मॅरेज Mystique ! ( भाग २ )

Submitted by र. दि. रा. on 6 May, 2019 - 12:25

भाग १ चा धागा.

https://www.maayboli.com/node/69844

भाग २ :

सौमित्र दादाच्या सिनेमाचे शुटींग वेगाने सुरु होते . रात्री जेवणानंतर सौमित्रदादा आणि सगळे कलाकार बसून दुसरे दिवशीच्या कामाचे नियोजन करीत .थोडी रिहर्सल केली जाई . सकाळी लवकर शुटींग सुरु होई दुपारी जेवण विश्रांती झाली की पुन्हा सेकंड शिफ्ट सुरु होई .जाण्यायेण्यातला वेळ वाचत होता .त्यामुळे शुटींगसाठी भरपूर वेळ मिळत होता . एक वेगळेच वातावरण तयार झाले होते . कलाकारांचा अभिनय उत्तम वठत होता. बऱ्याच वेळेला युवराज शुटींगच्या ठिकाणी भेट देत . आणखी काही सोयी सवलती पाहिजेत का या बद्दल विचारपूस करत.प्रत्येक वेळी ते रेवती जवळ थांबून तिच्याशी काहीतरी मिश्कील बोलत.एकदा ते असेच लोकेशनवर आले होते.रेवती पळत जाते असा शॉट सुरु असतो.रिहर्सलचे वेळी रेवती व्यवस्थित पळाली पण टेक च्या वेळी पळताना तिचा पाय एका वाटोळ्या दगडावर पडला आणि ती कोसळली.सगळा प्रोटोकॉल विसरून युवराज तिला सावरायला धावले. युवराजांचा आधार घेऊनसुध्दा तिला उभे राहता येइना.तोवर बाकी लोकही आले.

प्रत्येकजण आपापल्यापरीने ज्ञान पाजळू लागले. एक स्पॉट बॉय म्हणाला “ काही नाही मुका मार लागलाय ”

दुसरा म्हणाला “ असे कसे.? hair line fracture असू शकते.एक्स रे काढला पाहिजे ”

पहिला म्हणाला “ आज तेल लाऊन चोळले आणि शेकले की आराम पडेल. मला तरी fracture वाटत नाही.”

तोवर युवराजांची लिमोझिन घेऊन शोफर आला .युवराजांनी तिला गाडीत मागे झोपवले. ते म्हणाले “don't worry .I will take care”

गाडी डायरेक्ट राजवाड्यात आली. राजवैद्यांना पाचारण करण्यात आले .त्यांनी कसलातरी चिक लाऊन वेताच्या दोन बारीक काठ्यांनी पाय बांधून टाकला. ते म्हणाले “ राफ इलागल हीन .बिजडस कीथ लिहोल.बिजडस स्तब्ध हार.{आता दोन दिवस आराम करायचा .परवापर्यंत बरे वाटेल.”

अण्णासाहेबाना हॉटेलवरून बोलावून आणले.दोन दिवसांनी रेवतीचा पाय ठीक झाला पण त्यानंतरही दोघांचा मुक्काम राजवाड्यावरच राहिला.या प्रसंगानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाली की रेवती आणि युवराजाचे एकमेकावर प्रेम आहे . चर्चेचे रुपांतर बातमीत होण्याची दाट शक्यता होती.

----------------------------------------

आता अण्णासाहेब राजवाड्यातच राहायला असल्याने त्याची आणि भूवालाची बरेचदा भेट होत असे पण भूवाल मोकळे बोलत नसत.कारण अण्णासाहेबांच्यावर किती विश्वास टाकायचा या बद्दल ते साशंक होते.पण आता रेवती आणि युवराज यांच्यात काहीतरी रहस्य आहे हे समजल्यावर सगळ्यांनाच एकमेकाबद्दल विश्वास वाटायला लागला.

