Odd Man Out (भाग १७)

Submitted by nimita on 1 April, 2019 - 06:18

खोलीतून बाहेर आल्यावर नम्रता काही क्षण तिथेच दाराला टेकून उभी राहिली. खरं म्हणजे संग्रामपासून दूर व्हायची तिचीदेखील अजिबात इच्छा नव्हती. पण त्यावेळी त्याचं ऑफिसचं काम वेळेत पूर्ण होणं जास्त महत्वाचं होतं. 'Romance तो क्या.....बाद में भी कर सकते हैं।' तिनी स्वतःच्या हिरमुसल्या मनाला समजावलं. तिला स्वतःचीच खूप गंमत वाटली. थोड्या वेळापूर्वी 'सुबह और शाम , काम ही काम ' करणाऱ्या तिच्या नवऱ्याबद्दल तिची तक्रार होती की 'क्यूँ नहीं लेते पिया प्यार का नाम?' आणि आता जेव्हा तिचा पिया स्वतः रोमँटिक मूडमधे आला होता तेव्हा तिनीच त्याला रिकाम्या हाती परत पाठवला होता.

डायनिंग टेबल वरचा आपला चहाचा कप उचलुन घेत ती लिव्हिंग रूम मधल्या सोफ्यावर विसावली. आज रात्रीचा स्वैपाक नसल्यामुळे तिला तसा आरामच होता. एकीकडे चहाचे घोट घेतघेत नम्रता विचार करत होती....तिला मिसेस घोषचं बोलणं आठवलं.. किती सहजपणे बोलून गेल्या होत्या त्या...'खरंच, आता हे पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त संग्रामसाठी राखून ठेवायचे. जास्तीत जास्त वेळ घालवायचा त्याच्या बरोबर. तो जे म्हणेल, त्याला जसं हवं असेल तसंच करायचं.' मनातल्या मनात नम्रताची लिस्ट तयार होत होती...'त्याला माझ्या हातच्या पुरणपोळ्या खूप आवडतात..उद्याच करते...खूप खुश होईल तो माझं हे सरप्राईज बघून. आणि हो... cheezlings आणि मार्बल केक पण ...मागच्या आठवड्यात एकदा म्हणाला पण होता तो की - खूप दिवसात तू cheezlings नाही बनवलेस म्हणून- काय हे नम्रता ! अशी कशी विसरलीस गं तू ? वेंधळी कुठली!!' स्वतःलाच दटावत ती म्हणाली. शेवटी तिनी तिची फ्रिजवरची डायरी आणि पेन उचललं आणि काय काय करायचं ते लिहून काढायचं ठरवलं.. 'हो, म्हणजे काही विसरायला नको..नंतर उगीच हुरहूर लागून राहते जीवाला.' तिला मागच्या वेळचा एक प्रसंग आठवला. पुण्यात SFA मधे राहात असताना एकदा संग्राम दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. तो येणार आहे हे समजल्याबर नम्रताला 'काय करू आणि काय नको' असं झालं होतं. नंदिनी तर "बाबा येणार" या नुसत्या कल्पनेनीच घरभर नाचत सुटली होती. अनुजा अगदीच लहान होती तेव्हा; जेमतेम सव्वा वर्षाची असावी.ती तर तिच्या बाबांना नीट ओळखत सुद्धा नव्हती कारण अनुजाच्या जन्मापासून त्यांना दोघांना एकमेकांचा पुरेसा सहवास मिळालाच नव्हता.नम्रतानी संग्रामच्या आई बाबांना पण बोलावून घेतलं होतं पुण्यात. संग्रामसाठी तिच्याकडून ते एक सरप्राईज होतं.

