पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !

Submitted by कुमार१ on 27 January, 2019 - 21:30

रविवारचा दिवस होता आणि सवयीप्रमाणे इंग्लिश पेपरातले महा-शब्दकोडे सोडवत बसलो होतो. हे सोडवणे म्हणजे डोक्याचा भुगा होतो. सगळे कोडे कधी सुटत नाही पण निम्मे सुटले तरी मी आनंद मानतो. या कोडयातले एक शोधसूत्र लक्षवेधी होते. ते असे:

‘ओलीस व्यक्तीस तिच्या अपहरणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम’

ओळखायचा शब्दसमूह तब्बल १७ अक्षरी (९+८) होता. अन्य उभ्या-आडव्या शब्दांच्या मदतीने त्यातला दुसरा शब्द Syndrome असा सुटला. पण पहिल्यातले फक्त पहिलेच अक्षर S एवढेच कळत होते. खूप वेळ जाम डोके खाजवले पण शेवटी थकलो. पण डोक्यात किडा वळवळत होता आणि अवस्थ होतो. मग गेलो गुगलराजाला शरण. त्यावर S ने सुरु होणारे सिंड्रोम माझ्या पुढ्यात दाखल झाले. आता उत्तर सापडले होते - स्टॉकहोम सिंड्रोम ! अगदी कुतूहल वाटले या शब्दाचे. स्टॉकहोम ही तर स्वीडनची राजधानी. मग तिचे नाव या ‘अवस्थेला’ का बरे दिले असावे? मग झपाटल्यासारखे त्याबद्दल वाचून काढले. प्रकरण एकदम रंजक वाटले. मानसशास्त्रातील या अनोख्या प्रकाराची ओळख झाली आणि स्वतःवर खूष झालो.

एव्हाना या वाचनाने थकवा आला होता. जरा आळोखेपिळोखे देत होतो. तेवढ्यात कन्या जवळ आली. म्हणाली काय चहा हवाय वाटतंय. मी अर्थातच हो म्हणालो. मग चहा पिता पिता तिला या सिंड्रोमबद्दल उत्साहाने सांगू लागलो. तिच्या चेहऱ्यावर मला अधीरतेचे भाव दिसत होते. माझे बोलणे संपते ना संपते तोच ती म्हणाली, “अरे बाबा, मग तू नेटफ्लिक्स वरची Money Heist ही मालिका पहिलीच पाहिजेस, अगदी मस्ट- वॉच. या सिंड्रोमवरच आधारित आहे”. आता माझे कुतूहल अधिकच चाळवले गेले. मग पुढचे दोन आठवडे ही मालिका अगदी अधाशीपणे पाहत होतो. एकदम गुंगवून ठेवणारी. खूप आवडली हे सांगायला नकोच. माझ्या मुलीने त्या मालिकेचा ३ दिवसात फडशा पाडला होता हे ऐकून तिचा हेवा वाटला.

नंतर कधीतरी जाल-विहार करीत असता अचानक ‘मदारी’ हा हिंदी चित्रपट गवसला. योगायोगाचा भाग म्हणजे यातही या सिंड्रोमची संकल्पना घेतली आहे. म्हणजे चित्रनिर्मात्यांना भुरळ पडावी असा हा विषय दिसतोय. इथल्या वाचकांना तो रंजक वाटेल या आशेने मी तो लेखनास निवडला आहे. आता या लेखात आधी स्टॉकहोम सिंड्रोमचा परिचय आणि नंतर ती मालिका आणि त्या चित्रपटाची थोडक्यात माहिती देतो.

स्टॉकहोम सिंड्रोम

समजा काही गुंडांनी काही निरपराध माणसांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले आहे. मुळात या गुंडांचे त्या ओलीसांशी काहीच वाकडे नसते. स्वतःच्या काही मागण्या अन्य कोणाकडून तरी मान्य होण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेले असते. यात सुरवातीस ओलीस खूप घाबरतात. त्यांच्या मनात या गुंडांबद्दल घृणा निर्माण होते. पण जसा ओलीसपणाचा कालावधी वाढत जातो तशी त्यांची मानसिक प्रक्रिया बदलते. एव्हाना त्यांना कळले असते की हे गुंड त्यांना कुठलीच इजा करत नाहीयेत आणि खाऊपिऊ पण घालताहेत. पण आपण जर त्यांच्या तावडीतून पळायचा प्रयत्न केला तर मात्र ते आपला जीव घेतील, हे स्पष्ट असते. त्यामुळे ओलीस शांत बसणे पसंत करतात. पुढे जसा हा कालावधी वाढत जातो तसे ओलीस आणि ते गुंड यांच्यात एक भावनिक बंध निर्माण होऊ लागतो. यामागे काही कारणे असतात. एकतर हे दोन्हीही गट बाहेरच्या समाजापासून दूर असे कोठडीत बंदिस्त असतात. या अति निकट संपर्कातून ओलीसाच्या मनात त्या गुंडांबद्दल काहीशी कणव उत्पन्न होते. काही व्यक्तींच्या अपहरण प्रसंगी जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्याला स्टॉकहोम सिंड्रोम असे म्हणतात.
आता या मानसिक प्रक्रियेला स्टॉकहोमचे नाव का दिले गेले हे समजण्यासाठी १९७३ मधील एक घटना जाणून घेऊ.

