल की फक्त पोटाची खळगी भरायला जेवण गळ्याखाली ढकलत असेल? रोज ते सगळं अन्न एका ड्रम मधे फेकत, त्या ड्रम शेजारीच कामाचे सगळे तास उभं रहायचं..... तो अन्नाचा आंबट कुबट वास..... त्याला सवयीचा झाला असेल का?
तो घरी गेल्यावर, या कामामधल्या त्रासाचा विचार करून ताटात एक कण पण न सोडता ताट स्वच्छ करत असेल का? जेवण झाल्यावर ताट विसळून ठेवत असेल का? की निम्म्या भारतीय नवर्‍यां प्रमाणे जेवण झालं की ताट सरकवून हात धुवायला जात असेल?
तो कधीच कोणाशी बोलताना दिसत नाही. कोणी त्याच्याशी बोलताना का दिसत नाही? यांत्रिकपणे ट्रे उचलणं, प्लेट्स आणि बाउल मधलं खरकटे त्या बादलीत टाकणे आणि ते सगळे डिश वॉशर मध्ये टाकणाऱ्या माणसासमोर रचून ठेवणे, एवढेच करत असतो....

आज त्याच्याशी बोलावं...

हाय, हॅलो गुड मॉर्निंग, हाऊ आर यु किंवा असंच काहीतरी ..... निदान आपली प्लेट उचलल्या वर त्याला thank you तरी म्हणावं. त्याच्या कामाची, त्रासाची दखल घेणारे कोणीतरी आहे, हे पाहून त्याला बरे वाटेल कदाचित..... समोरचा माणूस ट्रे ठेऊन गेला तरी मी ट्रे हातात धरून तिथेच थांबलो. त्याने माझ्याकडे बघितलं आणि ट्रे माझ्या हातातून घेतला. मी बोलायला तोंड उघडायच्या आत त्याने नेहमीच्या सवयीने ड्रमकडे वळून ट्रे आणि प्लेट्स रिकाम्या करायला सुरुवात सुद्धा केली. मी म्हणलेलं थँक्स त्याच्या कानापर्यंत पोचलं पण नाही. मी का थांबलोय हे न कळल्याने म्हणा किंवा घाईत असल्यामुळे असेल पण मागचा एक जण पुढे जाऊन ट्रे ठेऊन निघून गेला. 'तो' सवयीने तो ट्रे उचलून कामाला लागला.

दुसऱ्या दिवशी मात्र ठरवून मी प्लेट स्वच्छ केली, फळाची सालं वगैरे फूड वेस्ट च्या डब्यात टाकली. ट्रे मध्ये उष्ट्या खरकट्याचा मागमूस पण नव्हता....

मी त्याला ट्रे हातात दिला. स्वच्छ ट्रे बघून त्याने एक निमिषभर माझ्याकडे पाहिलं आणि प्लेट्स डिश वॉशर समोर ठेऊन पुढच्या ट्रे कडे वळला.

आजकाल त्याच्या नजरेत ओळख दिसते....... माझ्याकडून ट्रे घेताना, मला उगीचच तो किंचित हसल्याचा भास होतो.


