प्रार्थना !

Submitted by चैतन्य दीक्षित on 6 May, 2019 - 11:07

देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता ।

चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी
दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।।

हासता यावे मला पाहून इतरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।

कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।

~ चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम
आरसा बघतो तसे येऊ दे जग पाहता >>आवडलेली काव्यपंक्ती.
पु.ले.शु!

कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।>>>> क्या ब्बात!
मस्तच चैतन्य!