एके दिवशी भूवालानी सोमथाला जाहीर केला.एक प्रकारे ही भूवालाची डिनर डिप्लोमसी होती.या गाला डिनरला सगळा राजपरिवार, अण्णासाहेब, रेवती, वैभव, सौमित्र सिन्हा आणि सिलीचुंगचे महामंत्री तेजबाग यांना निमंत्रण होते.अपेक्षेप्रमाणे डिनरचा कार्यक्रम छान झाला.राज घराण्यातील स्त्रियांना रेवतीला पारखता आले . रेवती वधू परिक्षेत सहज पास झाली . सौमित्र सिन्हांनी शुटींगसाठी युवराजांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार प्रदर्शन केले.सिलीचुंगच्या प्रथेनुसार सर्वांनी कुजकुरा [गुढग्यावर हात ठेऊन कमरेत वाकून वंदन करणे ] करून भूवालाप्रति आदर व्यक्त केला.सगळे निघत असताना महामंत्री तेजबाग यांनी अण्णासाहेबाचा हात दाबून त्यांना थांबण्याची हिंट दिली.बाकी सगळे गेल्यावर भुवालानी दुभाषा विरुपाक्षे यांना बोलाविले.

विरुपाक्षे म्हणाले “अण्णासाहेब आपण सूचित केल्याप्रमाणे भूवालानी तपास केला.त्यामध्ये असे दिसून आले की तूर्त आंदोलन थंडावले असले तरी ते लोक मोठ्या उठावाची तयारी करत आहेत. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु ठेऊन मर्यादित प्रमाणात लोकशाही स्वीकारण्याची तयारी दाखवावी ही तडजोड भूवालानी मान्य केली आहे.दरम्यान राज परिवार आणि त्यांचे निष्ठावंत पाइक यांचेसाठी आश्रय तयार करणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने आपण काय मार्ग सुचवालं.”

अण्णासाहेब म्हणाले “मला असे वाटते की मुंबईमध्ये बिल्डरच्या व्यवसायात गुंतवणूक करावी.या व्यवसायात परतावा चांगला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंवणूक करायला वाव आहे.”

दुभाषा आणि भुवाल यांच्यामध्ये काही संभाषण झाले.नंतर दुभाषा म्हणाला “ भूवालांची इच्छा आहे की ही गुंतवणूक मुंबईत कशी करायची याची योजना तयार करावी.ही जबाबदारी भूवालानी आपणावर सोपविली आहे. ”

“ भूवालांचा माझ्यावर विश्वास असेल तर मी हे काम पूर्ण निष्ठेने करेन. ”

“ विश्वास तर आहेच .पण तरीही आपण हे व्यवहार अधिकृत करणार आहोत.युवराज सिंगापूरला एक कंपनी स्थापन करतील .ती कंपनी तुमच्या कंपनीला वित्त पुरवठा करेल.आणि या सगळ्यावर एक त्रयस्थ कंपनी नियंत्रण ठेवेल.”

“ माझी काही हरकत नाही.”

“ छान ! आता तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट सुरु करा.”

तिघानी भूवालाना कुजकूरा करून निरोप घेतला.

रेवतीची सिलीचुंगमध्ये नीट सोय लावून आठदहा दिवसात परत जाण्याच्या तयारीने आलेले अण्णासाहेब सिलीचुंगच्या राजकारणात चांगलेच अडकले.

---------------------------------

सिलीचुंगमधले शुटींग संपवून सगळे परत आले . सौमित्र सिन्हा विशेष खुष होते.जवळ जवळ संपूर्ण सिनेमाचे शुटींग त्यांनी सहा महिन्यात उरकले होते.किरकोळ डबिंग ,एडिटिंग, पॅचवर्क अशी कामे फक्त राहिली होती.

परंतु इकडे सुनंदाबाई मात्र धास्तावून गेल्या .कारण सिलीचुंगहून आल्या पासून अण्णासाहेब तिकडचे फारसे काही सांगत नव्हते.सिलीचुंगला असताना ते दररोज सुनंदाबाईना फोन करून सगळी खबर बात कळवत होते. रिकामपण असल्याने जरा जास्तच रंगवून सांगत होते. ते ऐकून सुनंदाबाई हबकून गेल्या.वेळोवेळी त्यांनी रेवती युवराजच्या प्रेमाला आणि अण्णासाहेबांनी भूवालाच्या आर्थिक बाबीची जबाबदारी घ्यायला विरोध दर्शविला होता.त्यामुळे आपल्याला कळू न देता रेटून करून टाकायचे , अण्णासाहेबानी ठरविले असावे असे सुनंदाबाईना वाटले .त्यांनी एकदा रेवतीला विचारले ”काय ग रेवा,यांची आणि त्या महाराजाची पार्टनरशिप झाली का?”

