तू पूर्वीची राहिली नाहीस

Submitted by सई केसकर on 6 April, 2018 - 03:51

"माणसं बदलतात".
हे असं वाक्य नेहमी एखाद्या ब्रेकअप नाहीतर घटस्फोटाच्या प्रसंगी ऐकू येतं.
"इट्स नॉट यू, इट्स मी" वगैरे.

पण माणूस बदलण्याचं एक अत्यंत टोचरं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलंय, आणि त्याच्याशी माझ्या लग्नाचा थेट संबंध नाही.
माझ्या आईची जेव्हा आजी झाली, तेव्हा तिच्या भावनांनी जणू एकशे ऐंशीच्या कोनात गिरकी घेतली. पोराच्या बारशाच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी आजीबाई एक सुंदर सोन्याची (माझ्या मापाची) बांगडी घेऊन ठुमकत आल्या.
"ही माझ्या नातसुनेसाठी".

लहानपणी मला साधे (चॉकलेटविरहित) दूध प्यायला लावण्यासाठी एका उंच स्टुलावर बसवण्यात यायचे. चिरंजीवांनी दूध नाकारल्या नाकारल्या त्यांना पेढ्याचे बॉक्स पुरवण्यात आले.
"एक पेढा म्हणजे एक कप दूधच की!" शिवाय आटवलेलं. त्यामुळे बसल्या बसल्या सहा पेढे खाल्ले तर सहा कप दूध प्यायल्यासारखे होईल.
मग पेढ्यांबरोबर चॉकलेटं, आईस्क्रीम, गुलाबजाम हे असले सगळे दुग्धजन्य पदार्थ पंगतीला येऊन बसू लागले.
"आजीकडे गेल्यावर मला ब्रेकफास्टला गुलाबजाम मिळतो", असे चिरंजीवानी सांगितल्यावर ते नक्की विधान आहे की धमकी आहे याचा विचार करून मी बुचकळ्यात पडले. पण अर्थात आजी त्याला गुलाबजामच्या पाकात जिलबी बुडवून, त्याला चिरोटा लावून जरी वाढत असली, तरी मी माझ्या, पंचडाळीच्या धिरड्यापासून मागे हटणार नव्हते. सुरुवातीला सगळे पहिलटकर पालक करतात तसे आम्हीदेखील अतिशय क्लिष्ट नियम केले होते. मुलाच्या खाण्यात चमचाभर साखर घालताना, मला आपण त्याच्यात कोकेन घालतोय अशी भावना यायची. तसेच माझ्या आई बाबांना धाक लावून त्यांच्या घरी ही असली करूण नियमावली पाठवायचेही प्रयत्न झाले. त्या नियमावलीचा उपयोग बहुधा माझ्या मुलाच्या तोंडाला लागलेला पाक पुसायला झाला असावा. मुलगा बोलत नव्हता तोपर्यंत आम्हाला ही साखपेरणी छोट्या छोट्या पुराव्यांमध्ये दिसायची. शर्टावर पडलेला एखादा डाग, मुलाच्या तोंडाला येणार वेलदोड्याचा वास वगैरे. अशा गोष्टींकडे, आम्ही कानाडोळा करायचो. पण नंतर मुलानी, "आईकडचे (बेचव) जेवण विरुद्ध आजीकडचे (चविष्ट) जेवण" असा तोंडी प्रबंध सांगायला सुरुवात केली, तेव्हा नाईलाजाने आम्ही आमच्याकडील नियम शिथिल केले.

दीड वर्षाच्या कोवळ्या वयात मला शाळेत पाठवणारी माझी आई, नातवाच्या शाळेत जाण्यावर मात्र काहीही मतं व्यक्त करू लागली.
एक दिवस आजीच्या गाडीत बसून शाळेत जाताना, पोरानी आजी बरोबर आहे हे ओळखून एक करुणरसपूर्ण नाट्य सुरु केले. आजीच्या डोळ्यात डोळे घालून टप्पोरे अश्रू बाहेर काढले आणि झालं! शाळेच्या बाहेर गाडीत मुलगा आजीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून भोकाड पसरून बसला आणि त्याच्या बरोबर चक्क आजीसुद्धा अश्रू ढाळू लागली. "राहूदेत आज शाळा. नको रडवूस त्याला", असं म्हणून आईदेखील मुळूमुळू रडू लागली. मग केसात अडकलेले च्युईंगम काढायला जितके प्रयत्न लागतात, त्यापेक्षाही जास्त प्रयत्न करून मला आजीपासून नातवाला सोडवावे लागले. शाळेतल्या बाईंना माझी व्यथा सांगितल्यावर, आजी आजोबा असेच असणार हे आदिम सत्य त्यांनी मला सांगितले.
"नको रडवूस त्याला" हा वाक्य प्रयोग काळजाला घरे पडणारा आहे. कारण आपण साधारणपणे तीस वर्षांपूर्वी स्वतः असहायपणे अनुभवलेल्या परिस्थितीत, जे वाक्य म्हणायला आपली आजी नव्हती, तेच वाक्य तेव्हा आपल्याला रडवणारी बाई आता आपल्याला ऐकावतीये, हा केवढा मोठा दैवदुर्विलास आहे!
आणि एकूणच, "आई मुलाला रडवते" या वाक्यातील कर्त्याच्या डोक्यावर, त्या मुलाला बिघडवणाऱ्या सगळ्या मंडळींचे पापाचे घडे ठेवले जातात.

