खात्यावर मांडून ठेव!

Submitted by हरिहर. on 8 May, 2019 - 00:53

(माझा मिसळचा लेख वर आला तेंव्हा लक्षात आले की या लेखाचा दुसरा भाग मी तेंव्हाच लिहुन ठेवला होता पण प्रकाशित करायला विसरलो होतो. आता फारसा एडीट न करता प्रकाशित करत आहे.)

अगोदरचा लेख: मिसळपुराण

पुण्यातून निघालो तर अगदी सावकाश ड्राईव्ह केले तरी जास्तीत जास्त दिड तासात मी गावी पोहचतो. त्यामुळे दर शुक्रवारी रात्री पुण्यातून निघायचे आणि दोन दिवस गावी थांबून सोमवारी सकाळी सरळ कामालाच हजर व्हायचे हे माझे ठरलेले गणित होते. पण हळू हळू पुण्यात रमायला लागलो आणि नकळत दर शनिवार-रविवार गावाला होणारी चक्कर आता चक्क दोन-तिन महिन्यातुन एकदा व्हायला लागली. कधी कधी त्यापेक्षाही जास्त काळ मध्ये जाऊ लागला. आई-बाबा, भाऊ एवढंच काही माझे विश्व नाहीए. माझ्या छोट्या विश्वाचा एक लहानसा भाग अजुनही गावीच राहीला आहे. झाडावरुन आंबा उतरवताना आवाक्याबाहेरची चार फळे झाडावरच रहावी आणि समोर कैऱ्यांचा ढिग असतानाही जीव मात्र त्या चार फळांध्येच गुंतावा तसा माझा जीव गावाकडे राहीलेल्या काही मित्रांमध्ये गुंतून राहीला होता. त्यामुळे वर्षांतुन चारदा का होईना पण गावी फेरी मारल्याशिवाय काही गत्यंतर नसे. पण नंतर नंतर त्यातही सातत्य राहीनासे झाले. शेवटी एक दिवस गावी गेलो आणि खंडाने कसायला दिलेल्या आमच्या जमीनीपैकी थोडी जमीन मी ताब्यात घेतली व मित्रांच्या मदतीने कसायला सुरवात केली. पंधरा दिवसातली शेतफेरी ही कौतुकाची न राहता गरजेची बनली. त्या निमित्ताने आता गावी जाणे होऊ लागले. आई-बाबांनाही माझ्या निर्णयाने बरे वाटले. ज्या मातीने कधी काळी भरभरुन दिले तीच काळी कुणाला तरी खंडाने दिल्याचा बाबांच्या मनातला सलही जरा कमी झाला.

