नात्यांची शिस्त

Submitted by कुलमुखत्यार on 25 February, 2019 - 10:03

आई- अहो, 3 दिवस झाले मिनू घरी आलीये, पण नेहमीसारखी बोलत नाही,काही विचारलं तरी नीट उत्तरं देत नाही, सुकल्यासारखी झालीये, तुम्हीच बोला ना तिच्याशी
बाबा- अगं, मी केला प्रयत्न, पण ती काहीच दाद देत नाही
तूच एक काम कर, आज तिला सुट्टी आहे, घरीच असेल ती,मीच काहीतरी कामाचं निमित्त काढून बाहेर जातो, तू बोलून घे तिच्याशी ,तुझं घरकाम वगैरे बाजूला ठेव आज जरा, जेवायला बाहेरच जाऊ.
मिनू, ए मिनू, उठलीस का बाळा,नाश्त्याला काय बनवू सांग???तुझ्या आवडीचे आप्पे बनवू की पोहे खाशील???
मिनूने उठल्यावर लगेच हातात फोन घेतला, शशांक चा msg आलेला नाही हे पाहून ती हिरमुसली. तिने क्षणभर आईकडे पाहिलं, किती उत्साहाने करते ही सगळं, किती आपलेपणा असतो कायम हिच्या वागण्याबोलण्यात ,नेहमीच फ्रेश असते आई. 30वर्षांचा संसार आहे आईबाबांचा पण किती प्रेम आणि विश्वास आहे दोघांमधे आणि आपण, एकच वर्ष झालय लग्नाला तरी........
आई- अगं, काय विचारतेय मी??? फोन ठेव तो आधी बाजूला
काहीही कर गं आई,मला नाहीये फारशी भूक ....तिचा उदास स्वर
बरं आजचा काय प्लॅन बाईसाहेबांचा????दोघांना सुट्टी आहे तर शशांकराव येणार असतीलच भेटायला किंवा कुठेतरी दौरा असेलच दोघांचा???
काय गं आई, उठल्यावर लगेच सुरू करतेस,मी माहेरी आलीये ना आता,राहू दे मला शांततेने इथे, सारखा काय त्याचा विषय काढून खोदून खोदून विचारत असता तुम्ही दोघं मला......
अगं, आजचा प्लॅन काय एवढंच विचारलं मी, राहू दे, शशांकराव येणार नसतील तर आपण करूया काहीतरी प्लॅन....काय????
आणि तो कधीच आला नाही , तर गं आई???(मिनूने पाणावलेल्या डोळ्यांनी आईकडे पाहिलं)
आता मात्र आईने तिला जवळ घेतलं, थोडं रडू दिलं, काय झालंय सांगशील का मला???
काही नाही गं आई,आहेत आमचे थोडेफार मतभेद, होतात अधूनमधून भांडणं, खूप काही मोठं नाहीये( मिनूने स्वतःला सावरलं)
अगं पण, छोट्याशा भांडणामुळे एवढी डिस्टर्ब झालीस तू??? कोणी काही म्हणलं का तुला ???
तोच तर प्रॉब्लेम आहे गं आई, कोणी काहीच म्हणत नाहीत मला सासरी, पण कधी कधी असं परक्यासारखं वागतात ना, की माझं काय चुकलं तेच कळत नाही मला. आमच्या आई खूप चांगल्या आहेत गं, पण कधीकधी त्यांना माझ्या काहि गोष्टी आवडत नाही असं वाटतं, त्या तसं बोलून दाखवत नाहीत पण मला जाणवत ते, मग आम्हा दोघींमध्ये एक विचित्र ताण निर्माण होतो, मग काहीवेळाने अचानक त्या नॉर्मल, पूर्वीसारखं वागायला लागतात, पण मी मात्र माझं काय चुकलं याचाच विचार करत राहते. हळूहळू या गोष्टीचं दडपण यायला लागलंय गं, कुठलीही गोष्ट करताना त्यांना आवडेल की नाही याचाच विचार असतो बघ मनात. कधी कधी अगदी एखाद्या मैत्रिणीसारखं वागतात बघ, आणि कधी 10 प्रश्न विचारले तरी एका शब्दात उत्तर.
सुरुवातीचे काही दिवस मी दुर्लक्ष केलं ,नंतर शशांकला सांगितलं तर त्याला वाटतंय मी आईंना समजून घ्यायला पाहिजे, आईंच्या कलेने घ्यायला पाहिजे. आमचे दादा वहिनी लग्न झाल्यानंतर त्याच घरी राहत होते, 2-3वर्षं ठीक गेली, पण नंतर ते वेगळे राहायला लागले, पण जाताना बरीच वादावादी झाली, बरीच भांडणं झाली, आणि ते आईच्या मनाला खूप लागलय , असं सतत मला सांगत असतो. त्याने माझ्या आणि आईंच्या मधला दुवा व्हावं, असं मला वाटतं गं, पण त्याचं हे भलतच . त्याचं असं म्हणणं असतं, आई काही बोललीये का तुला?? काही म्हणाली का???नाही ना.... मग तूच असा विचार करतीयेस , आईच्या मनात काहीच नसतं....
माझा खूप गोंधळ उडालाय गं आई, कसं वागायचं तेच कळत नाही,आणि ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या आणि शशांक च्या नात्यावर व्हायला लागलाय बघ......
