मला काहीच आठवत नाहीये भाग ५ - प्रवास!

Submitted by अज्ञातवासी on 11 April, 2019 - 05:01

भाग ४
https://www.maayboli.com/node/68539

मी वरच्या मजल्यावर होते.
रेडियोवर मंद स्वरात कुठलीतरी गझल चालू होती.
दारावर टकटक झाली, आणि त्याने विचारले, "आत येऊ का?"
माझी पुन्हा नेहमीसारखीच अवस्था झाली. मी फक्त 'हं' म्हणू शकले.
तो आतमध्ये आला. त्याने माझ्यापुढचा स्टूल ओढला व त्यावर बसला.
क्षणभर रुममध्ये विचित्र शांतता पसरली.
"रेडियोचा आवाज वाढवता का?" त्याने शांततेचा भंग केला.
मी आवाज वाढवला.
तो गझलेला मनसोक्त दाद देत होता. तिच्या स्वरांबरोबर भावनाविवश होत होता!
गझल संपली आणि त्याने दोन्ही हात जोडले.
"गुलाम साब. माझे गुरु...या दगडाला आकार देणारा देवदूत."
एवढेच शब्द बोलून तो पुन्हा थांबला. पुन्हा एक विचित्र शांतता पसरली.
"तुमची तब्येत कशी आहे आता?"
"ठीक आहे."
"मला कसं बोलणं सुरु करावं कळत नाहीये, पण..." तो घुटमळला.
"पण काय?"
"तुमच्या शेवटच्या आठवणींचा आणि माझा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं."
"म्हणजे?"
"जेव्हापासून मला कळायला लागलंय, तेव्हापासून मी एकच स्वप्न सतत बघतोय."
"कोणतं स्वप्न."
"ट्रेन एका बोगद्यात शिरते. मिट्ट काळोख येतो... आणि मी..."
"आणि काय?"
"मी दचकून जागा होतो. या स्वप्नाच्या पुढे मी गेलेलो नाही."
"कसं शक्य आहे?"
"मला माहीत नाही, आणि याच गोष्टीसाठी मला तुमची गरज आहे."
"मी काय करू शकेन?"
"माझं स्वप्न आणि तुम्हाला आठवत असलेलं सत्य, हे एकच आहे. जर तुम्ही मनावर जोर दिलात, तर तुम्हाला पुढचं काहीतरी आठवू शकत, आणि तुम्हाला आठवत नसेल, तर मला काहीतरी आठवतंय..."
"काय?"
"त्या बोगद्याच्या आत शिरताना दिसणारा फलक... प्रशिक्रापूर."
प्रशिक्रापूर हे नाव ऐकताच माझं मस्तक भंजाळून उठलं.
"अशा नावाचं जगात कुठलंही गाव नाहीये, पण तुम्हाला या गावाविषयी काही आठवतंय का?"
प्रशिक्रापूर नाव ऐकताच माझ्या डोक्यात अस्पष्ट आकृत्या थैमान घालू लागल्या.
"मला काहीतरी आठवतंय," मी कशीबशी म्हणाले.
"काय आठवतंय...सांगा ना काय आठवतंय?" तो अधीर होत म्हणाला.
डोक्यात चाललेला कोलाहल सहन न होऊन मी जोरात किंचाळले...
आणि आई-बाबा धावत वर आले.
-----------------------------------
आम्ही सर्व जेवणाच्या टेबलवर बसलो होतो.
आईने जेवणाची ताटे आणून ठेवली.
बाबानी बोलण्यास सुरुवात केली.
"माझ्या माहितीप्रमाणे प्रशिक्रापूर नावाचं एकही गाव नाही. पण एखाद्या गावाचं जुनं नाव असू शकत.
"म्हणजे?" तो म्हणाला
"अरे कालानुरूप गावांची नावे बदलत जातात, तसेच एखाद्या गावाचं नाव बदललं असेल, तर?"
"हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही." तो उत्सुकतेने म्हणाला.
"मालती. उद्याच आपण अभ्यंकरांकडे जाऊ... त्याला माहिती असेल."
केशव चिंतामणराव अभ्यंकर...दारावर एक सुरेख नक्षीकाम असलेली पाटी होती.
एक माणूस अदबीने येऊन दार उघडून गेला. आम्ही मऊमऊ सोफ्यावर बसलो.
या घरात अनेक वस्तू होत्या. सगळ्या अत्यंत जुन्या... मी एका पांढऱ्या वास्तूला हात लावणार तेवढ्यात...
"हात लावू नकोस, विषारी आहे." कुठूनतरी आवाज आला.
अभ्यंकर पूर्ण सुटाबुटात माझ्या दिशेने येत होते.
"जगातल्या सगळ्यात विषारी प्राण्याचा दात. या दाताला स्पर्श जरी झाला, तरी माणूस तडफडून मरतो."
मी प्रचंड घाबरले.
"बोल रे, काय काम काढलंस?" ते बाबांकडे बघत म्हणाले.
"केशव, प्रशिक्रापूर नावाच्या गावाविषयी माहिती हवी होती."
अभ्यंकर चपापले.
"बऱ्याच दिवसानंतर हे नाव ऐकतोय, कुठून ऐकलंस हे नाव?"
बाबानी सगळी कथा सांगितली.
अभ्यंकर उठले, आणि त्यांनी एक लाकडी कपाट उघडलं.
त्यातून त्यांनी एक जुनाट नकाशा बाहेर काढला.
"हे बघ. हे आपलं गाव. गावापासून हि लाल रेषा जातेय बघ... आणि लांबवर संपते."
"अरे हे तर चिखलकुवा."
"पूर्वीच प्रशिक्रापूर. जिथे कैद्यांचा शिरच्छेद केला जात असे. आजही तिथे निरनिराळे भासमान आवाज ऐकू येतात. खास प्रेत वाहण्यासाठी तिथे एक ट्रेन दररोज जायची. कालांतराने ती प्रथा बंद केली. ज्या बोगद्याच्या तू उल्लेख करतोय, तो म्हणजे चिखलकुवा आणि पलादिला जोडणारा बोगदा!"
"दहा वर्ष तरी झाले असतील ना मालती, आपण चिखलकुवाला गेलो नाहीये?"
"पलादि मार्गेच तुला चिखलकुवा गाठावं लागेल."
"मला काहीतरी वेगळं वाटतंय." जमदग्नी मध्येच म्हणाला.
"काय?"
"हा प्रवास काहीतरी उत्तर देईन."
"म्हणजे?"
"आमहाला दोघांनाही माहित नाही, कि त्या प्रवासाच्या आधी काय घडलंय, जर आम्ही तोच प्रवास उलट केला तर..."
सगळे अवाक झाले...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच!
कित्ती दिवसांनी आला हा भाग!
पु भा प्र
Happy

