गंमत

Submitted by बिपिनसांगळे on 14 March, 2019 - 12:45

गंमत
-----------------------------------------------------------------------------------------
“ साप -साप “,…
विकेटकिपिंग करणारी गोड ,खोडकर पोरगी एकदमच किंचाळली . पण त्याही क्षणाला तिने सफाईदारपणे बॉल धरला होता ,ज्या बॉलने बॅट्समनला चकवलं होतं .
परसामध्ये क्रिकेट खेळणारी सगळीच पोरं दचकली !
“ कुठंय कुठंय ? “ , म्हणत बॅट्समन पुढे गेला . क्रीझ सोडून. त्याबरोबर तिने बॉलने स्टंपस उडवले व ती ओरडली , “ आऊट “ ! सगळीच पोरं ओरडली , “ आऊट “ ! आणि हसायला लागली .
त्या खोडकर पोरीने बॅट्समनला बरोबर टोपी घातली होती . तो तिचा भाऊच होता खरं तर. उन्हात खेळून तो आधीच वैतागला होता . घामेजला होता . त्याला राग आला व त्याचा गोरा रंग लाल झाला . तो ओरडू लागला , “ चीटिंग चीटिंग “ !
पण त्याला आऊट देण्यात आलंच . त्याला बहिणीचा खूप राग आला. पण काय करणार ?... तिचा खोडकरपणा साऱ्यांनाच भारी पडत होता .
परसात खेळ रंगला होता. त्यांचा आरडाओरडा सोडला तर शांतता होती . आजूबाजूच्या वाड्यांमध्येही कसली गजबज नव्हती .
मग ती बॅटिंगला आली . तिने अंगातला निळा टी शर्ट सारखा केला . कपाळावरचे भुरभुरणारे केस उडवले . कट्टयावर ठेवलेली टोपी घातली . बॅट घेतली . जमिनीवर ठोकली .
पहिल्याच बॉलला तिने बॅट घुमवली . नुसतीच . बिच्चारी ! आऊट होता होता वाचली. बॉलिंग तिचा दादा करत होता . त्याचे बॉल खेळणं तिला अवघड होतं .
“ साप- साप ” , बॅटिंग करणारी तीच गोड , गोबऱ्या गालांची , खोडकर पोरगी पुन्हा एकदा किंचाळली . सगळी पोरं पुन्हा एकदा दचकली . पण या वेळी मात्र तिच्याकडे संशयाने पाहू लागली .
“ ए फेकू , सारखी सारखी तीच नाटकं करू नकोस ना ! “ तिचा भाऊ म्हणाला . त्यावर तिने न्हाणीघरातून बाहेर आलेल्या पांढऱ्या पाईपजवळ बोट दाखवलं . तिथे रचलेल्या दगडांजवळ अळू फोफावलेला होता . सांडपाण्यावर हिरवीगार , दाट सावली धरून. पटकन काही शोधायचं म्हणलं तर मोकळं दिसत नव्हतं .
पोरं थोडीशी पुढे होऊन ,काळजीपूर्वक बघू लागली .
“ ए चला रे , ही ना - फुकटच्या फेका टाकते ! “ तिचा भाऊ म्हणाला .
त्यावर ती मोठ्याने दादाला म्हणाली , “ दादा , नाही रे ! ती अळूची पानं चांगलीच सळसळली . मी पहिली ना शेपूट त्याची . चॉकलेटी रंगाची . खरं - शप्पथ ! “
बसल्या जागेवरून मीही पाहू लागलो .
खरं तर कोकणातल्या पोरांना सापाची कसली भीती . पण शहरी पोरं ती ! जाम घाबरली होती .
ती वाडी मामाची होती . ऐसपैस . नारळ सुपारीची . हे इथून तिथून पसरलेली . हिरवीगार ! मध्येच आंब्यांचाही वास येत होता .
ही शहरी पोरं म्हणजे दादाची आतेभावंडं होती . दोन आत्यांची चार पोरं . पुण्याहून आलेली . उन्हाळ्याची सुट्टी घालवायला .
“ अरे , कोब्रा होता ! … पोरगी धसकल्यासारखी म्हणाली .