Stockholm_Sweden.jpg

तेव्हा स्वीडनच्या तुरुंगातील एक कैदी पॅरोलवर सुटला होता. त्याचा अन्य एक साथीदार तुरुंगात होता. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी याने स्टॉकहोममधील एका मोठ्या बँकेवर दरोडा घालून तिथल्या ४ कर्मचाऱ्यांना पकडून ओलीस ठेवले. पुढची कथा तर अजून रंजक आहे. एकून ६ दिवस अपहरणकर्ते व ओलीस अगदी प्रेमाने तिथे राहत होते. महिला ओलिसांची तर खास काळजी घेतली गेली. अखेर सातव्या दिवशी पोलिसांनी आतमध्ये अश्रुधूर सोडला. मग अपहरणकर्ते शरण आले आणि ओलिसांची सुखरूप सुटका झाली. तिथून बाहेर पडताना गुंड व ओलीसांनी एकमेकांना चक्क मिठ्या मारल्या व चुंबनेही घेतली ! त्यांच्या अशा विचित्र वर्तनाने पोलीस चक्रावून गेले. त्यांना ओलिसांच्या या ‘विचित्र’ वागण्याचा अर्थ लागत नव्हता. शेवटी पोलिसांनी Nils Bejerot या मनोविकारतज्ञाला पाचारण केले आणि त्याची मदत मागितली. त्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून त्या व्यक्तींच्या मानसिक अवस्थेला स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव दिले.

पुढे त्या अपहरणकर्त्याच्या विरोधात न्यायालयात खटला उभा राहिला. आता पोलिसांनी त्या ४ लोकांना साक्षीदार म्हणून तयार केले. पण आता त्या चौघांनी त्या गुंडाच्या विरोधात साक्ष द्यायला चक्क नकार दिला. उलट त्याच्या बचावासाठी ते पैसे जमवू लागले ! पण त्याचा उपयोग झाला नाही. न्यायालयाचा निकाल गुंडांच्या विरोधात गेला आणि त्यांना पुन्हा तुरुंगात टाकले गेले. तेव्हा पूर्वीचे ओलीस त्याना तिथे प्रेमाने भेटायला जात होते. हेही अजबच. पुढे मुख्य अपहरणकर्त्याने शिक्षा संपवून बाहेर आल्यावर स्टॉकहोम सिंड्रोम या नावानेच आत्मचरित्र लिहीले. अशा तऱ्हेने स्टॉकहोमचे नाव मानसशास्त्रात अमर झाले !

या घटनेनंतर अपहरणाच्या अन्य काही घटनांचाही अभ्यास करण्यात आला आणि त्यापैकी काहींत अशाच स्वरूपाचा अनुभव आलेला दिसला. त्यातून मानसशास्त्रज्ञांना अशा अवस्थेचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांच्या अभ्यासातून ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाले. या मनोवस्थेची काही वैशिष्ट्ये अशी आहेत:

१. या अवस्थेचे मूळ माणसाच्या जिवंत राहण्याच्या अंतःप्रेरणेत दडले आहे.
२. जेव्हा अपहरणकर्ता ओलीसास ठार मारणार नाही याची ग्वाही देतो तेव्हा ओलीसाच्या मनात त्याच्याबद्दल नकळत कृतज्ञता दाटून येते.

३. काही झाले तरी आपण मरणार नाही अशी ओलीसाची खात्री झाली की त्याच्या मनातला अपहरणकर्त्याबद्दलचा द्वेष मावळू लागतो.
४. काही वेळेस अपहरणकर्त्याच्या ज्या मागण्या असतात त्या योग्य आहेत असे ओलीसासही तात्त्विकदृष्ट्या पटते. त्यातून त्या दोघांत एक भावबंध निर्माण होतो. त्यातून ओलीसाचा पोलीस अथवा सरकारबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. विशेषतः जेव्हा अपहरणकर्ता आणि ओलिसांचे कुठलेच वैयक्तिक शत्रुत्व नसते तेव्हा ही भावना अधिक बळावते.

