मदत - स्फुट

Submitted by सुप्रिया जाधव. on 14 May, 2019 - 12:45

ती !!
आयुष्यभर घाण्याला
जुंपलेल्या बैलासारखी
खालमानेन कष्ट उपसत
घर-नोकरी, सण-वार, पै-पाहुणा
ह्यांचा रगाडा उपसून
सगळ्यातूनच रिटायर्ड होऊन
तिच्या लाडक्या जावयाच्या आग्रहाखातर
माझ्याकडे आलेली
कायमची !!

तो,
तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर
ढोर मेहनीतीची जोड देत
मिळवलेल्या पै न पैची
योग्य गुंतवणूक करून
उच्चपदावरील जबाबदारीच्या कामामुळे
सिव्हियर हाय ब्लडप्रेशर आणि वाढते कोलेस्ट्रॉल घेऊन
चाळीशीतच ऐच्छिक निवृत्ती घेतलेला

मी,
मुलाच्या आग्रहाखातर
निदान त्याच्या बारावीत
त्याच्या वाटणीला पूर्णत्वाने यावे म्हणून
शाळेतला व्हाईट कॉलर जॉब सोडून आणि
बऱ्याच मानसिक, शारीरिक ओढाताणीनंतर
फक्त आणि फक्त संसार करण्यासाठी घरी बसलेले
कायमची !!

सासू-जावई
दोघांनाही
सकाळी सकाळी आलेल्या पेपराची घडी मोडायची असायची !
इतके दिवसांची कसर भरून काढण्यासाठी !

उपाय म्हणून दोन पेपर लावले
एक इंग्लिश, नवर्यासाठी !
दुसरा मराठी,
आईसाठी !

सुरवातीला सामंजस्याने
आदला-बदल होत असे
पेपरची

मग वेळच लागतोय वाचायला,
घडी व्यवस्थितच नाही केलेली,
ह्या तक्रारी यायला लागल्या

टिव्ही पाहण्यावरूनही तेच !
मग दोनाचे तीन झाले टिव्ही !
एक त्याच्या बेडरूममध्ये
एक तिच्या बेडरूममध्ये आणि तिसरा बाहेर
आल्या गेल्या पाहुण्यांसाठी हॉलमध्ये !

माझी सकाळ संध्याकाळ आपली स्वयंपाकघरात !

आता
तो नाही,
अकाली गेला प्रकृतीच्या हेळसांडीने !
तीही नाही
गेली वृध्दापकाळाने !

पाच रिकाम्या खोल्या,
घडीतले रोज येणारे
आणि ती न मोडता
रददीत जाणारे
न्यूजपेपर !
आणि टिव्हीचंच काय
पण स्वतःच्या आयुष्याचं रिमोटसुद्धा वापरायलाच विसरलेली
मी !
जगतेय काळाची आज्ञा व्हायच्या प्रतीक्षेत !

आणि तुझ्यातच रमण्याची सवय लावून घेतलेल्या मला तू अचानक म्हणतेयस,
स्वतःला अपडेट कर
पेपर वाच, टिव्ही बघ !!

सवयी एकदम मोडतात का अश्या ?
मग एकच कर माझ्यासाठी !
मला दिवा-स्वप्नात रमायची ही जी सवय लावलीयस न ?
ती मोडण्यासाठी मदत !!

करशील कविते ???

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वा!
अगदी सुरेख! खरच भारी लिहिलय.
हे असंच आणि अगदी असंच होतं. एखादा ठरुन गेलेला नियम असावा किंवा परंपरा असावी तसं आणि तितक्याच सहजतेनं.
मस्तच!

Sundar