फ्रॉक

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 8 January, 2019 - 05:42

फ्रॉक

“आई मी अज्जीबात घालणार नाहीये तो काकीने दिलेला फ्रॉक... "असं पोरीने सांगितलेलं, तरीही पुन्हा तिने “एकदा तरी घाल राजा” असं लाडीगोडीत तिला समजावून पाहिलं... पण पोरगी जराही स्व विचारांत बदललेली दिसली नाही....तिने फ्रॉक घेतला अन कपाटाबाहेर ठेऊन म्हणाली , "नाही... फेकून दे "

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना तिला तो एका कोपऱ्यात निपचित पडलेला फ्रॉक दिसला... घरातून निघताना तिने तो घेतला, चांगल्या थैलीत नीट सजवला... स्टेशनजवळ असलेल्या मंदिराबाहेर मुलीच्याच वयाची; एक मुलगी बसलेली असायची... तिने तो भल्या विचारांनी तिला दिला... पोरगी खूपच खुश झाली... तिच्या डोळ्यातला आनंद पाहून हीही सुखावली , त्या लहानगीला कधी एकदा संध्याकाळ होते अन मायला दाखवते नवीन फ्रॉक असं झालं...

संध्याकाळी झोपडीत शिरताच तिने तो मायला दाखवला अन "मी उद्याच हा घालणार" ह्या हट्टाला पेटली, माय दोन मुस्काटात ठेऊन देत बोलली, "याडी झाली का? ह्या कपड्यात मिरवली तर कुणी एक रुपया बी द्यायचं न्हाय ... दे फयेकुन ..."

पुन्हा एकदा निपचित फ्रॉक कोपऱ्यात जाऊन निजला.

©मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली कथा.

आमच्या आजूबाजूच्या 'सुगृहिणी' मोलकरणीला जुने/नको असलेले कपडे, नकली दागिने, पर्स वगैरे देतात आणि आपण किती उदार आहोत या समजुतीत राहतात. त्या सगळ्याचा वापर ती बाई किंवा तिच्या घरातले करू शकणार नाहीयेत हे कळत नाही त्यांना....

ऍमी, खरं आहे.अनेक वर्षे एकत्र राहणाऱ्या माणसांनी परस्पर एकमेकांसाठी आणलेले कपडेही त्या माणसाला आवडतील/युजेबल वाटतील का याची खात्री नसते तिथे वेगळी राहणी,जन्म ठिकाण वगैरे असणाऱ्याना ते आवडतील/वापरता येतीलच याची काय खात्री?
आई आधी मावशीना साड्या घेऊन द्यायची दिवाळी ला.मग त्यांनी दोनदा आवडली नाही म्हणून बदलून द्यायला लावली.आता ती पैसे किंवा काय देऊ असं विचारून ती वस्तू देते.
आमच्या मावशी स्पेक्स मध्ये स्पष्ट असल्याने त्या आधीच पगाराला पगार बोनस पाहिजे, बदली वस्तू चालणार नाही सांगतात.