गावाकडे जायचे म्हणजे माझी काही आकर्षणस्थळे ठरलेली आहेत. त्यांचे क्रमही ठरलेले आहेत. संध्याकाळी गावी पोहचलो की बॅग घरात टाकायची आणि पायावर पाणीही न घेता मित्रांकडे धावायचे. कुणी दुकानात असे, कुणी खळ्यात. मग एकेकाला हाकारीत कुणाकडे तरी गोळा व्हायचे. “आपला बाप देखील चांगलीच मस्ती करतो की” असे भाव डोळ्यात घेऊन पहाणाऱ्या पिल्लांच्या देखत एकमेकांच्या पाठीत गुद्दे घालत, मिठ्या मारत मोकळे व्हायचे. मग ती रात्र कुणाच्या तरी खळ्यात जेवत, गप्पा मारत जागवायची आणि पहाट होता होता घरी परतायचे. आई-बाबांच्या वाट्याला त्यांचा लेक सकाळीच यायचा. सकाळी आईने केलेला खास स्वयंपाक असतो. पोटभर जेवून, डबा घेऊन मग शेतावर. तो दिवस मग सगळा तेथेच मोडतो. घरी परतेपर्यंत रात्र होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही मित्र अगदी सकाळी सकाळी गावात रामाच्या हॉटेलमध्ये जमायला सुरवात होते. ‘रामाचे हॉटेल’ हे एक खास प्रकरण आहे. गावाच्या वेशीलगतची पहिली इमारत म्हणजे हे हॉटेल. त्यामुळे गावात येणारी किंवा गावातून जाणारी प्रत्येक व्यक्ती या हॉटेलसमोरुनच जाते. रामाच्या ओट्यावर काही तास बसले की एका जागी बसुन बहुतेकांच्या भेटी गाठी होतात. या रामाची मिसळ सगळ्या पंचक्रोशीत प्रसिध्द आहे तर त्याच्याकडे मिळणारी भेळ अगदी परदेशापर्यंत नाव राखून आहे. विशेष म्हणजे ही मिसळ आणि भेळ जितकी प्रसिध्द आहे त्यापेक्षा जास्त हा रामा प्रसिध्द आहे. तो नक्की कोणत्या मुशीतून बनला आहे ते समजत नाही. हा माझा लंगोटी यार आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा असेल पण हा ‘राम’ सगळ्यांसाठी एकवचनीच आहे. आठ वर्षांचे मुल असो अथवा ऐंशी वर्षांचे आजोबा, सगळे याला एकवचनीच संबोधतात. वहिनीशिवाय हा सगळ्यांसाठी “ए रामभाऊ” आहे. असं हॉटेल आणि असा मालक जगाच्या पाठीवर क्वचितच असावा. याला गावातील कोण व्यक्ती मुंबईला आहे, कोण परदेशात आहे हे माहित असते. त्यांच्या गावी येण्याची खबरही त्याच्याकडे असते. त्यामुळे कुणी मुंबईकर सुट्टी संपवून निघाला की त्याचे भेळीचे पार्सल न विसरता काऊंटवर व्यवस्थित ठेवलेले असते. त्यातही कुणाला डाळ जास्त हवी आहे, कुणाला शेव कमी आणि मुरमुरे जास्त हवे आहे हे सारे लक्षात ठेऊन भेळ बांधलेली असते हे विशेष. ही भेळ हॉटेलवर दिवसभर उपलब्ध असली तरी मिसळ मात्र साडेदहा-अकरापर्यंतच मिळते. मी तरी कधीच अकरानंतर रामाकडे मिसळ शिल्लक असलेली पाहिली नाही. अकरा नंतर “मिसळ संपली” हे उत्तर ऐकुन परतणारे मात्र खुपजन पाहीले आहेत. रोज इतके जण परतणारे गिऱ्हाईक पाहुन रामा कधीही त्याच्या मिसळची क्वांटीटी वाढवत नाही. रोजचा वाढणारा ग्राहक पाहता खरे तर रामाने व्यवसाय वाढवायला काही हरकत नाही पण मी म्हटलो तसे हा मनुष्य वेगळ्याच मुशीतून घडला आहे. “काय करायचा आहे धंदा वाढवून? आहे त्यात चाललय सुखाने” हे त्याचे उत्तर ठरलेले असते. रोज पहाटे उठने आणि ठरलेल्या प्रमाणात मिसळ करणे यात त्याचे सात वाजतात. तोपर्यंत बेकरीवाला मोजुन पावाच्या लाद्या देऊन जातो. साडेसातला पहिले गिऱ्हाईक हॉटेल मध्ये येते. तो गिऱ्हाईकांचा ओघ अकरा वाजेपर्यंत अखंड सुरु राहतो. साधारण अकराच्या दरम्यान एकतर मिसळ संपते किंवा पाव संपतात. आणि येथेच मला रामाचे फार म्हणजे फार आश्चर्य वाटते. जर त्याच्याकडील पाव संपले तर रामा ओट्यावर उभा राहुन वेशीच्या दिशेने आवाज देतो. वेशीबाहेर गावाचा रामोसवाडा आहे. तेथे कुणी तरी पिंपळाखाली रेंगाळत असतेच. रामाचा आवाज ऐकुन एक दोन बायाबापड्या हातात मिळेल ते भांडे घेवून येतात. मग रामा उरलेली मिसळ त्या बायाबापड्यांमध्ये व्यवस्थित वाटुन देतो. जर मिसळ संपली तर हा ‘नाथांचा’ अवतार उरलेल्या पावाच्या लाद्या ओट्यावर घेऊन येतो. त्याचे हे हातात पावाच्या लाद्या घेतलेले रुप कुत्र्यांच्या चांगले लक्षात असावे. कारण रामा ओट्यावर आला की काही सेकंदात तेथे आठ दहा ग्रामकेसरी जमा होतात. मग प्रत्येकाच्या वाट्याला काही पाव येतील, त्यांच्या त्यांच्यात भांडणे होणार नाही अशा अंदाजाने रामा हातातले पाव समोरच्या रस्त्यावर चार ठिकाणी ठेवतो आणि एखाद्या जबाबदारीतून मोकळे व्हावे तसे पुन्हा पायऱ्या चढुन हॉटेलमध्ये येतो. कुत्र्यांच्या वाट्याला दोन चार दिवसातुन ही पावपार्टी येते. मिसळ संपली तर उरलेले पाव दुसऱ्या दिवसासाठी ठेवणे नाही की पाव संपले तर समोरच्याच गल्लीत असलेल्या बेकरीतुन पावाच्या लाद्या आणने नाही. हा रामभाऊ म्हणजे अल्पसंतुष्ट आणि अत्यंत समाधानी प्राणी आहे. मी रामभाऊला कैकदा सुचवले आहे की “आपल्या भागात संध्याकाळी कढी-वडा फार प्रचलित आहे. तुही सुरु कर. नाहीतरी तुला संध्याकाळी काही काम नसतेच” पण याचे एकच उत्तर ठरलेले आहे “अरे बाळा, माऊली देतायेत ते काय थोडं आहे का? कशाला हाताने पसारा वाढवायचा? आपल्या परीने आपण करु, पोरं त्यांच्या हिमतीवर काय करायचे ते करतीलच की” यावर मात्र माझ्याकडे काय आम्हा कुणाही मित्राकडे उत्तर नसते. कधी कधी मन म्हणते की रामभाऊ आहे असाच बरा आहे. जर तो व्यवसायाच्या मागे लागला तर कदाचीत तो ‘आमचा रामभाऊ’ राहणार नाही. भलताच कुणीतरी होऊन जाईल. त्यामागोमाग मिसळची चवही जाईल. कुणी सांगावे? तर असो.

