देशपांडे बाई

Submitted by jayshree deshku... on 6 April, 2019 - 06:53

रेखाचा आज ऑफिसचा शेवटचा दिवस होता. रेखा देशपांडे आज सेवानिवृत्त होत होती.तिच्या बरोबर आणखी चार जण सेवानिवृत्तहोत होते. ऑफिस तर्फे या सर्वांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम योजिला गेला होता.गीता सूत्रसंचालन करणार होती.त्यामुळे साहजिकच ती रेखाला विचारत होती,
“ तुझ्यासाठी कोणी बोलणार आहे का? असेल तर सांग म्हणजे कार्यक्रमात नाव घेता येईल “. गीताच्या प्रश्नातली खोच रेखाच्या लक्क्षात आली. तरीही तितक्याच सहजतेने हसत हसत रेखा म्हणाली , “ अर्थातच नाही.” तेवढ्यात मागच्या लाईनीतून कुणीतरी कुजबुजल,
“बोलणार नाहीत कुणी पण उद्या सत्यनारायण घालणार आहेत.” आणि मग हशा पिकला. गीताही तिथून हसत हसत निघून गेली.
कार्यक्रम सुरु झाला. एकेकाची भाषणे होत होती. निवृत्त होणाऱ्या व्यक्तीवर स्तुतिसुमने उधळली जात होती. रेखाचे तिकडे बिलकुल लक्ष नव्हते. ती मनातल्या मनात म्हणत होती,
“ मला थोडीच स्तुतिसुमनांची अपेक्षा आहे? अशी स्तुतिसुमने उधळून घेण्यासाठी करावी लागणारी तपस्या मी आयुष्यात कधीच केली नाही. आणि पुढेही करणार नाही. मला मस्त आयुष्य एन्जॉय करायला आवडत. मी नोकरी एन्जॉय केली, संसार एन्जॉय केला. हवी ती सारी सुख भरभरून उपभोगली. काही वेळा ओरबाडून पण सुख मिळवली. मी तृप्त आहे, मी खुश आहे माझ्या आयुष्यावर. मला जगाची,माझ्या मागे होत असणाऱ्या माझ्या निंदा-नालस्तीची पर्वा नाही. आयुष्यात खस्ता खाणाऱ्या माणसांबद्दल तरी कुठे जग चांगल बोलत? पाठीमागे त्याची टिंगल टवाळीच तर होते. माझी कुणी तोंडावर करत असेल म्हणून कुठ बिघडल? हवा तो आनंद घेण्यासाठी मी आयुष्यात चक्क निर्लज्ज बनले. कुणी काहीही म्हणो मी सुखी आहे. जळतात माझ्यावर सगळे, खुशाल जळा.”
रेखा शांत बसून आपलं गात आयुष्य आठवत राहिली. तिला आयुष्यातले तिच्या दृष्टीने आनंदाचे असे, मग लोकांच्या दृष्टीने ते आसुरी आनंदाचे का असेना ते क्षण, त्या आठवणी आठवत रहायला त्यात रमायला आणि पुन:श्च तो अनुभव घ्यायला आवडत.
आपल्याला मिळालेली ही रेल्वेतली नोकरी तेही एक गुपितच आहे. जे फक्त मलाच माहित आहे. तोही मी रेवावर उगवलेला एक सूड. बारावी पास अशा मला मिळालेली ही नोकरी, आयुष्यातली एक लॉटरीच. रेवा माझी जुळी बहिण. दोघी आम्ही दिसायला सारख्याच पण सर्वांच्या मते ती गुणी, सालस पोर आणि मी त्या विरुद्ध आगाऊ स्वार्थी म्हणे! हो करत गेले मी स्वार्थीपणा. आम्हा दोघींची सारखी तुलना व्हायची. सगळे जण रेवाचे कौतुक करायचे. आई मला रेवासारखे वागावे असं समजावत जायची, पण माझी रडारड नको म्हणून शेवटी माझ्या मनासारखे करायची. दुकानात कपडे घ्यायला गेल की आई प्रथम माझ्या आवडीचा ड्रेस मला घ्यायची. आणि रेवाला म्हणायची, “ माझी शहाणी बाई तू , हा पण ड्रेस छान दिसतो आहे, हा घे तुला.” आणि रेवा गरीबासारखी लगेच मन डोलवायची. मला मुळीच कुणी कधी गरीब म्हणलेलं आवडणार नाही. माझ्या मते, “ज्याला दबवता येत आणि ज्याच्या पासून स्वार्थ साधता येतो तो गरीब.” मला चुकून जरी कोणी गरीब म्हणल कि मी लगेचच सावध होऊन स्वत:ला चाचपून बघत असते; कोणी मला लुबाडण्याच्या प्रयत्नात तर नाही ना?
