राजबिंडा गुंडा- महेश आनंद

Submitted by टोच्या on 12 February, 2019 - 07:57

11mahesh2.jpg... त्याचं नाव काय हे कालपरवापर्यंत कोणाला माहीत नव्हतं. ते माहिती असण्याची आवश्यकताही नव्हती. पण, जेव्हा तो पडद्यावर यायचा तेव्हा अवघा पडदा व्यापून जायचा... अभिनयाने नव्हे... त्याच्या धिप्पाड देहयष्टीने! गौरवर्ण, सरळ नाक, मोठे डोळे आणि मानेवर रुळणारे लांबसडक रेशमी केस...! हे लांबसडक केस त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भागच बनलेले होते, ते त्याला शोभून दिसायचे, त्याच्या रांगडेपणात भर घालायचे. तो काही मिनिटांसाठीच पडद्यावर दिसायचा पण, जेव्हाही समोर यायचा, कोणीही, कितीही मोठा हिरो असो.. त्याचं व्यक्तिमत्त्व याच्यापुढे खुजं पडणार एवढं मात्र निश्चित! चित्रपटातील हिरो गोलमटोल, थुलथुलीत दंड, थोडंफार पोट सुटलेला (आठवा ऋषी कपूर), किंवा अगदीच पाप्याचं पित्तर (आठवा अजय देवगण) असायचा, तेव्हा हा साइड व्हिलन तगडी बॉडी घेऊन वावरायचा. तेव्हा निश्चितच त्या हिरोंनाही कॉम्प्लेक्स येत असणार. या कलाकाराचं नाव महेश आनंद. चित्रपट सृष्टीतील चकाचौंध आयुष्याच्या आहारी गेल्यानंतर, त्यातील ऐश्वर्य भोगल्यानंतर प्रवाहातीन बाहेर फेकलं जाणं आणि त्यानंतरचे कित्येक प्रसिद्ध कलाकारांच्या वाट्याला आलेले सारे भोग महेश आनंदच्याही वाट्याला आले... इतिहासाची पुनरावृत्ती झाली... अनेक कलाकारांंप्रमाणेच महेशची अखेरही अगदी दुर्दैवी झाली. फ्लॅटमध्ये तो तीन दिवस मरून पडलेला होता, शेजारच्यांना दुर्गंधी यायला लागल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या बॉलिवूडलाही ९०च्या दशकातील गुंडांच्या फुटकळ भूमिका करणारा हा कलाकार गेल्याचे कळले. अर्थात तो गेल्याने कोणालाच काही फरक पडला नाही की श्रद्धांजलीचे पाट वाहिले नाहीत. कारण तो ना मोठा अभिनेता होता ना माध्यमांमध्ये चर्चेत होता. गेली अठरा वर्षे त्याला कामच मिळत नसल्याने तो अगदी पाणीही विकत घेऊ शकत नव्हता, इतकी त्याची दुर्दशा झाली होती.