ठरावीक प्रमाणात मिसळ करुन हा माणुस “आपण हॉटेल चालवत आहोत” हे विसरुन गिऱ्हाईकांमध्ये वावरत असतो. एखाद्या सुगरणबाईची जशी पंगतीवर बारीक नजर असते, कुणाच्या ताटात काय संपलेय याची ती जशी दखल घेत असते तसे रामभाऊ काऊंटरमागे उभा राहुन प्रत्येक टेबलवर लक्ष ठेऊन असतो. कुणाच्या प्लेटमधला रस्सा कमी झाल्यासारखे त्याला वाटले की तो लगबगीने काऊंटरमागुन पुढे येतो. कोळशाच्या शेगडीवर ठेवलेल्या मोठ्या पातेल्यातुन रस्सा घेवून समोरच्या गिऱ्हाईकाला तो हवाय की नको याचा विचार न करता त्याच्या प्लेटमध्ये ओततो. येथे खाणाऱ्याचे काही चालत नाही. कुणी एखाद्याने हात आडवा केला तर रामा “हातावर ओतीन आता” म्हणत त्याचा हात बाजुला करुन रस्सा किंवा कट वाढतो. कटाचे छोटे भांडे रिकामे मागे नेणे हे त्याला पाप वाटत असावे असा पध्दतीने तो सगळ्यांना कट, रस्सा वाढत असतो. कांदा-लिंबू असेल तर मागावा लागत नाही आणि नसेल तर मागीतला तरी मिळत नाही. “जास्त कांदा खावू नये. चांगलं नसतं” असे उत्तर देवून रामभाऊ गिऱ्हाईकाला बोळवतो. आणि खाणाराही फारसे मनाला लावून घेत नाही. अन्नछत्रात वाढावी तशी जरी तो मिसळ वाढत असला तरी ती मिसळ करण्यासाठी त्याने अतोनात कष्ट घेतलेले असतात. रामभाऊच्या येथे मिसळ खाण्याला कुणी ‘बाहेरचे खाणे’ म्हणूच शकत नाही. कारण ती अत्यंत घरगुती पध्दतीने, स्वच्छतेची काळजी घेवून बनवलेली असते. या मिसळमध्ये पुण्या-मुंबईकडे असते तसे फरसाण नसते. फरसाणला आपली स्वतःची थोडीशी गोड अशी चव असते. रामभाऊच्या मिसळमध्ये फक्त शेव, पापडी आणि थोडे तळलेले शेंगदाणे असतात. रस्सा मात्र तो कसल्याही कडधान्याचा करतो. मटकीच पाहीजे असा त्याचा हट्ट नसतो. मी आजवर कित्येक ठिकाणी मिसळ खाल्ली आहे. कधी भुक लागली म्हणून तर कधी दिडशे दोनशे किलोमिटरचा प्रवास खास मिसळचे नाव ऐकुन केला आहे. पण हुलग्याची म्हणजेच कुळीथाची मिसळ फक्त रामाकडेच खाल्ली आहे. रामभाऊचा सगळा दिवस या मिसळमध्येच जातो. सकाळी अकरा वाजता मिसळ संपली की रामभाऊ सगळी पातेली वगैरे आवरुन ठेवतो. मग त्याच्या हॉटेलमध्ये दिवसभर चहाशिवाय दुसरे काही मिळत नाही. चहासुध्दा बरेचदा गिऱ्हाईकाला हातानेच घ्यावा लागतो, कारण रामभाऊ दुसऱ्या दिवशीच्या मिसळमागे लागलेला असतो. यात असंख्य कामे त्याच्या मागे लागलेली असतात. शेव-पापडी तो घरीच बनवतो. त्यासाठी लागणारे बेसन तो डाळ दळुन तयार करतो. त्यामुळे एकतर तो शेव पापडीच्या तळणीच्या मागे असतो किंवा बेसनपिठासाठी डाळ आणन्याच्या मागे असतो. मिसळसाठी लागणारे तेल फक्त शेंगदाण्याचे आणि तेही स्वतः शेंगदाणे विकत घेऊन ते मिलवरुन गाळून आणलेलेच वापरले जाते. कटासाठी लागणारा मसाला आई करुन ठेवते. दर पंधरा दिवसांनी आई या मसाल्याचा पसारा घालुन बसते तेंव्हा सगळ्या गल्लीत खमंग वास पसरलेला असतो. बरं, महीन्याचा करुन ठेव म्हटलं तर आईचे उत्तर “वास उडतो लेकरा मसाल्याचा” असे असते. रामभाऊचीच आई ती. वेगळी कशी असणार? रामभाऊला जर पाव घरी भाजता आले असते तर तेही त्याने भाजले असते. मिसळला चव यायला आणखी काय हवे असते? कित्येक जण तर मिसळ खायला येताना घरुन चपाती बांधुन आणतात. मी देखील कैकदा रामभाऊच्या आईला गरम गरम चपाती करायला लावून मिसळ खाल्ली आहे. पावाबरोबर जेवढी चवदार लागते त्याच्या कैकपटीने गरम चपातीबरोबर मिसळ जास्त चवदार लागते. जे मिसळला ओव्हर हाईप्ड पदार्थ समजतात त्यांनी एकदातरी ‘मिसळमध्ये जीव ओतलेल्या' माणसाकडे मिसळ खाऊन पहावी हे नक्की.

