फिर्याद

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 February, 2019 - 05:43

फिर्याद
म्या दादांचा मोठा मुलगा शंकर . शेती करतो. रग जिरवायला पैलवानकी करतो . सरळ तर सुत न्हायतर वडावरच भूत. कुणी मस्करी केली की म्या त्याची कुस्करी करतोय.

आवं गावातली बेनी कायपण चिडीवत्यात मला. म्या नाय भीक घालत कुणाला. चिडावलं की चितपटच करतूया. हिसाब जिथला तिथं रोखठोक. म्हंजी ठोक लगीच, उधारी नाय.
लोकं मला नवनाथातला अडबंगनाथ म्हणत्यात. कुणी म्हणत्यात
" शंक-या तुझा मेंदू गुडघ्यातच लका." म्या लगीच शड्डू ठोकतो. आपल्याला तिसरा डोळा उघडायचा अवकाश समोरचं गप्पगार होतय. मला असाच राग येतो जव्हा लोक मला हरिश्चंद्राची अवलाद म्हणत्यात. खरंतर चिडण्यासारखं काही नाही त्याचात. कारण आमच्या दादाचं नाव हरिश्चंद्र पण लोक ते हेटाळणीच्या सुरात म्हणत्यात ते आवडत नाही.

दादानी माझ्याही गळ्यात जन्मताच माळ घातली. साळत पाठावलं पण ती उजळनी, मुळक्षरं माझ्या मुळावं उठायची. आन बाराखडी आमचं बारा वाजवून मास्तरच्या नावानं खडं फोडाया लावायची. शिक्षाणापेक्षा खोड्याच जास्त करायचो . एकदा दुपारच्या सुट्टीत पवायला गेलतो. साळत यायला उशीर झाला . मास्तरला खरं सांगितलं पवायला गेलतो म्हणून. खोटं बोललो नाय. तरी लै हाणला मास्तरनी. ख-याची दुनियाच नाय. मास्तरला म्हणलं गुर्जी भिंतीवर तुम्हीच लिवायला लावलं ना "सत्यमेव जयते", "खरे बोला म्हणून" ?
मंग म्या काय चुकलो.
मला शिकावतो व्हयरं कार्ट्या. मास्तरनी सोलटून काढला.
पण दादा म्हणायचं माळकरी कधी खोटं वागत नाही. आवं किर्तनात बुवा म्हणलं "सत्त्याचा वाली परमीसर" पण आमच्या सत्त्याचा मास्तरबी वाली नाय. आमचं दादा कलीयुगातलं राजा हरिश्चंद्रच जणू. सदैव त्यांची सत्वपरिक्षा ठरलेली. तसा म्या दादांचाच मुलगा म्हणतात ना कुंभार तसं गाडगं आन् गुरु तसा चेला .

एकदा भग्या मला आई×× म्हणला. मरंस्तवर हाणला.
मास्तरनी मला धू धू धुतला. दुसऱ्या दिवसापासून साळत जाणार नाही म्हणून घरी बसलो.दादांनी खूप समजावून पाहिलं पण म्या काय बधलो नाय. म्या म्हणालं
"मी शेती करीन. मला कुठं साहेब व्हायचंय शिकून."
म्या आपल्या मनाचा राजा कुणाचा गुलाम व्हणार नाही.
दादांनी हात टेकलं.

माझी साळा सुटली आन् पाटी फुटली. तवाधरणं शेतीच करायला लागलो . पण शेती अगदी झोकात करतो. दुसऱ्यांच्या शेतीत चार पाच गडी राबून जेवढं पिक येईल तेवढं म्या एकटाच काढतो . समदी पिकंही डौलदार असत्याती. घरात धनधान्याच्या कणगी भरलेल्या असतात. शेतात दिवसभर राबून सांच्याला कुस्तीच्या आखाड्यात उतरतो. एखाद्या पैलवानाला चीत केले तर सोड म्हणेपर्यंत सोडत नाही. त्याचं कान कोपरानी घासून घासून लाल करतो म्हंजी त्याला माझा राग येऊन जोरानं माझ्याशी कुस्ती खेळल. आपल्याला त्याची आणि आपली दोघांची तब्येत सुधारायची असती. नाहीतर तुम्ही म्हणाल अक्करमाशी हाय. अगदी दमेपर्यंत जोर-बैठका मारतो. मुद्गल फिरवतो . मलखांब खेळतो. जेवायला बसल्यावर पाच सहा भाकरींचा मुडदा पाडतो. तांब्याभर कालवण रिचवतो. तोंडी लावायला चार-पाच हिरव्या मिरच्या . असं आपलं उग्र वारकरी रूप .
"भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी"

