पाटील v/s पाटील - भाग १८

Submitted by अज्ञातवासी on 18 April, 2019 - 13:58

भाग १७
https://www.maayboli.com/node/69522

बरीच रात्र झाली होती. आकाशात चंद्र बराच वर आला होता.
"किती सुंदर दिसतोय ना चंद्र?" सोनी चंद्राकडे बघत म्हणाली.
"हो," मोहन सोनीकडे बघत म्हणाला.
"चला, उद्या लग्न आहे माझं!" मिने अचानक गाडीकडे आली.
"अरे हो. रात्रही बरीच झालीये." मोहन गडबडला.
मोहनने गाडी स्टार्ट केली, सर्वजण पाटीलवाडीकडे निघाले.
अण्णांच्या वाड्यासमोर गाडी थांबली.
"मिनेताई, उद्या तयारीत राहा. सगळं नीट होईल..." मोहन म्हणाला.
"नक्की होईल," आणि मिने हसत घराकडे गेली.
"सोनी, जायचं नाही का घरला आज?" मोहन मिश्कीलपणे म्हणाला.
सोनी अजूनही गाडीतच बसलेली होती. ती गडबडीने खाली उतरली.
"जावा, जावा, उद्या लग्न आहे, आणि ही गाडीची चावी घेऊन जा." मोहन म्हणाला.
"अरे इतक्या रात्रीचं तू कसा जाणार घरी?"
"इतका दूर आलोय सोनी, जाईन घरी बरोबर!" मोहन मागच्या पाऊलानी चालत सोनीकडे बघत म्हणाला.
"अरे वेड्या, पडशील..." सोनी हसत म्हणाली.
आणि मोहन उड्या मारत निघाला.
-----------------------------------------
'तारे गिन गिन याद जो तेरी मै ता जागा रतानु'
मोहन मस्त गाणं म्हणत चालला होता.
व्यास मागून आले, आणि मोहनला म्हणाले.
"सर, गाडीत बसावं."
"व्यास, आज टेंपो? देवा, काय करावं मी या माणसाचं!" मोहन वैतागाने म्हणाला.
"सर, माझी दूरदृष्टी बघा. लग्न झालं असेल, तर नवरदेव नवरी,तुमची भावी नवरी आणि सगळं सामान न्यावं म्हणून हा टेंपो आणलाय."
"व्यास," मोहन टेंपोच्या मागे गेला आणि वर चढला.
"जाऊ दे," मोहन म्हणाला.
आणि तो टेंपो धूर उडवत निघाला.
------------------------------------------
'इलाया नीला...'
मोहन मस्तपैकी गच्चीवर गाणं ऐकत पहुडला होता.
"तीन तास उरलेत मोहन, लग्न मोडण्यासाठी." कृष्णराव म्हणाले.
"हो बाबा."
"लागलं नाही ना रे तुला जास्त."
"बाबा पन्नास माणसांना लोळवतो मी. हे बिचारे फक्त तलवारी घेऊन लढत होते. विकासाला फार वाव आहे बाबा भारतात."
"सर मी घरी जाऊ का?" व्यास डोक्यावर गोधडी घेत म्हणाले.
"अरे व्यास, तुम्हीही अजून इथेच का?"
"काय करणार सर, उद्या लग्न आहे, तर मोठ्या सरांनी इथेच थांबायला लावलंय."
"जा व्यास, काही गरज नाही."
"ठीक आहे सर, जातो."
व्यास तशीच गोधडी घेऊन बाहेर निघाले.
"व्यास, गोधडी सोडून जा," कृष्णराव म्हणाले.
"सर, थंडी खूप आहे."
"व्यास. घेऊन जा," मोहन त्रासिकपणे म्हणाला.
"बाबा, उद्याचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी जुळून यायला हवी."
"होईल सगळं नीट, काळजी नको. पण झोप आता."
"एवढं गाणं ऐकून झोपतो बाबा, तुम्ही जा बेडमध्ये."
"जातो. झोप आता."
आणि मोहनने गाणं गुणगुणतच डोळे मिटून घेतले.
'इलाया नीला'
---------------------------------------
"ये पोरींनो, उठा की, बापाने लाडवून ठेवल्या नुसत्या..."
अंबा मिनेकडे आरडाओरडा करत म्हणाली.
"आजीचं, बापाचं नाव खराब करशील, उठ, सासरी लवकरच उठावं लागेल."
मिने डोळे चोळत उठली. सोनीही थकून तिच्याच रूममध्ये झोपली होती, तीही उठली.
"चला तयारीला लागा, अर्ध्या तासात येतेय पुन्हा."
अंबा बाहेर गेली.
"म्हातारी कावलेली दिसतेय," सोनी म्हणाली.
"गप, तयारी कर."
अंबा खाली आली, खाली कृष्णराव व मोहन कामाच्या गडबडीत होते.