कधीतरी संध्याकाळी रामभाऊ फिकट निळसर शर्ट, ग्रे रंगाची पँट घालुन सायकल घेऊन बाहेर पडतो. डोक्यावरच्या राठ केसांचा मिलिट्री कट, बाह्या कशातरीच मुडपलेल्या, चेहऱ्यावर पांढरे शुभ्र दात दाखणारे, लहान मुलासारखे हसु असलेला रामभाऊ बाहेर पडला की समजावे ही नक्कीच कांदयावरची किंवा मटकीवरची मोहीम असणार. कारण त्याला मटकी गावठीच लागते आणि कांदा भले ‘वाटून’ मसाल्यात घालायचा असला तरी तो त्याला दुभाळका चालत नाही. तसेही दुभाळका कांदा खाताना त्रास होतो त्यामुळे गिऱ्हाईकाला कसा द्यायचा? कमाल आहे रामभाऊची. येथे आमच्या घरी पिठले भाकरी केले तरी आई कांदा न निवडता कापुन देते. आपण निवडायला लागलो तर “दुभाळके कांदे काय फेकुन द्यायचे आहेत का?” असा प्रश्न विचारते, तेथे हा रामराया गिऱ्हाईकाला दुभाळका कांदा चिरुन देताना शंभरदा विचार करतो. बरे याची मिसळ एवढी प्रसिध्द असुन त्यात काहीही गुपीत नाही. सिक्रेट रेसेपी कशाला म्हणतात ते रामाला माहीत नाही. कुणा मुंबई पुण्याकडच्या गृहीणीने जर त्याला मिसळची पाककृती मागीतली तर तो अगदी बारकाईने सांगतो. अगदी स्टेप बाय स्टेप. वर आणखी स्वतःचा मिसळचा मसालाही थोडासा बांधुन द्यायला विसरत नाही. “कशी झाली होती ते कळवा” वगैरेची अपेक्षाही नाही. समोरची व्यक्ती ‘थँक्स’ म्हणेपर्यंत हा काऊंटरच्या मागे पोहचलेला असतो. निरपेक्ष वृत्तीने रामभाऊ कुणालाही पाककृती देतो. पण एवढे असुन अजुन काही कुणाला त्याच्या हातची चव मात्र साधता आली नाही. दिवाळीला सगळा फराळ आई करते पण चिवड्याची शेव मात्र रामभाऊकडुनच येते. त्याला पर्याय नाही. एकदा बायकोने हट्ट केला म्हणून पहाटेच आम्ही रामभाऊकडे गेलो. बायकोने त्याला वॉर्नींग दिली होती “भावोजी, अजिबात रेसेपी सांगू नका. तुम्ही करा, मी पाहते फक्त”
“तसं तर, तसं. आपल्याला काय” म्हणत रामभाऊने मिसळ बनवली. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा बायकोच्या पुढे धरुन, नाव घेवून मग पातेल्यामध्ये टाकायचा. अजुन कसं शिकवायला पाहीजे? पण बायकोने एवढा आटापिटा करुन ती रेसेपी शिकली, पुण्याला येताना रामभाऊकडुन त्याची शेव-पापडीही आणली होती. पण चव काही साधली नाही ती नाहीच.
“अगं पण घरी करुन खायचा अट्टाहास का तुझा? या घरी खाल्ली काय आणि त्या घरी खाल्ली काय, सारखेच आहे” म्हणत मी बायकोची समजुत काढली पण तिला ते लागलेच. बायकोसाठी रामभाऊकडे याचे अत्यंत साधे उत्तर होते “बाळे, गावागावाच्या पाण्यालाही वेगळी चव असते”

