होती कुठे ती माणसे?

Submitted by निशिकांत on 1 April, 2019 - 00:59

शोध घेतांना हिर्‍यांचा कैक दिसले कोळसे
माणसे जी वाटली, होती कुठे ती माणसे?

ऐकती सत्संग आणी रोज जाती मंदिरी
लोभ, माया. मोह नांदे पण तरीही अंतरी
अंध जे स्वार्थात त्यांना काय दावू आरसे?
माणसे जी वाटली, होती कुठे ती माणसे?

श्वापदे पुसती मनुष्या "हिंस्त्र का तव संस्कृती?"
"तू बलत्कारी, न आम्हा भावते ही विकृती"
"प्रेम हे का नाव देता वासनेला छानसे?"
माणसे जी वाटली, होती कुठे ती माणसे?

या न त्या मार्गे कमवणे संपदा हे ध्येय का?
भ्रष्ट मार्गांना यशाचे लोक देती श्रेय का?
सूज आली जीवनाला लोक म्हणती बाळसे
माणसे जी वाटली, होती कुठे ती माणसे?

मुखवट्यांच्या आड झाली माणसे गुमनाम का?
चेहर्‍याविन सत्त्य झाले एवढे बदनाम का?
पारदर्शी माणसांना मोल कुठले फारसे!
माणसे जी वाटली, होती कुठे ती माणसे?

शील बाजारात विकते स्तोम वैश्यांचे इथे
खेळ हे "निशिकांत" सारे फक्त पैशांचे इथे
माणसाला माणसांनी वागवावे का असे?
माणसे जी वाटली, होती कुठे ती माणसे?

निशिकांत देशपांडे मो.के. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशिकांतजी तुमच्या सर्वच कविता मला आवडल्या पण त्यातील हि सर्वोत्तम आहे बर का..असेच मस्त मस्त लिहीत जा ..एखादा कवितासंग्रह काढा तुम्ही