माझी सैन्यगाथा (भाग १७)

Submitted by nimita on 6 March, 2019 - 23:41

साल १९९९ ... तारीख ७ जून....

स्थळ..जम्मू येथील संजुवां कॅन्टोन्मेंट .

सकाळी दहा-साडेदहा चा सुमार - मी आणि माझी मोठी मुलगी -ऐश्वर्या-आमच्या नव्या घराच्या दारात उभ्या होतो. नितीन घर ताब्यात घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या ऑफिसमधे गेला होता. आम्ही दोघी भिंतीच्या आडोश्याला सावलीत उभ्या होतो तरीही ऊन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. माझी अवस्था 'एक कटी आणि एक पोटी' अशी होती...स्पष्ट शब्दांत सांगायचं तर - I was in the family way . सातवा महिना चालू होता. तसंही माझं आणि उन्हाळ्याचं काही फारसं सख्य नाहीये. आणि त्यात प्रेग्नन्सी मुळे माझी स्थिती 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' अशी झाली होती.

पण पाच दहा मिनिटांतच नितीन घराची किल्ली घेऊन आला आणि आम्ही तिघांनी एकदाची घरातली सावली गाठली.

सगळ्यात आधी आम्ही सगळं घर नीट बघितलं. घरातले लाईट्स, फॅन्स,गिझर, घराची कॉलबेल सगळं काही वर्किंग कंडिशन मधे होतं. बाथरूम आणि किचन मधल्या नळांत पाणी येत होतं. घरातलं MES (Military Engineer Services) कडून मिळालेलं फर्निचर देखील ठीकठाकच होतं. सगळ्या दारांच्या आणि खिडक्यांच्या कड्या व्यवस्थित बंद होत होत्या. एकंदरीत पाहता घर राहण्याजोगं होतं.आम्ही सुटकेचा श्वास सोडला. त्याला कारणही तसंच होतं.. आता पुढंची निदान दोन वर्षं तरी आम्हांला - म्हणजे मला, ऐश्वर्या ला आणि आमच्या येणाऱ्या बाळाला याच घरात राहायचं होतं. कारण नितीन ची पोस्टिंग राजौरीला झाली होती, आणि ते फील्ड लोकेशन असल्यामुळे आम्हांला त्याच्याबरोबर राहणं शक्य नव्हतं.

माझ्यापेक्षाही नितीनला जास्त काळजी वाटत असावी. कारण त्याला त्याच दिवशी जम्मूहून निघून राजौरी ला पोचणं आवश्यक होतं आणि त्या वेळच्या युद्धाच्या परिस्थितीत त्याला इतक्यात पुन्हा सुट्टी मिळणं केवळ अशक्य होतं.

त्यामुळे आम्हांला नवीन जागी आणि नव्या घरात सेटल होताना कमीतकमी त्रास व्हावा या दृष्टीनी त्याचे प्रयत्न चालू होते.त्यावेळी संजुवां च्या त्या कॉलनी मधे आमच्या ओळखीचे एक ऑफिसर राहात होते. त्यांनी पुढाकार घेऊन आम्ही तिथे पोचायच्या आधीच आमचं घर झाडून स्वच्छ करून घेतलं होतं. आमचं सगळं सामानही एक दोन दिवस आधीच पोचलं होतं. तेही त्यांनी आमच्या घरा मागच्या सर्व्हंट क्वार्टर मधे उतरवून घेतलं होतं.त्यामुळे आम्ही लगेचच घर लावायला सुरुवात केली. नितीन असेपर्यंत त्याच्या मदतीनी अगदी आवश्यक असलेलं सामान लावून घ्यायचं होतं. बाकी मग मी हळूहळू माझ्या सवडीनुसार आणि माझ्या तब्येतीला झेपेल तसं करणार होते.

आम्ही दोघांनी पटापट काम करायला सुरुवात केली. मी एकीकडे आमची 'working kitchen' ची बॉक्स उघडली. नितीन च्या मित्रानी तात्पुरता त्यांच्याकडचा स्पेअर सिलिंडर पाठवला होता.एवढंच नाही तर कुठूनतरी एका रेग्युलेटर ची पण सोय केली होती. त्यामुळे माझं काम खूपच सोपं झालं होतं. पुढच्या अर्ध्या तासात माझं जुजबी किचन सेट झालं होतं आणि खिचडीच्या कुकर ची पहिली शिट्टी ही झाली.