बर्‍याच दिवसांनी, खरेतर वर्षांनी एका जुन्याच एम्प्लॉयर कडे शॉर्ट टर्म असाईनमेंट घेतली होती. बारा तासांचा दिवस आणि तीस पस्तीस दिवसांचे काम. प्रत्येक शिफ्टच्या सुरुवातीला सेफ्टी मीटिंग करायची, असा कंपनीचा नियम. tool box talk चा शॉर्ट फॉर्म करून त्याला TBT असे गोंडस नाव दिलेले. काम सुरु झाल्यानंतर एक चार पाच दिवसांनी सगळयात सिनियर टीम मेंबर दिवसाचा सेफ्टी टॉपिक एक्सप्लेन करून झाल्यावर now our manager will address today's meeting असे म्हणून बाजूला सरकला आणि मागून एक अलमोस्ट माझ्याच वयाचा अरबी तरुण पुढे आला.
त्याने बोलायला सुरुवात करताच मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. हा आपल्या युनिटचा मॅनेजर आहे??? इतका वेळ मी त्याला आमच्या सारखाच ईंजिनिअर समजत होतो. Seniority आणि नावासमोर असलेली सर्टिफिकेटची माळ, यावर योग्यता आणि पगार ठरत असलेल्या आपल्या क्षेत्रात, मी आणि माझ्या पेक्षा कैक पटीने अनुभवी आणि प्रशिक्षित असलेल्या लोकांच्या युनिटचा, हा पोरगा हेड आहे? what the fuck...
सालं काय नशीब असतं एकाएकाचं. जन्माने अरबी, श्रीमंत बाप, एखाद्या International School मधे शिक्षण, US/UK मधे पदवी आणि एखाद्या मोठ्या कंपनीमधे मोठ्या पदावर असलेल्या कोणाचा तरी वशीला. याच्या जिवावर एका फॉर्च्युन ५०० कंपनी मधे एवढी मोठी पोस्ट याला या वयात मिळालेली.... बरंय च्यायला. अगदी तरुण वयात वरच्या पोस्टवर बसणारे हे अरबी/युरोपिअन/अमेरिकन, निम्म्या वेळेस तर त्यांना निर्णय घ्यायला Sub ordinates वर डिपेंड रहावं लागतं, ह्यांच्या हाताखाली असलेले एशियन्स काम करणार आणि हे क्रेडीट घेत प्रमोशन करुन घेणार....
आपल्यावर अजुन तरी आपल्यावर आपल्यापेक्षा लहान असलेल्या कोणाला रिपोर्ट करायची वेळ आलेली नाही. पण अजून काही वर्षात येईल कदाचित.... आपल्याला कितपत हँडल करता येईल शंकाच आहे. किती वैतागवाणी गोष्ट आहे. आपल्यापेक्षा कोणत्या तरी लहान, कमी अनुभवी माणसाकडून ऑर्डर घ्यायची,फॉलो करायची, लिव्ह अ‍ॅप्लिकेशन/ परफॉर्मन्स रिव्ह्यु त्याच्या कडून अ‍ॅप्रुव्ह करुन घ्यायचे..... अवघड आहे.

पण का? अवघड काय आहे त्यात ? आपल्याला आपलं काम दिलं आहे ते करायचा पगार मिळतो ती काम सांगणारा २२ वर्षाचा आहे कि ६२, काय फरक पडतो? अवघड आहे, हे आपला ईगो बोलतोय का? आपल्यापेक्षा जर जास्त शिकलेला कोणी आपल्या पेक्षा मोठ्या पदावर असेल आला तर त्याला रिपोर्ट करावं लागणारच.... आपल्याला पण आपल्यापेक्षा मोठे असलेले किती जण रिपोर्ट करतात/ करत होते, त्यांना कसे वाटत असेल ? या असाईनमेंट मधेच टास्क सुपरवायजर, फोरमन, वर्कर्स असे सगळे मिळून जवळ जवळ ६५ जण आपल्या टीम मधे आहेत. त्यांचे रिपोर्टींग तसे म्हणायला गेलं तर आपल्याकडेच असते. त्यातले एक मोजके ५-७ जण सोडले तर सगळे आपल्यापेक्षा मोठेच आहेत. आपल्या अगदी पहिल्या जॉब मधे जेव्हा आपण ईनमीन २२ वर्षाचे होतो तेव्हासुद्धा ५५ ते ६० वर्षाचे वर्कर्स पण आपल्या टीम मधे होते. आपल्याकडून instructions घेताना या सर्वांना कसे वाटत असेल? त्यांना पण राग येत असेल का? कोण कुठला आपल्या मुलाच्या वयाचा मुलगा येऊन आपल्याला ऑर्डर्स सोडतो... का तर त्याने चार वर्षे कॉलेजला जाऊन विद्यापिठातून शिक्का असलेले एक सर्टिफिकेट मिळवले आणि आपल्याकडे ते नाही.

