माझी सैन्यगाथा (भाग २०)

Submitted by nimita on 30 April, 2019 - 06:31

आमच्या फौजी डिक्शनरी मधे एक शब्द आहे... pck ...म्हणजे pre course knowledge .जेव्हा एखादा ऑफिसर कुठल्याही कोर्सला जायची तयारी करत असतो तेव्हा त्याच्या युनिट मधले आणि त्याच्या माहितीतले ऑफिसर्स त्याला आपापल्या परीनी मदत करतात. जे ऑफिसर्स तो कोर्स अटेंड करून आलेले असतात ते कोर्सशी संबंधित स्टडी मटेरियल, त्यांच्या पर्सनल नोट्स वगैरे पुरवतात. त्याचबरोबर काही जण कोर्स च्या दृष्टीनी महत्त्वाच्या अशा सूचना (guidelines) ही देतात. आणि याच सगळ्या ज्ञान वाटपाला pck अशा गोंडस नावानी संबोधलं जातं.

हे झालं ऑफिसर्स चं pck... पण अशाच तऱ्हेचं pre course knowledge आम्हां लेडीज मधेही असतं बरं का ! आणि आमच्या ज्ञान वाटपाची व्याप्ती ही खूप मोठी असते. म्हणजे अगदी त्या नवीन जागेच्या इतिहास भूगोला पासून जी सुरुवात होते ती अनेकविध विषयांचा आढावा घेऊन थांबते....

उदाहरणार्थ.. तिथे घरकामासाठी मेड्स मिळतात की नाही? आणि जर असल्या तर कोणत्या कामाचे अंदाजे किती पैसे घेतात? तिथल्या शाळा, किराणा सामान, भाजी वगैरे साठीचं मार्केट (काही ठिकाणी तर अगदी स्पेसिफिक दुकानांची नावं सुद्धा), ब्युटी पार्लर्स, डॉक्टर्स (खास करून paediatrician ), त्या गावातली आणि त्याच्या जवळपासची प्रेक्षणीय स्थळं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या तिथल्या खास , unique वस्तू आणि त्या मिळण्याची ठिकाणं.

विषयाचा आवाका खूप मोठा असल्यामुळे त्याचे साधारणपणे तीन पोटविभाग होऊ शकतात....

Must see

Must buy

Must do

यातल्या 'must see' मधे मुख्यत्वे करून त्या जागेच्या आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा समावेश असतो. आणि त्याचबरोबर काही 'हटके' 'not so common' टुरिस्ट स्पॉट्स पण असतात..उदाहरण च द्यायचं झालं तर 'भूज' च्या जवळ असलेलं 'वीरांगना स्मारक', दार्जिलिंग मधली 'आवा आर्ट गॅलरी', लिस्ट बरीच मोठी आहे हो !

'Must buy' मधे त्या ठिकाणी मिळणाऱ्या खास वस्तू, handicraft, कपडे, तिथले फेमस खाद्य पदार्थ वगैरे वगैरे समाविष्ट आहेत. म्हणजे जर कोणी जोधपूरला जाणार असेल तर तिथल्या खास लेहेरिया आणि शिवोरी साड्या अगदी रास्त दरात ज्या फॅक्टरी आउटलेट मधे मिळतात त्या माणसाचं नाव आणि फोन नंबर (तोही with reference बरं का), सप्तरंगी काचेचे कडे आणि बांगड्या साठी प्रसिध्द असलेलं घंटाघर मधलं 'बिबाजी' चं दुकान. दही कचोरी साठी पोकर स्वीट्स, जम्मू मधल्या 'पहेलवान दी हट्टी' मधे मिळणारा गाजर हलवा, औरंगाबाद मधल्या 'तारा पान हाऊस' चं जग प्रसिध्द ड्राय फ्रूट पान , पठाणकोट च्या 'A1 बेकरी' च्या कोकोनट कुकीज ....ही लिस्ट देखील पहिल्या लिस्ट सारखीच न संपणारी आहे. त्यामुळे आता तिसऱ्या विभागाकडे वळू या..