मी किचनमधे busy होते तेवढ्या वेळात ऐश्वर्या च्या मदतीनी नितीन नी बेडरूम आणि बाथरूम मधलं सामान लावलं होतं. मग आम्ही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे अवजड वस्तू अनपॅक केल्या.

ही सगळी कामं उरकेपर्यंत एक दीड तास उलटून गेला होता. थोड्याच वेळात नितीनला निघणं भाग होतं. आमची जेवणं झाल्यावर तो कार घेऊन बाहेर पडला. कॉलनी पासून थोड्या अंतरावर एक पेट्रोल पंप होता. तिथून त्यानी आधी कार मधे आणि मग स्कूटर घेऊन जाऊन तिच्यातही पेट्रोल भरवून आणलं.....जर काही इमर्जन्सी आली तर मला ऐनवेळी प्रॉब्लेम नको म्हणून !

थोड्या वेळानंतर आमचा निरोप घेऊन तो राजौरीला जायला निघाला. ऐश्वर्या नी विचारलं," बाबा, तुम्ही कधी येणार परत?" खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर त्याला स्वतःलाही माहित नव्हतं. पण तरीही तिला जवळ घेत तो म्हणाला," लवकर यायचा प्रयत्न करीन मी बाळा. पण आई आहे ना इथे तुझ्याबरोबर. आणि मी जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हांला फोन पण करीन. आपण फोन वर खूप गप्पा मारुया. ओके ना?"

"पण या घरात फोन कुठे आहे?" ऐश्वर्या चा प्रश्न योग्यच होता."मग आपण कसे बोलणार?"

पण त्याचीही सोय होती. कॉलनी मधे आमच्या घराच्या मागच्या रस्त्यावर एक आर्मी चा टेलिफोन बूथ होता. म्हणजे तिथला फोन हा आर्मी एक्सचेंज चा होता. फील्ड मधे असणाऱ्या ऑफिसर्स ना त्यांच्या घरच्यांशी बोलता यावं म्हणून ही सोय केली होती. त्या बूथ मधे कायम एक ऑपरेटर बसलेला असायचा. जेव्हा एखादा ऑफीसर फोन करायचा तेव्हा तो ऑपरेटर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना बोलावून आणायचा. पण त्यातही एक drawback होता....त्या फोनवर फक्त incoming calls ची सोय होती. No outgoing calls. पण 'something is better than nothing' असा विचार करून आम्ही त्यातही समाधान मानून घेतलं.

'बाबांशी फोनवर बोलता येईल' या एका आशेवर ऐश्वर्यानी नितीन ला हसत हसत बाय केलं.

पुढचे काही दिवस घर सेट करण्यात गेले. आमच्या युनिट मधून मला मदतीसाठी म्हणून दोन तीन दिवसांकरता एक माणूस पाठवला होता. तो असेपर्यंत मी सगळ्या बॉक्सेस उघडून त्यातलं हवं असलेलं सामान काढून घरात ठेवून घेतलं. कारण माझ्या त्या वेळच्या शारीरिक अवस्थेत मला जास्त श्रमाची कामं करणं शक्य नव्हतं आणि advisable ही नव्हतं. त्या माणसाच्या मदतीनी मी दारं आणि खिडक्यांचे पडदे लावून घेतले.

घरातली situation बऱ्यापैकी कंट्रोल मधे आल्यावर मी इतर बाबींवर लक्ष केंद्रित केलं. त्यात सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी होत्या...पहिली -जम्मू मधल्या मिलिटरी हॉस्पिटल मधे जाऊन तिथल्या gynaecologist ना भेटणं आणि दुसरी-ऐश्वर्या ची शाळेत ऍडमिशन करणं.