हे घर काय किंवा ते घर काय असे म्हणायचे कारण म्हणजे रामभाऊची आई. मी आयुष्यात पहिल्यांदा कधी मिसळ खाल्ली ते आठवत नाही, पण रामभाऊकडेच खाल्ली येवढे मात्र नक्की आठवते. त्यावेळी काका मिसळ बनवायचे. माझं बालपणच मुळात काकांच्या समोर खेळण्यात गेलं. खेळत असताना भुक लागली तर कुणाकडेही जेवायचे ते दिवस होते. पण ‘कुणाकडेही’ मध्ये जी काही खास घरे होती त्यातले एक रामभाऊचे होते. हा जिव्हाळा तेंव्हापासुनचा. मी जेवढा मार माझ्या आईच्या हातचा खाल्ला नाही तेवढा रामभाऊच्या आईच्या हातचा खाल्लेला आहे. मी कॉलेजला असताना रामभाऊने कधीतरी जुने घर पाडले आणि नविन बांधले. प्रथम शहाबादी फरशीचा ओटा, मग बारा बाय विसचा हॉल. येथे आठ-दहा टेबल मांडलेली. एका बाजुला जीन्याखाली काऊंटर. हॉलच्या मागील दाराने आत गेले की प्रशस्त किचन. तेथुन मागे गेलं की मग एका मागोमाग एक अशी दोन बेडरुम आणि त्याच्या मागे परसदार. परसदारात कोथींबिर, टोमॅटो केलेले. दोन मोठी कढीपत्याची झाडे आणि गवती चहाची मोठमोठी बेटे. असा सगळा पसारा रामभाऊने मांडला होता. आम्ही मित्र गेलो की सरळ किचनमध्ये जावून मांडी घालायचो आणि आई आम्हाला मिसळ वाढायची. बाहेर बसायची सोय नसायची. कारण मग मिसळ खाण्यावर आमचे काहीही नियंत्रण राहत नसे. रामभाऊ वाढील तितका कट घेणे क्रमप्राप्तच असायचे. बरे दोन पाव खावून होतात न होतात तोवर हा दोन हातात शेवपापडी घेवून ती प्लेटमध्ये चुरडून टाकणार. पुन्हा त्यावर रस्सा ओतनार. आपण फक्त हताश होऊन त्याच्याकडे पाहत रहायचे. मिसळ हा काय आग्रह करुन खाऊ घालायचा पदार्थ आहे का? पण रामाला कोण सांगणार? त्यामुळे किचनमध्ये बसणे परवडायचे. किचनमध्येही काही फारशी शांतता मिळायची असं नव्हे पण तो सारा आईच्या प्रेमाचा मामला असायचा.
“काय रे मुडद्या, सकाळी दुकानापुढून गेलेला पाहीलं मी तुला. आणि आता येतोस होय म्हातारीला भेटायला. गहीरा आगावू झालास न् काय” या वाक्याने किचनमध्ये स्वागत होई. मग मिसळ खाताना बायकोची, काम-धंद्याची वगैरे चौकशी होई. रामभाऊ दाराच्या चौकटीवर हात ठेवून कधी किचनमध्ये तर कधी मागे हॉटेलात लक्ष ठेवी. कधी कधी आईने जर मला आलेले पाहीले असेल तर मग ती थोडे कणीक मळून झाकुन ठेवते. म्हणजे मिसळ खायला गेलो की गरम गरम चपाती मिळे. पण किचनमध्ये बसुन मिसळ खाल्ली तर चहा मात्र मिळत नसे. “अंगाचे चिपाड झालेय अगदी आणि चहा कसला पितोस रे? थांब जरा” म्हणत आई सगळ्यांच्याच हातावर गुळ-शेंगदाण्याचे लाडू ठेवते. खरे तर मिसळनंतर चहाच हवा असतो पण आईपुढे कुणाची मात्रा चालत नाही. तसाही लाडू चविला अत्यंत सुंदर असतात. कारण ते आईने खलबत्त्यात स्वतः कुटून बनवलेले असतात.

