मर्म - १

Submitted by ऑर्फियस on 3 May, 2019 - 05:34

एखादी तरुण, नितळ त्वचा रोगाने काळवंडून कुरुप व्हावी तशी ती शांत, शालीन वस्ती पाहता पाहता बकाल होऊन गेली. तेथिल सुस्वभावी माणसे हळुहळु निघून गेली. तरण्या मुलींना पाहून शूक शूक करणारी, त्या वस्तीसारखीच बकाल माणसे आली. दुकाने वारेमाप झाली. झाडे तोडली गेली. चहाचे स्टॉल्स आले, जुगाराचे अड्डे आले, ताडीमाडी, दारुची दुकाने आली. बाजूला एक गावच्या दोन्ही वस्त्यांना जोडणारा पूल बांधला गेला. खालून रेल्वे गेली होती. पुलावर गणंगांना बसायला जागा मिळाली. वस्तीत दिवसभर वर्दळ वाहत असे. अगदी पहाटे मात्र शूकशूकाट असायचा. एखाद्या दुकानामागे अंगावर घोंगडी घेऊन झोपलेला एखादा भिकारी सोडला तर त्या अरुंद रस्त्यावर माणसाची खूण दिसत नसे. दिवसभरात वारेमाप कचरा गोळा झालेला असे. सुमनाच्या धंद्याची हीच वेळ होती. दिवसभर जमा झालेल्या कचर्‍यातून प्लास्टीकच्या अनेक वस्तू मिळत. कागद, पिशव्या, फुटके डबे, बाटल्या, जुनी वायर, भंगार सामान अशा अनेक गोष्टी ती दिवसभर गोळा करून रात्री गोदामात नेऊन टाकत असे. त्यातून मिळणार्‍या पैशांवर पुढचा दिवस जात असे. वणवण दिवसभर असली तरी दिवसाच्या या शांतवेळी भरपूर माल मिळत असल्याने ती आजही अगदी ठरवून पहाटे आली होती आणि अचानक तिचे रस्त्यावर पडलेल्या बरणीकडे लक्ष गेले. तिचे डोळे चमकले. काचेची मोठी बरणी न फुटलेली. अशी तिला क्वचितच गावली असेल. फक्त तिला झाकण नव्हते. तिने ती सावकाश उचलली आपल्या पाठीवरच्या गोणीत घातली. किंचित पुढे गेली तर छोटासा कॅनच पडला होता. फक्त वरचा भाग किंचित तडकला होता. तोही तिने उचलला. त्यानंतर थोडं पुढे तर वापरलेल्या पिशव्यांचा एक ढीगच पडला होता. सुमनाचे नशीब जोरावर होते. आज पूर्ण दिवसाचे काम तासाभरातच होतेय असे तिला वाटू लागले. आणि समोर पाहिल्यावर तिला खात्रीच पटली. एका दुकानाचे शटर अर्धवट उघडे होते. आणि त्याच्या दरवाजातच प्लास्टिकच्या कचर्‍याचा ढीग पडला होता. सुमना शटरच्या खाली वाकून तो ढिगारा उचलू लागली आणि अचानक एक जाडजूड हात अंधारातून पुढे आला आणि त्या हाताने सुमनाला सहज बाहुलीप्रमाणे आत खेचले. दुसर्‍याक्षणी शटर खाली खेचले गेले. अंधारातच दुकानाच्या जमिनीवर तिला ढकलून बाबुअण्णा हसला. किती सोप्प असतं यांना मूर्ख बनवणं. आणि त्याने थरथरत असलेल्या सुमनावर स्वतःला झोकून दिले.