कित्येकवेळा एखादा जॉब अडकला असेल काही प्रॉब्लेम असेल तर आपण अशा परिस्थीतीमधे काय करता येईल हे त्यांनाच विचारतो, त्यांचे मार्गदर्शन घेतो. पण मग त्यांच्या ऐवजी आपण का या खुर्चीत बसलोय? कशाच्या जिवावर? नॉलेजच्या? ते तर यातल्या कितीतरी लोकांकडे आपल्यापेक्षा जास्त आहे! मग कशामुळे? पदवीमुळे? सर्टीफिकेट्स मुळे? का अतुल ठाकुरच्या लेखात उल्लेख होता त्या सांस्कृतिक भांडवलामुळे? आपली पदवी, सर्टिफिकेट्स, ईंग्रजी, कम्युनिकेशन स्किल्स, आपण बोलत असलेली शहरी/ प्रमाण भाषा, आपलं मध्यमवर्गीय असणं, ठिकठाक दिसणं हे सगळे भांडवलच की... हा याच सर्व गोष्टींचा परिणाम का? हे भांडवल जे आपण म्हणतोय त्यातले काही आपल्याला मिळालेले, काही आपण कमावलेले... खरेतर आपण आज पर्यंत फक्त पदव्या आणि सर्टिफिकेट्स वर लक्ष केंद्रित केलं, बाकी एकतर होतं किंवा आपसूक मिळालं, त्यासाठी आपण काहीच कष्ट केले नाही ! मुळात हे सगळे भांडवल आहे हा मुद्दाच आपण लक्षात घेतला नाही. प्रगती करायची असेल तर हेच सर्व भांडवल म्हणून ट्रीट करायला हवे आणि ते कसे वाढवता येईल यावर पण लक्ष द्यायला हवे... आणि हे फक्त स्वतःपुरतं नाही तर मुलांना पण हळूहळू तसाच विचार करायला शिकवायला हवे.....

मी आणि माझी मुले.... झालं. एवढंच आपलं विश्व..... आपण भांडवल वाढवायचे आणि आपल्या मुलांना ते कसे वाढवता येईल ते शिकवायचे.... एवढीच आपली धाव... पण बाकी समाजाचे काय? त्यांच्या मुलांचे काय? आपल्याच मागे पडलेल्या नातेवाईकांचे आणि त्यांच्या मुलांचे काय? आपल्याला काय ना त्याच्याशी... बघतील त्यांचे आईबाप आणि ते......

३.

सकाळी सकाळी लॉग ईन केल्यावर पहिलाच ईमेल.... Fatigue test schedule केल्याचा. आमचाही जॉब प्रोफाईल आता स्ट्रेसफुल कॅटेगरी मधे ढकलेला... शट्डाऊन चालू झाल्यावर दर १२ दिवसांनी मेडीकल करणे बंधनकारक... नेहमीप्रमाणे सर्व टेस्ट पार पडल्या आणि नेहमीप्रमाणे टेस्ट्स करताना मला त्या काकांची आठवण आलीच...

असाच २०१७ मधला एक शॉर्ट टर्म जॉब, काम सुरु व्हायच्या आधीचे दोन तीन दिवस.... निवांत कंपनीच्या पैशाने खाणे पिणे आणि नेटवर टीपी करणे एवढेच काम..... सकाळी दहाच्या सुमारास coordinator चा ईमेल आणि त्यात ११.३० ला ड्रायव्हर मेडिकल साठी पिक करायला येत असल्याची ईन्फॉर्मेशन..... ईमेल मधे to मधे दुसरे एक ख्रिश्चन नाव. ड्रायव्हर आधी मला पिक करुन मग त्यांना घ्यायला जाऊ म्हणाला. गाडीत त्यांच्याशी ओळख झालीच......५०-५५ तरी वय असावंच, वसईला राहणारे, सर्वसाधारण ऊंचीचे आणि शरीरयष्टिचे, थोडे पोट सुटलेले, सावळ्या वर्णाचे...
ड्रायव्हर हॉस्पिटल मधे ड्रॉप करुन दुसरे काम करुन येतो म्हणून गायब झाला.