एकदा मिसळ खाऊन झाली की मग आम्ही मित्र बाहेर ओट्यावर येऊन बसतो. येथे रामभाऊने दोन जास्तचे टेबले ठेवली आहेत. त्यावर चार पाण्याचे जग भरुन ठेवलेले असतात. ओट्याला खेटुनच गावाचा मुख्य रस्ता गेलेला आहे. त्यामुळे हे पाण्याचे जग दर तासा-दोन तासाला भरुन ठेवावे लागतात. या टेबल्सचा उपयोग फक्त बिनकामाच्या गिऱ्हाईकांसाठीच असे. एकदा या टेबलवर आम्ही बैठक मारली की मग महीनाभराच्या गप्पा निघतात. येणारा जाणार प्रत्येक जण भेटून जातो. “कधी आलास?” “कोण कोण आलय?” “शेतात काय करायचा विचार आहे?” असं विचारत कुणी ना कुणी येतच असतो. रामभाऊचे आतुन लक्ष असते. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला आवाज द्यावा लागत नाही. बाहेर किती जण आलेत किंवा कोण आलेत त्यानुसार तो बाहेर चहा पाठवत राहतो. तेही आपल्या हातात नसतेच. कारण एखादा वाह्यात मित्र (म्हणवणारा) आला तर चारदा आवाज देऊनही चहा बाहेर येत नाही. किंवा कुलकर्णी गुरुजी वगैरे जर आले तर न सांगता बिन साखरेचा चहा पाठवला जातो. या सगळ्या वर्दळीत दुपार अगदी सहज होते. तो पर्यंत अगदी सरपंच, सदस्यांपासुन ते कॉलेजच्या सखा प्युनपर्यंत कुणीही हजेरी लावून जातो. ही वर्दळ आणि चहाची आवर्तने दुपारपर्यंत सुरु राहतात. जर बाजारचा दिवस असेल मग काही विचारुच नका. का कोणासठाऊक पण रामभाऊला या ओट्यावरच्या आमच्या भेटीगाठींच्या कार्यक्रमाचे भारी कौतुक वाटते. पण तो कधी या गप्पांमध्ये सामील झाल्याचे मला आठवत नाही. बाराच्या आसपास रामभाऊ कामातुन बराचसा मोकळा होतो. पण बाहेर आमच्यात येऊन न बसता तो काऊंटर मागील उंच स्टुलावर बसुन, हातात छटाक किंवा पावशेराचे वजन खेळवत आमच्याकडे कौतुकाने पहात बसतो. आमची ही टाईमपास बैठक शक्यतो आईमुळे मोडते.
दुपारी दिड-दोनच्या सुमारास आई बाहेर येऊन ओरडते “हात् मेल्या, अजुन इथंच आहेस होय? अरे जरा आई बापाजवळ बसावं, चौकशी करावी. का आल्यापासुन नुस्ता गावच कोळपायचा आहे? पळ लवकर. घरी जेवायला वाट पहात असतील. आणि पुढच्यावेळी माझ्या पोरीला घेऊन ये. किती दिवस झाले पाहुन तिला”