दादा म्हंजी सात्त्विक माणूस. गावातल्या मोजक्या आदर्श माणसांपैकी एक. शिक्षण जुनी फायनल सातवीपर्यंत . आव फायनल म्हंजी आक्षी फायनल. एकदा एखादी गोष्ट कुणाला समजत नसली आणि दादांनी समजावली तर त्याच्यापुढे पष्टीकरणाची गरज नसायची. गावात शाणासुरता म्हणून सगळ्यांचा मान होता. त्यात गडी वारकरी पंथाचा. संतांच्या शिकवणुकीवर देह पोसलेला. भजन-कीर्तनात लय रमायचं. त्याकाळी शाळामास्तर म्हणून नोकरीला सहज लागलं असतं. पण घरचा जमीन-जुमला भरपूर, काय करायची नोकरी. दारात १०-२० जनावरं दावणीला होती तव्हा. दूध दुभतं भरपूर. रात्री तुपात खारका भिजवायला टाकायच्या आणि सकाळी उठून खायच्या. पण जसजसं दुष्काळाचं प्रमाण वाढलं तसतशी जित्राबं कमी करायला लागली .
गावात कुणाला काय आडलं नडलं तर दादा मदत करायचे. कोण मोटं साठी बैल घेऊन जायचं तर कोण औत घेऊन जायचं. न्ह्यारी करताना कोणी दारात आलं तर त्याला जेवल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही हा शिरस्ता घरचा. पण ह्याचा त्रास आईला व्हायचा. दादांनला बारा वाजता कोण गावात भेटलं आणि आई रानात जायच्या तयारीत असली तरी दादा त्याला घरी घेऊन यायचं आणि आईला म्हणायचे दोन भाकऱ्या कर अन त्यांना जेवायला वाढ. कधीकधी दिसभर चुलीतला इस्तू इझायचा नाही.

कुणाला मुलांच्या शिक्षणाला पुस्तकं लागली. पैसे कमी पडले तरी मदत करायचे. शेतमजूर, बलुतं शेतातला भाजीपाला खुशाल घेऊन जायचे. कोण दूध मागायला यायचं तर कोण ताक मागायचं. दादांचे एकच म्हणणं हरी देतोय , मी का हात आखडू.

लोक त्यांना आदरानी दादा म्हणायचं. दादाचं घर म्हणजे गावकऱ्यांना आपलंच घर वाटायचं. लोक आमच्या घरी इनासंकोच यायचे , बसायचे, बोलायचे. चहापाणी व्हायचं. बहुतेक गप्पा साधूसंतांविषयी असायच्या. स्वभाव सरळमार्गी त्यामुळं गावातलं बेरकी लोक देखील वचकून असायचं पण पाठीमागं कारस्थानं रचायचे. त्यांना दादांना मिळणारा मानमरातब, आमच्या घरचा सुकाळ डोळ्यात खुपायचा.

म्या बी दादा सारखा सरळ पण रागीट . कोणी अरे म्हटले तर माझं कारे ठरल्यालं.

गावच्या शीववं दक्षिण दिशेला आमचं एक दहा एकराचे शेत हाय. एक हिर हाय. त्या शेताला छान बांधबंदिस्ती केलीय. बांधावर चांगलं गवात राखलय. काही बाभळीची आणि लिंबाची झाडे देखील वाढू दिली . आमच्या शेताच्या पश्चिमेला दगड्याचं वावार हाय . झाडांवरून दोरी धरली की दगड्याने बांध किती सरकवला हे मला सहज कळायचं . झाडांची दुपारच्या पारी सावली व्हती जेवतानी. पाखंर येत्यात आस-याला. सकाळ-संध्याकाळ चिमण्यांची साळा भरतीया. त्यांचा किलबिलाट शीन हलका करतो.

दगड्या लय वंगाळ बेनं. सारखं काकरी काकरी बांध कोरायचं . समदा बांध माझ्या हद्दीत होता. त्यामुळं मला खोटेपणाचा राग यायचा. दगडयाला किती यळा सरळ केला तरी त्याला खुमखुमी यायची कधी कधी. तो बांधावरचं झाड पाडायचा.
म्या - दगडू हद्द माझी. झाड माझं.वाढावलं म्या. एक झाड वाढाया कैक वरीस जात्यात. पाडाया काही मिनिटं.
दगडू- माझ्या वावरात वलसावट व्हती. माझं पीक मरतं.
म्या - आरं वाद़या माझ्या वावरात बी वलसावट येतीया. माझं बी पीक मरतया. आरं तुझ्या वावरातली माती, झाडं आन बांध नसलं त माझ्या वावरात येईल पावसाळ्यात चालल का?
दगडू - ते पुढचं कुणी पायलय.
म्या- तुझं राव्हदे आन माझं बी राव्हदे. आपुण दादाला इचारु.
दादा दगड्याला म्हणत - अरं पोरा आपण संत परंपरेतली माणसं. तुकाराम महाराज म्हणायचे
" वृक्षवल्ली आम्हा सोयरे " . आरं झाडं, यली म्हणजी आपलं सोयरं. आपलं जगणं सोयरंधायरं असलं की सोप्प होतं. घरा, गोठ्याला , शेतीला, जाळायला लाकूडफाटा होतो. चार पाखरं इसावत्यात. पाऊसपाणी व्हतं . पायझी तं तू लाव झाड बांधावर म्या काय म्हणायचा नाय. मला नाही वलसावट व्हायची त्याची.

दगडू तेव्हड्यापूर्ती मान हलवायचा. पण अंतर्यामी दगडच तो त्याला काय पाझर फुटणार. त्याचं आपलं मागचं पाढं पंचावन्न.
सगळं समजलं तरी त्यो मुद्दाम न समजल्याचं स्वांग घ्यायचा. कारण यकदा झाड त्वाडलं की बांध सरकावयाला मोकळा. मला त्याचा कावा माहीत व्हता.

एकदा शेतात क्वाण नाही ही बघून दगड्यानी बांधावरचं बाभळीचं झाड त्वाडलं. दुसऱ्या दिशी म्या रानात गेल्तो. बघतो तर बाभळीचं झाड तुटून पडल्यालं. म्या तसाच दगड्या शेतात काम करत होता तिथं गेलो आन दगडयाला वर उचलून गरा गरा फिरवून जोरात आपटला. दगड्या आई, आई करून वरडायला लागला . मग म्या त्याला सोडून दिला. त्याला दम भरला ...
"परत झाड तोडलं तर तंगडी मोडून हितच गाडील."