Luckily, कॅन्टोनमेंट च्या परिसरातच आर्मीची एक प्रायमरी शाळा होती. तिथे Upper KG मधे ऐश्वर्या ची ऍडमिशन झाली. शाळेची स्वतःची स्कूल बस पण होती. त्यामुळे तोही प्रॉब्लेम solve झाला.शाळेच्या जवळच एक छोटासा शॉपिंग कॉम्प्लेक्स होता, त्यात दैनंदिन व्यवहारासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजांची सोय होती...म्हणजे एक भाजी आणि फळांचं दुकान, छोटंसं पोस्ट ऑफिस, STD बूथ, स्टेशनरी, किराणा सामान वगैरे ची दुकानं आणि एका बँकेचं एक्सटेन्शन काउंटर सुद्धा. या सगळ्यामुळे माझी बरीचशी काळजी दूर झाली होती.

आता दुसरं महत्वाचं काम करायचं होतं...हॉस्पिटल मधे जाऊन डॉक्टर ना भेटणं.पण त्यातही एक मोठा प्रॉब्लेम होता आणि तो म्हणजे मला तिथल्या हॉस्पिटलचं नक्की लोकेशन माहित नव्हतं. आणि त्या दिवसांत आजच्यासारखं गूगल, gps वगैरे एवढं प्रचलित नव्हतं... आणि तसंही, माझ्याकडे तेव्हा मोबाईल फोन ही नव्हता. माझ्या चेकअप चा दिवस जसा जवळ यायला लागला तशी मी त्या दृष्टीनी हालचाल सुरू केली. कॉलनी मधल्या एकदोघीना विचारून रस्ता समजून घेतला आणि एक दिवस ऐश्वर्या शाळेत गेल्यावर मी कार घेऊन माझ्या शोधमोहिमेवर निघाले. रस्त्यातल्या ट्रॅफिक पोलीस ना विचारत विचारत शेवटी एकदाची हॉस्पिटलमधे जाऊन पोचले.

आता हळूहळू जम्मूमधे आमचं बस्तान बसत होतं. पण आमच्या घरात आम्हांला दोघींना कंपनी द्यायला अजूनही काही जीव राहात होते. आणि त्या सगळ्यांची हकालपट्टी करताना माझी मात्र दमछाक होत होती . अगदी डास आणि लाल मुंग्यांपासून ते पाली आणि बेडूक सुद्धा. आम्हांला जे घर alot झालं होतं ते जवळजवळ वर्षभर बंदच होतं.. unoccupied .. पण दिवसा उजेडी हे सगळे रहिवासी लपून असल्यामुळे आम्हांला पहिल्या दिवशी त्यांचं अस्तित्व जाणवलं नाही. पण रात्री आम्ही दोघी जेव्हा झोपलो तेव्हा थोड्या वेळानी बेडकाच्या ओरडण्याचा आवाज आला. आधी मला वाटलं बाहेर बागेत असावा. पण मग हळूहळू त्या एका आवाजाचं रूपांतर समूहगानात झालं तेव्हा लक्षात आलं की ही बेडकांची फौज आपल्या घरात - नव्हे- आपल्या खोलीतच आहे. मी उशीखालून टॉर्च काढला ..आणि टॉर्च च्या प्रकाशात बघते तर काय...खरंच खाली जमिनीवर लहान मोठ्या आकाराचे बरेच बेडूक सूर आळवत होते. ही सगळी सेना लवकरात लवकर हद्दपार करणं अनिवार्य होतं. मग मी थोडा विचार करून, माझ्याकडे असलेली आयुधं आजमावत माझी रणनीती तयार केली. उशाशी ठेवलेली काठी उचलून घेत मी कॉटवरून खाली उतरले. लाईट ऑन केला. रस्त्यातले बेडूक चुकवत चुकवत बाथरूम मधे गेले आणि एक मोठी बादली आणि प्लास्टिकचा झाडू घेऊन आले. केरभरणी मधे जसा केर गोळा करतात ना अक्षरशः तसेच मी ते बेडूक बादलीत लोटत होते.... दहा बारा तरी नक्कीच असतील. मग ती बादली घराबाहेर च्या एका खड्ड्यात रिकामी करून आले. वाटलं, चला आता शत्रू तडीपार झाला. पण माझं हे विजयाचं सुख फार काळ नाही टिकलं. थोड्या वेळानी पुन्हा शत्रूची नव्या दमाची फौज कॉटखाली तयार होती. मग काय....पुन्हा बादली, झाडू, ते बेडूक आणि मी....हा रिपीट टेलिकास्ट तीन चार वेळा तरी चालला.या सगळ्या गडबडीमुळे ऐश्वर्या पण जागी झाली.मला वाटलं 'आता हे सगळे बेडूक बघून घाबरते की काय?' पण बेडकाना बादलीत भरून बाहेर नेऊन टाकण्याची आयडिया तिला खूपच मजेशीर वाटली असावी. कारण ती कॉटवर बसल्या बसल्या मला खालच्या शत्रूचा ठावठिकाणा सांगत होती...'आई, तो बघ दारापाशी....अजून एक आहे तुझ्या मागेच'....वगैरे वगैरे.