'Must do '.....या सदरात material गोष्टींपेक्षा 'live experiences ' बद्दल माहिती असते...म्हणजे 'माउंट अबू ला जाणार असाल तर तिथला सूर्यास्त नक्की बघा' किंवा 'सिक्कीम ला गेल्यावर 'बाबा हरभजन मंदिर' ला जायचं अजिबात विसरू नका' ...या आणि अशा प्रकारच्या सूचना ऐकायला येतात.

आम्ही जेव्हा वेलिंग्टन ला यायला निघालो तेव्हा मला पण इतर लेडीज कडून अशा अगाध pck ची प्राप्ती झाली होती. आणि त्यामुळेच मी अगदी पूर्ण तयारीत होते...तिथल्या त्या एक वर्षाच्या कालावधीचा अगदी पुरेपूर उपयोग करून घ्यायला !

आमच्या युनिट मधले एक ऑफिसर वर्षंभरापूर्वीच तिकडे राहून आले होते. त्यांच्या बायको कडून मला बरीच माहिती मिळाली होती. त्यातला एक प्रॅक्टिकल आणि तितकाच महत्वाचा input म्हणजे... "साधारण एक वर्षांपासून ते दहा बारा वर्षांपर्यंतच्या मुला मुलींसाठी खूप सारी birthday gifts बरोबर घेऊन जा.. कारण तिकडे येणारे सगळे ऑफिसर्स समवयस्क असल्यामुळे सगळी बच्चे कंपनी पण एकाच वयोगटाची असते. त्यामुळे वर्षभरात खूप birthday पार्टीज ला जावं लागतं. आणि तिथे जवळपास कुठलंही गिफ्ट शॉप नाहीये, म्हणून तू आपली आधीच ती सोय करून ठेव."

त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी तिचं पालन केलं, in fact मी तर गिफ्ट्स बरोबरच त्यांसाठी लागणारे रॅपिंग पेपर्स, सेलोटेप वगैरे पण आधीच स्टॉक करून ठेवले.

मला मिळालेल्या इतर माहिती मधे वेलिंग्टन, कून्नूर आणि जवळपासच्या काही जागांचा उल्लेख बऱ्याच जणींनी केला होता.

त्यात कून्नूर मधली 'Crown Bakery' त्याचप्रमाणे जवळच असलेल्या 'केत्ती' नावाच्या गावातल्या प्रसिद्ध 'hand embroidery' केलेल्या साड्या आणि टेबल लिनन यांचं नाव वारंवार आलं होतं. कोईम्बतूर जवळ असलेलं तिरुपुर हे गाव तर एखादं श्रद्धास्थान असल्यासारखंच वाटत होतं. अजूनही बऱ्याच जागा आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्या लिस्ट मधे. लिहिण्याच्या ओघात त्यांचा उल्लेख होईलच म्हणा!

म्हणतात ना..की वैष्णोदेवी च्या यात्रेत जर तुम्ही देवीच्या दर्शनानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं नाहीत तर तुमची यात्रा असफल होते....तसंच काहीसं आहे हे...म्हणजे वेलिंग्टन ला असताना त्या वर्षभरात जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या जागांना भेट दिली नाहीत तर तुमचं तिथे राहाणं निरर्थक आहे !

इतकी सगळी माहिती मिळाल्यावर मला अगदी 'रात्र थोडी सोंगं फार' असं वाटायला लागलं होतं. त्यामुळे जरा स्थिरस्थावर झाल्यावर मी लिस्ट मधल्या पहिल्या जागेला भेट द्यायचं ठरवलं....कून्नूर मधली प्रसिध्द 'Crown Bakery '.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त हाही भाग.
Pck भारीच! तुमचं बोट धरून जीवाचं वेलिंग्टन करणार Happy

राजे १०७, आत्तापर्यंत माझ्या लेखनाला मिळालेला हा सर्वात गोड प्रतिसाद आहे. माझं लिखाण तुम्हाला भावलं हे वाचून मन सुखावलं. जर शक्य झालं तर माझे इथले इतर लेख ही वाचा व प्रतिक्रिया कळवा. Happy

pck मध्ये माझी पण थोडीशी भर.
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ वेलिंग्टनमध्ये राहात होते आणि तिथेच त्यांचे निधन झाले. वेलिंग्टनजवळ उटी-कुन्नूर रस्त्यावर त्यांचा पुतळा आहे, जमल्यास त्याला भेट द्यावी आणि आदरांजली वाहावी अशी विनंती.