५. ही अवस्था स्त्रियांमध्ये तुलनेने अधिक दिसून येते.
६. काही प्रसंगात तर अपहरणकर्त्याच्या मनात देखील त्याच्या ओलिसाबद्दल प्रेमभावना निर्माण होते.

अशा या वैशिष्ट्यपूर्ण सिंड्रोमचा मानसशात्रात सतत अभ्यास चालू आहे. आता ही संकल्पना फक्त अपहरणासंदर्भातील गुन्ह्यापुरतीच मर्यादित नाही. अन्य काही प्रकारच्या गुन्ह्यांतही तिची नोंद झाली आहे. हे गुन्हे खालील प्रकारचे आहेत:

१. कौटुंबिक हिंसाचार
२. धार्मिक अथवा पंथीय विद्वेष
३. युद्धकैद्यांचे अत्याचार
४. बलात्कार आणि सक्तीचा वेश्याव्यवसाय
५. बाल-लैंगिक अत्याचार.
६. रॅगिंगचे गुन्हे

अशा गुन्ह्यांतील पिडीत व्यक्तीस काही वेळेस संबंधित गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अर्थात त्यामुळे गुन्हेगारास शासन मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात हा यातून उद्भवलेला एक मोठा सामाजिक तोटा आहे.
कित्येकदा बलात्काराच्या प्रकरणात पिडीत स्त्रीला आपला जीव वाचल्याचे समाधान इतके असते की त्यापुढे ती तो अत्याचार मुकाटपणे सहन करते.
अपहरणाच्या प्रकरणांत जेव्हा ओलिसांची सुखरूप सुटका होते त्यानंतर मात्र त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला जाणवतो. अर्थातच त्याची तीव्रता ओलीसपणाच्या कालावधीवर अवलंबून असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी बरेचदा मानसिक समुपदेशनाची गरज भासते. आता कित्येकदा त्यांना अपराधी वाटू लागते. तेव्हा “केवळ जीव वाचवण्यासाठीच तुम्ही त्या गुंडाबद्दल प्रेम व सहानुभूती दाखवलीत”, असे त्यांना पटवून द्यावे लागते.
...

स्टॉकहोम सिंड्रोमच्या संकल्पनेची अनेक चित्रनिर्मात्यांना भुरळ पडली आहे. त्यावर आधारित काही चित्रपट व जालमालिका लोकप्रिय झाल्या आहेत. त्यापैकी ज्या दोन कलाकृती मी पाहिल्यात त्यांचा आता परिचय करून देतो.

Money Heist (हाइस्ट) ही मुळातली स्पॅनिश टीव्हीमालिका. त्याचे इंग्लिश रुपांतर नेटफ्लिक्सवर पाहण्यास उपलब्ध आहे. ही बऱ्यापैकी स्टॉकहोममधील बँक दरोड्यावर आधारित वाटते. ‘हाइस्ट’ म्हणजे दरोडा. यात स्पेनच्या राजधानीतील राष्ट्रीय चलन-छापखान्यावर धाडसी सशस्त्र दरोडा टाकला जातो. या गुन्ह्याचा सूत्रधार एक बुद्धिमान पुरुष असून तो स्वतःला ‘प्रोफेसर’ म्हणवतो. तो निरनिराळ्या ठिकाणांहून ८ ‘हटके’ जणांना गाठून आणतो आणि त्यांची एक टोळी बनवतो. तो त्यांना सांगतो की दरोड्यादरम्यान आपली २ मूलभूत तत्वे असतील:
१. आपण कुठल्याही ‘व्यक्ती’चा पैसा लुबाडणार नाही आहोत. आपण त्या छापखान्यावर दरोडा टाकून तिथे पूर्णपणे नव्या युरोच्या नोटा आपल्यासाठी छापणार आहोत, आणि

२. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खूनखराबा करायचा नाही. एकाही ओलीसास थोडी सुद्धा इजा होता कामा नये.