एक तर दिवसभर झालेली दगदग, त्यात माझी अवस्था अशी होती की अगदी साध्या, सोप्या वाटणाऱ्या हालचाली पण माझ्यासाठी अवघड झाल्या होत्या. प्रेग्नंट बायकांना 'अवघडलेली' असं का म्हणतात हे तेव्हा माझ्या लक्षात आलं. असो...

तर अश्या प्रकारे त्या नव्या घरातली आमची पहिली रात्र आम्ही दोघींनी जागवली आणि शत्रूवर विजय मिळवून गाजवली देखील!

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आधी शत्रूच्या गोटाचा छडा लावायचं ठरवलं. सगळ्या घरात शोधलं पण कुठेच काही सुगावा लागेना. शेवटी एक संभावित जागा आढळली. आमच्या बेडरूम मधे एक भिंतीतलं ड्रेसिंग टेबल होतं. त्यातला आरसा भिंतीवर fixed होता पण खालचं ड्रॉवर्सचं कपाट मात्र हलवता येण्यासारखं होतं.त्या कपाटाच्या आणि भिंतीच्या मधल्या कोपच्यात शत्रूचा तळ असावा असा अंदाज होता. ऐश्वर्या च्या मदतीनी मी हळूहळू ते कपाट हलवलं....शत्रूचे मोजके सैनिक तिथे दबा धरून बसले होते. त्यांना बघताच ऐश्वर्या पळत गेली आणि बादली आणि झाडू घेऊन आली. अशा रीतीने रात्री सुरू झालेल्या युद्धाची सांगता सकाळी आमच्या विजयानी झाली.

आमची ही विजयी घोडदौड चालू ठेवत आम्ही पुढच्या दोन तीन दिवसांत मुंग्या आणि पाली यांचा पण बिमोड केला. पण या सगळ्यांशिवाय आणखीही एक शत्रू दबा धरून बसला होता.. पण तो घराबाहेर असल्यामुळे अजून पर्यंत माझ्या नजरेस पडला नव्हता. पण ती वेळही लवकरच आली. एकदा रात्री मी ऐश्वर्या ला गोष्ट सांगत झोपवत होते. अचानक भिंतीच्या कडेकडेनी काहीतरी हलताना दिसलं...आधी मला वाटलं झुरळ असावं. मनात आलं,"oh no! आता झुरळं का?" पण थोडं लक्ष देऊन बघितलं तर तो चक्क विंचू होता! आणि तो कॉटच्या दिशेनीच येत होता. मग काय, ना आव देखा ना ताव...सरळ जमिनीवरची माझी स्लीपर उचलली आणि तिच्या एका फटक्यात शत्रू गारद ! खबरदारी म्हणून कपाटातून माझी एक ओढणी घेतली आणि बेडरूमचं दार बंद करून दार आणि जमीन यांच्यातली फट त्या ओढणीनी बुजवून टाकली.दुसऱ्या दिवशी सकाळी नितीनच्या मित्राला सांगून सुताराला बोलावून घेतलं आणि बाहेरच्या मुख्य दाराला चक्क उंबरा बसवून घेतला.

