Odd Man Out (भाग ९)

Submitted by nimita on 23 February, 2019 - 21:35

"Good morning" अचानक संग्रामचा आवाज ऐकून नम्रता क्षणभर दचकली. तिनी मागे वळून पाहिलं.. संग्राम हातातल्या ट्रे मधे चहाचे दोन कप घेऊन उभा होता. "माझ्याबरोबर चहा प्यायला वेळ आहे का मॅडम कडे?" संग्रामनी खट्याळ हसत नम्रताला विचारलं. "वाह! याला म्हणतात 'चोराच्या उलट्या बोंबा !" नम्रतानी पण तितक्याच खट्याळ स्वरांत उलटा टोला हाणला. त्याच्या हातातले चहाचे कप बघून तिनी विचारलं,"आज अगदी चहा वगैरे! काय झालंय नक्की? हे मस्का पॉलीश कशासाठी?" संग्राम काही बोलणार इतक्यात नम्रताच म्हणाली,"आज पण जायचंय वाटतं ऑफिसमधे ?"

संग्रामच्या चेहेऱ्यावरचा ' तुला कसं कळलं ?' हा प्रश्न अगदी स्पष्ट वाचता येत होता नम्रताला. त्याची उडालेली तारांबळ बघून ती म्हणाली," तू तर एरवी सुद्धा बऱ्याचदा रविवारी ऑफिस मधे जातोस. आता तर युनिट इथून हलणार आहे म्हटल्यावर कामाचं प्रेशर नक्कीच वाढलं असणार ना! त्यामुळे आता पुढचे काही आठवडे तुझ्याकडे आमच्यासाठी जास्त वेळ नसणार याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाहीये. त्यामुळे तू उगीच अपराधी नको वाटून घेऊ." पुढे होऊन ट्रे मधला कप उचलत ती म्हणाली,"वाह! स्पेशल चहा दिसतोय ..मला आवडतो तसा.. आलं घातलेला!"

नम्रतानी केलेली चहाची तारीफ ऐकून संग्रामची कळी खुलली. दोघंही बोलत बोलत बाहेर झोपाळ्यावर जाऊन बसले.

"सॉरी नम्रता, काल रात्री मुलींना झोपवता झोपवता मी पण झोपून गेलो." संग्राम ओशाळल्या स्वरांत म्हणाला.त्याच्या हातावर हात ठेवत नम्रता म्हणाली," अरे, it's ok. तू पण खूप दमला होतास काल. I can understand. तू असं उगीच सॉरी वगैरे नको म्हणू. तुला suit नाही करत ते." एकदम काहीतरी आठवल्यासारखी नम्रता म्हणाली," मुली उठल्या का? थांब, बघून येते." तिला थांबवत संग्राम म्हणाला," गाढ झोपेत आहेत दोघी. मी बघितलं मगाशीच. पण खरंच , काल रात्री बऱ्याच दिवसांनंतर मुलींबरोबर इतका वेळ घालवता आला. खूप बरं वाटलं गं!"बोलता बोलता संग्राम कुठल्यातरी विचारांत हरवल्यासारखा गप्प झाला. 'आता हे पुढचे काही दिवसच आहेत मुलींबरोबर, नम्रताबरोबर राहायचे... एकदा का युनिट फील्ड वर गेली की मग दोन अडीच वर्षांचा दुरावा...अर्थात अधे मधे सुट्टी मिळेलच म्हणा, पण ते म्हणजे- दुधाची तहान ताकावर !' संग्रामच्या मनातली ही चलबिचल त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याचं हे असं हळवं रूप बघून नम्रताला खूप गलबलून आलं. पण या बाबतीत त्याच्याशी काही बोलायचीही सोय नव्हती. कारण तिला माहित होतं..तिनी जरी त्याला विचारलं की 'कसला विचार करतोयस?" तर त्याचं उत्तर असणार होतं ," काही नाही."