दरोड्याचा कार्यक्रम अत्यंत विचारपूर्वक ठरवला जातो. या टोळीचे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. ते दरोडा टाकतात आणि तिथल्या ६७ कर्मचाऱ्यांना अकरा दिवस ओलीस ठेवतात. या कालावधीत ही टोळी आणि ओलीस यांच्या दरम्यान जी दोन प्रेमप्रकरणे निर्माण होतात त्यांचा पाया या सिंड्रोमवर उभारला आहे. त्यापैकी एकात ओलीसांतील एक स्त्री त्या टोळीतील एकाच्या प्रेमात पडते आणि चक्क टोळीला सामील होते. तर दुसऱ्यात या प्रकरणाचा तपास लावणारी पोलीस स्त्री नकळत खुद्द त्या ‘प्रोफेसर’च्याच प्रेमात पडते. या उत्कंठावर्धक सुंदर मालिकेबद्दल अधिक लिहून रहस्यभेद करीत नाही. इच्छुकांनी जरूर पहावी.
.............
‘मदारी’ हा निशिकांत कामत दिग्दर्शित आणि इरफानची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट. यात इरफानने ‘निर्मल’ची भूमिका केली आहे.

madari.jpg

त्याचा मुलगा एक पूल कोसळून झालेल्या अपघातात मरण पावला आहे. तो पूल निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच कोसळला होता. त्या बांधकामास राज्याच्या गृहमंत्र्यांसकट अनेक सरकारी मंडळी जबाबदार होती. उद्विग्न झालेला निर्मल याचा सूड घेण्यासाठी गृहमंत्र्यांच्या मुलाचे(रोहन) अपहरण करतो. खूप काळ तो लपून राहतो. त्या दरम्यान रोहन व त्याच्यात एक मैत्रीपूर्ण नाते तयार होते. पुढे निर्मल रोहनच्या सुटकेच्या बदल्यात त्याची ‘मागणी’ जाहीर करतो. ती म्हणजे गृहमंत्र्यांसह त्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जाहीरपणे त्यांच्या ‘खाबूगिरीची’ कबुली द्यायची आणि त्याचे थेट टीव्ही प्रक्षेपण होईल. अखेर ती मागणी मान्य होते आणि तो रोहनला सोडून देतो. त्या प्रसंगी रोहन त्याच्या वडिलांकडे जाण्यापूर्वी निर्मलला प्रेमाने घट्ट मिठी मारतो. हा प्रसंग या सिंड्रोमचेच निदर्शक म्हणता येईल. निर्मलने रोहनचे अपहरण करण्याचे कारण रोहनला मनापासून पटलेले आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल त्याच्या मनात तिडीक उठलेली आहे.
.........

याव्यतिरिक्त अनेक चित्रकृती या सिंड्रोमवर आधारित आहेत. मी नमुन्यादाखल दोन उदा. दिलीत. सामान्य माणसाला कुतूहल वाटावा असा हा सिंड्रोम. म्हणून मला त्याची ओळख तुम्हास करून द्यावी वाटली. प्रतिसादांचे स्वागत !
******************

जाता जाता ....
स्टॉकहोम सिंड्रोमच्या विरुद्ध एक अवस्था असते. त्याला ‘लिमा’ सिंड्रोम म्हणतात. यात अपहरणकर्त्याना त्यांच्या ओलिसांबद्दल दया वाटू लागते !
ह्या सिंड्रोमची व्युत्पत्ती-कथा अशी. ‘पेरू’ची राजधानी लिमा येथे १९९६मध्ये काही दहशतवाद्यांनी जपानी दूतावासावर धाड घालून महत्वाच्या लोकांना ओलीस ठेवले होते. पण नंतर त्यांचे मन द्रवले आणि त्यांनी ओलीसंना चक्क सोडून दिले.
अपहरणाच्या काही घटनांत स्टॉकहोम व लिमा हे दोन्ही सिंड्रोम एकत्रही अनुभवास येतात.
**************************************************************************************
(‘मिपा’वर पूर्वप्रकाशित हा लेख काही सुधारणांसह येथे प्र.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.
बॉलिवूडमधेही ह्यावर आधारीत आहेत सिनेमे.
आलिया चा हायवे आणि सनी देओलचा पण एक होता. पुजा भट होती बहुतेक हिरोइण.

स्टॉकहोम सिंड्रोम खूप चित्रपटांचे बीज आहे.मराठीत पण एक डाकू चा चित्रपट होता ज्यात डाकू हिरोईन ला पळवून नेतो आणि कुंकू लावून लग्न करतो असे काही.
तो चंद्रचूड आणि अंजला झवेरी चा बेताबी ज्यात तो तिला बाजेवर घेऊन पर्वत चढतो(याला मागे तुम मेरे हो नावाचं मस्त गाणं आहे.)