सीमेवर चालू असलेल्या युद्धाचे परिणाम जम्मूमधे ही दिसून येत होते.सिव्हिल एरिया मधून कॉलनी मधे घरकाम करायला येणाऱ्या बायका आता येत नव्हत्या.त्यामुळे मी 'अपना हाथ जगन्नाथ' या सत्याला सामोरं जात स्वतःच सगळं घरकाम करत होते.या सगळ्यात भर म्हणून की काय पण आम्ही गेल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून सगळ्या कॉलनी मधे पाण्याचा पुरवठा बंद झाला.त्यामुळे कोणाच्याही घरात नळाला पाणी नाही... आर्मी चे टँकर्स होते म्हणा...रोज सकाळी सगळ्यांच्या टाक्यांमधे टँकर नी पाणी भरलं जाऊ लागलं. पण माझं घर रस्त्यापासून थोडं आतल्या बाजूला असल्यामुळे टँकरचा पाण्याचा पाईप माझ्या घराच्या टाकीपर्यंत पोचतच नव्हता. मग काय....घरातली मोठी पन्नास लिटर ची बादली बाहेर ठेवली. त्यात पाणी भरून घेतलं आणि मग छोट्या बादलीनी घरातल्या इतर बादल्या, वॉशिंग मशीन वगैरेमधे पाणी भरून ठेवलं. त्यावेळच्या माझ्या अवघडलेल्या अवस्थेत मला जास्त वजन उचलणं शक्यच नव्हतं.पण त्यामुळे दिवसभरासाठी पाणी साठवून ठेवायला मला बऱ्याच चकरा माराव्या लागल्या. पाण्याचा प्रश्न सुटायला दोन दिवस लागले..तोपर्यन्त रोज सकाळी माझी ही पाणी परेड चालू राहिली. पण हळूहळू सगळं मार्गी लागेल ही खात्री होती. अशाच एका आणीबाणीच्या क्षणी मनात आलं..मी आणि नितीन दोघंही आपापली युद्धं लढतोय....तो तिकडे सीमेवर आणि मी इकडे!

पहिल्याच आठवड्यात इतक्या घडामोडी घडल्या पण यातलं नितीनला मात्र काही कळू दिलं नाही. आधीच त्याला तिकडे इतकी व्यवधानं असणार त्यात अजून हे टेन्शन कशाला! आणि तसंही त्याला सारखं सारखं फोन करणं शक्य नव्हतं. सुरुवातीच्या काही दिवसांत तर आठ आठ दिवस उलटून जायचे पण त्याचा फोन नाही यायचा. पण त्यावेळी सीमेवरची परिस्थिती च इतकी गंभीर होती..मी जरी शरीरानी प्रत्यक्ष युद्धभूमीत नसले तरी तिथे चालू असलेल्या घडामोडींची थोडीफार कल्पना करू शकत होते. तिथल्या लोकांना दिवस रात्र , जेवण, झोप या आणि अशा कुठल्याच गोष्टींचं भान नसणार हे मी जाणून होते. सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी जिवंत परत येईल की नाही याचीही शाश्वती नव्हती तिथे...अशावेळी त्यानी फोन केला नाही म्हणून चिडून किंवा रुसून बसण्याइतकी selfish आणि immature नाहीये मी. पण तरीही रोज दिवसाची सुरुवात - 'आज तरी फोन येईल' - या आशेवर व्हायची आणि शेवट मात्र - 'उद्या नक्की येईल फोन' या विश्वासावर व्हायचा.

पण नितीन नी मला या सगळ्याची पूर्वकल्पना देऊन ठेवली होती, "जर माझं काही बरंवाईट झालं तर सगळ्यात आधी ती बातमी तुला कळवतील. त्यामुळे जोपर्यंत तशी काही बातमी येत नाही तोपर्यंत मी ठीक आहे असं समज. No news is good news."

त्यामुळे रोज रात्री झोपताना या 'no news' बद्दल मी देवाचे आभार मानायला शिकले होते.