आणखीन वर, "आमच्याकडे असला की तो अजिबात हट्टीपणा करत नाही" हेदेखील असतं.
कसा करेल तो हट्टीपणा? तुम्ही त्याच्या मनातले, त्यालाही माहिती नसलेले हट्ट ओळखून ते पुरवण्याचा चंग बांधला असेल तर मुलाला फारसे कष्ट घ्यावे लागणारच नाहीत. एक दिवस डीमार्ट मध्ये मुलांना बसवून रिमोटने चालवायची गाडी असते तशी गाडी घेण्याचा मानस आजीबाईंनी व्यक्त केला. तसे केल्यास गाडी पुरवणाऱ्याच्या घरी ती गाडी आणि नातू कायमचे राहतील अशी धमकी देऊन तो आजीहट्ट मागे फिरवण्यात आला. नातवाला स्पीड ब्रेकरवरून गाड्या फिरवण्याची हौस आहे आहे असे कळताच, सुताराकडून दोन सुबक, लाकडी स्पीडब्रेकर बनवून घेण्यात आले. आणि घाई गडबडीचा वेळी त्यावर अडखळून पोराच्या आई बापानी पोराला कितीतरी साष्टांग नमस्कार घातले.

आपल्या आईच्या अशा वागण्याचा आपल्याला नक्की त्रास का होतो याकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भरपूर पाहून झाल्यावर, तिला तिच्या तरुणपणीच्या कुचकटपणाचा पश्चाताप होतो आहे, पण त्याचं प्रायश्चित मात्र ती माझ्यावर न करता माझ्या पोरावर करते आहे, हे माझ्या निदर्शनास आले. आणि मला म्हातारपणी असा पश्चाताप नको असेल तर सध्या मला पोराशी माझी आई वागते तसे वागावे लागेल हे भीषण सत्य समोर आले.
एकतर आपल्या नातवाला काहीही करू देणे हा किमान जोखमीचा मार्ग आहे. त्याची थेट फळं मुलीला भोगावी लागतात. आणि आजी आणि नातवाच्या या घट्ट नात्याचे कारण त्या दोघांचेही माझ्याशी असलेले सौम्य शत्रुत्व हे देखील असू शकेल. या सगळ्याचा उहापोह करून निष्पन्न असे काहीच झाले नाही. परिस्थिती हाताबाहेर जातेय असे लक्षात येत होते तोच मला एक रामबाण सापडला. माझ्या आईचा लाडवर्षाव सुरु झाला की मी माझ्या आजीचे गुणगान गाऊ लागते. अगदीच सुधारत नसली तरी त्यामुळे परिस्थिती थोडी आटोक्यात येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशयच सुंदर मांडलयं हे आजी - आजोबा आणि नातवंडे हे नातं....

मला मात्र माझी आई माझ्या मुलीचे लाड करायची ते मनाला सुखवायचे... आणि आपण जरा जास्तच काटेकोर आणि अतिरेकी शिस्तीची अपेक्षा करतो आहोत अस एक गिल्ट वाटायचा.

अगदी अगदी.
आमच्या आज्जीनी कधीच इतके लाड नाही केले आमचे. तिचं सगळं शिस्तीत असायचं. पण आता माझी आई मात्र माझ्या लेकीला अगदी असंच लाडावते.

'तिला खाऊ घालत जा', हे मलाही ऐकावं लागतं प्रत्येक फोन कॉल मध्ये Happy

360 डिग्री फिरतात पालक आजी -आजोबा झाले की. <<<< ३६० डिग्री फिरल्यावर माणूस होता तिथेच येतो.. तुम्हाला १८० म्हणायचे असेल..

मस्त लेख.. आजी आजोबा असतातच असे. माझे सर्वात जास्त लाड माझ्या आजीनेच केले. अजूनही करते.
लहानपणी माझी आजी शाळेत सोडायला, गरम डबा घेऊन मधल्या सुट्टीत यायची. तेव्हा माझ्या टिचर तिला बघून नेहमी म्हणायच्या 'दुधापेक्षा दुधाची साय जास्त महत्वाची असते'.
Happy

Pages