“ हो,झाली बहुतेक .कारण अण्णा नहुष बरोबर सिंगापूरला गेले होते. ”

“ हा नहुष कोण आणि ? ”

“युवराजाचे नाव नहुष आहे ग”

“तू त्यांना नावाने बोलवतेस.”

“हो,तोच म्हणाला मला नावाने बोलाव म्हणून”

“ तू त्यांना ये जा म्हणतेस ? ”

“ ए किंवा अहो असे काही म्हणायचा प्रश्नच नाही .आम्ही फक्त इंग्रजीत बोलतो ”

“ तुमचे एकमेकावर प्रेम आहे का?”

“ माहित नाही.पण असेल बहुतेक?”

“ म्हणजे ते तुला तसे काही म्हणाले नाहीत !”

“आई, ते एका मोठ्या राज्याचे राजे आहेत.एखाद्या कॉलेजकुमारासारखे शंभर रुपयांचा गुच्छ घेऊन ते मला "आय लव्ह यू" म्हणू शकत नाहीत.तिथे प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल असतो .त्यांच्या कडे वाचासंकल्प नावाचा विधी असतो. भुवाल दरबार बोलावतील .त्यात आपल्यालाही बोलावतील .मग राजगुरू मला विचारतील की मला राजकुमार पसंत आहेत का ? मग राजकुमारनाही तसच विचारतील.दोघांनी पसंती व्यक्त केल्यावर मी मुलगी द्यायला तयार आहे असे अण्णा जाहीर करतील.मग नजराणा द्यायचा असा रिवाज आहे ”

“रेवा खर म्हणजे मला ही राजघराणी आवडत नाहीत .फार भानगडी असतात या लोकांच्या.पण तुला खरच तिथे लग्न करायचे आहे का?”

“राणी व्हायला कोणाला आवडणार नाही .पण खर म्हणजे मला सिनेमातच करीअर करायचे आहे.”

सुनंदाबाई काळजीत पडल्या.आपण विरोध केला तरी कोण जुमानेल का ? आणि नाही विरोध केला तर ही पोर त्या सोनेरी पिंजऱ्यात कैदी होऊन पडेल. सुनंदाबाईनी ठरवले आपण यथाशक्ती विरोध करायचा . ऐकणे न ऐकणे त्यांची मर्जी .

एकदा त्या अण्णासाहेबांशी बोलत बसल्या होत्या.त्या म्हणाल्या “कशाला त्या महाराजांशी पार्टनरशिप केलीत.छान तुमचा छोटासा व्यवसाय होता.निष्कारण डोकेदुखी विकत घेतलीत.”

“अग किती दिवस त्या मुठभर भांडवलात खेळत बसू ? आता बघ एकेक टाऊनशिप उभी करतो.”

“आणि रेवती बद्दल तुम्ही काही कबूल केलंय का?”

“ नाही . त्यांनी मला विचारले नाही मी काही कबूल केले नाही.”

“ आणि आता विचारले तर सरळ नाही सांगा ”

“का ? किती वैभवात लोळेल ती .”

“अहो तिथे अराजक आहे .तेच लोक पळून जायच्या तयारीत आहेत.आपण आपला जीव कशाला दु:खात घालायचा?”

“इतके काही नाही.राज्य म्हटले की अशा कुरबुरी होताच राहतात.”

“आयुष्य कसे साधे सरळ सोपे असावे.रोज उठून जीवाला घोर नको.”

“बर असु दे . तिला मागणी आल्यावर विचार करू .तू नसलेली काळजी करत बसू नकोस.”

______________________

रविवारचा दिवस होता.केदार मिनाक्षी आणि त्यांचा सात वर्षाचा मुलगा आश्विन यांची जेवणे नुकतीच झाली होती .केदार बडीशेप चघळत पेपर वाचत बसला होता.मिनाक्षी किचनमध्ये झाकपक करीत होती.रविवार असला तरी केदारला डुलकी काढता येणार नव्हती.कारण तो ज्या सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये चिटणीस पदावर नोकरीला होता त्या संस्थेत दुपारी तीन वाजता मिटिंग होती.मिटिंग म्हणजे काही खास मिटिंग होती असे नाही .नेहमीची संचालक मंडळाची मासिक मिटिंग होती.संस्थेच्या चेअरमनसाहेबांनी दर महिन्याचा तिसरा रविवार हा मिटिंगसाठी ठरवून दिला होता.त्यांच्या मते रविवार हा दिवस मिटिंगसाठी योग्य होता.कारण रविवारी कोणी व्हिजीटर नसतात.आणि संचालकानाही कुठे जायची गडबड नसते .त्यामुळे रविवारी मिटिंग शांतपणे पार पडते . केदार तर काय नोकर होता .त्याचे ब्रीद होते चेअरमन म्हणतील तसे . म्हणून तर तो गेली बारा वर्षे या पोस्टवर टिकून होता.जेवण झाल्यावर लगेच अश्विन खाली खेळायला गेला होता .तो लगेच परत आला.

