मर्मबंधातली ठेव ही....

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

यादों के झरोंकों से...

आम्हा जोश्यांना हिंदी, मराठी गाणी म्हणजे अगदी जीव की प्राण. आम्ही लहान असताना घरी कायम रेडिओ सुरूच असे. त्यात बातम्यांपासून नभोनाट्य आणि बालकांसाठीच्या कार्यक्रमापासून ते कामगार कल्याण पर्यंत सर्व काही ऐकले जाई. कारण तेव्हा मनोरंजनाची साधनंच मुळात कमी होती. एक तर रेडिओ, टेप रेकॉर्डर, किंवा मग तो मोठ्या आणि छोट्या डिस्क्स प्ले करणारा ग्रामोफोन. तो ही होता आमच्याकडे पण त्याचा भोंगा नव्ह्ता त्याला इन्बिल्ट स्पिकर होता. त्यात बर्‍याच डिस्क्स पण होत्या मोठ्या आणि छोट्या. खरंतर आम्ही लहान असतानाच ग्रामोफोन तसा नामशेष होण्याच्या मार्गावरच होता, कारण तेव्हा टेप रेकॉर्डर आणि कॅसेटसचा जमाना येऊ घातला होता. टिव्ही होता तो मोजकाच... म्हणजे फक्त डी डी नॅशनल. ज्यावर चित्रहार, बुनियाद, वगैरे मोजक्या सिरियल्स लागत. केबल वगैरे नव्हते आणि इंटरनेट चा तर पत्ताच नव्हता.

अशात मला आवडती गाणी लिहून ठेवायचा फार छंद होता. मोकळ्या वेळी ती वही/जुनी डायरी घेऊन बसावं आणि चाळावी किंवा एखादं गाणं गुणगुणावं हाच टाईमपास. एखाद्या वेळी एखादं आवडणारं गाणं रेडिओ वर लागलं की माझी धावपळ होई. हातात मिळेल तो कागद घेऊन त्यावर पेन किंवा पेन्सिल घेऊन ते त्या वेगात खरडणे आणि नंतर तेच गाणं सुबक अक्षरात माझ्या गाण्याच्या वहित डायरीत लिहून ठेवणं... हे एक दुहेरी काम असे. त्यातच रेडिओ वर लागलेलं गाणं ही कानात प्राण गोळा करत ऐकत लिहायला लागे, मध्येच एखादा शब्द निसटला की संपलं.. मी थांबत असे .. किंवा मग तायडी, बाबा, काका यांना "अमूक शब्दानंतर तो काय गायला गं/हो?" असं विचारायची, त्याने मदत झाली तर उत्तमच... नाहितर मग पुन्हा रेडिओ च्या कृपेने ते गाणं लागेल तेव्हाच काय तो प्रसाद. मग नंतर नंतर युक्ती सुचली की तेव्हढी जागा सोडून पुढे ऐकून निदान ते तरी लिहावं... 'रफ' गाणं 'फेअर' करायला वेळ मिळत नसे मग मी त्या चिठोर्‍या जमवून ठेवून, निवांत वेळ मिळाला की मग लिहायला बसत असे.

आमच्या कडे ग्रामोफोनच्या ही बर्‍याच डिस्क्स होत्या. त्यात लता, गीता दत्त, किशोर कुमार यांनी गायलेल्या, शिवाय ससुराल, आशिक, नवरंग.. या ही होत्यात. सर्वच आठवत नाहीत. शिवाय मराठी गाण्यांच्या ही होत्या. त्या ऐकताना गाणं उतरवून घेणं ही मजा असे कारण फक्त 'पिन' उचलून मागे ठेवायची की झालं. या डिस्क्स ऐकून काही गाणी माझ्या मनात इतकी बसली.. जसं की लताचं " मेरा दिल मेरी जां चाहे लेले... किशोरचं " रंगोली सजाओ रे.. रंगोली सजाओ, किंवा नखरेवाली.... मराठीपैकी "छबिदार छबी मी तोर्‍यात उभी.. "मी जलवंती, मी फुलवंती..." अनेक होती. आणि आजही ती गाणी आवडत्या यादीतच आहेत.

