प्रेम

Submitted by Asu on 29 April, 2019 - 02:59

प्रेम

तू असा दीड शहाणा
नाही म्हटल्यावर निघून गेलास
एकदा तरी मागे वळून
पाहायचेही विसरून गेलास

हो म्हणजे नाही म्हणायची
चारचौघात किंमत असते
उघड उघड जगासमोर
प्रेम करायची हिंमत नसते

प्रेमाच्या वाटेवर पहारे किती
घरी मायबाप आणि
दारी सगळ्यांचीच भिती
थोड्याही शंकेने धडधडते छाती

बोलण्याची अबोल भाषा असते
नजरेला नजरेतून आस दिसते
हृदयाला हृदयाची साथ असते
बिनतारी संदेशाची बात असते
हीच प्रेमाची सुरूवात असते

प्रेमातून प्रेम हळूच उमलते
आयुष्य त्यातूनच अलगद फुलते
दिवसा चांदण्यांची खैरात भासते
रात्री प्रेमाची बरसात असते

प्रेम असेच अव्यक्त असते
प्रेमीजनांनाच फक्त दिसते
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
जगणे आपुले सुंदर व्हावे

कणाक्षणात प्रेम असता
उगाच का कुढत जगावे
जन्माला येवून एकदा तरी
कुणावर तरी प्रेम करावे

प्रेम फक्त प्रेम असावे
इच्छा अपेक्षांचे ओझे नसावे
पतंगासम समर्पण असावे.

-प्रा. अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर. नेमक्या शब्दात भावना मांडल्या आहेत.
प्रेम फक्त प्रेम असावे
इच्छा अपेक्षांचे ओझे नसावे
पतंगासम समर्पण असावे.
या ओळींत प्रेमाचा खरा अर्थ भरला आहे.