“ आई ,मला काही तरी खायला देना ? ”

“ बघ जेवायच्या वेळेस नीट जेवत नाहीस,आता लगेच भूक लागली.तूप साखर पोळी देवू ? ”

“ नको. काहीतरी सटरफटर दे .”

“ शंकरपाळी देवू ? ”

“ मला व्हील्स पाहिजेत ”

“ नाही ह.अश्विन . ते बाहेरचे तळकट मळकट काही आणायचे नाही.”

आईने फटकारल्यावर अश्विनने वडिलांकडे मोर्चा वळवला. तो म्हणाला “बाबा मी तुम्हाला जोक सांगू?”

“नको. नको. तुझा जोक म्हणजे नाग म्हणाला ए सापड्या ,आणि साप म्हणाला ए नागड्या.”

“नाही, तो नाही. आता एकदम नविन आहे.”

“ बर सांग ! ”

“तीन मुल गप्पा मारत असतात.एक मुलगा म्हणतो माझे वडील इतके शक्तिमान आहेत की ते फिरता पंखा हाताने थांबवतात .दुसरा मुलगा म्हणतो हे काहीच नाही माझे वडील चालू गॅस हाताने विझवतात तिसरा मुलगा म्हणतो काही बंद करायचे असेल तर माझे वडील स्विच ऑफ करतात.”

“अरे वा . खरच मस्त आहे.!”

“आई ,मी तुला एक कोड घालू?”

“नको मला नाही सुटत ती कोडी बिडी”

“मला भूक लागली आहे ना? खायला दे”

“काय पाहिजे ते सांग.”

“तूप साखर पोळी दे”

“मग मघाशी काय कानडीत सांगत होते का?” ती पोळीला तुपसाखर लावायला गेली. केदार कपडे बदलून मिटींगला निघाला.दर तिसऱ्या रविवारी मिटिंग असते हे मीनाक्षीला माहित असते, तरीही ती कुरकुरली “काय नेमकी रविवारी मिटिंग असते हो”

“का?कुठे जायचा प्लॅन आहे का?”

“प्लान कसला आलाय ? एक रविवार मिळतो तर कुठे तरी फिरून यायचे ”

“ठीक आहे ना.मी पाच साडेपाच पर्यंत येतो.मग जाऊ .येतो मी ”

“ ह ! ”

__________________

मिटिंग सुरु करायला हरकत नसते .चेअरमन आलेले असतात.शेजारीच केदार फाईली सांभाळत बसलेला असतो.बहुतेक संचालक आपापल्या जागी बसलेले असतात.एक संचालक म्हणतात
“करा सुरु.”

चेअरमन म्हणतात “केंद्रेअण्णा तरी येऊ देत

“येतील की. सुरु तर करा “

केदार विचारतो “मागील सभेचे प्रोसिडिंग वाचू का?”

“कशाला ? तुम्ही झेरॉक्स कॉप्या पाठवल्यात ना ? झाल तर ”

केदार पुढचा विषय वाचतो.थोडी फार चर्चा होते ,विषय मंजूर होतो.कोणीही चेअरमनसाहेबांच्या विरोधात बोलायचे धाडस करीत नसत. त्यामुळे माफक चर्चेने विषय मंजूर होता .पाचसहा विषय झाल्यावर रंगरावने चहा नाश्ता द्यायला सुरुवात केली.साहजिकच मिटिंग सैल पडली.संचालक गप्पात रमले. अर्ध्या तासाच्या ब्रेक नंतर केदारने पुन्हा अजेंडा हातात घेतला .आता विषय आहे वीस हजार पेक्षा जास्त रकमेची बिले मंजूर करणे .केदारने दोन बिले वाचली .प्रयोगशाळा साहित्य खरेदी वगैरे बिले लगेच मंजूर झाली.केदारने तिसरे बिल वाचले “पेटकर वकील .वार्षिक सल्ला फी तीस हजार रुपये “