म्या दगड्याला सरळ विचारलं असतं तर कवचित दगड्या खोटं बोलला असता. झाड पाडलं नाही म्हणून.

दगड्याच्या आन माझ्या बांधावरून किंवा झाडावरून कुरबुरी ठरलेल्या असायच्या. खरंतर बांध आन झाडं संपूर्ण आमच्या हद्दीत होतं. तरी दगड्या कधी बांधावर गुरं चार, बांध सरकव, झाड पाड अशा कागाळ्या करायचा.
दगड्यात खोटंपणा होता मला चांगला माहीत व्हता. तो गावात फक्त मलाच घाबरायचा.

एकदा दगड्यानी आमच्या उसात पेटती काडी टाकली. ऊस पेटला. जवळजवळ पाव एकर ऊस जळून खाक झाला. म्हादानं इझावला.
दगड्याच्या पल्याड म्हादूचं वावार. त्यानी हे पाहिलं आन मला सांगितलं. म्या दगड्याला झोड झोड झोडला. म्हादा मधी पडला म्हूण वाचला.

संध्याकाळी दादांनी पंचायत बोलावली. पंचांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं.
दगड्याला इचारलं तू आसं का केलेस?
यावर दगड्या म्हणला
" मला काय ठाऊक नाही ? म्या केलं नाही "
म्या म्हणलो
" हे त्वाच केलंय. त्याला उसात काडी टाकताना या म्हादूनी पाहिलं."
पंचांनी म्हादाची साक्ष काढली. तो म्हणला
"त्यादिशी म्या कपाशी खुरपत व्हतो. एकाएकी ऊसाला आग लागली आण दगड्या तिथून पळताना म्या पाहिला. म्या इझावला ऊस."
यावर दगड्या म्हणला
"मी पण माझ्या वावरात पाणी धरीत होतो. आग इझवायला बादली आणण्यासाठी मी पळत होतो. पण बादली घेऊन येई पर्यंत ऊस जळाला होता."
यावर पंच म्हणाले
"ह्यो म्हादा तर एक खुटान लांब व्हता उसापासून . तू जवळ होता. दुसरी कुणी लावली आग तर त्यो तुला दिसला असता."
एवढ्यात म्या डोळं फाडून दगड्याकडं बघितलं आन दगड्याची इजार वली झाली.
दगड्याला कळून चुकलं की आता आपली लबाडी पचत नाही. तो म्हणला
"माझी का अशी बुद्धी फिरली मलाच कळंना . मला काय झालं कुणास ठाऊक म्हणून मी जळती काडी ऊसात टाकली."
"मी चुकलो. मला माफ करा . तुम्ही जो काय दंड कराल तो मी भरायला तयार आहे."
यावर पंचांनी हिसाब केला . उसाच्या लागवडीसाठी आणि वाढीसाठी मला किती खर्च झाला याचा. त्यांच्या अंदाजाने वीस हजार रुपये झाले. पंचांनी त्याला 20000 देण्यास सांगितले. त्याला तो तयार झाला. मी त्याला मारला म्हून मला दोन हजार दंड केला.
मला दादांनी समजावलं प्रत्येक गोष्टीला हमरीतुमरीवर येऊ नये. काही गोष्टी तंट्या शिवायही सुटू शकतात.
म्या - अहो दादा याला लाथचीच भाषा समजते त्याला मी काय करणार.
दगड्या कायम धुमसायचा प्रत्येक वेळी आपण पकडले जातो म्हणून. आता तर दगडयाला म्हादाचा पण राग आला. त्यानं म्हादावर एक हिणकस कटाक्ष टाकला.
म्हादा - "आरं जा माकडा बघतोस काय ? तुझ्यासारखं लय बघितल्यात खोटारडं . लेका सोन्यासारखी माळकरी माणसं, त्यांना त्रास देतुयीस कुठे फेडशीला."
पंचांसमोर दगड्या गुपचूप निघून गेला. दगड्याने एक हप्त्यात पंधरा हजार रुपये मला दिलं. पण हे सगळं दगड्याच्या मनात घर करून बसलं.

एक दिवस म्हादाच्या वावरातला जोंधळा खुडल्याचं म्हादाला दिसलं, पण कुणी खुडला ते काय कळना. म्हादाला दगड्याचा संशय आला पण पुरावा नसल्यानं तो काय करु शकला नाही.

असे पाच सहा महिने जरा निवांत गेले..