खूप एन्जॉय केले होते ते दहा दिवस त्यांनी सगळ्यांनी. संग्रामच्या आईनी तर जणू सैपाकघराचा ताबाच घेतला होता. आपल्या मुलाला स्वतःच्या हातांनी वेगवेगळे पदार्थ करून खायला घालण्यात त्यांना जो आनंद आणि समाधान मिळत होतं ते बघून संग्रामचे बाबा एक दिवस नम्रताला म्हणाले होते,"थँक यू नम्रता...तुझ्यामुळे आज कित्येक वर्षांनंतर मी हिला इतकं उत्साही आणि आनंदी बघतोय. नाहीतर संग्राम NDA मधे गेल्यापासून जणूकाही तिच्या आयुष्यातला एक खूप मोठा हिस्सा हरवल्यासारखा झाला होता. ती कधी फारसं बोलून नाही दाखवत - मला त्रास होईल म्हणून- पण ती संग्रामला खूप मिस करते, त्याचे लाड करणं मिस करते. पण तुझ्यामुळे आज ती आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतीये." त्यांचं हे असं भावुक बोलणं ऐकून नम्रताला खूपच संकोचल्यासारखं होत होतं. ती म्हणाली,"अहो बाबा, थँक यू कशाला म्हणताय तुम्ही मला. मी पण एक आई आहे. त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकते. आणि माझ्या लग्नानंतर माझ्या बाबांची होणारी भावनिक ओढाताण मी बघितली आहे.. त्यामुळे संग्रामपासून दूर राहताना तुम्हांला काय वाटत असेल याचाही अंदाज आहे मला. आणि म्हणूनच मी तुम्हांला दोघांना इथे बोलावून घेतलं..एका दगडात किती पक्षी मारले बघा ना मी...संग्रामच्या सहवासात तुम्ही आणि आई खुश, तुम्हांला दोघांना इथे आलेलं बघून संग्राम खुश आणि माझी ही जवळची माणसं खुश आहेत हे बघून मी पण खुश!!!" तिचं हे बोलणं ऐकून तर तिचे सासरे अजूनच भारावले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,"कायम अशीच खुश राहा बाळा ! तू आमच्याबद्दल इतका विचार करतेस, आमच्या सुखासाठी प्रयत्न करतेस हे बघून खरंच समाधान वाटलं.आमच्या संग्रामची निवड अगदी योग्यच आहे हे पुन्हा एकदा पटलं."

आता मात्र नम्रताचे पण डोळे भरून आले होते. पटकन आपले डोळे टिपत ती म्हणाली," तो फिर इस बात पर एक बढियासी चाय हो जाये..अद्रकवाली ?"

"जरूर, पण जर तू करणार असलीस तरच हं !" डोळे मिचकावत तिचे सासरे म्हणाले,"तुला म्हणून सांगतो- कोणाला सांगू नको बरं का- इतकी वर्षं झाली पण आमच्या होम मिनिस्टर ना चहा करणं काही जमलं नाही!" त्यांच्या या बोलण्यावर ते दोघं इतक्या जोरात खळखळून हसायला लागले की स्वैपाकघरातून त्यांच्या 'होम मिनिस्टर' स्वतःच काय झालं ते बघायला बाहेर आल्या.

जगातल्या प्रत्येक आई प्रमाणेच संग्रामच्या आईला सुद्धा त्याच्याबद्दल एकच काळजी होती....त्याच्या जेवणाची. शेवटी न राहवून त्यांनी त्याला विचारलंच,"जेवणखाण नीट असतं ना रे तिकडे? व्यवस्थित, वेळच्यावेळी जेवतोस ना रोज?"

"हो आई, अगदी मस्त तिन्ही त्रिकाळ खायला मिळतं आम्हांला.. आणि तेसुद्धा रोज वेगळा मेन्यू बरं का! बाकी सगळं तर ठीकच असतं पण आमच्या मेसच्या कुकला चायनीज कुकिंग अजिबात नाही जमत,"संग्राम सांगत होता.. नम्रताकडे बघून तो पुढे म्हणाला,"अगं, हाक्का नूडल्स मधे पण तो कढीपत्ता घालतो."