एक संचालक म्हणाले “आपल्याला वकील कशाला लागतो हो”

“शिक्षकांच्या बदली बढतीच्या केसेस असतात.ठेकेदारांनी मध्येच काम बंद केल्याच्या केसेस असतात.आजकाल जो उठतो तो कोर्टात जातो.” एक जागरूक संचालक बापूराव चौगुले यांना दुसरीच एक गोष्ट आठवली ते एकदम म्हणाले “अहो जरा थांबा. रानडे सर ,आपल्या जागेचीपण कोर्ट केस सुरु आहे ना ?काय झाले त्या केसचे .”

बापूराव चौगुलेना जी जागेची केस आठवली ती स्वातंत्र्यपूर्व काळातली होती.त्यावेळी भद्रावती हा जिल्हा झाला नव्हता.तर ते स्वतंत्र संस्थान होते,त्यावेळचे संस्थानिक वीरभद्र डबीर यांनी सरस्वती विद्या प्रसारक मंडळीना शाळा बांधण्यासाठी ही मरगळ माळावरची नऊ एकर जागा दिली होती.आणि आता पंच्याहत्तर वर्षानंतर संस्थानिक वीरभद्र डबीर यांच्या भावाच्या नातवाने केस केली होती की ही जागा त्यांच्या कौटुंबिक मालकीची असून वीरभद्र डबीर यांनी त्यांच्या लहान भावाच्या संमती शिवाय ही जागा परस्पर विद्या प्रसारक मंडळीना दिली.तरी त्यांच्या हिश्श्याची एक एकर दहा गुंठे जागा त्यांना परत मिळावी. दुसरे संचालक म्हणाले “आणि इतकी वर्षे काय हा झोपला होता का?”

बापूराव म्हणाले “इतकी वर्षे हे इंग्लंडमध्ये होते आता परत आलेत.आता आल्यावर त्यांना त्यांचा हिस्सा आठवला . रानडे सर ,आता कोणत्या स्टेजला आहे आपली केस ?”

केदार म्हणाला “ कोर्टाने जागेच्या मालकी संबंधात डीआयएलआर यांचा अहवाल मागवलाय ”

“ त्यावर आपण काय केलंय? ”

“ डी.आय.एल.आर. यांच्या अहवालाची वाट बघतोय.”

“आणि हा अहवाल आपल्या विरोधात गेला तर?”

“मी डीआयएलआरना भेटून त्यांना आपली केस समजावून देतो.”

“तुम्ही भेटून काय डीआयएलआर त्यांचा अहवाल बदलणार आहेत का?”

“मी काय करायला पाहिजे ते तरी सांगा.तुम्ही सांगाल तशी ऍक्शन घेतो.”

“रानडेसर इतके सारे झाले पण तुम्ही आम्हाला काहीच सांगितले नाहीत.आता सुद्धा मी विचारल्यावर सांगताय”

“बापूराव तुम्हाला सांगायचे नव्हते असे काही नाही .मी चेअरमनसाहेबाना सगळे वेळोवेळी सांगतच असतो.”

”तुम्ही चेअरमनना सगळे सांगताच हो. पण थोडे फार आम्हालाही विचारात जा ना “

त्याच्या वादात आता चेअरमननी हस्तक्षेप केला.ते म्हणाले “बापूराव मुद्दाम सांगायचे टाळले असे काही नाही.रुटीन मॅटर आहे असे वाटले म्हणून बोललो नाही.”

“अहो ही रुटीन बाब नाही.जागा हातातून जाईल .“

“या वर काय ऍक्शन घ्यायची ते आमच्या काही लक्षात आले नाही.तुम्ही सांगा ना”

“माझ्या मते आपण अपिलात जायला पाहिजे”

केदार म्हणाला “पण अजून केसचा निकाल लागलेला नाहीय”

“कोर्टाने केस डीआयएलआरना रिफर केली या विरुद्ध अपीलात जायला पाहिजे”

चेअरमन म्हणाले “रानडे सर बापूराव म्हणतात ते बरोबर आहे .तुम्ही उद्याच पेटकर वकिलांना बोलावून घ्या आणि त्यांना अपिलाची तयारी करायला सांगा “