काय झाल शेवटी रेवा हुशार असून सुद्धा एका खाजगी बँकेतच नोकरीला लागली. नंतर तिचे मुख्य व्यवस्थापकच्या पोस्टला पोस्टिंग झाले म्हणा पण खडतर प्रवास करतच ना! मी सरकारी नोकरीत आरामात आयुष्य काढल. आणि नोकरी पण आरामातच मिळवली की! रेल्वेच्या लेखी परीक्षेच्या वेळी मी आणि रेवा दोघी परीक्षेला बसलो. मी चालबाजी करून रेवाचा रोल. नं. माझ्या पेपरवर शेवटी टाकला.आणि माझ्या हवेत मारलेल्या गोळीचा नेम अगदी बरोबर बसला. पेपर रेवाने चांगला लिहिला आणि सिलेक्शन माझे झाले. रेवाला आणि आईला थोडा संशय आला, पण करणार काय दोघी ? बाबांनी कौतुकाने माझीच पाठ थोपटली. मला हुशार नवरा हवा अशी रेवाप्रमाणे बावळट स्वप्न मी नाही पाहिली. मी दिसायला स्मार्ट आणि श्रीमंत नवरा पटकवला. रेवा बावळट शून्यातून सुरुवात करून अजूनही सेटच होत आहे. हे सार बाई मनाशीच बोलण हं ! घरी आई समोर, लोकांसमोर आपल्या दैवाच्या गोष्टीवर चर्चा करायची. आपल्या बोलण्याने लोकांवर छाप पाडण्याची आणि समोरच्याला गप्पगार करण्याची कला मला चांगलीच अवगत आहे. आपली कृती लोकांच्या फार उशीरा लक्षात येते. त्याआधी आपल्या बोलण्याने आपले काम होऊन गेलेले असते. बाबांनी एक गोष्ट आयुष्यात चांगली केली, आम्हां मुलींना इंग्लिश मिडियमला घातले. त्यामुळे माझा फायदा झाला. आधीच बोलून सर्व गोष्टी साध्य करणाऱ्या मला लोकांच्या तोंडावर इंग्लिश वाक्ये फेकता येत गेली आणि बाजी मारता येत गेली.
रेल्वेत माझ पाहिलं पोस्टिंग झाल ते गाड्यांच तिमे schedule करणाऱ्या सेक्शनमध्ये. किती महत्वाचा विभाग तो. पाहिलं वर्षभर मी सेक्शनला नवीन आहे म्हणत मी कामचुकारपणा करत गेले. बरोबरच्या लोकांनी बनवलेली register मोठेपणा घेऊन साहेबांच्या केबिनमध्ये जायची. इंग्लिशमध्ये साहेबांशी बोलायची. मला कामाच किती महत्व वाटते ते त्यांना पटवून द्यायची. साहेब खुश व्हायचे. प्रथम साहेबांनी खुश होऊन मला जबाबदारीच टेबल दिल. पण मग मात्र माझी तंतरली. मग मी तिथल्या एका सिनीअर क्लार्कला हाताशी धरून त्याच्याकडून काम करवून घेत गेले. तरी गाड्यांच्या टाईम टेबलमध्ये एकदा झोल झाला, त्यामुळे लोकलचा होणारा accident थोडक्यात वाचला. माझ्याकडून ते टेबल काढून घेण्यात आल आणि बोलण चांगल म्हणून announcementला टाकल. मला ते आजिबात आवडल नव्हत. किती अलर्ट रहाव लागायचं. मी तिथून भांडण करून बाहेर पडले. नेमक त्यावेळी पे सेक्शनचा एक क्लार्क retired झालेला, मला तिथं टाकल गेलं. सेक्शन मधल्या लोकांची मदत घेऊनसुद्धा मला माझ काम उरकत नव्हत. म्हणजे मी ते इतरांवर ढकलायचं बघत होते. आणि जे मी करायची त्यात भारंभार चुका. लोकांचे पगार चुकीचे निघू