मराठीत पण एक डाकू चा चित्रपट होता ज्यात डाकू हिरोईन ला पळवून नेतो आणि कुंकू लावून लग्न करतो असे काही.

>>

'ढोलकीच्या तालावर' वाला देवता.

चांगली माहिती.

सिंड्रोमबद्दल माहिती होतंच, (तरी परत वाचलं); नेटफ्लिक्स मालिकेचं नाव तेवढं ऐकलं होतं.

जालावर कुठे मिळेल बघायला ? >>>>> नेटफ्लिक्स किंवा प्राईम वर असेल कदाचित. घरी गेल्यावर चेक करून सांगते. खूप छान मुव्ही आहे. कथा, गाणी, acting, सगळंच.

लेख छानच लिहिला आहे. Stockholm syndrome बद्दल हायवे पाहिल्यावर गुगल केलं होतं आणि बरंच वाचलं होतं तो पर्यंत ही टर्म फक्त ऐकली होती, पण फार माहीत नव्हतं. तुमच्या लेखातून अजूनही बरेच डिटेल्स मिळाले. SS वर असंख्य हिंदी इंग्लिश मुव्हीज आहेत.
हा एक whatsapp फॉरवर्ड -

There is a phenomenon called Stockholm syndrome.

Stockholm syndrome or capture-bonding, is a psychological phenomenon in which hostages express empathy and sympathy and have positive feelings toward their captors, sometimes to the point of defending and identifying with them.

In India ,we call it arranged marriage

आवडला लेख. मनी हैस्ट आणि मदारी दोन्ही पाहिले नाहीत.
स्टॉकहोम सिनड्रोम असलेले सहज आठवले अजूनकाही चित्रपट
Beauty and the Beast
Twelve Monkeys
World Is Not Enough

OMG, How ironic! गेल्या तीन दिवसात आम्ही मदारी आणि हायवे पाहिला. दोन्ही सिनेमांबद्द्ल काहीही माहित नव्हतं. तेव्हाही दोन्ही एकाच थीमवरचे निघाले म्हणून आम्हालाच खूप आश्चर्य वाटलं होतं आणि आज याच विषयावरचा तुमचा लेख वाचायला मिळाला.

मदारीमधे तो छोटा मुलगा आणि किडनॅपर यांच्या संवादातून "स्टॉकहोम सिंड्रोम" हा शब्द कळला. त्याचा शोध लावू असं ठरवलं होतं. पण तुमच्यामुळे आयतंच वाचायला मिळालं. खूप विस्तॄत माहिती दिली आहे आपण.खूप खूप धन्यवाद.

मस्त लेख ! नेहमीप्रमाणेच सहजसुंदर ओघवत्या शैलीतील निवेदन. वरील चर्चेत बऱ्याच सिनेमांची माहिती झाली.

खूप पूर्वी नाना पाटेकर यांचाही असा एक सिनेमा आल्याचे आठवते. पण नाव जाम आठवत नाहीये.

मनी हाईस्ट बघायला सुरवात केली आहे. मस्त उत्कंठा वर्धक आहे. त्या टोळीचा म्होरक्या असलेल्या प्रोफेसरचे तत्वज्ञान अजब आहे.

वत्सला, धन्यवाद.

साद, मनी हाईस्ट जरूर बघा. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर म्हणजे तिचा तिसरा मोसम या वर्षाच्या मध्यात सुरू होणार आहे.

रोचक लेख! हा सिंड्रोम माहीत नव्हता.

अंधायुध पाहिलाय. मस्त आहे. शेवटी शेवटी कंटाळवाणा वाटला. हायवे पूर्ण नाही पाहिला.
'रोजा' मध्येही थोडं फार दाखवलंय की असं. अतिरेक्यांमधे एक मुलगी असते, बहुतेक पंकज कपूरचीच मुलगी असते तिला अरविंद स्वामीबद्दल वाईट वाटतं त्यामुळे ती त्याला पळून जाऊ देते. अरविंद स्वामीलाही पंकज कपूर आणि बाकीच्यांचा राग असा न येता कणवच वाटते. शेवटी पंकज कपूरही त्याला पकडणं शक्य असून सोडूनच देतो.
कॅप्टन फिलिप्समधे टॉम हॅन्क्सचे अपहरणकर्त्यांमधला एकजण सोडला तर बाकीच्यांशी बरे संबंध निर्माण होतात. एकाला तो मलमपट्टीपण करतो.

Pages