...बाबुअण्णा उठला. बाजुला ठेवलेल्या पँटच्या खिशात हात घालून त्याने पाचशेच्या दोन नोटा काढल्या. सुमनाच्या अंगावर नोटा भिरकावत म्हणाला," रोज सकाळी इथला बाटल्यांचा कचरा तुझा". सुमनाचे रडणे एकदम थांबले. रोजचा कचरा आपला म्हणजे दिवसभर पायपीट करण्याची गरज नाही. बाबुअण्णा पुन्हा हसला. नवे पाखरु येईपर्यंत असेच करावे लागते. पुढचे पुढे. एकंदरीत आजच्या दिवसाची सुरुवात मस्त झाली होती. सुमना निघून गेली. वस्ती जागी होऊ लागली होती. आता घाई करायला हवी होती. समोरच्या नळावर बायका पाणी भरायला येणार होत्या. त्यांना न्याहाळत पुजा करणं हा बाबुअण्णाचा रोजचा आंबटशौक होता. नुसती चड्डी घालून उघडेबंब पोट आणि थुलथुलीत अंग दाखवत तो दुकानातील देवाची पुजा केल्याचे नाटक करीत असे. त्याने दुकानातल्या बाथरुमध्ये घाईघाईने अंघोळ उरकली. आणि तो पुढच्या भागात आला. बायका पाणी भरायला आल्या होत्या. बाबुअण्णाने सावकाश उदबत्ती काढून लावली आणि पुजा करण्यास सुरुवात केली. हे रोजचंच होतं. बायका मनातल्या मनात शिव्या हासडत पण कुणाचीच बाबुअण्णाला बोलण्याची टाप नव्हती. बहुतेकांच्या नवर्‍यांनी त्याच्याकडून कर्जाऊ पैसे घेतले होते. साधारण अर्धा तास पूजा चालली. दुकान उघडले होते. श्रीपती आत आला. हा बाबुअण्णाचा जुना नोकर. "शिरपती, ती सुमनी येईल उद्यापासून सकाळी. आपला रोजचा बाटल्यांचा, बरण्यांचा कचरा तिला देत जा" बाबुअण्णाने त्याला सांगितले आणि तो दुकानाच्या मागच्या भागात खिडकीजवळच्या टेबलसमोर बसून कालचे हिशोब तपासू लागला. आता तेथून शाळेत मुलांना नेणार्‍या बायका जाणार होत्या. तेवढेच नजरेला सुख. बाबुअण्णाने हिशेब तपासण्याचे काम सुरु केले. श्रीपती काहीच बोलला नाही. तो काय समजायचे ते समजून गेला. याच दुकानात लोणच्यांच्या बरण्या भरता भरता त्याचे काळ्याचे पांढरे झाले होते. मालकाच्या सार्‍या सवयी त्याला माहित होत्या.

"अण्णा कुठे आहात" मंजूळ स्वरात हाक ऐकू आली आणि बाबुअण्णा गडबडीने उठला. त्याची मुलगी मेधा आली होती. ही इथे कशाला? या वस्तीत तिने कधीही येऊ नये म्हणून बाबुअण्णा जीवाचा आटापिटा करीत असे. त्यासाठी त्याने चांगल्या वस्तीत फ्लॅट घेतला होता. पॉश कॉलेजात तिला अ‍ॅडमिशन घेऊन दिली. आपली मेधा काय फाडफाड इंग्रजी बोलते याचं बाबुअण्णाला भारी कौतूक होतं. खानदानी मुलीने कसं राहावं तर आपल्या मेधासारखं. जगात वाईट माणसं फार असतात. मेधाने खरं तर इथे कधीही येता कामा नये. "काय गं इथे का आलिस? तुला सांगितलं होतं ना मला भेटायला इथे यायचं नाही म्हणून. मी रात्री घरी येईपर्यंत वाट पाहता येणार नाही असं कुठलं काम होत?" बाबुअण्णाने प्रश्नांची सरबत्ती लावली. त्याच्या आवाजात नाराजीचा सूर स्पष्ट होता. "अण्णा अहो काल तुम्ही तुमचं पाकिट घरी विसरलात म्हणून ते द्यायला आले. आणि तुम्ही तुमची औषधं ही विसरलात" मेधा खुर्चीवर बसता बसता म्हणाली. देखण्या मेधाने तरुणपणचे वत्सलेचे लोभस रुप उचलले होते आणि लाल गोरा रंग बाबुअण्णाकडून घेतला होता. बाबुअण्णाने तिच्या हातातून पाकीट घेतले आणि तिला धड बसुही दिले नाही. "ठिक आहे. मिळाले पाकिट. तु निघ आता. तुला माहीत आहे ना ही वस्ती कशी आहे ती?" तिला जवळजवळ हाताला धरूनच त्याने दरवाजापर्यंत नेले. "शिरपती हीच्या बरोबर त्या नाक्यापर्यंत जा आणि हिला रिक्शा पकडून दे" त्याने नोकराला हुकूम सोडला. बाबुअण्णा सकाळी दुकानात येऊन रात्री अगदी उशीरा घरी जात असे. वत्सलाबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. बाबुअण्णाला तिच्याकडे पाहिले तरी तिटकारा वाटत असे. गेल्याच आठवड्यात वत्सलाबाई आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून परत आल्या होत्या. ही आपल्या बायकोची हॉस्पिटलमधली कितवी फेरी ते बाबुअण्णाला आठवेना. किचकट दुखणे बरे होत नव्हते. नुसते हातापायाचे सांधे पेरं सुजायची. नीट चालताही येत नव्हते. सकाळ, संध्याकाळ आणि दिवसभर त्यांचं सारं करायला ब्युरोतून बायका येत. बाबुअण्णाला या दुखण्याचा अगदी कंटाळा आला होता. यावेळी जेव्हा वत्सलाबाई घरी आल्या तेव्हा बाबुअण्णाने तिची एका शब्दानेही चौकशी न करता व्हिस्कीची बाटली काढून दोन दिवसापूर्वी फ्रिजमध्ये ठेवलेले मटण काढले होते. ते गरम करून त्याने बाटली घशात रिती केली आणि तो रात्री झोपायला दुकानात आला.