टेप रेकॉर्डरवरून गाणी उतरवणे त्या मानाने सोप्पं पडे. एक ओळ ऐकायची टेप बंद करायचा ती ओळ निवांत लिहायची आणि मग परत टेप सुरू करून पुढची ऐकायची. एखादा शब्द समजला नाही तर कॅसेट 'रिव्हर्स' करण्याची सोय होती. कधी कधी कॅसेट प्लेअरच्या रोलर मध्ये अडकली की सोडवावी लागे... ती हळूच सोडवणे. एक कॅसेट ऐकताना दुसरी कॅसेट पेन्सिल ने रिव्हर्स करणे... (हवी ती बाजू ऐकण्यासाठी) ऐकून ऐकून कंटाळा आलेल्या कॅसेटस मध्ये रेकॉर्ड चे बटण दाबून आपण गायलं/बोललं की जुनं पुसलं जाऊन नविन बोलू ते टेप होई. मग ते परत परत पुसून नवे नवे काहितरी टेप करणे. कधी कधी मग रेडिओ च्या समोर टेप ठेवून रेडिओ वर लागलेला एखादा कार्यक्रम किंवा गाणं टेप करणे हे असले उद्योग चालायचे. तेव्हा आमच्याकडे जो जिती वही सिकंदर, मेंदिच्या पानावर, वसंतराव देशपांडे आणि दिल एक मंदिर, अरूण दाते, भावगीते, लावण्या, भजनं... अशा कुठल्या कुठल्या अनेक कॅसेटस होत्या.
त्या कॅसेटस च्या जमान्यात मला "हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है.... भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी.... नाचू किती नाचू किती कंबार लचाकली.... थाप मारून थापाड्या गेल्या.... या गाण्यांनी वेड लावलं..

मग फ्लॉपी आणि सिडीज आल्या पण फ्लॉपीज बर्‍याचदा ऑफिसचे काम्/फाईल्स स्टोअर करायला म्हणून वापरल्या जायच्या त्यामुळे आवडत्या गाण्यांची सीडी खास बनवून घ्यावी लागे. मला आठवतंय की माझ्या पुण्याच्या तेव्हाच्या घराच्या शेजारी एक कॅसेटचे (म्युझिकचे) दुकान होते तिथून मी अशा कित्येक सिडीज बनवून घेतल्या होत्या. लता, आशा, किशोर.. सुफी आणि काय काय. तरिही माझा गाणी लिहून ठेवायचा छंद काही मागे पडला नाही. अनेक वह्या भरल्या, अनेक जुन्या डायर्‍या भरल्या...

मग आलं कूलटोड... माझ्याकडे कॉम्प्युटर किम्वा नेट अ‍ॅक्सेस तेव्हा फक्त ऑफिस मध्ये होता.. आणि गाणी डाउन लोड वगैरे करणं तेव्हा जरी अलाऊड् होतं तरी त्यातलं तांत्रिक ज्ञान त्यामानाने कमीच होतं. मग जेव्हा मोबाईल मध्ये गाणी ऐकायची सोय झाली तेव्हा मात्र माझा गाणी लिहून ठेवायचा छंद मागे पडायला लागला.. तरिही आवडती गाणी जमवून ठेवणं (कॅसेट, सीडी ज मध्ये) ते मात्रं सुरू होतं. मग अशा वेळी समीर रानडे ला मी मेसेज करीत असे... समीर मला हे अमूक अमूक गाणं हवं आहे. मग तो ते डाउन लोड करून ठेवे, आणि भेटेल तेव्हा मला ब्लू टुथ ने द्यायचा. एकदा त्याला मी ' मुझको इस रात की तनहाई में आवाज न दो.." आणायला सांगितलं... (मुकेश चं) आणि त्याने जे दिलं ते होतं लताचं... एक मिनिट माझा मूड खराब झाला होता पण मुकेश पेक्षा लताने गायलेलं ते गाणं आजही माझ्या अत्यंत जवळचं आहे.

त्यानंतर भराभर गाण्यांची दुनिया बदलतच गेली... टेप रेकॉर्डर्स गेलेच होते, सीडिज चा जमाना पण गेला, मेमरी कार्ड्स, आलेल्या नव्या यंत्रांचीच इनबिल्ट मेमरी 'ह्युज' प्रकारात मोडू लागल्याने सीडिज ठेवणे... वगैरे कालबाह्य झाले मग गाणी थेट मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर 'स्टोअर' करण्याची सोय आली.

आणि आता तर "सावन" "गाना" या सारख्या अनेक अ‍ॅप्स नी ती पण शक्यता मोडीत काढली आहे. कोणतही गाणं आज इंटरनेटवर सहज उपलब्ध होतं आहे.

माझ्याकडे घरात एका साईड टेबलचा एक पुर्ण कप्पा भरून व्हिसिडिज आणि ऑडिओ सिडिज होत्या... त्यात जगजित सिंग, विविध गायकांच्या गझल्स, अगदी दिल चाहता है, स्वदेस, ब्लफ मास्टर (अभिषेकचा) शाहरूख चा डॉन, कभी अलविदा ना केहना.. अशा विविध सिडिज होत्या.