"मोहन, आणि ड्रायवर, वर ये," अंबा रगेल आवाजात म्हणाली.
दोन्हीही वर गेले.
"ड्रायवर, हे पाचशे रुपये घे, जा, नवीन कपडे घे."
"मालकीनबाई, किती मोठं मन तुमचं... एवढी बक्षिसी? तुमचे पुत्र, पौत्र, भाऊ, बहीण सगळे सुखी राहो."
"तुझ्या आशीर्वादाची गरज नाही. थोड्यावेळाने स्टेशनवर जा. माझी भाची येतेय. तिला घेऊन ये."
"जशी आज्ञा," आणि कृष्णराव निघाले.
"तुही हे हजार घे. काय करणार, बहिणीचा नातू, जरा गरिबी उजळेल. आणि जरा नवीन कपडे घाल आज. काय नेहमी हे झबलं घालून फिरतो..."
'त्याला वेस्टकोट म्हणतात अंबे' मोहन मनातल्या मनात चरफडत म्हणाला.
"जा तयारीला लागा..."
मोहन धावतच बाहेर गेला.
-------------------------------
"ताई, आज तुझं लग्न मोडणार..."
"सोनी, लग्न मोडताना आनंदी होणारी मी पहिली मुलगी असेन. पण व्हायला हवं सगळं नीट."
"होईल ग सगळं नीट. चल मी खाली जाते."
सकाळपासून वाड्यावर लगबग चालू झाली होती. स्वयंपाकाची भांडी, वाढप्यांची वाढणी, सनईचे सूर, पाहुण्यांची गडबड यांचा आवाज एकमेकांमध्ये मिसळत होता.
अण्णा पाहुण्यांच स्वागत करत होते. मोहन जेवणाच्या सोयीकडे लक्ष देत होता.
मुहूर्त जवळ आला तरी नवरदेवाचा पत्ता नव्हता.
"दादा," अण्णा श्यामरावाकडे येऊन म्हणाले, "पाहुण्यांना फोन तरी कर, कुठे पोहोचलेत?"
... तेवढ्यात दारासमोर दहा बारा गाड्या थांबायचा आवाज झाला.
"या, या काकासाहेब या, सर्वेशराव कुठे आहेत?" अण्णा हसतमुखाने दरवाजात जात म्हणाले.
"अण्णा," काकासाहेब अत्यन्त गंभीर चेहरा करत म्हणाले, "जरा आत चला."
अण्णा चक्रावले.
"काकासाहेब, सर्वेशराव कुठे आहेत?"
"अण्णा..."आणि एवढं बोलून इतका वेळ गाडीच्या मागच्या बाजूला लपलेल्या सर्वेशने अण्णांच्या पायाशी लोळण घेतली.
"सर्वेशराव, काय लावलंय हे," घरात चला अगोदर.
सर्व लवाजमा वाड्यात गेला.
----------------------------------
वाड्यात स्मशानशांतता पसरली होती.
सर्वेशने आपल्या सगळ्या अपकृत्यांचा पाढा अण्णांसमोर वाचला होता.
"काका," अण्णा काकासाहेबांसमोर गरजले... "कातडी वाघाची आणि काळीज कुत्र्याचं अशी गत आहे तुझी. या अण्णा पाटीलला संपवायला निघाला होतास तू, बघ आता एकही कारखाना आणि संस्था तुझ्या ताब्यात राहते का."
"दादा," अण्णांनी शामरावांकडे मोर्चा वळवला, "तूच हे स्थळ आणलं ना? सगळं बघून, पारखून आणलंय असं म्हणालास ना? मग आज हे काय ऐकतोय मी? मिनेही तुझीच मुलगी ना? जराही विचार करावासा वाटला नाही?"
"अण्णा, मला माहित नव्हतं रे," शामराव मान खाली घालून म्हणाले.
"शामकाका, सगळं माहिती होतं तुम्हाला," मिने गरजली...
सगळ्यांच्या माना मिनेकडे वळल्या...
"मिने, काय बोलतेय तू?"
"हो अण्णा, खरं तेच बोलतेय. अण्णा, माझ्यावर मारेकरी घातलेत या नालायकांनी. अण्णा, मी आत्महत्या करणार होते यांच्यामुळे. त्यादिवशी ह्या सोनीची गाडी खराब झाली, हा मोहन नसता ना, मी डोळ्याला दिसले नसते. अण्णा याने मला काल वाचवलं, आणि त्यादिवशीही..."
"अण्णा, मला हा लक्ष्मी म्हणून नाही, रखेल म्हणून नेणार होता..."
"ये मिने," शामराव उखडले... "बस झालं तुझं. ड्रायव्हर बरोबर लफडेबाजी करताना लाज नाही वाटत का? अण्णा, तुझ्या घराण्याची इज्जत काल या मोहनसोबत पळून गेली होती. कळतंय का? काळ रात्री या मोहनने, सर्वेशला बेदम मारलं. भेदरला बिचारा पोरगा. मारून टाकायची धमकी दिली या मोहनने त्याला. आणि माझ्यावर आरोप लावताय?"