हॉस्पिटल मधे रजिस्ट्रेशन करुन सगळ्या टेस्ट होईपर्यंत नाव, गाव, आधीचे जॉब, देश, कंपन्या वगैरे नेहमीची ओळखपरेड झाली.... ड्रायव्हर परत यायला अर्धा तास तरी लागला असता म्हणून चहा घेऊन रिसेप्शनला जाऊन बसलो. आणि अचानक का आणि कसं काय माहीत ते काका बोलू लागले.... पहिल्या भेटीत आपण बोलणार नाही अशा गोष्टी, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे घर, कॅन्सरने वारलेली त्यांची पत्नी, त्यांची कॉलेज मधली एक मुलगा एक मुलगी, पत्नी गेल्यावर त्यांचे होणारे हाल, मुला-मुलीची भविष्याची काळजी..... सांगत राहीले. मी नुस्ता हं हं करत ऐकत राहीलो.

ईतक्याश्या ओळखीवर कोणी असंकाही सांगताना काय प्रतिक्रिया देणार? त्यांना मला एवढं सगळं का सांगावंसं वाटलं असेल? हे सगळं बोलायला/ समजून घ्यायला त्यांच्या कडे कोणीच नसेल का? त्यांना माझ्या वागण्या बोलण्यात काहीतरी आपलंसं वाटलं म्हणून बोलले असतील की माझ्याजागी कोणीही असतं तरी त्यांना चाललं असतं? त्यांना फक्त बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं. मुलं, मित्र, नातेवाईक यापैकी असं कोणीच नसेल की ज्यांच्यापाशी त्यांना हे सर्व बोलता येत नसेल ? समोरच्याला उपदेशाचे/ सकारात्मकतेचे बिनकामी डोस न पाजता मोकळं होऊ देणारे कोणी असतं की नाही? प्रत्येकाला असे का वाटते की समोरचा माणूस बोलतो आहे त्यावर मी काही तरी सल्ला किंवा उपदेश दिलाच पाहिजे? काकांना कोणी फक्त ऐकून घेणारं, समजून घेणारं भेटत नसेल का? असं अर्ध्या तासापुर्वी भेटलेल्या व्यक्तीशी ईतकं बोलणारा माणुस एकटेपणाला किती वैतागलेला असेल.......

ड्रायव्हरचा फोन आल्यावर काका बोलायचे थांबले आणि त्यांना जाता जाता एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेऊन त्यांना रूम वर सोडून मी माझ्या रूम वर पोचलो. नंतर काम सुरु झाल्यावर मी बिझी झालो आणि ते पण. अधून मधून येता जाता दिसायचे आणि एखादे हाय हॅलो व्ह्यायचे तेवढेच. असेच चार पाच दिवस गेल्यावर गाडीतून जाताना दिसले, मी ओळख दिली तर गाडी थांबवून उतरले. जवळ येऊन शेकहँड करत म्हणाले
" Today is my last day !"

" What? why ? what happened?"

" My medical reports were rejected due to high BP"

कंपनीच्या काटेकोर नियमांमधे त्यांची ब्लड प्रेशरची रिडींग बसत नव्हती. तीन चार दिवस वेगवेगळ्या लोकांनी रिपोर्ट्स रिव्ह्यू करुन त्यांना डिमोबीलाईज करायचा निर्णय घेतला होता. मला पटकन काय बोलावे हेच कळेना.