रोज संध्याकाळी मी आणि ऐश्वर्या घरामागच्या त्या टेलिफोन बूथच्या आसपास रेंगाळत राहायचो. ती तिथल्या रस्त्यावर तिची सायकल चालवायची किंवा कधी तिच्या मित्र मैत्रिणी बरोबर खेळायची. आणि मीही तिथेच फेऱ्या मारायचे. पण माझं अर्धं लक्ष मात्र त्या फोन कडेच असायचं. जर कधी रिंग वाजली तर वाटायचं -आता आतला attendant बाहेर येऊन मला बोलवेल. माझी होणारी चलबिचल बघून एकदा तिथली माझी एक मैत्रीण म्हणाली," आप कुछ ज्यादाही चिंता करते हो। आपके husband तो वहाँ स्टाफ अपॉइंटमेंट पे हैं ना? फिर क्या टेन्शन है? " तिला मी फक्त एकच वाक्य ऐकवलं," वो स्टाफ में है ये हमें पता है....लेकिन ये बात दुश्मन की गोली को कौन समझायेगा?"

कधीकधी ऐश्वर्या पण खूप डिस्टर्ब व्हायची.'बाबा कधी येणार? ते फोन का नाही करत?' अशा प्रश्नांनी भंडावून सोडायची. तिची समजूत घालताना अगदी नाकी नऊ यायचे.

जम्मू मधेही स्थिती खूपच तणावपूर्ण होती. दर दुसऱ्या दिवशी शहरात कर्फ्यु लागायचा. मला जेव्हा नववा महिना सुरू झाला तेव्हा मी माझ्या सोनोग्राफी साठी मिलिटरी हॉस्पिटलमधे गेले होते तेंव्हाचीच गोष्ट. ऐश्वर्या शाळेत गेल्यावर मी घरातून निघाले.सकाळी जाताना सगळं काही नॉर्मल होतं. पण परत येताना अचानक कुठेतरी दंगे सुरू झाले आणि पोलिसांनी सगळे रस्ते बंद केले. मी मधेच अडकून पडले. आता काय करावं....तासाभरात ऐश्वर्या शाळेतून घरी येणार होती. त्याआधी घरी पोचणं आवश्यक होतं. कार मधून उतरुन जवळ उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडे जायला लागले. पण जसं मी कार चं दार उघडलं तसा तोच आला कारपाशी..म्हणाला," वापस जाइये। आगे नहीं जा सकते।" मी त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. माझं आर्मी चं dependent card दाखवलं. मला लगेच घरी पोचणं गरजेचं होतं. त्यानी देखील शांतपणे माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं, माझं कार्ड नीट चेक केलं आणि म्हणाला ," इस कंडिशन में आप अकेली क्यूँ आयी?कुछ भी हो सकता है।अभी तो आप जा सकती हैं, लेकिन आगेसे थोडा ध्यान रखीये।" त्याला काय सांगणार की माझ्याकडे दुसरा काही option नाहीये! त्याचे आभार मानून मी घरी जायला निघाले. तेव्हा तो म्हणाला,"मेरा एक कॉन्स्टेबल आपके साथ साथ आयेगा ..आप चिंता मत किजीए।"आणि खरंच मी आमच्या कॉलनीमधे शिरेपर्यंत एक कॉन्स्टेबल त्याच्या मोटारसायकल वरून माझ्या बरोबर आला होता.

त्या दिवसांमधे आम्ही टीव्ही वर फक्त दोनच चॅनेल्स बघायचो..ऐश्वर्याचं कार्टून चॅनल आणि माझं न्युज चॅनल. पण तिच्यासमोर बातम्या बघणं मी कटाक्षानी टाळत होते. तिच्या निरागस अजाणत्या मनात मला भीती किंवा काळजी नको होती. त्यामुळे ती शाळेत गेल्यावर आणि रात्री झोपल्यानंतर मी फक्त आणि फक्त न्युजच ऐकत होते..एकाच बातमीची वाट बघत होते....युद्धविराम झाल्याची!

