चिकन खिमा पॅटिस

Submitted by maitreyee on 3 May, 2019 - 11:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिन्स्ड/ ग्राउंड चिकन (खिमा) - १ पाउंड
कांदा - १ मोठा
हिरव्या मिरच्या - ४-५
आले - २इन्च
लसूण - ८-१० पाकळ्या
बटाटे - २ लहान ते मध्यम आकाराचे
अंडं - १
कोथिंबीर - अर्धी वाटी
पुदिना- पाव वाटी
धणे - २ चमचे
जिरे - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा ( शान चा कबाब मसाला मिळतो तोही चालेल)
बेसन - साधारण अर्धी वाटी.
ब्रेड क्रम्स किंवा बारीक रवा - अर्धी वाटी.

क्रमवार पाककृती: 

चांगली थालिपिठं करण्याचं ठरलं होतं परवा रात्रीच्या जेवणात. पण ऐन भुकेच्या वेळी कुठेतरी एका साइट वर एक रँडम फोटो दिसला - खीमा पॅटिस चा. झालं मग! थालिपीठ क्यान्सल!! आता पॅटिसच करायचे असं डोक्यात घेतलं Happy
घरी जाता जाता इन्ग्रेडियन्ट्स घेउन गेले. २-३ यूट्युब व्हिडिओ बघितले. मग ऐन वेळी कोणतीही रेसिपी तशी च्या तशी करायची नाही या माझ्या नियमानुसार(!) रीतसर बदल, रीप्लेस्मेन्ट्स करून बनवण्याचा उरका पाडला. फायनल प्रॉडक्ट झक्कासच बनलं एवढं खरं!!
तर कृती अशी:
तयारी - खिमा हळद, मीठ, तिखट घालून थोडा परतून घ्या. खिमा शिजून पाणी निघून गेले पाहिजे. थंड झाल्यावर चॉपर, फूड प्रोसेसर किंवा हाताने तो खिमा एकसारखा कुस्करून घ्या. बटाटेही उकडून मॅश करून बाजूला ठेवा. धणे - जिर्याची भाजून पूड करा. कांदा बारीक चिरून घ्या. आले लसुणाची पेस्ट बहुतेक रेसिपीज मधे असते पण मी आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून न घेता बारीक चॉप करून घेते चॉपर मधे. पेस्ट पेक्षा तुकड्या तुकड्यांचं टेक्स्चर पॅटिस/कबाबात छान लागतं. कोथिंबीर आणि पुदिनाही बारीक चिरून घ्या.

आता खिम्यात धणे जिरे पावडर, गरम मसाला, आले, लसूण मिर्ची, कांदा, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ ( ते जरा बघूनच घाला कारण आधी खिमा परताताना आपण मीठ घातले आहे) घाला. एक अंडे फोडून घाला. उकडून मॅश केलेले बटाटे घाला. (या दोन्हीमुळे बाइंडिंगसाठी मदत होते). कोथिंबीर, पुदिना घाला. आता थोडे थोडे बेसन घालून सर्व नीट मळून घ्या. काही रेसिपीज मधे सत्तू, कॉर्न फ्लावर असे ऑप्शन आहेत. मी बेसन घरात आहेच आणि वापरायला सोप्पं म्हणून ते वापरलं. बेसन फार जास्त लागत नाही , फायनल प्रॉडक्ट मधे त्याची चव पण लागत नाही पण पॅटिस जरासे फर्म होण्यासाठी ते लागते.
शेवटची स्टेप - एका उथळ पॅन मधे तेल गरम करा. अगदी कमी तेलात नीट नाही होणार असे वाटते. मी डावभर पेक्षा जरा जास्तच तेल वापरलं. मळलेल्या खिम्याच्या गोळ्याचे लहान लहान चपटे लंबगोल पॅटिस बनवा. एका ताटलीत बारीक रवा घेऊन त्यावर पॅटिस हलकेच दोन्ही बाजूने दाबून मग सर्व बाजूने ब्राउन रंग येईपर्यन्त शॅलो फ्राय करा.
पुदिना चटणी, कांद्याच्या स्लाइसेस सोबत सर्व्ह करा.
chpat.jpg

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२-१४ पॅटिस होतील यात . २-३ जणांना पुरावे. पण हादडणारे दर्दी असतील तर काही सांगता येत नाही :)
अधिक टिपा: 

हा तसा वर्सटाइल प्रकार आहे. आम्ही अ‍ॅपेटायजर म्हणून खाल्ले. पण बर्गर/ सॅंडविच, रॅप इ. प्रकारात वापरता येतील.
व्हेजि. मंडळींसाठी पनीर, सोया चन्क्स इ. वापरून हा प्रकार नक्कीच करता येईल. मी ट्राय केलेलं नाही. करून पहा Happy

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तं, एकदम पाकिस्तानी रेस्टॉरन्ट मधे शोभेल अशी डिश दिसतेय Happy
बेसन घातलय त्या ऐवजी काय? राइसफ्लोअर ?