महेश आनंद... एक मॉडेल. राजबिंडा चेहरा, धिप्पाड शरीरयष्टीची दैवी देणगी लाभलेला उमदा तरुण. अभिनेत्री किमी काटकरबरोबर तो कॉलेजात होता. साहजिकच, तो मॉडेलिंगकडे वळला. तो ट्रेन्ड डान्सर होता. कराटेत ब्लॅक बेल्ट होता. वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या कराटे स्पर्धांमध्ये तो भाग घेत असे. डान्स येत असल्याने त्याने बॉलिवूडमध्ये बॅक डान्सर म्हणूनही उमेदीच्या काळात काम केलं. याच दरम्यान तो माॅडेलिंगही करीत होता. तेव्हाच्या आघाडीच्या मॉडेलमध्ये त्याचं नाव होतं. मॉडेलिंगचा रस्ता पुढे चित्रपट सृष्टीला जाऊन मिळतो. जन्मजातच संपूर्ण हिरोइक मटेरियल लाभल्याने आपणही हिरो होऊ, या अपेक्षेने तो बॉलिवूडमध्ये आला. त्या काळात सिनेमा कसाही असला तरी त्यात फाइट सिन असलाच पाहिजे असा जणू अलिखित नियमच. मग त्यासाठी हिरोशी फाइट करणारे मजबूत गुंडही ओघाने आलेच. महेशलाही अशा भूमिका ऑफर होऊ लागल्या. पण, त्यातच तो अडकून पडला. अभिनयाची त्याला ना कधी संधी मिळाली, ना कधी त्याने तसा प्रयत्न केला. त्याच्या वाट्याला येणाऱ्या शॉट्समध्ये शक्यतो मारणे आणि मार खाणेच जास्त असायचे. एखादा बलात्काराचा शॉट, मुख्य व्हिलनच्या बाजूला उभे राहून दारू पिणे, मोठ्याने हसणे, किडनॅपिंग वगैरेच शॉट असायचे. त्याच्या वाट्याला आलेल्या चार दोन डायलॉगमध्येही तो किरण कुमारच्या संवादफेकीची नक्कल करायचा. ८० चा उत्तरार्ध आणि नव्वदचे पूर्ण दशक महेश आनंदसाठी सुवर्णकाळ होता. दर दुसर्‍या सिनेमात तो साइड व्हिलन असायचाच. बर्‍यापैकी पैसा, ग्लॅमर आणि बॉलिवूडच्या रंगारंग आयुष्याच्या तो आहारी गेला. तेव्हा दारू पिऊन त्याने अमिताभ बच्चनच्या घरासमोरच फुटपाथवर झोपलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घातली होती. त्यातून बच्चनने त्याला सोडवलं होतं. जो या चमचमत्या दुनियेतही जमिनीवर पाय रोवून उभा असतो तो टिकण्याची शक्यता असते. पण महेश आनंद प्रवाहाबरोबर वाहत गेला. त्याला भविष्यातील बदलांचा अंदाजच आला नाही. कपडे बदलावेत तशा त्याने बायका बदलल्या. तब्बल सहा लग्ने केली.. पण प्रत्येक बायको त्याच्या दारू आणि रंगेल वागण्याला कंटाळून निघून गेली. हळूहळू बॉलिवूडने कूस बदलली. मारधाडीचे सिनेमे कमी झाले आणि साहजिकच महेश आनंदसारख्या गुंडांच्या भूमिकांची गरजही. त्यामुळे गेल्या तब्बल १८ वर्षांपासून त्याला कामच मिळालं नाही. अक्षरशः तो खाण्यास मोहताज झाला. पाणीही तो विकत घेऊ शकत नव्हता अशी खंत त्याने फेसबुक पोस्ट करून व्यक्त केली होती. त्याच्या सावत्र भावाने त्याची सहा कोटींची फसवणूक केली होती. त्यामुळे तो स्वतः भणंग, एकाकी आयुष्य जगत होता. त्याला दारूचे व्यसन लागले. काही महिन्यांपूर्वी त्याने पहलाज निहलानींकडे कामाची अक्षरशः भीक मागितली. निहलानी गोविंदासह रंगीला राजा सिनेमा करीत होते. सिनेमाचं शूट पूर्ण होत आलं होतं. फक्त क्लायमॅक्स बाकी होता. त्यामुळे तुला रोल देऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. पण, महेश म्हणाला काहीही करा पण मला काम द्या. अठरा वर्षे झाली मला कोणी काम देत नाही. त्याची दया येऊन निहलानींनी त्याच्यासाठी क्लायमॅक्सला छोटासा रोल लिहिला. सेटवरही तो दारू पिऊन यायचा. शक्ती कपूरने त्याला दारू सोडण्याचा सल्ला दिला, पण तरी तो पितच राहिला. रंगीला राजातील हा रोल त्याचा अखेरचा ठरला. सिनेमा डब्यात गेला आणि महेश आनंदचं पुनरागमनाचं स्वप्नही. त्यामुळे तो अधिकच खचला. जास्तच प्यायला लागला. एकटेपणानं त्याला डिप्रेशनमध्ये ढकललं. त्याला कोणीही मित्र नव्हते.