अशीच एका रात्री न्युज बघता बघता झोप लागून गेली. पण मधेच कधीतरी कुठल्यातरी आवाजानी जाग आली. एखादा जोरदार धमाका झाल्यासारखा आवाज होता तो...मी सरसावून बसले. काही मिनिटं शांततेत गेली. मला वाटलं मला भास झाला असावा,किंवा टीव्ही चालू राहिला होता ना-त्यात काहीतरी दाखवत असतील.टीव्ही बंद करून पुन्हा उशीवर डोकं टेकलं. तेवढ्यात परत एक मोठा आवाज आला...यावेळी मात्र मी तो आवाज ओळखला...कुठेतरी रायफल फायरिंग चालू होती. नक्कीच .... कॉलेज मधे NCC त असताना मी रायफल शूटिंग केली होती. त्यामुळे हा आवाज माझ्या ओळखीचा होता. एका क्षणात मनात नको नको ते विचार येऊन गेले. वाटलं..नव्हे जवळजवळ खात्रीच झाली की आमच्या कॉलनी वर शत्रूनी हल्ला केला आहे. आमची कॉलनी अगदी मेन रोडवरच असल्यामुळे तिला टारगेट करणं सोपं होतं. माझ्या डोक्यात विचारांची चक्रं जोरात सुरू झाली. मला लवकरच काहीतरी हालचाल करणं भाग होतं. कारण कॉलनी मधे शिरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नजरेस पडणारं घर हे माझंच होतं....आणि त्यात अजून भर म्हणजे आमची बेडरूम रस्त्याच्या साईडला होती. त्यामुळे जर माझ्या अंदाजाप्रमाणे हा खरंच शत्रूचा हल्ला असला तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जोरदार प्रहार आमच्यावरच होण्याची शक्यता होती.

सगळ्यात आधी मी खोलीतला नाईट लॅम्प बंद केला.आतल्या जाळीच्या खिडक्या जरी बंद असल्या तरी बाहेरच्या काचेच्या खिडक्या नेहमीच उघड्या असायच्या...व्हेंटिलेशन साठी...पटकन मी बेडरूमच्या त्या खिडक्याही बंद केल्या. पडदे नीट बंद करून घेतले. मग टॉर्च ऑन करून त्याला रुमालात गुंडाळून घेतलं...म्हणजे पुरेसा उजेड मिळेल पण बाहेरून कोणाला नाही दिसणार. एक एक करून सगळ्या खोल्यांच्या काचेच्या खिडक्या बंद केल्या..अगदी हळुवारपणे...जास्त आवाज होऊ न देता. लिव्हिंग रूम मधली एक सोफा चेअर हळूहळू ढकलत मुख्य दाराच्या समोर नेऊन लावली, जेणेकरून जर कोणी दार तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते सहजासहजी शक्य होणार नाही. स्वैपाकघरातून मिळतील तेवढे चाकू, सुऱ्या , काड्यापेटीची बॉक्स,लाटणं वगैरे हत्यारं उचलली. त्या सगळ्या वस्तूंचा मी कसा वापर करणार हे मलाही नव्हतं माहीत. पण त्याक्षणी मला जे जे सुचत होतं तसं करत गेले .मी अक्षरशः पळत आमची बेडरूम गाठली.दार घट्ट बंद केलं. या सगळ्या धडपडीमुळे दम लागला होता. पण इतक्यात बसायला वेळ नव्हता. हळूच ऐश्वर्याला उठवायचा प्रयत्न केला, पण ती गाढ झोपेत होती.तिला उचलून घेणं मला शक्य नव्हतं. तरीही तिला बेडवरून ओढत कसंबसं खाली घेतलं. कॉटच्या खाली जाऊन झोपण्याइतकी पुरेशी जागा नव्हती. म्हणून मग तिला कुशीत घेऊन खोलीच्या कोपऱ्यात बसून राहायचं ठरवलं. रस्त्याच्या बाजूला जी भिंत होती तिच्याच कोपऱ्यात बसणं सगळ्यात सुरक्षित होतं. कारण जर त्या बाजूच्या खिडकीतून हल्ला झाला तरी मी त्याच्या कक्षेच्या बाहेर सुरक्षित राहिले असते.त्या कोपऱ्यातलं बेडसाईड टेबल पुढे ओढलं आणि ऐश्वर्या ला घेऊन त्याच्या आडोशाला जाऊन बसले. स्वैपाकघरातून उचललेली अस्त्र-शस्त्र, टॉर्च,काठी वगैरे होतीच हाताशी. फायरिंगचा आवाज अजूनही चालूच होता, पण thankfully अजूनही तितक्याच लांबून येत होता. एकदा मनात आलं-'कदाचित आपलेच सैनिक नाईट फायरिंग ची प्रॅक्टिस करत असतील. आणि मीच उगीचच पॅनिक situation निर्माण करतीये.' तसं असेल तर चांगलंच होतं हो...in fact- 'तसंच असावं' - अशीच मी मनोमन प्रार्थना करत होते. पण 'Hope for the best, but be prepared for the worst' या उक्तीला धरून मी माझ्याकडून जेवढी शक्य होती तेवढी सगळी काळजी घेतली होती. आता वाट बघत बसण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एकीकडे देवाचं नाव घेत मी बाहेरचा अंदाज घेत राहिले..उरलेली सगळी रात्र मी जागून घालवली. पहाटे चारच्या सुमाराला हळूहळू फायरिंग बंद झाली. पण दिवस पूर्ण उजाडेपर्यंत मी ऐश्वर्याला घेऊन तशीच कोपऱ्यात बसून राहिले. सकाळी बाहेर रस्त्यावर कॉलनी मधल्या लोकांची वर्दळ सुरू झाली, तेव्हा माझ्या मैत्रिणीकडे जाऊन रात्रीच्या प्रसंगा बद्दल तिला विचारलं. तिच्या नवऱ्याची युनिट जम्मूमधेच असल्यामुळे तिच्याकडून खरी माहिती मिळेल ही खात्री होती. तिच्याकडून कळलं की खरंच आपलेच सैनिक नाईट फायरिंग ची प्रॅक्टिस करत होते. हे ऐकून जीव भांड्यात पडला. रात्रभर झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास एक क्षणात नाहीसा झाला.

