आठवणीतलंं जनसेवा

Submitted by साजिरी_11 on 16 May, 2019 - 12:50

आज बऱ्याच दिवसांनी ब्रेकफास्टला तिखटमीठाचा सांजा करताना रवा भाजायला घेतला आणि जनसेवाची हटकून आठवण आली..! येस्स 'गावातलं' जनसेवा..पीयूष आणि सांज्यासाठी प्रसिद्ध असलेलं जनसेवा, बरेचदा चव , क्वालिटीसाठी नावजलं गेलेलं जनसेवा तसंच अव्वाच्या सव्वा किंमती लावतात बुवा उपाध्ये असं म्हणून टीकेचा भडिमार सहन केलेलंही जनसेवाच..काहीही असलं तरी पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत मानाचं स्थान पटकावलेलं जनसेवा..!

मला आठवतंय लहानपणी आजीच्या हाताखाली स्वयंपाकाचे बेसिक धडे घेत होते तेव्हा वरणभाताच्या कुकरनंतर मला शिकण्याची इच्छा असलेला पदार्थ होता तो म्हणजे सांजा..आजी चक्क हसलीच होती मला. म्हणाली " सांजा पर्फेक्ट जमणं फार कौशल्याचं काम आहे बरं का. त्यात पाणी नेमकं किती आणि केव्हा घालायचं , साखरेची चिमूट कधी टाकायची , रवा कसा भाजायचा याचं एक शास्त्र आहे बरं..अगोदर कांदा एकसारखा चिरून दाखव मला. सांज्याचं बघू आपण पुढेमागे." तेव्हा अगदीच लिंबू टिंबू असल्यामुळे हो म्हणण्याशिवाय काही ऑप्शनही नव्हता. हळूहळू जिभेला तिथल्या सांज्याची , साबुदाणा खिचडीची चटक लागायला लागली होती.

जनसेवामधे जाणं हाही एक मजेशीर प्रकार असायचा. बहुतेक करून लक्ष्मी रोडची खरेदी आटोपून आलेलं पब्लिक जसं तिथे असायचं तसं रोजचा पीयूषचा रतीब लावलेलं पब्लिकही नित्यनेमाने दिसायचं तिथे. नेहमीच्या लोकांना तिथे येणारे वेटर्सही ओळखायचे. इतकंच काय त्यांचा खाण्याचा क्रमही माहीत असायचा. आल्या आल्या डिशमधे मधोमध मुदेच्या प्रमाणात दिलेला सांजा..जरा जास्त नाही किंवा कमीही नाही. ओलं खोबरं हमखास असायचंच. त्यातही माझ्या आठवणीत दोन प्रकार असायचे, कधी खोबरं नेहमीप्रमाणे खोवून तर कधी खोबरं जाड किसणीवर किसून. मला स्वतःला किसलेलं खोबरं जास्त आवडायचं. सांज्यासारखीच तिथली साबुदाण्याची खिचडी हा खूप लोकांच्या मनाचा हळवा कोपरा होती.
'अप्पाची खिचडी बेस्ट की जनसेवाची बेस्ट', 'अप्पासारखी खमंग काकडी जनसेवा का देत नसावेत , समजा दिली तर काय फरक असेल चवीत' किंवा साबुदाणा अजून छान लुसलुशीत भिजावा आणि खिचडी मऊ व्हावी म्हणून जनसेवावाल्यांनी साबुदाणा कसा भिजवला पाहिजे अशा मजेशीर मुद्द्यांवर खवैयांच्या चर्चा चालायच्या तिथे. बाजूच्या टेबलावर बसून हे सगळं ऐकताना भारी मजा यायची..!
घरचा सांजा तिथल्यासारखा व्हावा म्हणून कित्येक सुगरणींनी केलेले प्रयत्न , त्यांच्या सांज्याचं केलेलं यशस्वी 'डीकोडिंग' याचे किस्सेही कळायचे काही वेळा..बिल देऊन निघताना तिथली श्रीखंडाची वडी किंवा दाण्याचा लाडू घेतला नाही असे लोक अगदीच क्वचित असतील. नारळाची बर्फी , पौष्टिक लाडू , गुलकंद वडी असे काही खास पदार्थही फेमस होते जनसेवाचे पण बाकी कशाहीपेक्षा पीयूष आणि सांज्यासाठी विशेष ओळख जपली होती जनसेवाने.

काळाच्या ओघात बदलावं लागतं हा जगाचा नियम आहे. जनसेवाला जरा थोडा लवकर याचा फटका बसला. रेनोव्हेट केल्यानंतर जरा जास्तच प्रमाणात वाढवलेल्या पदार्थांच्या किंमती, त्या मानाने मग सेल्फ सर्व्हिसवर अडून राहणे, याचा परिणाम जनसेवाला नक्कीच जाणवायला लागला. पुढची पिढी जनसेवा चालू राहावं म्हणून कितपत इंट्रेस्टेड राहिली हा वेगळा वादाचा मुद्दा होऊ शकतो. जनसेवा लंबी रेस का घोडा होता हे मात्र खरं..! 'हॉटेल' आणि 'उपहारगृह' यात एक खूप महत्वाचा पॉईंट म्हणजे आपलेपणा, ग्राहकांप्रती असलेला जिव्हाळा हे असतं. पैकी बऱ्याच कसोटींवर जनसेवा खरं उतरलं होतं. असं असूनही काहीतरी चुकत गेलं, लोकांशी असलेलं कनेक्शन बिघडत गेलं परिणाम जनसेवा कायमचं बंद पडलं.
अजूनही लक्ष्मी रोडवरून जाताना मान आपसूक उजवीकडे जातेच आणि जुन्या आठवणींत मन रमतं..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जनसेवात जायचा योग मी 5-6 वर्षाची होते तेव्हा आला होता.लेख वाचून वाटतंय कि उगाच जनसेवा बंद झालं.

आईग्गं....मनाची तार छेडलीस अगदी. मऊ लुसलुशीत पिवळा सांजा. दुधी हलवा आणि पियुष....क्या बात क्या बात. अनेक एकांडे जेष्ठ नागरीक किंवा सुनेच्या घरातले आज्जी आजोबा जुन्या चवींच्या शोधात येत असत. नैवेद्याच्या वाटीत दुधी हलवा, श्रीखंड, एकच लाडू किंवा गुलाबजाम, खरवस, डिंकाचा लाडू, अळूची वडी, पेढा, श्रीखंडाची वडी असं मिळायची होय होती तिथं.