लोणच्याच्या धंद्यात अमाप पैसा मिळत होता. आता तर निरनिराळ्या रिसॉर्टसना लोणची, सॉसेस, निरनिराळे मसाले, मुरांबे अशा गोष्टी पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. बाबुअण्णा धंद्यात रमला होता. तो घरी जात असे आपल्या मेधासाठी. आपल्या मुलीसाठी त्याच्या मनात केवळ कोवळे कौतुक होते. तिला तो लांडे कपडे घालु देत नसे. खानदानी मुली असलं काही घालतात का? पुरुषांच्या नजरा किती वाईट असतात. मेधाला जगाचा काय अनुभव? फक्त एकदाच या वस्तीत मेधाची कुणीतरी छेड काढली होती. बाबुअण्णाने त्या मुलाला काठीने फोडून काढले होते. बराच वेळ त्याचे अंग थरथरत होते. तेव्हा डॉक्टरकडे जावे लागले आणि ही डायबेटीज, कॉलेस्टेरॉल आणि बीपी ची भानगड निघाली होती. डॉक्टर म्हणतोय वजन खूप वाढलंय. डॉक्टरला काय कळतं? मी लहानपणापासूनच जाडा आहे. तेव्हा कुठे मला त्याचा त्रास झाला होता? बाबुअण्णाला डॉक्टरच्या सुचनांची पर्वा नव्हती. शिवाय मटण खाऊ नका? बापरे, बाबुअण्णाला आपल्या मुलीनंतर जगात सर्वात जास्त काय प्रिय असेल तर मटण. रोज सकाळ संध्याकाळ जरी त्याला मटण खायला मिळाले तर त्याची ना नव्हती. मस्त तर्री असणारे लालेलाल, जीभ पोळणारा रस्सा असलेले मटण म्हणजे स्वर्गसुख. मग कोंबडी, की बकरा कि रानडुक्कर असा भेदभाव बाबुअण्णा मानीत नसे. बरोबर पाव, भाकरी, भात असे काहीही त्याला चालत असे. कित्येकदा त्याने भांडेभर मटण एकट्याने संपवले होते. श्रीपती गेली तीस वर्षे बाबुअण्णाकडे टिकण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तो उत्तम मटण बनवत असे. पण मेधाने इथे येता कामा नये. बाबुअण्णाला पुन्हा मेधाची काळजी वाटू लागली. तिला पुन्हा एकदा नीट समजावले पाहिजे. एव्हाना श्रीपती मेधाला सोडून आला होता. बाबुअण्णाने पुन्हा त्याला विचारुन ती रिक्शात बसल्याची खात्री करून घेतली. मेधा हे बाबुअण्णचे मर्मस्थान होते.