“ कोब्रा ? कळतंय का तुला काय बोलतेस ते ? शब्द माहिती आहेत म्हणून फेकू नकोस उगा . इथे मुळात साप आहे का नाही याचाच पत्ता नाहीये . ए , चला रे स्टार्ट . “ तिचा भाऊ म्हणाला . त्याला खेळायचं होतं . तिला आऊट करायचं होतं . अन मग तिला चांगल्या वाकुल्या दाखवायच्या होत्या . जशास तसं .
त्यावर दादा म्हणाला, “ कोब्रा ? म्हणजे नाग का ? अरे , असू शकतो . उन्हाळ्यात ते गारव्याला बाहेर पडतात .”
पोरांच्या गलक्याने मागच्या वाडीतून एक गडी पळत आला . काळा , सडसडीत , एखाद्या पोलादी कांबीसारखा ! तो नारळाच्या झाडावरून उतरलेला असावा . कारण त्याच्या हातात धारदार कोयता होता .
गड्याने तो कोयता कंबरेला खोचला . एक काठी उचलली . त्यानं पोरांना धीर आला . त्याने फटाफट काठी आपटली . दगड उचलले . चाहूल घेतली . अळूची पानं हलवली .
पोरंही धिटाईने पुढे झाली . पाहू लागली. शोधू लागली.
पण तिथे काही नव्हतंच …
उन्हाळ्याचे दिवस . दुपारची वेळ . कोरडी हवा . नकोसा वाटणारा उकाडा . जीवाची नुसती घालमेल होत होती . त्यात हि धांदल !
दादा म्हणाला , “ गेला असेल तो आता. चला खेळू या . आवाजामुळे ते जवळ येत नाहीत “ , असं म्हणत त्याने जोरजोरात बॅट आपटली .
त्या गोड मुलीकडॆ तिचा भाऊ मात्र अजूनही संशयानेच पाहत होता . ती खोडकर होती ना . पण तो खोडकरपणा आत्ता मात्र तिच्या चेहऱ्यावरून गायब होता .
तिला वाईट वाटत होतं . तिने सगळ्यात आधी तो नाग पहिला होता . पण ती मुलांना तो दाखवू शकली नव्हती . ते दाखवून भाव खायचा तिचा चान्स गेला होता . त्यात मुलांचा तिच्यावर विश्वास नव्हता …
तिला वाटलं - ‘ कुठे गेला असेल तो ? कुठे दडलाय कोणास ठाऊक ? ‘
कसलीच चाहूल लागेना , तसा गडी पुन्हा कामाला निघून गेला .
तो गेला त्या बाजूला दाट सावली होती . तिथे फुलपाखरांचा एक मोठा थवा बसलेला होता . त्या गड्याच्या चाहुलीने तो उडाला . नारिंगी रंगाचा . पोरगी ते पाहू लागली . एवढी फुलपाखरं एकदम? तीही एकसारखी ? … तिला जाम मजा वाटली . बाकी पोरंही मग ते पाहू लागली .
तसं मुलांचं खेळणं थांबलंच . सगळी मुलं सावलीत बसून गप्पा मारू लागली . कट्ट्यावर बसून . जो न्हाणीघराच्या थोडासाच पलीकडे होता .
‘ गंमत ‘ संपली होती .
तेव्हा मीही निघालो . आता मी त्यांच्या विरुद्ध बाजूला होतो . मी माझा फणा मिटून जाऊन लागलो . रुबाबात ! … उन्हाच्या कवडशांमध्ये माझं सळसळणारं शरीर भारीच चमकत होतं .
-----------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मीरा -

लिखाणाची शैली छान आहे. कथा आवडली.

हि प्रतिक्रिया मलाही आवडली
त्यामुळे आपण ट्रॅकवर आहोत हे कळतं

अनघा

' मस्त आहे.. तुमचे लेखन चित्रदर्शी असते.'

आभार
जबाबदारी वाढल्यासारखे वाटते .

चैतन्य -
आपण म्हणालात ,
म्हणजे मिळवलं .
खूप आभार .

मस्त कथा... खूप आवडली.

कथानायकाला सांगा काळजी घे, ऊनात बाहेर पडू नको, उगीच कुणी पाहिल. Happy

साधना -
हाहाहा !

तुमची प्रतिक्रिया आली त्यावेळी ,
कथानायक आणि कथालेखक ,
दोघेही दुपारचे मस्त सावलीला गुडूप झाले होते ,

आभारी आहे

Pages