"मोहन," अण्णा मोहनकडे वळून म्हणाले, "दादा बोलतोय तो एकही शब्द खोटा नाही ना?
"अण्णा, काल रात्री आम्ही दोन्ही पळून गेलो हे खरंय, पण आमच्यासोबत तिसरीही व्यक्ती होती... सोनी..."
अण्णांनी सोनीकडे बघितलं. "सोने, माझं डोकं फुटेन आता, बोल काहीतरी."
"मी काय बोलू अण्णा," सोनी गडबडून म्हणाली.
"मी सांगतो अण्णा, काल रात्री काय घडलं ते. या नालायक माणसाने मिनेताईना धमकावून पुलाजवळ बोलावलं. सोबत सोनीला आणायची गळ घातली. हा नराधम काय करेल, याचा काही नेम नव्हता. वेळ आणीबाणीची होती, काळजाचं पाणी पाणी होत होतं. प्रसंग बाका म्हणून त्यांनी मला नेलं, तर शामरावानी ते बघितलं. आणि पुढचं महाभारत घडलं."
"ये मोहन, काहीही खोट बोलू नको..."शामराव म्हणाले.
"दादा, बस झालं. सोनी, मोहन सांगतोय ते खरंय?"
"हो अण्णा, सोनी मान हलवून म्हणाली."
"बस्स," अण्णा डोळ्यातून अक्षरशः अंगार फेकत म्हणाले.
"फेका या सगळ्यांना बाहेर, हा काक्या, सरव्या... एकही घरात दिसायला नको..."
--------------------------------------------------
कृष्णराव स्टेशनवर उभे होते, अजून गाडी आली नव्हती.
एक भिकारी भीक मागत आला
"हे पाचशे रुपये घे, जा, नवीन कपडे घे." कृष्णराव खिशातून अंबाने दिलेले पाचशे रुपये काढत म्हणाले.
"साहेब, किती मोठं मन तुमचं... एवढी भीक? तुमचे पुत्र, पौत्र, भाऊ, बहीण सगळे सुखी राहो. भिकारी आशीर्वाद देत म्हणाला."
'वा,' कृष्णराव स्वतःशीच म्हणाले.
"ओ, बाबा, चलायचं नाही का?" मागून एक बाई आवाज देत म्हणाली.
साधारणतः साडेपाच फूट उंची, सडपातळ बांधा, लांब नाक, गोरा रंग, तेजस्वी डोळे!
"बाई कोण तुम्ही."
"अण्णाची बहीण, मलाच घ्यायला आलात ना?"
"अरे हो, पण तुम्हाला कस कळलं?"
"हातातलं गाडीच कीचेन आहे ना, ते सोन्याचं आहे. सप्तशृंगीच! अण्णा विश्वासानेच ही चावी देतो. चला." ती बाई हसत म्हणाली.
"चला," कृष्णराव सामान उचलून गाडीकडे चालू लागले.
"बाई, कुठून आल्यात म्हणायचं." कृष्णरावानी गाडी चालवत विचारलं.
"अहो काही ठावठिकाणा नाही माझा. जिथे लोकांना गरज असेल, तिथे मी असते. मूळ गाव कागल."
"वा, जवळच आहे इथून."
"हो."
"पण समाजसेवा लई अवघड काम बघा, घरदाराकडे, पोराबाळाकडे लक्षच देता येत नाही. "
"अहो माझं लग्नच झालं नाही.."
"अर्रर्रर्रर्र... माफी..."
ती बाई फक्त हसली.
रस्ताभर गप्पागोष्टी चालल्या होत्या.
वाडा आला, ती बाई उतरली, कृष्णरावानी सामान उतरवलं.
"बाई, चला. पण तुमचं नावच सांगितलं नाही तुम्ही."
आणि पुढचं वाक्य ऐकताच कृष्णराव धक्क्याने कोसळायाचेच बाकी राहिले....
"माझं नाव, आनंदी....."

टिपा:
इलाया नीला
https://youtu.be/uJcPX9xgIkY

तारे गिन गिन
https://youtu.be/yN21C972fsE

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धे आधी वाच तरी...
आणि सलमान नाही, अज्ञातवासी... नाम तो सुनाही होगा Wink
कसा झालाय हा भाग? माझ्या मनासारखा जमलाय...

मोहन मागच्या पाऊलानी चालत सोनीकडे बघत म्हणाला. >>> म्हणजे मोहन माणूस नाहीये? तो चतुष्पाद / बहुपाद प्राणी आहे ? Wink

@माधव - प्रतिसादासाठी धन्यवाद. कुणा व्यक्तीकडे बघत मागे चालत जाण, त्याला आमच्याकडे मागच्या पावलांनी चालणं म्हणतात. बऱ्याच चित्रपटांमध्ये हे रोमँटिक जेस्चर म्हणून वापरतात.
Happy
कोटी आवडली...