मी उगाच बोलायचं म्हणून its ok, happens, are you taking any medication for BP?, take the medication and we will meet in next shutdown once it is under control. असं काही बाही बोलत राहीलो. ते पण हं हं करत राहीले. bye, good bye, see you झाल्यावर ते जाऊन गाडीत बसले. नेहमी आपण एखाद्या माणसाला भेटून निघालो, गाडीत बसलो की परत एकदा बघून निरोपाचं हसतो, हात हलवून बाय करतो, पण ते तसं काही न करता समोर कुठेतरी शुन्यात बघत राहीले. मी गाडी नजरे समोरुन जाई पर्यंत त्यांच्या कडे बघत राहीलो.
तेव्हा पासून आजतागायत कधीही कुठेही ब्लड प्रेशरचे मशीन हाताला लावले की मला ते काका, त्यांनी त्या हॉस्पिटल च्या रिसेप्शन मधे बसून सांगितलेलं सगळं, आणि त्यांचा तो शुन्यात बघत असलेला चेहरा हटकून समोर येतो. काही क्षण उदास करुन जातो.......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि माझी मुले.... झालं. एवढंच आपलं विश्व..... आपण भांडवल वाढवायचे आणि आपल्या मुलांना ते कसे वाढवता येईल ते शिकवायचे.... एवढीच आपली धाव... पण बाकी समाजाचे काय? त्यांच्या मुलांचे काय? आपल्याच मागे पडलेल्या नातेवाईकांचे आणि त्यांच्या मुलांचे काय? आपल्याला काय ना त्याच्याशी... बघतील त्यांचे आईबाप आणि ते...... >>>> काय बोलावं? असच चालूये सगळीकडे.

खूप छान लिहलंय. पु भा प्र.
मलापण 'आधे अधुरे पन्ने'ची आठवण आली.

पण तुम्ही लेखमालेचे शिर्षक बदलावे असे वाटते. खरडवही म्हणजे टाईमपास काहीतरी असेल असं वाटलं होतं.

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy

मी साधारण महिनाभरा पुर्वी हे लिहायला घेतलं. अर्धं लिहुन झाल्यावर ड्राफ्ट वाचला आणि मला पण पन्ने आठवले. मग लिहायचं सोडून पन्नेच वाचत राहीलो. पन्ने ईतके सुंदर आहेत की त्यानंतर मला पुढे लिहावेसेच वाटेना. तरी गेल्या विकेंडला परत लिहावंसं वाटलंच. Happy

सुंदर लिहीलयं अतरंगी....
नाव अजून काही वेगळे देता येईल तर बघा... पण तुम्हाला वाटलं तर....
पन्ने ईतके सुंदर आहेत की त्यानंतर मला पुढे लिहावेसेच वाटेना. >>>> यावर हे आठवले --- Woods would be silent if no birds sing except those who sing the best --- शब्द थोडे बदलले असतील पण कोट असाच वाचला होता.
जोपर्यंत मनाचा हुंकार हाताला सहज लिहीते करतोय तोपर्यंत जरूर लिहा. वाचायला आवडेल.

अरे वा! छान लिहिलंय. फक्त डिमोबिलायझेशन, Fatigue test वगैरे संदर्भ लागले नाहीत. कुठल्या इंडस्ट्रीबद्दल लिहिलंय? अजून वाचायला आवडेल. पु.ले.शु.

स्वप्ना,

मी आॅईल ॲंड गॅस ईंडस्ट्री मधे काम करतो. स्टाफला कामाचे प्रेशर खुप असते. कामाच्या स्वरूपामुळे आणि काम करताना एखाद्याचे बीपी/ शुगर हाय लो झाल्यास होणाऱ्या अपघाताच्या शक्यतेमुळे ठराविक दिवसांनी बीपी शुगर वगैरे चेक करतात. त्याला आमच्या कंपनीत Fatigue test म्हणतात. ज्यांची रिडींग्स कंपनीच्या requirements मधे बसत नाहीत त्यांना प्लांटमधे काम करता येत नाही.....

ते खरडवही म्हणजे काहीतर टाईमपास टाईप असेल असे वाटल्याने अजुन वाचले नव्हते, पण हे तर खुप छान आहे Happy

मस्त!
स्वप्नाच्या पन्न्यांसारखी खरडवही पण आवडलीये. खरडत रहा.>>>> +१.
जोपर्यंत मनाचा हुंकार हाताला सहज लिहीते करतोय तोपर्यंत जरूर लिहा. वाचायला आवडेल.>>>> वा कारवी!

Pages