त्यामुळे विषय बदलत नम्रतानी विचारलं," किती वाजता जायचं आहे ऑफिसमधे ? लंच पर्यंत येशील ना परत? आज मुलींना मनप्रीत कडे जायचं आहे. अंगद चा वाढदिवस आहे ना आज. त्याची birthday party संध्याकाळी आहे, पण तिनी मुलींना सकाळपासूनच बोलावलं आहे. अनुजाचा बेस्ट फ्रेंड आहे ना तो! त्यामुळे आज ब्रेकफास्ट नंतर दोघींना तिकडे घेऊन जाईन. थोडा वेळ थांबून मनप्रीतला संध्याकाळच्या पार्टी साठी थोडी मदतही करीन.तू जेव्हा ऑफीसमधून घरी यायला निघशील ना तेव्हा मला फोन करून सांग. म्हणजे मग मी पण निघेन तिच्या घरून."

"अरे वा ! म्हणजे आज अनुजा मॅडम चा तोरा विचारायलाच नको ! अंगद ला मिळणारी गिफ्ट्स ही घरी घेऊन नाही आली म्हणजे मिळवलं." संग्राम कौतुकानी हसत म्हणाला. "हो ना! पण जरी तिनी तसं केलं ना तरी अंगदला काही प्रॉब्लेम नसेल, बघ तू...दोघांचं चांगलंच मेतकूट जमलंय." त्याच्या बोलण्याला दुजोरा देत नम्रता म्हणाली.

"हो, काल रात्री आलं माझ्या लक्षात," संग्राम सांगत होता," अगं, काल रात्री दोघी मला त्यांच्या होमवर्क च्या वह्या दाखवत होत्या ना तेव्हा अनुजाच्या बॅग मधे मला अंगदची पण वही दिसली. मला वाटलं चुकून आली असेल हिच्याकडे...तू एकदा सांगितलं होतंस ना की दोघं एकाच बेंचवर बसतात म्हणून....पण चुकून वगैरे काही नाही..अंगदनी स्वतःच दिली म्हणे तिला...म्हणाला, 'कल मेरा बर्थडे है ना, इसलिये मेरा होमवर्क तुम करके लाओ।' आणि ही पठ्ठी पण अगदी इमाने इतबारे घेऊन आली...आणि जेव्हा मी तिला म्हणालो ना की- असं दुसऱ्याचं होमवर्क आपण नाही करू- तर डोळे मोठे करत मला म्हणाली -'पण अंगद च म्हणाला की 'बर्थडे के दिन कोई होमवर्क नहीं करता ' म्हणून ...आणि एवढंच नाही .. तर म्हणे अंगद नी हिला प्रॉमिस केलंय की हिच्या बर्थडे ला तो करेल दोघांचं होमवर्क - आता बोल!!!"

" किती निरागस असतात नाही लहान मुलं," नम्रता म्हणाली," तुला आठवतंय, नंदिनी जेव्हा प्ले स्कूल मधे होती तेव्हा एकदा तिच्या drawing ला दोन स्टार्स मिळाले होते आणि तिच्या मैत्रिणीला एक पण नव्हता मिळाला.. तेव्हा नंदिनी नी आपल्या वहीतला एक स्टार काढून त्या मैत्रिणीच्या वहीत लावला होता-आणि जेव्हा तिला कारण विचारलं तेव्हा किती सहजपणे म्हणाली होती...' तिच्याकडे एकही स्टार नव्हता आणि माझ्याकडे एक एक्स्ट्रा होता म्हणून मी माझ्याकडचा एक स्टार तिला दिला..सेम सेम व्हावं म्हणून!'

पुढचा काही वेळ दोघंही मुलींच्या आठवणींत रमून गेले. अचानक संग्रामला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला,"अगं, तुझं काय ठरलंय- कुठे राहणार तुम्ही तिघी?" त्यावर नम्रता म्हणाली," मुलींचं सेशन संपेपर्यंत तर इथेच राहाणं योग्य आहे. पण नंतर मात्र SF अकोमोडेशन मधे शिफ्ट करू."