लागले. माझ्या नावाने बोंबाबोंब सुरु झाली. अशावेळी मीच इतर सेक्शनच्या बायकांशी मैत्री केली आणि उलटी बोंब सिनीअर क्लार्कच्या नावाने मारायला सुरुवात केली. आणि मलाच उलटी सहानुभूती मिळाली. नंतर बदली झाली लिव्ह सेक्शनला. सुरुवातीला सगळीकडेच मी मला कामात केवढा इंटरेस्ट आहे हे लोकांना दाखवायची. मन लाऊन नवीन गोष्टी शिकून घेण्याच नाटक करायची. आणि जबाबदारी अंगावर पडते म्हणल कि हळूच अंग काढून घ्यायला करून
सासरी तेच केल मी. मोठा बंगला पाहून नवरा गटवला. सासूबाईंना बिचाऱ्यांना वाटायचं दोन मुल आहेत. जागा मोठी आहे. दोन्ही मुल आणि सुना आपल्या बरोबरच नांदावी. मी मोठी सून, माझी जाऊ धाकटी. मला एक मुलगा आणि मुलगी. तर जावेने एका मुलीवरच ऑपरेशन करून घेतले. बी.कॉम झालेली पण मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून नोकरी केलीच नाही. राहिली हाउसवाईफ होऊन घरात. बावळट कुठली! पण बर झाल बाई माझ फावल ना! बिचारी! स्व:ताच्या मुलीबरोबर माझ्या मुलाचं पण सगळ आवरायची.सगळ्या मुलांचा नाश्ता, डबे सगळ्याचं सगळ्याचं व्यवस्थित बघायची. स्व:ताच्या मुलीबरोबर माझ्या मुलांना पण बऱ्याचदा कपडे आणायची. पण मी अशी ही खंबीर! माझ्या लेकाच्या मुंजीतच तिला आणि तिच्या मुलीला काय ते कपडे केले. आणि तुझ्याशिवाय काही जमणार नाही बाई असं म्हणत तिला वेडीला हरबरयाच्या झाडावर चढवल. आणि मुंजीच काम उरकून घेतल. लेकाच्या मुंजी नंतर सासूबाईचा पाय fracture झाला. त्यावेळी तर मी मज्जाच केली. वेड पांघरून पेडगावला गेले. म्हणल, “ मला ना ऑफिस घरापासून लांब पडत आहे. खूप त्रास होतो. मी आणि हे आम्ही दोघ बाई ऑफिसपाशी flat घेऊन राहू. मूल राहू देत तुझ्याजवळ, कारण त्यांना इथून शाळा जवळ पडते ना! आणि तसही मला नाही बाई बंगल्याच कौतुक.” अशी मखमालीशी करत सेपरेट रहायला सुरुवात केली. मग जावेने अखेर सासू-सासर्यांची जबाबदारी घेतलीच. त्याबरोबर घरातले सणवार आहेर उपाचर सार बघत राहिली. त्यातपण मी आईच्या घराजवळ flat पहिला. मग काय सकाळी आरामात उठायला सुरुवात केली. ऑफिसची वेळ झाली की नवरा आम्हा दोघांचे डबे आईकडून घेऊन येऊ लागला. माझी चांगली सोय झाली. बंगला नीटनेटका ठेवायचं काम जाऊ बघायची, पण आता माझा flat बाई कोण आवरून देणार? मी सगळा पसारा टाकून तसेच ताणून द्यायला सुरुवात केली. कोचावर, दिवाणावर कपड्यांचे ढीग तसेच असायचे. डायनिंग टेबल आणि ओटा घरातल्या आणि बाजारातून घरात आलेल्या सामानानी अस्ताव्यस्त पसरलेलं असायचं. सुरुवातीला नौरोबाने चीड चीड करून पाहिलं, या पसाऱ्यात एकही गोष्ट नीट सापडेल तर शपथ असं म्हणायचा. पण नंतर झकात सामान आवरायला सुरुवात केली. त्याला हव असेल तर तो कधी नाश्ता बनवायचा मग मी पण खायची त्याने बनवलेले. नाही तर माझे काय , मला ऑफिसमध्ये माझे लाड करणाऱ्या कॅटीनच्या मावशी होत्याच. मी त्याचं रोजच गिऱ्हाईक म्हणून मला रोज आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीचा मेनू विचारून त्याप्रमाणे त्या बनवायच्या. सकाळी ऑफिसला पोहचल की टेबलवर गरमागरम नाश्ता लगेच यायचा.