आन एकदाचा तो दिवस उजाडला. आमच्या रानात खालच्या अंगाला आम्ही एक हिर खानल्ली. ती बारूमाही पाण्यानी भरलेली असती. त्याच्या बाजूलाच दगड्याची हिर हाय पण तिला एवढं पाणी नाही. म्या सकाळी मका भिजवायला रानात आलो. इंजान चालू केलं आन् ह्यिरीत डोकावलं तर ह्यिर खपाटी गेलेली. म्या चक्रावलो. असं कसं व्हईल, हिरीतलं पाणी उलटं झ-यात जाईल. मी हिरीच्या काठाकाठानी फिराया लागलो. एका जाग्यावं माणसाची पावलं दिसली, पाईप काठाला घासल्याची खूण दिसली. हितं तिथं पाणी सांडलं व्हतं . पाण्याचा आन पावलांचा माग काढला तर त्यो थेट दगड्याच्या कांद्यात. दगड्याचं कांद्याचं वावार वलं व्हतं. डोक्यात तिडीक गेली. तसाच तडक दगड्याच्या वढ्याच्या पड्यालल्या वावरात दगड्याला इचरायला आलो. पण दगड्या नव्हता तिथ. मग म्हणलं संध्याकाळी घरी जाऊनच इचारू. परत गेलो. हिरीत जेवढं पाणी होतं तेवढं मकला दिलं आन दिवस मावळायला गावात आलो. माझ्या घराकडं न जाता तसाच आल्या पावली दगड्याच्या घरी गेलो. दगड्या वसरीला बसला होता . त्याची चार पोरं पण वसरीला बसली होती. म्या त्याला म्हणलं

लेका दगड्या खरं सांग हिरीच पाणी कोणी काढलं.
दगड्या : म्या नाय. माझ्या इंजनाच्या पायपानी.
म्या - लाज वाटती का इंजनाच्या पायपानी काढलं म्हणायला.
दगड्या :- माझ्या इंजनाचा पाइप म्या कुठं बी फिरवल. तुझी हिर मधी आली म्या काय करू.
दगड्याची पोरं घरी होती म्हणून त्याला लय जोर आलता. पण म्या काय भितो त्याला. केला चित्पट. आन बसलो उराव. एवढ्यात दगड्याची पोरं आली काठ्या घेऊन. मला लय झोडला काठ्यांनी. दगड्या माझ्या हातून निसाटला. तरीपण ते सगळे मला मारतच राहिले. बघ्यांची गर्दी जमायला लागली. पण काठ्या पाहून कोणच मधी पडायला तयार होईना. त्यातलंच कोणतरी माझ्या घरी सांगायला गेलं. माझी कारभारीन पारु घरी होती. ती आली. बघती तर म्या खाली पडल्यालो आन दगड्या आन त्याची पोरं करडी झोडल्यागत मला झोडत व्हती. तिनं कसला इचार न करता मला कवळ घातली तसं दगड्या आन त्याच्या पोरांनी मारायचं थांबवलं. तवर तिला दोन-चार काठ्या बसल्याच होत्या. आता म्हादा आन बघ्यातलं काही लोक पुढं आलं आन त्यांनी भांडाण सोडावलं. मला उठवत नव्हतं पण दोन गड्यांच हात धरुन उठलो. म्या उठल्यावर बायकूचा तोंडपट्टा जो चालू झाला थांबायलाच तयार नव्हता. लै शिव्या दिल्या तिनं दगड्याला.

कसं बसं चार बघ्यांनी आम्हाला घरी सोडलं. आंग पार मोडून गेलं व्हतं. पारुनी ईट गरम केली आणि माझं आंग शेकलं. गरम गरम चहा करून दिला. चहा पिल्यावर तरतरी आली. तोपर्यंत दादा अंगणात आलं होतं. दादांना म्या सगळं सांगितलं. दादा म्हणलं आत्ताच्या आत्ता पोलीस पाटलाला जाऊन वर्दी दे. सारखं काहीतरी खोड काढतयं. म्या म्हादाला घेऊन पोलिस पाटलाच्या घरी गेलो तवा समजलं पोलीस पाटील घरात नाही. म्हणून म्हादा त्याच्या घरी गेला आणि मी माझ्या घरी आलो.

घरी आल्या आल्या पारुनी इचारलं काय झालं मी तिला सांगितलं पाटील घरी नाही. दादा म्हणला उद्या बघ. पारुनी समद्यांना जेवायला वाढलं. आम्ही सगळेच हात राखून जेवलो. कुणाच्या घशाखाली घास उतरत नव्हता. झालेला अपमान सारखा खुपत होता पायात काटा टोचावा तसा. पारु पण कशीबशी जेवली. भांडीकुंडी झाली आणि चुलीतल्या निखा-यावर पारु पाठ शेकत बसली. म्या म्हणलं लय लागलं का तर म्हणाली नाही एवढं नाही पण अंग दुखतंय म्हणून शेकतेय. माझ्या डोक्यात सारखं येत होतं की आता दगडयाला रानात एकटं भेटल्यावर सोडायचा नाही. काय होईल ते होईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघूळ आटापली. चहा पिऊन पाटलाच्या घरचा रस्ता धरला. पण पाटील रानात गेला होता . मग ठरवलं आता थेट मल्हारगडला जाऊन पोलीस स्टेशनला नोंदवायची. घरी येऊन पारूला आन दादांना तसं सांगितलं. पारुच्या भाकऱ्या झाल्या होत्या. कोरड्यास पण झालं होतं. म्या कोरड्यास भाकरी खाल्ली. वाढग्यावर गेलो. बैलांना पाणी पाजलं वैरण टाकली आणि पुन्हा घरी आलो. पारुला म्हणलं म्या मल्हारगडला पोलिसात फिर्याद नोंदवायला जातो तू बैलं सांभाळ. तिनं एका फडक्यात ठेचा आणि भाकर गुंडाळून दिली.