बापूराव म्हणाले “एवढा वेळ नाही आपल्याकडे .आपणच मुंबईला जाऊन हालचाल करायला पाहिजे .थांबा, मी अॅडव्होकेट चंद्रचुडना फोन लावतो “

“त्याची अपॉइंटमेंट मिळायलाच महिना लागेल”

“त्यांचा सल्ला तरी घेऊ या “

बापुरावांनी चंद्रचूड वकिलांना फोन लावला. “ हॅलो,वकीलसाहेब मी बापूराव चौगुले भद्रावतीहून बोलतोय”

“हा.बोला”

“साहेब आमच्या शिक्षण संस्थेत जागेवरून वाद झालाय “

“सॉरी बापूराव,आता माझ्या तीन मोठ्या केसेस बोर्डावर आहेत.मला अजिबात वेळ नाही “

“साहेब तुम्ही आमची केस चालवू नका.फक्त आम्हाला गाईड करा.”

“तुम्ही असे करा.गुरुवारी मुंबईत येऊन हॉटेल ला मेरीडनमध्ये थांबा . दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा मी तुम्हाला तिथे भेटेन “

“चालेल साहेब ,आम्ही गुरुवारी येतो.थॅक्यू सर” फोन कट करून बापूराव म्हणाले “त्यांनी आपल्याला गुरुवारी मुंबईला बोलावलंय.”
चेअरमन म्हणाले “चांगले आहे.रानडे सर केसची फाइल ,लेटरहेड ,शिक्के ठरावाच्या प्रति सगळ आठवणीने घ्या.आपण तिघेही जाऊ “ बापूराव म्हणाले “आणि मुख्य म्हणजे हॉटेल ला मेरीडनमध्ये मोठा सुट बुक करा “

“हो .करतो.”

________________________________

मिटिंग संपवून केदार वेळेवर घरी आला पण बापुरावांनी झापल्यामुळे त्याचा हिरमोड झाला होता.तो घरी आला तेंव्हा मिनाक्षी तयार होऊन त्याची वाट पहात बसली होती. केदार हुश्श करून सोफ्यावर बसला .

मिनाक्षीने विचारले “ चहा करून का? ”

“ नको ”

“ काही खायला देऊ का ? ”

“ अग. नकोsय ” कारण नसताना केदारचा आवाज चढला.

“ काय झालं .मिटिंग मध्ये काही बिनसले का? ”

“ मिटिंगमध्ये दुसरे काय असतंय . ”

“ आज काय झाले ? ”

“ ती डबीर सरकारांनी जमिनीसाठी केस केली आहे ना.त्याचे अपडेट्स मी देत नाही म्हणे.”

“ मग चेअरमन काय म्हणाले ? ”

“ चेअरमन म्हणाले एवढे सांगण्यासारखे काही नव्हते म्हणून सांगितले नाही. ”

“ मग झाले तर. चेअरमननी तुमची बाजू घेतली.विषय संपला.हे या पुढारी मंडळींचे कुरघोडीचे राजकारण आहे. ते चेअरमनना डायरेक्ट बोलू शकत नाहीत म्हणून तुमच्या अडून तीर मारतात.तुम्ही कशाला मनाला लाऊन घेताय.”

मीनाक्षीच्या समजावण्याने केदारचा क्षोभ कमी झाला.केदारला जरी फार मोठा पगार नसला तरी मिनाक्षीच्या समजूतदार स्वभावमुळे त्यांचा संसार सुखाचा झाला होता.मिनाक्षी कधीच दागदागिने पिकनिक आणि पार्ट्या किंवा सण समारंभ अशा गोष्टीवर खर्च करी नसे.आधी आश्विनच्या पुढील शिक्षणासाठी बचत बाजूला काढायची ,नंतरच महिन्याचा खर्च करायचा हे त्याच्या सुखी संसाराचे रहस्य होते.लौकिक अर्थाने पाहायला गेले तर केदार फार मागे पडला होता . तो बीकॉम एमेसडब्ल्यू मेरीट मध्ये पास होता.नंतर नोकरी करत असताना तो एमबीए सुद्धा झाला.शिक्षणाच्या मानाने त्याची नोकरी फारच सामान्य होती . त्याचे संस्थेतले सहकारी जोड धंदा करून भरपूर कमाई करत होते.कोण ट्युशन घेत होते,कोणाचे स्टेशनरीचे दुकान होते ,कोणी शेअर्समध्ये उलाढाल करत होते.केदारला असल काहीच जमत नव्हत.त्याला छान पर्सनलिटी होती. त्याला नाटकाची ऑफर सुद्धा आली होती.पण तेव्हा त्याचे नुकतेच लग्न झाले होते.त्यामुळे ती ऑफर त्याने सोडली होती.त्याला स्व:तला कबूल होते की केवळ धडाडी नसल्याने त्याचे अनेक गुण वाया गेले होते . पण तो असंतुष्ट नव्हता . मिनाक्षी आणि आश्विनच्या सहवासात तो सुखी होता .
________________________________