"ओके, मग आज च मी पुण्यात SFA करता ऍप्लिकेशन पाठवायची तयारी करतो ," उठून आत जाता जाता संग्राम म्हणाला. "नाही, पुण्यात नको...तुझ्या युनिट च्या लोकेशन पासून जे सगळ्यात जवळ असेल ना त्या गावातल्या SFA मधे राहू आम्ही." नम्रतानी एक दमात सांगून टाकलं. तिचं उत्तर ऐकून संग्राम थबकला. मागे वळून तिच्याकडे बघत म्हणाला,"ते तर जम्मू आणि अखनूर दोन्ही ठिकाणी आहे ..चालेल का तुला? पण का गं .. पुणे का नको?"

"जम्मू मधे राहायला काहीच प्रॉब्लेम नाहीये मला." नम्रता त्यांचे चहाचे कप उचलून घेत आत जाता जाता म्हणाली. तिला मधेच थांबवत संग्रामनी विचारलं," पण पुणे का नकोय? मागच्या वेळी जेव्हा मी फील्ड मधे होतो तेव्हा तर तूच मुद्दाम पुण्याच्या SFA मधे राहायचं ठरवलं होतंस ना! मग या वेळी का नको ? काय झालंय नम्रता...तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना?" तिच्याकडे रोखून बघत संग्रामनी विचारलं.संग्रामची नजर चुकवत नम्रता म्हणाली."काहीही काय बोलतोयस?मी का बरं काही लपवीन तुझ्यापासून ? खरंच काही नाही झालं. पण आता यापुढे तुझ्या जितकं जवळ राहता येईल तितकं राहायचं ठरवलंय." पण तिच्या या उत्तरानी संग्रामचं समाधान नाही झालं; नम्रताला त्याच्या नजरेत अजूनही काही प्रश्न दिसत होते. पण त्यानी अजून काही विचारायच्या आधीच ती -' मुली उठल्या का बघते'- असं काहीतरी पुटपुटत घरात निघून गेली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा पुढे सरकत नाहीये. तिथेच तेच तेच प्रसंग येतायेत असं वाटतंय.>> रोजनिशी फॉर्मेट असावा. किंवा घरगुती जीवन रंगवून रंगवून लिहीले आहे.
राइज अँ ड फॉल ऑफ द थर्ड राइक नक्की वाचा लोक्स. ऑडिओ बुक उपलब्ध आहे. त्यात प्रत्यक्ष युध्हाच्या व आर्मी जनरल्स ना मिळालेल्या वागणुकीच्या कथा आहेत. रॉमेल स्वतः अतिशय आजारी असतानाही हिटलरने त्याला परत फील्ड वर पाठवले होते ते ऐकताना इतके कसे तरी होते. भले तो शत्रु साइडचा होता पण उत्तम योद्धा. शेवटी त्याची ही हत्या करवली गेली. युद्ध हरता हरता हिटलरने काही अतिशय काँपि टंट जनरल्स ना रशियातील युद्धातील पराभवाबद्दल दोषी ठरवून काढून टाकले काही ना कॅशिअर केले काहींवर कोर्ट मार्शल व मग खतम. ऑपरेशन बार्बारोझा मुळातूनच वाचायला हवे. युद्ध परिस्थितीची खरी माहिती मिळते. ग्राउंड वर काय हलाखीची परिस्थ्ती असू शकते व कोणत्याही परिस्थितीत ऑर्डर फॉलोच करावी लागते ह्याची कल्पना येते. कोणत्याही बाजूचे असेना सैनिक व ऑफिसर ह्यांची परिस्थिती खूपच अवघड असते.

ऑफिसर चे पर्सनल लाइफ बद्दल फारसे वाचायला मिळत नाही. ते अश्या वर्णनातून मिळते आहे मी पण काहीतरी घडेल म्हणून वाचत आहे. पुलेशु मॅडम.

बर्थडे के दिन कोई होमवर्क नहीं करता
Lol
किती गोड!
सैनिक duty वर असतात आणि त्यांच्या अर्धांगिनी मात्र multiple front वर लढत असतात. स्वतःच्या भावनीक लढ्याला तोंड देता देता अनेक जबाबदार्या सांभाळाव्या लागतात. असं असतानाही लहानग्यांचं भावविश्व खूप नाजूकपणे फुलवत आहे नम्रता. _//\\_