म्या सायकलीवर टांग मारली आणि जांभळीच्या वाटनी मल्हारगडला निघालो. वाट कसली नुसतीच पायवाट. तिच्या दोन्ही अंगाला डोक्या इतका वाढलेला जोंधळा वाऱ्यावर नुसता सू सू करत होता. त्याच्यातून डोळ्यासमोरचा जोंधळा आणि पायवाट सोडून काही दिसायचं नाही. सायकल मधीच चकार सोडून जोंधळ्यात घुसायची. मग मला खाली उतरून पुन्हा वाटेवर यायला लागायचं. कुठं कुठं जोंधळा भिजवला होता आणि ओल्या रानात चिखल झालेला असायचा मग मला सायकल खांद्यावर घ्यायला लागायची. तर कुठं कुठं भिजवलेल्या रान वाळलं होतं. त्याच्यातून सायकल जाताना खडखड खडखड आवाज यायचा. सायकल चालवताना जरा नजार हिकडं तिकडं झाली की पटकन वाट सोडून पुन्हा सायकल ज्वारीत घुसायची. मधेच एखादा बांध आडवा आला की परत उतरायला लागायचं. बांधावरचा काटं कुटं चुकवायला लागायचं. समोरून कोण आलं तरी वाट एवढी अरुंद व्हती त्यामुळं पुन्हा खाली उतरायला लागायचं. शेतमळं, वडं, नालं ओलांडून मल्हारगड येईस्तवर सायकल चालवून घामटा निघायचा. गाडी वाटनं जायचं तर मोठाल्या फुपाटयाच्या चकारीतून सायकल चालवताना तोंडाला फेस यायचा. रेल्वेचं फाटक वलांडलं की कुदळे मळा आला. मोट चालली व्हती. सायकल स्टँडला लावली आन वंजळीनं पाटातलं पाणी घटाघटा प्यालो. पारुनं दिलेली भाकर आन ठेचा खाल्ला. थोडं पाणी प्यालो. आता कुठं जीवात जीव आला.

सायकलीवर टांग मारली आन सरळ पोलीस चौकीच्या जवळ येऊन उतरलो. सायकल स्टँडला लावली. कुलूप लावलं आन बाहेरच्या बाकड्यावर थोडावेळ बसलो. मनावर खूप दडपण आलं होतं. मी काही चुकीचं वागलो तर नाही ना असं सारखं वाटायचं. आज पर्यंत कधीच कोर्टाची आणि पोलिसांची पायरी चढलो नव्हतो. त्यामुळे आतून चांगलाच टरकलो होतो .

तेवढ्यात आतून एका पोलिसाचा जोरानी आवाज आला
" घ्यारं त्या भडव्याला आत . बघू कसा कबूल होत नाही. दोन-चार पडले की घडाघडा बोलायला लागेल."
आन कुणाच्या तरी दोन-चार थोबाडीत दिल्याचा आवाज आला.
आता माझ्या नाडीचं ठोकं चांगलच वाढलं व्हतं. लहानपणापासून हेच डोक्यात की सत्याचा विजय होतो. पण पोलिसांविषयीच्या ऐकीव कथा मनात भीती निर्माण करत व्हत्या. त्याप्रमाणं मनाची तयारी करत होतो. कुठला प्रश्न विचारला तर काय सांगायचे ह्याची.
समोर एक टेबल होता त्याच्या बाजूला एक पोलिस बसून समोरच्या खुर्चीतल्या दोघाजनांशी काहीतरी बोलत व्हता. बहुतेक ते फिर्याद नोंदवायला आले व्हते. ते नवरा-बायको व्हते. नवरा दारू प्यायला व्हता आणि बायको त्यांनं तिचं डोरलं चोरलं असं सांगत होती. दारुडा म्हणाला
" साहेब मीssss कsssसा चोरेssल हिचं डवॉरलं ?"
"साहेब माझा नवरा लय भंगार हायं. कामबीम काय करत नाय. म्यि चार घरची धुणीभांडी करती आन ह्याला सांभाळती. पण दारू प्यायला पैसं कमी पडलं म्हणून ह्यानी माझं डोरलं चोरलं."
हवालदारानी त्या दारुड्याच्या चार-पाच थोबाडीत मारल्या जोरात आणि म्हणाला भडव्या सांग घेतलं का नाय?
"व्हय साहेब पण म्या इकून खाल्लं आता माझ्याजवळ काय बी नाय."
"साहेब तुम्ही काय बी करा पण मला माझं डोरलं पाहिजे."
" ये बाई जा घरी त्याला घेऊन आता मुकाट्यानी. याला इथं सांभाळायला आम्हाला काय तेवढच काम नाय. लय वात होतो डोक्याला. तुला नीट सांभाळता आलं नाय. अन तो आता इकलं म्हणतोय म्या कुठून देऊ तुला. म्या एकच करील ह्याचं तंगडं मोडील. चालेल का तुला. लंगडा झाल्यावर तुलाच करायला लागल सगळं. हागणं, मुतण पण काढायला लागेल."
ती बाई गुमान चालायला लागली आणि हवालदाराने अजून दोन-चार थोबाडीत दिल्या त्या बेवड्याच्या तसं ते खाली पडलं. ती बाई परत आली. कसाबसा त्याला आधार दिला आणि घरी घेऊन गेली.