"बाबुशेट, आज रायचंदच्या रिसॉर्टवर माल घेऊन जायचंय ठावूक हाय नव्हं?" श्रीपतीने आठवण करून दिल्याबरोबर बाबुअण्णाच्या शरीरातून आनंदाची एक लहर निघून गेली. एकंदरीत आजचा दिवस मस्तच जाणार म्हणायचं. अनेक रिसॉर्टपैकी फक्त रायचंदचे रिसॉर्ट्स हे एक असे होते जेथे बाबुअण्णा स्वतः मालाचा टेम्पो घेऊन जात असे. रायचंद आता तेथे येत नव्हता. त्याचा मुलगा राकेश तेथे येत असे. बाबुअण्णाला नेहेमी वाटायचं आपण हाय सोसायटीत जन्मलो असतो आणि आपल्याला फाडफाड इंग्रजी आले असते तर आपण अगदी राकेशसारखे झालो असतो. तो स्वतःला राकेशमध्ये पाहात असे. रिसॉर्टमध्ये कामाला सार्‍या तरूण मुली होत्या. एकाहून एक देखण्या. साल्याला रुपाची सॉलिड पारख होती. सतत तरण्या पोरींनी घेरलेला असे. बाबुअण्णाने त्याच्याशी सलगी जमवली होती. राकेशनेही बाबुअण्णाला बरोबर ओळखले होते. दोघेही बाईलवेडे. एकमेकांच्या रंगेल आणि रगेल हकिकती ते एकमेकांना ऐकवत. खरं तर बाबुअण्णा राकेशहून वयाने फारच मोठा. पण या एका वेडाने दोघांच्या वयातील अंतर नाहीसे केले होते. राकेशने तर खुल्ली ऑफर केली होती. त्याच्याकडच्या एका फटाकडीच्या बाबतीत. पण बाबुअण्णाला फाडफाड इंग्रजीची भयंकर भीती वाटत असे. आपल्याला सुमनाच बरी. बाबुअण्णाने ओशाळत राकेशला नकार दिला होता. बाबुअण्णा आला की त्याचे दुपारचे जेवण राकेशसोबत असे. मग चिकन काय मटण काय, भेजा फ्राय काही बोलु नका. नुसती खाण्याची रेलचेल. पिण्याची सोयही होतीच पण बाबुअण्णाला टेम्पो परत न्यायचा असल्याने पिता येत नसे. तत्त्व म्हणजे तत्व. दारु पिऊन गाडी चालवायची नाही. पण आज बाबुअण्णाला राकेशसोबत जेवण्याची वेळ गाठता येणे शक्य नव्हते. आजचा दिवस विसरल्याने जरा गोंधळ झाला होता. राकेशकडे जायचे तर गुळगुळीत दाढी करायला हवी. मिशा कोरायला हव्या. केस काळे करायला हवे. हे सारे करायचे तर जेवायची वेळ साधता येणार नव्हती. पण हे न करता जाणे शक्यच नव्हते. इतक्या सुंदर मुली आसपास असताना आपण गबाळ्यासारखे जायचे? शक्यच नाही. (क्रमशः)

ऑर्फियस

अंतिम भाग
https://www.maayboli.com/node/69842

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षमा असावी पण पुढच्या भागात मेधाबरोबर काहीतरी वाईट घडेल व बाबुअण्णाला कर्मांची सजा मिळेल असं होईल हा अंदाज वाटतोय. बहुतेक राकेश मेधा प्रकरण जुळेल व बाबुअण्णा चडफडत बसेल.
असो दमदार लेखन, चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. पुढचा भाग लवकर लिहा.

क्षमा असावी पण पुढच्या भागात मेधाबरोबर काहीतरी वाईट घडेल व बाबुअण्णाला कर्मांची सजा मिळेल असं होईल हा अंदाज वाटतोय. बहुतेक राकेश मेधा प्रकरण जुळेल व बाबुअण्णा चडफडत बसेल.

अंदाज आलाय काय असेल ते

अनेक शक्यतंपैकी एक शक्यता आहे. आणि त्याचा अंदाज अनेकांना आला असेल. पण मन्या यांनी म्हटलं तसं मला खरं तर एका बाबुअण्णात किती बाबुअण्णा दडलेत हे रंगवण्यात जास्त रस आहे. Happy

मस्त सुरवात!

> पण मन्या यांनी म्हटलं तसं मला खरं तर एका बाबुअण्णात किती बाबुअण्णा दडलेत हे रंगवण्यात जास्त रस आहे. > पुभाप्र

> याच दुकानात लोणच्यांच्या बरण्या भरता भरता त्याचे काळ्याचे पांढरे झाले होते. > केस शब्द राहिला कि तो गाळून असेदेखील वापरतात?

याच दुकानात लोणच्यांच्या बरण्या भरता भरता त्याचे काळ्याचे पांढरे झाले होते. > केस शब्द राहिला कि तो गाळून असेदेखील वापरतात?

>>>>>>. हो वापरतात

मस्त सुरूवात !