आई- मिनू, प्रत्येक नवीन नातं हे एखाद्या काचेच्या भांड्यासारखं नाजूक असतं बघ. आपण एकमेकांची मनं जपण्यासाठी सुरुवातीला अनेकदा खोटं खोटं वागतो, समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मूळ स्वभाव बाजूला ठेवतो ,मग समोरच्याच्या आपल्याबद्दल अपेक्षा वाढतात आणि आपण मात्र ते नाटक करून दमून गेलेलो असतो, मग नावीन्य ओसरून एकमेकांचे मूळ स्वभाव समजत जातात, मग अपेक्षाभंग होतो आणि दुरावा निर्माण होतो.
कावेरीताईंचही असच काहीस झालं असणार,एक सून म्हणून त्यांच्या तुझ्याकडून काही अपेक्षा असतील,पण आधीच्या काही अनुभवांवरून त्या तुला स्पष्ट सांगायला चाचरत असतील, मग त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून त्यांना वाईट वाटत असेल आणि शशांकरावांचं म्हणशील तर , तुला जो तुमच्या नात्यात ताण जाणवतो तो त्यांना जाणवत नाही, त्यामुळे त्यांना ह्याचं काहीच वाटत नाही.
पण आता मी काय करू गं आई???
सगळ्यात आधी तू तुमच्या दोघींमध्ये तिसऱ्या कोणालाही घेणं सोडून दे,अगदी शशांकारावांनासुद्धा!
मग ह्या नात्याला शिस्त लाव. प्रत्येक नात्यामध्ये शिस्त असावी लागते बेटा आणि ती आपणच लावावी लागते. शिस्त लावायची म्हणजे, एकमेकांना काय आवडतं आणि काय आवडत नाही हे जाणून घ्यायचं आणि त्या भावनांचा आदर करायचा. आपल्याला आवडतं म्हणून समोरचा जेव्हा एखादी गोष्टं करतो ना, त्याहीपेक्षा आपल्याला आवडत नाही म्हणून एखादी गोष्ट तो करत नाही, तेव्हा जास्त आनंद होतो बघ.
सगळ्यात आधी कावेरीताईंशी असलेला तुझा संवाद वाढव. त्यांची मतं, त्यांचे विचार जाणून घे त्यांच्या आवडीनिवडी विचारून घे, त्यांना हळूहळू बोलतं कर. त्याचबरोबर तुझी मतं, तुझ्या आवडीनिवडी त्यांना सांग, तुझेही विचार त्यांच्यासमोर मांड. त्यांच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा जाणून घे, काही अपेक्षा तू पूर्ण करू शकणार नसलीस तर तसं त्यांना सांग, पण न चिडता आणि त्यांना न दुखावता. थोडा वेळ लागेल , पण हळूहळू त्या व्यक्त व्हायला लागतील, तुझ्याबद्दलच्या अपेक्षा तुला सांगितल्या तरी तू चिडत नाहीस हे कळल्यावर मोकळेपणाने तुझ्याशी बोलायला लागतील. तू स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोलतीयेस, नातं सुधारण्यासाठी प्रयत्न करतीयेस, हे त्यांना पटलं की त्यासुद्धा मागे राहणार नाहीत. मग दोघींमधला ताण आपोआपच नाहीसा होईल.
आणि तुम्हा दोघींचं नातं एकदा घट्ट झालं की तुझ्या आणि शशांकरावांमधला दुरावाही संपेलच.......
मिन- पण मला हे सगळं जमेल ना गं आई?????
आई- अगं, का नाही जमणार??? आजच्या जमानातल्या Smart मुली तुम्ही.......करिअर ,घर दोन्ही manage करता, शिवाय त्या इंटरनेट वर बघून काय काय शिकत असता........
मिनू- पण अशा गोंधळलेल्या नात्यांना शिस्त लावायला तुझ्यासारखी smart आईच हवी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं कावेरीताईंना आलेल्या पाहिल्या सुनेच्या अनुभवामुळे आपण मिनूच्या(ही) अपेक्षांना पुर्‍या पडणार नाही याचा ताण आला असावा. त्यांनी मिनूशी बोलून तिच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ते समजून घ्यायला हवं.

छान कथा आणि आजच्या काळासाठी अगदी उचित सल्ला !

नात्यात संवाद नसतो म्हणून हल्ली डिवोर्स प्रमाण भयंकर वाढलेले दिसते आणि चूक कळते पण वळत नाही अशी काहिशी स्थिती बहुतांश प्रकरणी असते.

प्रत्येक सासूने सुनेकडून अपेक्षा करताना , सुनेच्या जागी आपली मुलगी या अपेक्षेच्या संदर्भात कशी आहे , असेल , वागेल असा विचार केला तर त्या एकदम भानावर येतील ..
आणि सुनेने सासूच्या अपेक्षांच्या बाबतीत अशी अपेक्षा आईने केली तर आपण तिच्याशी कसे वागू हेही पडताळून पहावे !

मतभेद असणारच आहेत. ते सहजतेने स्वीकारले गेले पाहिजेत. कटुता येता कामा नये.
पूर्ण करता न आलेल्या अपेक्षांची भरपायी दुसर्या कुठल्या तरी , अपेक्षाही नसलेल्या क्रुतीने करावी.