अर्धा तास मी असलीच कलागत पाहत व्हतो. मला वाटायचं कधी पोलिसही मुजोरी करतात. काही बाबतीत तर एखाद्याचा काही गुन्हा नव्हता तरी ते सगळा राग त्याचावर काढत व्हते . चोर सोडून संन्याशाला मार पडत व्हता. कुणी तरी म्हणालं

माझे पाकीट मारलं तर त्याला इचारलं कुठल्या हद्दीत मारलं. तो म्हणाला
" मी पुण्यावरून एसटीने येत होतो."
"मग पुण्याला जावा नोंदवायला"
" अहो साहेब पण आता मी गावाला आलो. आता गाडी खर्च येईल. कसा जाऊ मी पुण्याला. घ्या हितच काहीतरी करून ".
"किती पैसं होतं पाकिटात"
" 5000"
" तुझ्याकडे कसं आलं एवढ पैसं"
"डाळींब इकल पुण्याला"
"पटटी दाखव"
" ही बघा"
तो हवालदार हळू आवाजात त्या माणसाच्या कानात काहीतरी पुटपुटला. त्या माणसाने खिशातून काहीतरी काढलं आणि बंद मुठ हवालदाराच्या हातावर टेकवली हवालदाराने काहीतरी हातात घेतलं. गुपचूप प्यांटच्या खिशाकडे हात नेला. त्याची फिर्याद नोंदवून त्याच्या हातात कसला तरी कागूद दिला. म्हणाला चोर सापडल्यावर बोलावतो.

तो निघून गेल्यावर मी भीत्र्या सशाच्या काळजानी त्या टेबलाजवळ गेलो.तोंडातून शब्द फुटायच्या आतच
" मागच्या हप्त्याला एक कंप्लेन नोंदवली आता आणि काय आणलं "
"म्या नवतो आलो मागचा हप्त्यात. म्या आत्ताच येतोय."
"ख्वाटं बोलू नको . ही पोलीस चौकी हे "
"आवं सायब दुसरं कोणतरी आसलं माझ्या सारखं दिसणारं"
"बरं बरं आम्हाला माहित हाय. क्वाण गाव तुझं? "
"देवाची चावडी"
"काय झालं""
" मारामारी"
" कुणी मारला कुणाला?."
" सायब, मला दगडू आन त्याच्या पो-हानीं काठीन हानला. वळ उठल्यात आंगाव."
" का?"
"म्या जाब इचारला? "
" कसला?"
" माझ्या हिरीचं पाणी का काढलं म्हून"
" डाक्टरकडं गेल्ता."
" नाय "
" मग जा लिहून आण "

तिथून जवळच सरकारी दवाखाना होता. म्या चालतच गेलो. कागद काढला. डाक्टर बसलेल्या खोलीत गेलो .
डाक्टर :- "काय होतय?"
"मारामारीत लागलंय, पाठीव वळ उठल्यात, काठ्यांनी मारलं"
डाक्टरनी तपासलं. गोळ्या,मलम लिवलं. म्या म्हणलं मार लागल्याचं लिवून द्या. पोलिसात द्यायचय.
"डाक्टरनी लिहून दिलं".
म्या कंपाऊंडर कडून मलम , गोळ्या घेतल्या आन चौकीवं आलो. मघाच्याच हवालदाराला गाठला.

म्या बिचकत तोंडावर उसण आवसान आणत म्हणलं आणलं लिवून .तसा तो वस्सकन अंगाव आला.म्हणला
"साक्षीला क्वाण हाय".
"म्या एकटाच हाय."
" आरं तुला मारलं ती कुणी पाहिलं का त्याचा जबाब नको का घ्यायला. तू डॉक्टर कडून लिहून आणलं म्हंजी झालं का. आम्हाला दुसरी बाजूबी पायाला लागती. तू खरं सांगतोय कशावरून ? कुठून पडल्यावर पण लागतं माणसाला. याचा अर्थ तुला कोणी मारलं असं नाही होत ना. डॉक्टरनी नुसतं लिवलय अंगावर जखमा हायेत पर त्या कशा झाल्या ते नाही लिवलं. तवा तू असं कर उद्या ये. तुला मारताना कुणी बघितलं त्यालाही घेऊन ये. "

असं सांगून मला घरी पाठवून दिला. मी दुसऱ्या दिवशी म्हादूला माझ्या बरं पुरावा म्हणून घेतला . पोलिस चौकीत गेलो. तर गेल्या गेल्या पोलिसांनी माझ्या आणि म्हादूच्या कानाखाली जाळ काढला. आम्हाला काहीच कळंना असं का होतय म्हणून . हवालदार आमच्याच अंगावर धावून आला आन म्हणला साल्यांनो खोटी तक्रार नोंदवताय . आम्हाला पोलीस कोठडीत डांबलं. कसला जबाब नाही आणि काय नाही. उलट आम्हालाच दम भरला. हवालदार म्हणला
" तो दगडू त्यादिवशी गावातच नव्हता तर तुम्हाला मारायला कुठून आला . त्याचीच एनसी हाय तुमच्या विरुद्ध. "
असं म्हणून हवालदाराने आमचं आंग पट्ट्याने सोलून काढलं. आमचं नशीब थॉर म्हणून आमचा आरडा इन्स्पेक्टर सायबानी ऐकला. सायब त्याच्या खोलीतून कोठडी जवळ आला. हवालदाराला म्हणला
आरं जीव घेशील काय त्येंचा . द्यां सोडून . जागा कुठंय किरकोळ गुन्हेगारांना ठेवायला.
सायब म्हणला अशा खोट्या तक्रारी करू नका. जा तुमच्या घरी. ह्याच्यानंतर जर दगडूशी मारामारी कराल तर जेल होईल. असं म्हणत हवालदाराला डोळा मारला.