माझ्या ऑफिसच्या सख्या बिचाऱ्या धवत धावत ऑफिसची वेळ गाठायच्या. घरातून येताना उभ्या उभ्या नाश्ता करून यायच्या किंवा डब्यात भरून नाश्ता आणायच्या आणि ऑफिसच्या कामाला सुरुवात करून मग हळूच डबा बाहेर काढायच्या, आणि ऑफिस स्टाफची नजर चुकवत अपराध्या सारखं नाश्ता उरकायच्या. मी मात्र समोर साहेब येऊ नाहीतर चपरासी नाहीतर कोणी कस्टमर येऊ राजरोसपणे गरम नाश्त्यावर ताव मारायची, आणि म्हणायची सुद्धा,
“सारे कष्ट बाई पोटासाठी करायचे मग व्यवस्थित खाणे-पिणे व्हायला नको का?” असं म्हणत नाश्त्याबरोबर कपभर चहा पण जिरवायची. मग हळूच टेबलवरच्या फाईलीत डोक खुपसायचं नाटक सुरु व्हायचं. त्यातच रिझर्वेशन सेक्शनकडे जाताना चुकलेला एखादा माणूस आमच्या सेक्शनकडे येऊन धडकायचा. त्याच मनोरंजन करण्यासाठी पाहिली मी त्याला सामोरी जायची. लोकांना योग्य माहिती बरोबर नको ती माहिती देण्यात माझा हातखंडा. महिनाभरात लोकांना माझ्या कामाचा अंदाज यायचा. त्यामुळे माझ्या कामाची लोकांकडून तारीफ मी कधीच अपेक्षित केली नाही. पण नव्या माणसावर माझ असं काही इंम्प्रेशन पडायचं कि, त्याला वाटायचं ह्या ऑफिसमध्ये सगळ्यात कामसू आणि हुशार मीच आहे. माझ्यामुळेच ऑफिस चालू आहे. माझ्या डोक्यात नेहमी माझ्या मतलाबाचा हिशेब असतोच. त्यामुळे मी भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या आगाऊ चौकश्या करत असते. बोलता बोलता मतलबाची एखादी किल्ली मिळून जाते. एकदा एका माणसाला रीझर्वेशन सेक्शनला नेऊन सोडलं तर त्याने त्याच्या जवळचे भारी पेन मला देऊ केले. एकद एका जेष्ठ नागरिकाला रांगेत उभे न करता तिकीट मिळवून दिले, त्याने पुढच्या वेळी येताना आठवणीने माझ्यासाठी एक किलो सफरचंद आणि चिक्कू आणले. सारा ऑफिस स्टाफ माझ्याकडे आ वासून बघत राहिला. भारी मजा आली मला तेव्हा.
ऑफिस मध्ये होणारे हळदी-कुंकू, पार्ट्या, सहली या सगळ्या गोष्टीत पहिला सहभाग माझा असायचा. या साठी लागणार नियोजन, मेहनत मी कधीच केली नाही. पण फोटो काढले जाताना सगळ्यात पुढे फोटोमध्ये मीच असायची. कार्यक्रमच्या फोटो मध्ये माझी विजयी मुद्रा पाहून सगळ्या बायकांचे चेहेरे असे काही पडायचे कि बस, ते पाहून मला आनंदाने गुदगुल्या व्हायच्या. ऑफिसमधल्या कोणाच्याही गुप्त गु गप्पांमध्ये मी जातीने हजार असायची. सगळ्या स्टाफच्या खाजगी खबरी मला माहित असायच्या. नंतर नंतर मला पाहिलं कि बायकांच्या चर्चा लगेच थांबायच्या. विषय बदलले जायचे, असं असल तरी नंतर बातम्या माझ्यापर्यंत पोह्चायच्याच . माझे खबरी प्रत्येक सेक्शन मध्ये असायचेच.
कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे एकदा माझ्या टेबलवरचा फायलींचा गठ्ठा वाढत गेला.१००-१२५ लिव्ह केसेस सेटल करून लिव्ह मेमो तयार करायचे होते. मला दबावाचे फोन यायला लागले. पण मी या गोष्टीला थोडीच भिक घालणार? मी चांगली महिनाभर मेडिकल टाकून मोकळी झाले. आणि गुपचूप चारी धाम यात्रा करून आले. कामावर रुजू झाल्यावर बघते तो सगळ टेबल खाली झाल होत. टेबलवर फक्त दोन फायली होत्या. माझ काम सगळ्या स्टाफ मध्ये वाटून दिल होत. माझा चेहरा आनंदाने फुलला होता, पण बाकी स्टाफ माझ्याकडे मारक्या म्हशिसारखा पहात होता. म्हणल, “खुशाल पहा, अंगावर याल तर शिंग मोडून हातात देईन.” कॅन्टीनच्या मावशीना फोन केला. गरम मेदू वडा सांभारच्या दोन प्लेट मागवल्या आणि नेहमीप्रमाणे वर कपभर चहा पण रिचवला. दिवस मजेत आणि शांततेत गेला. ऑफिस संपताना दुपारून फोन आला. टेबलवरच्या दोन फायली पैकी एक आमच्या ऑफिसरची फाईल होती, आणि एक प्यूनची होती. थंडपणे फोनवर म्हणल, “ सर उद्या आले कि सकाळी तुमची लिव्ह केस सेटल करते.” कधी नव्हे ते मला मनातून थोडी शरम वाटली. म्हणल, उद्या ह्या दोन फायलींच काम करून टाकूया. दुसरे दिवशी ऑफिसमध्ये आल्यावर मन लावून लिव्ह केसेस सेटल केल्या. लिव्ह मेमो त्या केले, आणि पाठवून दिले. दोन-तीन दिवसांनी आमच्या साहेबांनी मला केबिन मध्ये बोलावले. ऑफिसमध्ये फक्त त्यांच्याच मनात माझ्या बद्दल थोडा soft कॉर्नर होता. त्यांच्या बरोबर बर्याच वेळा मी चहा घेतला होता, तेही इतर ऑफिस स्टाफच्या खवचट नजरेकडे दुर्लक्ष करत, अगदी बिनधास्तपणे. मी केबिनमध्ये गेले. साहेब कुत्सित स्वरात बोलले,
“या देशपांडे madam या, बरोबर आरतीच तबक नाही का आणायचं? किती काम करता तुम्ही. एकदा आरती उतरवून टाकूच या !”
काही तरी गडबड झाल्याच माझ्या लक्षात आलं. पण मी गुपचूप उभी राहिले. मग मला समजल, त्या दोन लिव्ह केसेस मी सेटल केल्या पण साहेबांच्या लिव्ह मेमोवर प्युनच नाव आणि प्युनच्या लिव्ह मेमोवर साहेबांच नाव टाकल गेलं होत. त्यामुळे साहेबांची ३०० दिवसांची शिल्लक राजा प्युनच्या नावावर पडली आणि प्यूनची ५२ दिवसांची साहेबांच्या नावावर. साध्या दोन लिव्ह केसेस सुद्धा नीट सेटल न करता आल्यामुळे मलाच एक खरमरीत मेमो मिळाला होता. आणि बरोबर हातात बदलीची ऑर्डर सुद्धा होती.पार्सल सेक्शनला माझी बदली झाली होती. लिव्ह सेक्शन मध्ये अर्थातच माझा निरोप समारंभ झाला नाही. ऑफिसमधून मी संध्याकाळी बाहेर पडताना माझ्याशी कोणी अवाक्षर सुद्धा बोललं नाही. मला माहित होत मी ऑफिस बाहेर पडल्यावर सगळ्या बायका फिदीफिदी हसल्या असणार. बर झाल पाठीला डोळे नसतात ते.
पार्सल ऑफिस सासरच्या घरापासून जवळ होत. त्यामुळे नाईलाजाने मला परत बंगल्यात रहावयास यावे लागले. पण सासूबाई आणि जाऊ यांचे हुप्प चेहेरे काही न बोलताच म्हणत होते, “ आली का ब्याद पुन्हा?” सासूबाई त्यांच्या लेकाला म्हणाल्या सुद्धा, “ तुझ्या बायकोला इथ नांदवण्यापेक्षा तुझ्या दोन्ही मुलाचं संगोपन सोप वाटत रे” तेही माझ्या अपोरक्ष , माझ्या तोंडावर बोलायची घरात कुणाचीच हिम्मत नाही. जाऊ सासूबाईंना म्हणत होती,
“ मुलांना चांगली शिस्त लावली होती, आता पुन्हा बिघडतील ती.”