सकाळचे दहा वाजले होते . हॉटेल ला मेरीडन मध्ये नेहमीची शिस्तशीर लगबग सुरु होतीच .पण सिलीचुंगचे युवराज मुक्कामी असल्याने वातावरणात एक विशेष दबदबा जाणवत होता.एवढ्यात जग्गु ओसवालने हॉटेलात प्रवेश केला.तो रिसेप्शनवर जाऊन म्हणाला...

“ हाय रवी ”

रवी उत्तरला “ गुड मॉर्निंग.बोलिये सर . ”

“ प्रिन्स आये है क्या ?”

“ हा. रातमे आये है. मिलना है क्या? ”

“ हा. पुछो फ्री है क्या? ” रवीने इंटरकॉमवरून युवराजशी सम्पर्क साधला.
बोलणे झाल्यावर माउथ पीस वर हात ठेवून तो म्हणाला “आधा घन्टा रुकने को बोल रहे है. ”

“ रूकता हू ना बाबा. आखिर नौकरी है . ”

रवी इंटरकॉम मध्ये म्हणाला “ ही विल वेट युवर हायनेस . ”

गेल्या वर्षी अण्णासाहेबांनी महाराजाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी घेतल्यावर जग्गुलाच आपला सेक्रेटरी म्हणून नेमले .कारण आता युवराज वरचेवर मुंबईला येत असत आणि त्यावेळी दोघाच्या मधला दुवा म्हणून जग्गू काम पाहत होता.अण्णासाहेब स्व:त युवराजांना भेटायला हॉटेलवर कधी येत नसत . आपण त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळतो आहोत ही बाब गुप्त ठेवायची होती.

आता अर्धापाऊण तास टाइमपास करायचा म्हणून जग्गू लाउंजमध्ये बसला. त्याने खुणेने कॉफीची ऑर्डर दिली.त्याच्या पासून काही अंतरावर केदार बापूराव आणि चेअरमन ब्रेकफास्ट करत बसले होते.केदारला पाहताच त्याच्या डोक्यात स्पार्क पडला.चार महिन्यापूर्वी अण्णासाहेबांनी त्याला एका तरुणाची निवड करायचे काम दिले होते.त्यांच्या अटीमध्ये हा तरुण तंतोतंत बसत होता.जग्गू रिसेप्शनवर गेला त्याने विचारले

“ रवी, ये लोग कौन है ? ”

रवीने स्क्रीनवर पाहून सांगितले “ ये लोग भद्रावती नामके गावसे आये है. काम ऑफिस वर्क लिखा है.”

“ रवी ये छोरा कभी अकेला दिखे ना तो मुझे तुरंत फोन करना ”.

“सौमित्र दादाकी फिल्मकी कास्टिंग चालू है क्या? ”

“ कुछ ऐसाही समझो ”

प्रिन्सनी बोलावल्यामुळे जग्गू त्यांच्या सूटकडे गेला .

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा.
हा ही भाग उत्सुकता वाढवणारा...

मस्त आहे फ्लो.

ते एका मोठ्या राज्याचे राजे आहेत.एखाद्या कॉलेजकुमारासारखे शंभर रुपयांचा गुच्छ घेऊन ते मला "आय लव्ह यू" म्हणू शकत नाहीत. >>> Rofl तो सगळा संवाद वाचताना भाडिपामधली आई आणि मुलगी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

भारी आहे हे. काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा. मजा आली वाचायला. कॅरॅक्टर्स खुप आहेत त्यामुळ भरपुर लांब गोष्ट होईल अस वाटतय.