मग आमची ही बैठक मोडते. कुणी दुकानाला तर कुणी शेतातल्या कामाला दांडी मारलेली असते, ते चटकन गायब होतात. ज्यांना कामामुळे दांडी मारता आलेली नसते त्यांना संध्याकाळी भेटता येणार असते.
मग मी गडबडीने उठतो. पायऱ्या उतरताना रामभाऊला आवाज देतो “रामभाऊ, सकाळी परस्पर पुण्याला जाणार आहे रे. गावात काही येणार नाही आता. काय असेल ते खात्यावर मांडुन ठेव. पाहू नंतर”
रामभाऊ लगबगीने ओट्यावर येतो आणि निर्व्याज हसत हात हलवत म्हणतो “जपुन जा रे बाळा! फोन कर पोहचल्यावर”

हे माझे उधारीचे खाते कैक वर्षांपुर्वी रामभाऊच्या आईने उघडले होते आणि आता रामभाऊ ते पुढे चालवत होता. “ठेव खात्यावर मांडुन” म्हणत म्हणत या खात्यावर माझी किती उधारी जमा झाली आहे याचा मी विचारही करत नाही आणि रामभाऊही त्याची चिंता करत नाही. हे खाते असेच आजन्म सुरु राहणार याची दोघांनाही खात्री आहे. या खात्याच्या अदृष्य पानावर जमा झालेल्या प्रेमाची, जिव्हाळ्याची उधारी कधीच फिटणार नाही, फेडता येणार नाही आणि फेडायची इच्छाही नाही. माझीही आणि मिसळवाल्या रामभाऊची देखील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंत.
दुभाळका कांदा म्हणजे डबल कांदा का?

छान लिहिलंय.
दुभाळका कांदा म्हणजे आमच्या इथे दुंडा कांदा.
दुंडा कांदा, बटाटा, रताळे वैगरे काहिच खाऊ नये असा गावी समज आहे .

दुंडा- अगदी ग्रामीण शब्द आहे. सध्या त्याच modification वापरात आहे ते म्हणजे 'जुळे'

काही कारण आहे का त्यामागे?>>> काहीही नाही. सेम असतो. पण कांदा कच्चा खायचा असेल तर आमच्या भागात चकत्या (स्लाईस) न करता उभा चार भागात कापला जातो. असा डबल कांदा चार भागात कापला तर व्यवस्थित पाकळी मोकळी करुन खाता येत नाही. पाकळ्याही कमी असतात. बाकी काही नाही. पण अशा कांद्यांचा भावही जरा कमी मिळतो शेतकऱ्याला.