नवऱ्याने मला कोपरापासून दंडवत घालत विनवले, “ बाई ग तू कशीही वाग पण आपल्या मुलांचं शिस्तीत चाललेलं रुटीन बिघडवू नको स.” मी हो म्हणल कारण त्यातही माझा फायदा होता. मूल आता कॉलेजला जायला लागली होती. तसही आता माझ काही ती ऐकणार नव्हती. त्यांना घरातली बाहेरची काम शिस्तीत करण्याची सवय लागली होती. त्याचं वळण बिघडवून माझाच तोटा झाला असता. माझी काम वाढली असती. मूल मला शिस्त लावू पहात होती. पण मी थोडीच जुमानणार होते? एकदाच मी त्यांना ठणकावून सांगितलं,
“ आयुष्यात आता तुम्हाला पुढ जायचं आहे तेव्हा तुम्ही काय ते सुधारायचं, मला सुधरवायचा प्रयत्न करायचा नाही!”
पार्सल सेक्शनला पण साध्या पार्सलच्या एन्ट्रीमध्ये सुद्धा माझ्या चुका होत्या. मला कामाला लावण्याचा आणि माझ्याकडून काम करवून घेण्याचा साऱ्या ऑफिसने शर्थीने प्रयत्न केला. पण शेवटी हात टेकले. माझ्या कामातल्या चुकांची सुधारणा करण्यापेक्षा मला काम न सांगितलेलं बर ह्या निर्णयाशी येऊन साहेब थांबले. पार्सल ऑफिसला दोन वर्ष मला काहीही काम न देता बसवून ठेवण्यात आले. मी पण तेवढीच निर्ल्लज. रोज ऑफिसला यायचं, सही करायची. दिवसभर चकाट्या पिटायच्या आणि ऑफिसची वेळ संपली की घरी जायचं. हो पण त्यात एक राहीलच, मी फोन मात्र अटेंड करायचं काम करायची. त्यामुळे ऑफिस बाबतच्या माझ्या आवांतर ज्ञानात भर पडायची. मला तरी काय तेच हवे होते ना! ऑफिस मध्ये नंतर कॉम्पुटर आले. माझ्या टाईम पासचे साधन झाले. मी कॉम्पुटरचे गेम शिकून घेतले. आणि खेळायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये सगळे खालपासून वरपर्यंत माझ्या नावाने बोट मोडत राहिली. ‘ फुकट पगार खाती ही बाई.’ असं म्हणत राहिली. पण मला कामावरून काढून टाकण्याच धाडस कुणी केल नाही. पार्सल सेक्शन मध्ये पहिले साहेब बदलून नवे साहेब आले. मग मात्र त्यांनी मला कामाला लावले. म्हणाले, “ आपले प्यून हुशार आहेत ते तुमच पार्सल एन्ट्रीच काम कॉम्पुटर वर करतील तुम्ही त्याचं काम करा. पार्सलवर रोजच्या डेटचा stamp मारत जा. मीही ती गोष्ट मनावर घेतली नाही. आजतागायत पार्सल वर stamp मारत राहिले.
आयुष्यात नशिबाने माझे काहीच अडले नाही. नोकरी पार पडली. संसारही छान झाला. मुलगी आर्किटेक झाली. मुलगा सिव्हील इंजिनिअर झाला. दोघेही आता त्यांच्या संसारात रममाण झालेली आहेत. लग्नकार्य अर्थातच जावेने ओढून काढले. मी सुखात आहे. साऱ्या ऑफिस स्टाफने मला सांभाळून घेतले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. मनात म्हणता म्हणता रेखा उघडपणे चार लोकात व्यक्त झाली होती. सार ऑफिस शांतपणे निशब्द वातावरणात रेखाच अजब व्यक्तित्व समजून घेत होत. लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारी रेखा आज स्व:ताचेच पाणावलेले डोळे घेऊन ऑफिसचा शेवटचा निरोप घेत होती.
पार्सल dispatch झाले रे म्हणून ऑफिस सुटकेचा श्वास सोडत होते.