महेशचं पहिलं लग्न अभिनेत्री रीना रॉयची बहीण बरखा रॉयशी झालं होतं. पण महेशचा रंगेल स्वभाव नडला आणि बरखा रॉयने त्याला दोन वर्षांत सोडलं. बरखा रॉयने सोडल्यानंतर महेशने १९८७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसोजाशी केलं. तिच्यापासून महेशला मुलगा झाला, ज्याचं नाव त्रिशूल आनंद. तिनेही दोन वर्षांत त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुलगा अवघा नऊ महिन्यांचा होता. आज त्रिशूल आनंद २९ वर्षांचा असून टोरंटोत आहे. पण, दुर्दैव हे की पुढे त्याच्या आईने त्याला अँथनी नाव दिलं आणि दुसर्‍या पित्यांचं वोहरा हे आडनाव लावलं. महेश आनंद आपला बाप आहे, हे मुलाला माहितीच नसणं यापेक्षा नियती काय क्रूर चेष्टा करू शकते?
महेश आनंदने तिसरं लग्न १९९२ मध्ये अभिनेत्री मधु मल्होत्राशी केलं. हे लग्नही टिकणं शक्य नव्हतं. काही काळात दोघे विभक्त झाले. २००० मध्ये त्याने अभिनेत्री उषा वाच्छाणीशी लग्न केलं, जे अवघं दोन वर्षे टिकलं.
उषा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. पण तिने महेशवर दारूच्या नशेत बलात्कार केल्याचा आरोप करून घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने एका स्रीबरोबर फेसबुकवर फोटो शेअर केला होता, ती आपली पत्नी असल्याचे त्याने म्हटले होते. २०१५ मध्ये तो पुन्हा बोहल्यावर चढला आणि रशियन महिला लेडी लाना हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली. तीही काही दिवसांतच त्याला वैतागून रशियाला निघून गेली. तो एकटा पडला.
महेश आनंद त्याच्या सिनेमांतील रोलसारखंच ग्रे शेडचं आयुष्य जगला. कायमच वादग्रस्त आणि अनिश्चित. त्याचे परिणाम त्याला भोगणे क्रमप्राप्तच होते. अलिकडे तो खूपच खचला होता. एकटेपणा त्याला खायला उठत होता. दोस्त कोणी नव्हते. नातेवाईकांचाही पत्ता नव्हता. मुलाच्या आठवणीत तो रडायचा. त्याने अलिकडेच टाकलेल्या भावनिक फेसबुक पोस्टमधून त्याने मुलाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाला त्याचा बाप कोण आहे हेही माहित नाही. मुला सुखी रहा, अशा गदगद भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्याने अक्षय कुमारचं जानवर सिनेमातलं 'तुझको ना देखूं तो जी घबराता है' हे बाप-मुलाचं गाणं शेअर केलं होतं आणि 'हे गाणं मला रडण्यास प्रवृत्त करतं' असं लिहिलं होतं. यातूनच तो अधिकाधिक पित गेला. तशातच काही दिवसांपूर्वी रात्रीतून त्याने या जगाचा निरोप घेतला. टीव्ही चालूच होता. जेवणाचे डबे बाहेर पडलेले होते. त्याच्या फ्लॅटमधून वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि मग महेश आनंद नावाचा कुणी एक कलाकार घरात मरून पडल्याचं बॉलिवूडला कळलं. अवघ्या ५७व्या वर्षी तो गेला. दुर्दैव हे की बॉलिवूडमधल्या कोणी त्याच्यासाठी दुःख व्यक्त तर केलं नाहीच, पण त्याचा मृतदेह ताब्यात घ्यायलाही कोणी येऊ नये, यापेक्षा वाईट काय असू शकतं? दादा कोंडके म्हणतात त्याप्रमाणे, मला पुढच्या जन्मी नाव, प्रतिष्ठा, प्रसिद्धी काहीच दिलं नाही तरी चालेल. फक्त आपली म्हणता येतील अशी माणसं दे. अशीच काहीशी भावना मरताना महेश आनंदचीही असेल. जशी मोठमोठ्या कलाकारांची अखेर झाली, तेच भोग या लहानशा कलाकाराच्याही वाट्याला आले. त्याचं आयुष्यही एक सिनेमाच बनून राहिलं.... सगळंच अनिश्चित. लहानपणी फायटिंगमध्ये हिरोला मारताना पाहून या महेश आनंदचा राग यायचा, आज त्याच्याविषयी दया वाटते. परमेश्वर असं आयुष्य कोणाच्या वाट्याला न देवो. श्रद्धांजली...
(इंटरनेटवरील माहितीचे स्वैर संकलन)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही माहीत नव्हतं यांच्याबद्दल. फोटो बघून आठ्वतदेखील नाहीय. भयंकर आयुष्य जगला....