पण ऐश्वर्याच्या "आई, मी कॉटवरून खाली कशी काय आले?" या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र माझी जरा तारांबळ च उडाली बरं का! पण या सगळ्या अनुभवातून एक जाणीव झाली..... शत्रूच्या हल्ल्याच्या नुसत्या कल्पनेनी माझी रात्रीची झोप उडवली होती....आणि तिथे सीमेवर आपले सैनिक चोवीस तास ही वस्तुस्थिती जगत असतात. त्याक्षणी आपल्या सैनिकांचा खूप खूप अभिमान वाटला ...आणि माझ्याही नकळत मी हात जोडून त्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना केली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.. सिविलियन्स ह्या सगळ्या प्रकाराची कल्पनाहे करू शकत नाहीत..
सहज कुतुहल म्हणून विचारतेय, महारा ष्ट्रात, नातेवाई कांच्या गोतावळ्यात येण्याचा ऑप्शन स्वीकारणं शक्य होतं का?
(तुमची परिस्थिती तुम्हाला माहित! पण अवघडलेल्या अवस्थेत असल्याने, विचारतेय.. सपोर्ट किती गरजेचा असतो हे जाणवतं अशा वेळेस त्यामुळे)

बापरे! हे फक्त वाचूनच अंगावर काटा आला. तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात असता याची कल्पनाच सिव्हिलियन्सना नसते. तुमच्या धैर्याला सलाम

नानबा, तुमच्या मनात हा विचार येणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्यावेळची परिस्थिती म्हणाल तर... माझ्या सासरी माझी धाकटी नणंद तिच्या दुसऱ्या बाळंतपणासाठी येणार होती..( आमची दोघींची due date एकाच महिन्यातली होती. ) आणि एकाच वेळी दोन बाळंतपणं करणं माझ्या सासूला physically शक्य नव्हतं. आणि माझी आई माझ्या लग्ना आधीच दिवंगत झाल्यामुळे माहेरी देखील जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला.

बाप रे!
खरंच कठीण आहे सैनिकांचेच आयुष्य नाही तर त्यांच्या कुटुंबियांचेदेखिल!

बापरे!
खूपच खडतर आहे तुमचं आयुष्य.
तुमच्या धैर्याला सलाम

_//\\_

बापरे.. सिविलियन्स ह्या सगळ्या प्रकाराची कल्पनाहे करू शकत नाहीत.. > +++१
खरच खूप अवघड आहे हे ..

Hmm.. I understand ur situation!
We can just think of what u all go through!