Group content visibility: 
Use group defaults

बाई भारीच की.
पण असलं माणुस एवढं स्वतःचे गुण स्वतःशीच तरी कबुल करेल का?
असल्या काही सरकारी नोकरांमुळे सामान्य माणसाला मनस्ताप होताना पाह्यलंय.

तिमे schedule>>> इथे टाइम हवंय ना? तेवढं बदला. अजुनही एकदोन टायपो आहेत.

भारी लिहिलय एकदम. हटके व्यक्तिचित्र. राग राग झाला अगदी. लेखीकेचाही राग आला. Happy
शेवटी मॅडम सुधारलेल्या किंवा त्यांना एखादा धडा मिळाल्याचे दाखवले नाही हे आवडले.

असे निर्लज्ज व निर्ढावलेले अनेक लोक नोकरीत पाहिले आहेत. अधिकारी तर असे सह्याजीराव खूप पाहिलेत. खूप तिळपापड होतो, पण काहीच करू शकत नसतो आपण. लैंगिक शोषणाच्या केसची भिती दाखवणाऱ्या महिला सुध्दा पाहिल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य नियमावलीत कितीही अन्याय झाला तरी ताबा सोडायचा नाही, रागावर नियंत्रण ठेवणे, असे डरपोक बनवणारे व भिती घालणारे अनेक नियम आहेत. यामुळे कोणी कोणाला दुखवत नाही व आपल्या काय बापाचा पगार जातो म्हणून गप्प बसतो.
सेवानिवृत्त झाल्यानंतर यांना कुत्रेही विचारत नाही, बहुतेक वेळा कुटूंबातही एकटे पडतात.
आवडले लिखाण. पु.ले.शु.