महेश आनंद गेल्याची बातमी वाचली आणि मग फोटो पाहिल्यावर - अरे ज्याला किती तरी पिक्चर मध्ये खलनायक म्हणून पाहिले आहे त्याचे नाव महेश आनंद होते - असे वाटले. व्यसनापायी फार वाईट करून घेतले. तुम्ही लिहील्याप्रमाणे स्वतःला बदलता आले नाही आणि मग व्यसनाने जीव घेतला

चित्रपटांतल्या त्याच्या लहान सहान भूमिकांतही तो लक्षात राहिला होता.
भवानी जंक्शनमध्ये मजहर खानचा मित्र, विनोद खन्नाच्या जुर्ममध्ये संगीता बिजलानीला मारायला आलेला गुंड, गोविंदा करिस्मा कपूरच्या खुद्दार मध्ये ब्लू फिल्म्स बनवणारा गुंड, .....त्रिदेव की विश्वात्मा मध्ये जरा जास्त फुटेज होतं.

तुम्ही म्हणताय तसं लक्षणीय व्यक्तिमत्त्व होतं. पण गौर वर्ण ?

फक्त एकाच चित्रपटात त्याला सज्जन भूमिकेत पाहिलंय. महेश भटने वहिदा रहमानसोबत स्वयं हा चित्रपट केलेला. त्यात त्याने वहिदाच्या जावयाची भूमिका केलेली.

चुकीच्या वागण्याच्या बातम्या यायच्या. पण इतकी लग्नं केलीत हे माहीत नव्हतं. अशा प्रकारे शेवट व्हावा याचं वाईट वाटलं.

चक्क श्रीदेवीचा नियोजित वर होता सदमा मध्ये.
सस्ती दुल्हन मेहंगा दुल्हा चित्रपटात प्रिया तेंडुलकरचा हिरो होता.
९० च्या दशकात तो HIV Positive असल्याची बातमी होती. हा कैफियत मांडत फिरला अगदी स्वतःचे ब्लड रीपोर्ट दाखवून पण उशीर झाला होता.

बऱ्याच लोकांना, महेश आनंद म्हणजे कोण हे माहीतच नसतं.
हा व्हिलन म्हणून मला ही आवडायचा. जॅक गौड, डॅन धनोआ, माणिक इराणी ह्या मंडळींना लोक फक्त चेहऱ्याने ओळखतात, नावाने नाही!

शिर्षक 'राजबिंडा गुंडा - महेश आनंद' असं करता येईल का?

चांगली माहिती.आधी महेश आनंद गेला हेडलाईन वाचल्यावर मला हम साथ साथ है मधला नीलम चा नवरा गेला असं वाटलं.मग बातमी उघडून फोटो पाहिल्यावर 'अरे हा तर हा' असं झालं.बऱ्याच चित्रपटात हा असायचा.मला त्रिदेव मुख्य आठवला.
या मायानगरीत पाय जमिनीवर ठेवून राहणं कठीणच असावं.