दुन्डा हा शब्द नव्याने कळला. माहीत नव्हता.

गावाकडची साधीभोळी माणसं आणि त्यांचे निर्व्याज्य प्रेम..... खुपच छान लिहलंय.
मिसळपुराण अजून वाचले नाही. पण या लेखातूनच मिसळीचा भन्नाट तडका लागला. आता मिसळपुराण वाचतो.

छान लिहिलंय.

दुंडा कांदा, बटाटा, रताळे वैगरे काहिच खाऊ नये असा गावी समज आहे .
हो,माझी आजीही जुळी फळं खाऊन देत नाही, अशी फळं खाल्यास जुळी संतती होते असे म्हणतात. चुकीचा समज आहे हा.

आई गं कित्ती गोड हे रामभाऊ आणि त्यांची आई.... व्यवहारीपणा न शिवलेले... म्हणून च कदाचित गोड आहेत ही माणसं...शाली लकी आहात....

आणखी एक सुरेख व्यक्तिचित्रण, रामभाऊ छान उभे केलेत डोळ्यासमोर...
असेच एक ठिकाणं माझ्या माहितीतले... माऊली ढाबा जेजुरी...
दुसरे दादरचे हाऊस ऑफ मिसळ ऐकून आहे. मालकीण स्वत: मिसळ बनवतात. त्यांच्याकडे मिसळीचे खूप प्रकार आहेत.
पण हे प्रोफेशनल लोक त्यांच्या रेसिपी राम सारख्या खुल्या मनाने शेअर करत नाहीत.
माझ्या गावातही निवृत्ती (लोक त्याला नेवरती नावाने बोलवत) नावाचा बायकी लक्षणे असलेला माणूस भेळीचे हॉटेल चालवायचा या हॉटेलात फक्त भेळ , पाटील भत्ता आणि चहा मिळायचा. पाटील भत्ता भरपूर असायचा त्यामुळे तो परातीत घ्यायचा आणि दोघा-तिघात मिळून खायचा. लिंबू , हिरव्या मिरच्या, कांदे, कोथिंबीर ताजे शेतातले असायचे.
काही टोळभैरव भेळ खाता खाता निवृत्तीची टिंगल टवाळी करायचे.

दुफळी कांदा आमच्याकडे कांद्याचे बी तयार करण्यासाठी आडवा कापून लावला जातो. त्याला आमच्याकडे गोठ असेही म्हणतात. तो चवीला सामान्य कांद्या सारखा लागत नाही.

मस्तच जमलाय हा भाग शाली..
आम्ही दुतोंडी कांदा म्हणतो त्याला आणि त्याची चव जरा जास्तच तिखट आणि जरा वेगळी असते हे माझ ऑब्सर्वेशन.. मला नाही आव्डत म्हणुन तो खायला..

व्यक्तिचित्रण तर झकासच, पण तुमच्यासारखा चवीने खाणारा, आणि खाऊन त्याचं त्याहून उत्तम चवीने रसग्रहण करणारा माणूस मी तरी पाहिला नाही.. तुमच्या प्रत्येक लेखात खाण्यावर काहीनाकाही असतंच.. चांगलंय. आम्ही पण मनात मांडे खाऊन घेतो त्या निमित्ताने Happy

अतिशय छान शालीजी,
सांगू की नको अशी चलबिचल असतानाही सांगूनच टाकावे वाटतेय,की हे व्यक्तिचित्रण अतिशय सुरेख जमले आहे,negative प्रतिक्रियांचा सुवर्णमध्य तुम्ही साधला आहे,अगदी तुमचा मोठ्ठा पंखा असूनही अशा व्यक्ती चित्रणा मधील काही गोष्टी खटकून जायच्या मात्र हे अतिशय परिपूर्ण झाले आहे,
खटकणार्या गोष्टी अतिशय आवर्जून टाळल्या आहेत हे सहज लक्षात आले,हीच तर मनाने आणि लिखाण प्रतिभेने समृद्ध लेखकाची खूण आहे,खूप छान शालीजी

झकास लिहलय.
मी परवाच रामभाऊकडे मिसळ खाऊन आलो.

Pages