मागे एकदा तिकीटे देणारी स्त्री पत्त्यांचा खेळ संगणकावर खेळत आहे व लोक रांगेत उभे आहेत हे चित्र आंतरजालावर पसरले होते ते नजरेसमोर आले.

असतात असे लोक. फक्त सरकारी नाही, इतर ठिकाणी देखील असतात. माझ्या सध्याच्या कंपनी मध्ये पण अशी एक व्यक्ती पाहिली आहे, काही काम करत नाही,नुसता टाईमपास.. सगळी कामे vendor( इंफी, टीसीएस,विप्रो) कडुन करून घेते. डायरेक्टर एकदा बोलला होता तिला फोकस करत जा तर एथिक्स कडे कंपलेंट केली की मेंटल हारास मेंट झाली म्हणून. तेंव्हापासून कोणी काही बोलत नाही तिला.

चांगलं लिहिलंय.
अशी माणसं खाजगी कंपनी मध्ये एका ठिकाणी जास्त टिकत नाहीत.पण लोकांना त्यांना नक्की काय खटकतं हे सांगता येत नसल्याने त्यांना मांजर पोत्यात घालून सोडतात तसं सन्मानाने दुसरी एखादी लांबची चांगली पोस्ट दिली जाते.

अशी माणसं खाजगी कंपनी मध्ये एका ठिकाणी जास्त टिकत नाहीत.
>>> स्त्री असेल तर टिकू शकते.माझा प्रतिसाद वाचा, खाजगी कंपनीत आहे ती बाई.

वाटलंच होतं मला. खूप तपशीलात जाऊन लिहिली आहे. चांगली आहे. स्वभाव असतो एकेकाचा. काहीजणांना आयुष्यभर खस्ता खाव्या लागतात अशा लोकांमुळे त्याचं वाईट वाटतं, जशी तिची जाऊ. सख्ख्या बहिंणीमधूनही अनेक वेळा विस्तव जात नाही, परस्परविरोधी स्वभाव असतात आणि कधी कधी आईवडिलंच भेदभाव करतात.

मला शेवट खूप आवडला..
अर्थात मला नोकरी न त्याच्या संबंधित फारशी काही माहिती नाहीय ... कारण मी शिकतिय अजुन ..पण खूप छान लिहिलय तुम्ही...एखाद्याचा स्वभाव इतक्या बारकाईन n तेही रंजकतेन मांडलाय...
पण ही एवढ नकारात्मक पात्र !!!
जरा वाचताना. Weird वाटलं

एक्दम वेगळी कथा आहे. शेवट उगाच इमोशनल केला नाही ते बर वाटल. छान लिहिली आहे.
मला शांता शेळकेंचा लिली या कथेची आठवण झाली. (लिली नायीकेच नाव असत. गोष्टीच नाव पण तेच असाव बहुदा. चार मैत्रिणी असतात आणि त्यांची गोष्ट आहे. एका चुलीचे गाणे कथा संग्रहात होती. )

तिने नंबरांची गुपचूप अदलाबदल केली. इतकं बारिक पाहू नये. छिद्रान्वेषी स्वभाव बनतो.
by हिज हायनेस

रेल्वेची परीक्षा आहे, पहीलीची वार्षिक परीक्षा नाही...
असे गुपचूप रोल नंबर नाही बदलता येत
इतकं बारिक का पाहू नये?

चांगली लिहिली आहे... सरकारी नोकरी च्या नियमांमध्ये बदल करणे आवश्यक आहे..काम न करता पगार घेणाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकायला हवे...त्यांच्या जागी सक्षम लोक आणावेत..तरच सरकारी यंत्रणा ठीक चालेल