घाईघाइत लिहिल्यासारखा झालाय हा भाग.
पॅराग्राफ मधे लिहा. एकेक वाक्य सुटी लिहिल्याने तेवढा इम्पॅक्ट नाही येते.
अभ्यंकरांकडे जाउ म्हणल्यावर लगेच दुसर्‍या ओळीत अभ्यंकरांकडॅ गेलेत. इथे पॅरा किंवा स्पेस हवा.
हे मा वै म
मी कथा सुरुवातीपासुनच वाचत आहे. आवडतेय. पण दोनभागांमधे जास्त वेळ घेता त्यामुळे लिंक तुटते.

दोनभागांमधे जास्त वेळ घेता त्यामुळे लिंक तुटते. +!११११
हे पाप (क्रमश कथा) मीही करते, त्यामुळे आधी बोलले नाही Proud

चांगले चालुय कथानक.

> दोनभागांमधे जास्त वेळ घेता त्यामुळे लिंक तुटते. > +१. यावर उपाय आहे कि सगळी कथा लेखकाने लिहून तयार ठेवावी आणि दर आठवड्याला एकेक भाग इथे टाकावा. कथा पूर्ण तयार असली तरी एकच भलामोठा धागा काढू नये. जास्त लांबी असेल तर लोक शक्यतो वाचत नाहीत.

सर्व प्रतिसादकांचे आभार.
या भागाला खूप वेळ लागला, आणि छोटाही झाला, त्याबद्दल माफी असावी. मी मोबाईलवर टाईप करत असल्यामुळे टाइपिंगला वेळ लागतो,आणि मध्यंतरी जर बिजी होतो. हाही भाग बसमध्येच टाईप करून पोस्ट केला.
अमी माझ्या कुठल्याही कथेचा पुढचा भाग माझ्या डोक्यात नसतो. जसजसा आठवलं तसतसा लिहीत जातो. हीसुद्धा संपूर्ण कथा माझ्या डोक्यात नाहीये. शेवट काय होईल, हेसुद्धा मी अजून ठरवलेलं नाही, मग आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार Wink
पुढचा भाग नक्की मोठा आणि सविस्तर टाकेन. Stay Tuned!

माझ्या कुठल्याही कथेचा पुढचा भाग माझ्या डोक्यात नसतो. जसजसा आठवलं तसतसा लिहीत जातो. हीसुद्धा संपूर्ण कथा माझ्या डोक्यात नाहीये. शेवट काय होईल, हेसुद्धा मी अजून ठरवलेलं नाही, मग आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार>>> ये तो झीमराठी के सिरीयल्स का फंडा है

Nice..

खूप भारी... उत्सुकता लागून राहिली खूप पुढचा भाग लवकर लिहा त्याशिवाय काही करमणार नाही बुवा Happy
कथा वाचून मूड अगदी चांगला झाला.

धन्यवाद शुभांगी...
तुमचा प्रतिसाद वाचूनच मूड चांगला झाला Happy

Khup Chan... Kytri interesting start zalay... Jra lvkr take pudhcha bhag... Vel kadhun...