संग्रामचं हे बोलणं ऐकून नम्रतानी मनोमन ठरवलं की संग्राम परत जायच्या आधी एकदा त्याच्यासाठी चायनीज मेन्यू बनवायचा. पण आज उद्या करता करता शेवटी त्याचा जायचा दिवस येऊन ठेपला पण तिच्या चायनीजचा मुहूर्त काही लागला नाही.

आणि त्या एका गोष्टीचीच तिला खंत जाणवत राहिली...नंतर कितीतरी दिवस. एकदा सहज बोलता बोलता ही गोष्ट तिनी तिच्या एका मैत्रिणीला सांगितली..तिची शाळेपासूनची खूप खास मैत्रीण...

नम्रताचं सगळं म्हणणं ऐकल्यावर तिची मैत्रीण शांतपणे म्हणाली," त्यात एवढं इमोशनल होण्यासारखं काय आहे ? तुला जर घरी करायला जमत नव्हतं तर सरळ बाहेरून ऑर्डर करायचं होतंस ना!! " तिचं उत्तर ऐकून नम्रतानी अक्षरशः डोक्यावर हात मारला, "अगं, पण त्याला माझ्या हातचं खायला आवडतं हे माहित असताना बाहेरून कशाला मागवायचं? तसंही सध्या तो दुसऱ्यांच्या हातचंच खातोय." नम्रताला उगीचच खूप गहिवरून आलं आणि तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. पण ती मैत्रीण आपल्याच तंद्रीत बोलत राहिली," पण काही म्हण हं नम्रता; तू जरा अतीच करतेस आजकाल...जास्तच 'संग्राम,संग्राम' करतेस! जसं काही इतरांचे नवरे कधी लांब जातच नाहीत. माझा पण नवरा गेला होता मागच्या वर्षी U.S ला - मी पण राहिलेच की त्याला सोडून महिनाभर!मलाही त्याची काळजी वाटायची.पण मी केलंच ना मॅनेज ? आणि आत्ता गेलाय तरी परत येईलच ना संग्राम..तेव्हा खाईलच की तुझ्या हातचं..." तिचं हे वक्तव्य ऐकल्यावर नम्रताला तिला ओरडून सांगावंसं वाटलं...' अगं बये, U.S मधल्या A C ऑफिस मधे बसून काम करणं वेगळं आणि दुर्गम भागातल्या बॉर्डरवर एका छोट्याशा बंकर मधे राहून चोवीस तास शत्रूशी लढणं वेगळं !! आणि अजून एक महत्वाची गोष्ट विसरतीयेस तू...एकदा सीमेवर गेलेला सैनिक कधी आणि कसा परत येईल याची खात्री कोणी नाही देऊ शकत..."

पण यातलं काहीच न बोलता सरळ तिथून निघून गेली नम्रता.…तिला एक गोष्ट लक्षात आली होती..'ज्याचं जळतं त्यालाच कळतं !'

क्रमशः.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast

<<अगं बये, U.S मधल्या A C ऑफिस मधे बसून काम करणं वेगळं आणि दुर्गम भागातल्या बॉर्डरवर एका छोट्याशा बंकर मधे राहून चोवीस तास शत्रूशी लढणं वेगळं !! आणि अजून एक महत्वाची गोष्ट विसरतीयेस तू...एकदा सीमेवर गेलेला सैनिक कधी आणि कसा परत येईल याची खात्री कोणी नाही देऊ शकत...">> सैनिकाचं आयुष्य आणि सिव्हिलीयन्सचं आयुष्य याची तुलनाच होऊ शकत नाही. पण आपण आपल्याच व्यक्तीला कळत नकळत दुखावतो आहे हे मैत्रीणीला समजायला हवं होतं. कथेच्या शीर्शकातलं मर्म समजलं. आणि हलल्यासारखं झालं.