हवालदारानी आमच्याकडंन हजार रुपये उकळलं आन आमची दोघांची सुटका केली.

माझं अंग थरथरत होतं. काही सुचत नव्हतं. म्हादू आन मी पहिला पोलीस चौकीच्या बाहेर आलो. दोघांनी रस्त्यात बसकण मांडली. गळा काडून रडलो. काय कराव काही सूचना . येणारं जाणारं मधीच थांबायचं आणि इचरायचं काय झालं? आता काय सांगायचं त्यांना ? म्हादू म्हणला आता आपण वाटंला लागू, म्हंजी येणाऱ्या जाणाऱ्यांचा ताप व्हणार नाय.

आम्ही गावची वाट धरली.
म्हादू म्हणला
" तुला काय कळलं का."
"नाय बा."
"आरं त्या दगड्यानं एनसी केली आपण त्याला मारु म्हणून."
"एनसी काय भानगड असती."
" अदखलपात्र गुन्हा , म्हणजी फकस्त ताकीद देत्यात"
आता आम्हाला चांगलीच पाचर मारली होती. आम्ही ना दगड्याला हात लावू शकत होतो ना फिर्याद करू शकत होतो.
दिवस मावळला होता. अंधार पडत होता. रेल्वे फाटक ओलांडलं. थोडं चालल्यावर नदी आडवी आली‌ नदीचे काळभोर पाणी रात्रीच्या अंधारात भयाण वाटत होतं. गुडघाभर पाण्यातून वाट काढत नदी वलांडली. पायवाटनं कसंबसं वाट काढत आम्ही गाव जवळ करत व्हतो. आम्ही दोघेही गप्प व्हतो अगदी कुणाच्यातरी मैतीत चालल्यागत . काय बोलायचं समजत नव्हतं. मध्येच जोंधळ्याची सळसळ ऐकू येत व्हती. आख्खं शिवार अंधारातल्या भुतासारखं अंगावर येत व्हतं. एखादा दुसरा काटा पायात घुसत व्हता पण बधिर मनाला त्या वेदना जाणवत नव्हत्या. असंच घुम्यानं चालत चालत आम्ही चिचच्या मळ्यात आलो. दगड्याच्या आणि पोलिसांच्या मारापरीस आमाला आमची फिर्याद नोंदविली न गेल्याचे दु:ख जास्त झालं होतं. मला राहावलं नाय.
म्या म्हदूला म्हणलं
" आपलं खरं असूनही आपण दगड्याचा आन पोलिसांचा मार खाल्ला. वर हजार रुपये पोलिसाला दिलं. अशी कुठली रीत. ज्याच्यावर अन्याय झाला तोच चिरडला जातोय."
म्हादा - " मला बी परश्न पडलाय असला न्याय असतो काय. हवालदार दगड्याने एनसी केली असं म्हणला. म्हंजी पोलिसाला पैसं चारून आपल्याविरुद्ध भडकावलं. "
म्या - " तुझं खरं हे म्हादा पण मला वाटतं दगड्याची वळख पण आसलं त्याच्याशिवाय पोलीस आपल्यावर तुटून पडलं नसतं. "
म्हादा- "आरं कसली वळख हितं फक्त पैसा वळखत्यात. "
म्या - " आरं व्हय पण ह्याला काय अर्थ हाय. न्यायानं चालल ती यडं ठरतया गड्या आण अन्यायाला पायघड्या."
म्हादा- "आरं ह्या कलीयुगात काय बी व्हतयं. आता म्होरं काय करायचं ती ठरव."
म्या- "माझा तं डोक्याचा पार गोयंदा झालाय. बघू दादा म्हणल तसं."
बोलत बोलत चिचच्या वाटला आलो. गाव जवळ आला तस काळोखात लपलेली अंधुक घरं दिसाया लागली. उघड्या दारातून हलणारा दिव्याचा उजेड दिसाया लागला. साळच्या पडवीला पोरं खंदिलाच्या उजेडात वाचत असलेली दिसली. पाराव सामसूम व्हती. पाच-सहा ठिलार पोरं चावडीत ग्रामपंचायतीचा टीव्ही लावून बसली होती. मधीच एखाद्या घरातून भाकऱ्या थापायचा आवाज येत होता. कुठं जेवणाची भांडी वाजत होती . कोण खाकरून चूळ भरत होता.
म्या म्हादूला म्हणलं
" चल चार घास आमच्याबरोबर खा आमच्या घरी. "
"नगं घरी वाट बघत असतील आन माझा सैयपाक पण केला असलं. उगा वाया जाईल."
" बरं बघ बाबा आग-याव करत नाही."

म्हादू त्याच्या घरी गेला. मी माझ्या घरी आलो. दादा, पोरं जेवत व्हती. पारु वाटच बघत व्हती. म्या तिला म्हणलं लय पोटात आग पडली. पहिलं जेवून घेतो. मला तिनं पाण्याचा तांब्या दिला. पायावर पाणी टाकलं. तोंड धुतलं. जेवायला बसलो. पोरं जेवल्या बरोबर गोधडीवर जाऊन लवांडली. दादानी चंची काढली त्यातून एका कप्प्यातून पानसुपारी‍ दुस-यायातून चुना, कात काढला. पानाला चुना, कात लावला थोडी सुपारी टाकली आन विडा करून तोंडात ठेवला. माझं जेवण झालं. मग पारुनं जेवायला घेतलं. तसं दादा म्हणलं काय झालं शंकर? म्या समदी राम कहाणी सांगितली. दादांना काय बोलावं हेच सुचना ते गुपचूप उठले.