अॅमी, अनेकांना तो माहितीच नव्हता. चेहऱ्यानेच तो ओळखला जायचा.
<<महेश आनंद गेल्याची बातमी वाचली आणि मग फोटो पाहिल्यावर - अरे ज्याला किती तरी पिक्चर मध्ये खलनायक म्हणून पाहिले आहे त्याचे नाव महेश आनंद होते - असे वाटले. व्यसनापायी फार वाईट करून घेतले. तुम्ही लिहील्याप्रमाणे स्वतःला बदलता आले नाही आणि मग व्यसनाने जीव घेतला>>
धनि, मलाही त्याचे नाव माहिती नव्हते.. पण अनेक सिनेमांत पाहिलेला होता त्याला.

भरत,
<<तुम्ही म्हणताय तसं लक्षणीय व्यक्तिमत्त्व होतं. पण गौर वर्ण ?

फक्त एकाच चित्रपटात त्याला सज्जन भूमिकेत पाहिलंय. महेश भटने वहिदा रहमानसोबत स्वयं हा चित्रपट केलेला. त्यात त्याने वहिदाच्या जावयाची भूमिका केलेली.>>
रंगाबाबत इतके आठवत नाही. मेकअपची कमाल असेल. सज्जन भूमिकेबद्दल मला माहिती नव्हतं. त्याने २००३ मध्ये एक सिनेमाही प्रोड्यूस केला होता, जो कधी आला, कधी गेला ते कळले नाही.

गुगु
<<चक्क श्रीदेवीचा नियोजित वर होता सदमा मध्ये.
सस्ती दुल्हन मेहंगा दुल्हा चित्रपटात प्रिया तेंडुलकरचा हिरो होता.
९० च्या दशकात तो HIV Positive असल्याची बातमी होती. हा कैफियत मांडत फिरला अगदी स्वतःचे ब्लड रीपोर्ट दाखवून पण उशीर झाला होता.>>
सद्मा अनेकदा पाहिलाय, पण त्याचा रोल आठवत नाही. नवीन माहितीबद्दल धन्यवाद.

च्रप्स, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
जावेद खान,
<<शिर्षक 'राजबिंडा गुंडा - महेश आनंद' असं करता येईल का?>>
नक्की करतो. धन्यवाद.

मी अनु
<< 'अरे हा तर हा' असं झालं>>
अशीच अनेकांची प्रतिक्रिया झाली त्याचा फोटो पाहिल्यावर...

सिनेमात येण्यापुर्वि, महेश आनंद जग्गु दादा सारखाच वाळकेश्वर/तीन बत्ती भागा मध्ये टपोरीगिरी करायचा. त्याच भागात पुढे मॉडेलिंग सुरु केल्यावर त्याचे होर्डिंग्ज बँडस्टँड च्या कॉनरवर लागलेले पाहिले आहेत. पण असा दु:खद अंत व्हायला नको होता. श्रद्धांजली...

खरंच राजबिंडा होता महेश आनंद, पण व्यसनाने आणि डोक्यात चढलेल्या यशाच्या धुंदीने घात केला त्याचा.
लेख वाचून हळहळ वाटली त्याच्याबद्दल.
श्रद्धांजली!!!

बापरे, स्वत:च्या हाताने बरबाद केलं स्वत:ला. बरखा रॉय आणि त्याचे लग्न झालं तेव्हा फोटो बघितलेले, शाळेत होते मी त्यावेळी. नंतर इतकं काय काय काही माहिती नव्हतं. एक छान personality वाला मॉडेल अशी ओळख होती तेव्हा.

असं वागायचा तरी personality मुळे लोकप्रिय होता बहुतेक म्हणून मुली भाळत होत्या की काय.

वाईट झालं, श्रद्धांजली.

किती वाईट!
चेहऱ्यानेच माहीत होता हा नट.

शेवटची टीप कोणती?
(इंटरनेटवरील माहितीचे स्वैर संकलन)

ही का आवडली म्हणताय?