फायनल प्रॉडक्ट एकदम भारी दिसतंय. Happy
आम्ही आपले हे ते आन ते हे घालून करून पाहू, तसंही बाकी काय ऑप्शन्स नसतेत आमाला.

खिमा असल्यामुळे बादच.
ते हे घालून विचारणारच होते पण लेखिका बाईंना हा प्रश्न येणार ह्याची कल्पना असल्यामुळे त्यांनी स्वतःच लिहिलं आहे.
सिंडे, तू बटाटा घालून चालेल ना हा प्रश्न विचारुन टाक Wink

मस्त रेसिपी. फारच भारी दिसताहेत पॅटिस. सगळे जिन्नस घरात असणारे लिहिले आहेत आणि रेसिपी विकेंडला आली आहे, फार मोठं पुण्याचं काम. फार वाट पहावी लागणार नाही. :thumbs up:

मस्त दिसतोय फोटो.

आम्ही कांदा आणि बेसन नाही घातलं कधी आणि बरेचदा टर्की खिमा वापरलाय.

मी खिमा आधी परतून घेत नाही आणि बेसन आणि बटाटे देखील घातले नाहीत कधी. आता या रेसिपीने करुन पाहीन. चिकन खिम्याचे सर्वच प्रकार आवडतात घरी
फोटो एकदम कातिल !

फोटो भारी आहे एकदम.

बटाटा घालून चालेल ना हा प्रश्न विचारुन टाक >>> विचारायचं काय त्यात, मै तशी प्रेमळ आहे, बटाट्यांचे चिकन खीमा पॅटिस केले तर राग मानणार नाही.

मस्त पाकृ!
मी खिमा तयार करून घेते.ते सारण उकडलेल्या बटाट्याच्या पारीत भरून तांदळाच्या पिठात घोळवून शॅलो फ्राय करते.
खिम्यात धणे जिरेपूड घालत नाही.

मस्त रेसिपी.. तोपासू.. व्हेज लोकांनी काय करायचे ते आधीच सांगितल्यामुळे तुम्हाला 310 गुण अधिक Proud
फायनल डिश क्लास आहे एकदम.. आवडली

मस्त आहे पाकृ.
फायनल डीश पण भारी यम्मी दिसतेय.
मला उगीच रवा लावुन तळलेले सुरमई/रावसाचे तुकडे आठवले. Happy

बायडिंगसाठी बटाटा आणी थोडं बेसन घातल्यावर अंडं नाही घातलं तर चालेल का?

मस्तच रेसीपी. मी मटन खिम्याचे शामी कबाब करत असे नेहमी. पोळी बरोबर टिफिन मध्ये पण छान लागतात. बेसन ऐवजी उकडलेली चणाडाळ घालायची मस्त लागते. खिम्याबरोबरच वाटून घ्यायची. आणि अंडे घातल्याने छान मिळून येते व टेस्ट पण येते.

फोटो एकदम कातिल आलाय... जेवताना असले फोटो बघितले तर ते अजूनच कातिल वाटतात.

करून पाहणार हे नक्की.

रेसेपी वाचल्यापासून करून बघायचीच हे ठरवलं होतं. आज केले. आमच्याकडच्या दुकानात किमान 350 ग्राम खिमा घ्यावा लागेल म्हणून सांगितलं. म्हणून तितका खिमा आणला.
रीतसर २-३ वेळा रेसेपी वाचली, पौंडचे ग्राम मध्ये कन्व्हर्जन केलं.
करताना मात्र प्रमाण बिमाण न बघता अंदाज पंचे सगळं सामान घातलं.
नुसता बटाटा घातल्यावरपण परफेक्ट कंसिस्टंसी आली होती. मग अंडं घातल्यावर प्रकरण पातळ झालं. बेसनानी परत परफेक्ट.
मस्त झाले कटलेट /टिक्की/पॅटिस. आम्ही फुलक्यात घालून रॅप बनवून खाल्ले. 12 कटलेट झाले होते मध्यम आकाराचे. एका फुलक्यात २ घालून बाकी सलाद इ घातल्यावर एका रॅपमध्येच काम भागलं पर पर्सन.

अर्रे थॅन्क्यू फीडबॅक बद्दल! मी अंडं आणि बटाटे घालून मग च मळले होते आणि मग लागेल तसे बेसन घातले. त्यामुळे नुस्ता बटाटा वापरून भागेल का ते माहित नाही! मेबी नेक्स्ट टाइम..