पांडुरंगाच्या तसबिरीसमोर जाऊन बसले. बराच वेळ गप्प होते. थोड्यावेळाने त्यांच्या तोंडातून शब्द फुटला.
" माझी भक्ती संतां एवढी थोर नाही. तरीपण मी माझी फिर्याद तुझ्यापुढे मांडणार. तूच जर मारायला लागला तर मी कुठे जाऊ. एकुलता एक पोर माझा त्यांची बाजू सत्याची, तरी मार खाल्ला. पोलीसात फिर्याद नोंदवायला गेला तर त्यालाच परत मार बसला. आम्ही कधी खोटं वागत नाही. लांडीलबाडी करत नाही तरी हे नशिबाचे भोग का?
आता मळ्यात त्यांनी काम तरी कस करायचं. त्याच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार? पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय पण खलरक्षणाय सदनिग्रहणाय झालेत. कोर्टात जायचं म्हटलं तरी पैकं लागत्यात आणि पैकं खर्च करूनही दहा दहा वर्ष न्याय मिळत नाही आणि मिळाला तरी कधी कधी किरकोळ शिक्षा होते. शिक्षा झालेला चार सहा महिन्यानी बाहेर येऊन पुन्हा माझं कोण काय वाकडं करतोय अशा अविर्भावात वावरतो. खुनी, बलात्कारी लोकांना पण जामीन मिळतो. कधीकधी गुन्हेगार निर्दोष सुटतो. लोकांना दिसतं त्यानेच गुन्हा केला ते पण न्यायदेवतेला दिसत नाही. कारण पोलिसांनी सबळ पुरावा दिलेला नसतो. एवढा बदनाम करून ठेवलाय न्याय. आमच्यासारखी सरळमार्गी माणसं अन्याय सहन करणं सोपं समजू लागली. नव्हं त्यांच्या अंगवळणी पडलय ते. तारणारा आणि मारणारा तूच आहेस तूच सांभाळ कर सज्जनांचा.
असं काहीबाही बडबडतच राहिले. म्या आणि पारू घाबरून गेलो. बरीच रात्र झाली तरी दादा बरळतच होतं पुन्हा पुन्हा म्हणत होतं.

खालच्या कोर्टात न्याय झाला नाही तरी वरच्या कोर्टात होतो. त्याचं कोर्ट सर्वोच्च आहे. पण न्याय मिळायला फिर्याद कराया लागते. नाही तर त्याला कसं समजणार तुमच्यावर अन्याय झालाय ते. लेकरू रडलं की आईला समजतं त्याला भूक लागली. म्हणून मी आता रोज तुझ्याकडे फिर्याद करत राहणार. एक ना एक दिवस तुला माझी दया येईल असं म्हणून तुकारामांचा अभंग गावू लागले.

हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा होय तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥

समाप्त.
( भविष्यात क्रमश: करण्याचा मानस आहे )

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्न करणारी कथा.
सुंदर चित्रपट पाहिल्याचा अनुभव आला वाचताना.

<<सुन्न करणारी कथा.
सुंदर चित्रपट पाहिल्याचा अनुभव आला वाचताना.>> +१००

सुन्न करणारी कथा.
सुंदर चित्रपट पाहिल्याचा अनुभव आला वाचताना.>>>++१११
खरेच अशी परिस्थिती आहे आजची Sad

खरच छान लिहीता तुम्ही. वास्तववादी असले तरी चटका लावुन जाते. कधी निगेटिव्ह प्रतीसाद आला तरी दुर्लक्ष करा. लिहीत रहा.

@ जावेद,पशुपत,मेघना, संदिप, अॅमी, उमानु,आसा,वाली,स्नेहनिल, वाले,हर्पेन,अनघा,रश्मी..

खूप आभार सर्वांचे सुंदर प्रतिसादासाठी....

faar chan,, dolyan samor pratek patr disat hot katha vachtana,, sundar likhan.. lihit raha..

@ Kally, कोमल १२३४५६
खूप धन्यवाद प्रेरणादायी प्रतिसादासाठी...

शेवट कळला नाही.
एनसी त्याने केली तर याने पण करायची ना. त्यासाठी हात पाय गाळायची गरज काय?

आनन्दा आभार प्रतिसादासाठी....
शंकर पोलिस ठाण्यात प्रथमच गेलाय. त्याला मुळातच पोलिस ,कोर्ट याची भिती वाटते. तो शिक्षितही नाही. ही प्रक्रिया काय ते माहित नाही. त्याला सध्या दादांना जपायचे आहे.
त्याचे आत्तापर्यंतचे सर्व निर्णय दादा घ्यायचे त्यामुळे तो दादांवर भिस्त ठेवतो. दादांचे अनुभव त्यांच्या संवादातून आलेत. त्यांना मानसिक धक्का बसलाय. या कथेचा शेवट मी आत्ता तरी वाचकांवर सोडलाय. कदाचित मीच यावर क्रमशः लिहील.

वास्तव वादी लिखाण आशि स्थिती आहे देशात .
लढा तर ह्याच्या विरुद्ध च दिला पाहिजे .
पण आपण जात ,धर्म, भाषा ,पक्ष, ह्यातच शक्ती वाया घालवतोय

छान आहे कथा.
पुढचा भाग लिहा. दादांच्या फिर्यादीला उत्तर मिळालेलं वाचायला आवडेल.

Pages