"कोणतही गाणं आज इंटरनेटवर सहज उपलब्ध होतं आहे " या विचारानेच मी परवा तो कप्पा आवरायला घेतला आणि इतकी वर्ष जपून ठेवलेल्यांपैकी जवळ जवळ शे-सव्वाशे सिडिज मोडित काढल्या.. आवडत्या मात्रं अजूनही ठेवल्या आहेत. आठवण म्हणून. त्याच कप्प्यात मी लिहून ठेवत असलेली गाण्याची जुनी डायरी (२००३ साल ची) पण सापडली आणि आठवणी उफाळून आल्या. म्हणून हा लेखन प्रपंच.... या डायरीत गालिब च्या गझल्स, हिंदी जुनी गाणी, नवी गाणी, मराठी गाणी इतकंच काय पण गोविंदाचा एक सिनेमा आला होता गॅम्बलर की कायसं नाव होतं त्यातलं "मेरी बाते सुनकर देखो हसना नही.." हे गाणं सुद्धा मी लिहून ठेवलं आहे. आता चाळताना हसू येतं... पण एकेकाळी गाणी लिहून ठेवलेल्या त्या वह्या/डायर्‍या माझ्या मर्मबंधातली ठेव होत्या...

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय... |
नेईं हरोनि सुखाने दुखवी जीव...||

विषय: 
प्रकार: 

मला वाटले तुम्ही माझ्या विषयीच लिलिले आहे की काय इतकं प्रत्येक वाक्य रिलेट झालं. माझ्याही कैक डायऱ्या भरलेल्या आहेत. पुर्ण गीत रामायण मी लिहुन काढले होते. सिडी आणि कॅसेट फेकुन द्यायला मला वर्ष लागले. कारण प्रत्येकवेळी त्यातल्या काही पुन्हा बाजुला काढुन ठेवायचो. अलुरकरांकडुन मी बऱ्याच सिडीज बनवुन घेतल्या होत्या. खास करुन सवाईच्या. खुप जुन्या आठवणी जागवल्या या लेखाने.

सुरेख! आमच्या घरीही एक अक्खं कपाट कॅसेट्स नी भरलेलं होतं. त्यातच दोन कॅसेट्स वाला टेप-डेक ही होता. कितीतरी गाणी ऐकलीत त्यावर. आता पूर्ण दुनियाच बदललीय गाण्यांची, हवं ते गाणं ऑनलाईन एका मिनिटात अगदी हाय-डेफ साऊंड क्वालीटीत हजर! Happy

वाह दक्षे, काय लिहीलंस गं. सर्व काळ, पहिल्यापासून सर्व माहोल डोळ्यासमोर उभा केलास. अक्षरशः तू गाणं कसं लिहून घेत असशील पूर्वी, ते दिसलं.

फार ओघवतं, गोड लेखन. सर्व स्थित्यंतर सुरेख मांडलंस.

मस्त लेख... बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या. जुनी हिंदी/मराठी गाणी ही माझीदेखील मर्मबंधातली ठेव आहेत...

खुप सुंदर लिहिलंय दक्षिणा.
सगळ्याच गोष्टी रीलेट झाल्या.
माझ्या गाणी लिहिलेल्या वह्या कुठे नाहीशा झाल्या कुणास ठाउक. Sad

खूप सुंदर!
माझ्या ताईला होती सवय गाणी लिहून घेण्याची. तिच्याही अशा २-३ फुलस्केप वह्या भरल्या होत्या. पण नंतर तिने तिच्या एका मैत्रिणीला दिल्या वाचायला म्हणून आणि परत मिळाल्याच नाहीत Sad
टू इन वन मधे ( टेप + रेडिओ) गाणं थेट रेकॉर्ड करता यायचं. गाण्यांचा कार्यक्रम लागला, की लक्ष ठेवून बसायचं आणि आवडीचं गाणं लागलं की play + record अशी २ बटणं एकदम दाबायची Happy असले उद्योग कॉलेजला असताना मीही केलेत. २-३ कॅसेट्स भरल्या होत्या अशा. कधीकधी गाणं संपता संपता जाहिरात सुरू व्हायची आणि टूं असा जाहिरातीआधीचा आवाजही रेकॉर्ड व्हायचा लक्षात येईपर्यंत. Lol नंतर कॅसेट ऐकताना छान वाटायचा तो आवाज ! काय दिवस होते!!

मस्तच आठवणी.. अगदी अगदी झाले, ते गाणी लिहून घेणं वगैरे.
लिहिताना एखादा शब्द मिस झाला तर फारच हळहळ वाटायची की हे गाणं आता परत कधी ऐकायला मिळेल. चित्रहार, छायागीत बघताना तर मी एखादं आवडतं गाण लागावं म्हणून मी चक्क देवासमोर हात जोडायचे Proud प्ले आणि रेकॉर्ड एकदम दाबणे, अडकलेली कॅसेट, तो चॉकलेटी गुंता मग हळूवार तो सोडवणं, कॅसेट खराब झाली की त्यातून निघणारे चित्रविचित्र आवाज, रिकामी कॅसेट गाण्यांनी भरून घेणे सगळ्या आठवणी जागा झाल्या.