भाई - व्यक्ती की वल्ली

Submitted by क्षास on 6 January, 2019 - 10:25

⁣⁣⁣⁣⁣
भाई - व्यक्ती की वल्ली⁣⁣⁣⁣⁣
⁣⁣⁣⁣

पु. ल. देशपांडे हे नाव ऐकल्यावर डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधल्या आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा, धमाल किस्स्यांनी, वर्णनांनी भरलेली 'बटाट्याची चाळ' आणि प्रत्येक पानातून, ओळीतून मनमुराद हसवणारं 'असा मी असामी'. अशी अनेक भन्नाट पुस्तकं देणाऱ्या पुलंचा जीवनप्रवास छोट्या-छोट्या प्रसंगातून उलगडणारा चित्रपट म्हणजे भाई- व्यक्ती की वल्ली... पुलंच्या व्यक्तिमत्वासारखाच खुसखशीत आणि खुमासदार.⁣⁣⁣⁣⁣
⁣⁣⁣⁣
हा चित्रपट पूर्णपणे चरित्रपट किंवा माहितीपट नाही. यात पुलंच्या आयुष्यातली तसेच 'व्यक्ती आणि वल्ली' मधली काही काल्पनिक व्यक्तिमत्वेही येत राहतात. त्यामुळे कुठल्याही साच्यात न अडकता हा चित्रपट एकेक घटनेने,प्रसंगाने पुढे सरकत राहतो. अडीच तासांच्या पूर्वार्धात त्यांचे बालपणापासून ते कॉलेज जीवनापर्यंतचे गंमतीशीर प्रसंग, त्यांच्या आयुष्यातले भावनिक चढ-उतार, त्यांचं नाटक, संगीत आणि लिखाणाचं वेड हे सारं रेखाटलं आहे.....सुरवातीला पन्नासच्या दशकातली शुद्ध मराठी ऐकायला जड, कृत्रिम वाटते. पण पुलंच्या स्वभावातला निरागसपणा, मिश्कीलपणा, कोट्या,विनोद करण्यातली सहजता हे सारं बघता बघता आपण चित्रपटाशी एकरूप होऊन जातो....एवढ्या मोठ्या, प्रतिभावान माणसाचं साधं-सरळ आयुष्य पाहून तो आपलासाच वाटू लागतो.... त्यांच्या खाजगी आयुष्यातले हलके फुलके प्रसंग तसंच त्यांचं प्राध्यापकी सोडून नाटक-सिनेमामध्ये काम करणं, पटकथा-संवादलेखनात रमणं यातून पुलंचं आयुष्य उलगडत जातं. ⁣⁣⁣⁣⁣

साचेबद्ध, पूर्वनियोजित अशी काही विशिष्ट कथा नसल्यामुळे आणि कदाचित संघर्ष, वादविवादांनी भरलेले बायोपिक बघण्याची सवय लागल्यामुळे 'भाई' थोडा तुटक वाटतो. आय.सी.यु. मध्ये शेवटचे क्षण मोजणारे भाई आणि बाहेर सुनीताबाई, इतर मंडळी अशी सुरवात होऊन चित्रपट भूतकाळात येत-जात राहतो. आय.सी.यु. आणि फ्लॅशबॅक्स हे समीकरण तसं बरंच जुनं झालंय. चित्रपटात कलाकारांचीही बरीच दाटी आहे. अजून बारीकसारीक गोष्टी विनोदाच्या पेरणीमुळे झाकून गेल्या आहेत. बाकी पुलंबद्दल अधिक जाणून घ्यायचं कुतूहल जराही कमी होत नाहीत. महाराष्ट्राचं पुलप्रेम हे या चित्रपटापलीकडलं आहे तरीही पुलप्रेमींसाठी हे हसते-खेळते 'भाई' म्हणजे एक सुंदर पर्वणीच आहे. पूर्वार्ध बघितलेल्या प्रत्येकाची पावलं उत्तरार्ध बघायला फेब्रुवारीमध्ये नक्कीच थिएटरकडे वळतील याची मला खात्री आहे.⁣⁣⁣⁣⁣

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्राचं पुलप्रेम हे या चित्रपटापलीकडलं आहे तरीही पुलप्रेमींसाठी हे हसते-खेळते 'भाई' म्हणजे एक सुंदर पर्वणीच आहे.
अगदी अगदी.
कधी आला हा चित्रपट? कुठे पाहता येईल?

उत्सुकता <> कुतुहलता
जाणून घ्यायची उत्सुकता कमी होत नाही
जाणून घ्यायचे कुतूहल कमी होत नाही

आमच्या घरचे बघून आले आज.
मसालापट धमाल काहीतरी विनोदी अश्या अपेक्षेने बघायला गेलेले. तसे नव्हते तरी बरेपैकी आवडला म्हणाले. आता फेब्रुवारीत पुढचा भाग बघायला जाणार आहेत. गंमत म्हणजे दोन भागात आहे हे आधी घरच्यांना माहीत नव्हते. त्यांना हे सांगायचे माझेही राहिले. बघून आल्यावर अरे तुला महीत आहे का आविर्भावात मलाच सांगू लागले. मी कपाळावर हात मारला. त्याआधी बाळासाहेब ठाकरे बघणार आहेत म्हणाले. मस्त चीजी एन स्पाईसी सॅन्डवीच होणार.

चित्रपट पाहिला कालच..मजा आली Happy
पु ल, सुनीताबाई ह्यान्ची भूमिका करणार्‍या कलाकारांनी मस्त केलय काम..
शेवटची मैफील तर अतिउत्तम झाली.. भीमसेन जोशींचे हावभाव अचूक टिपलेत कलाकाराने..
थेटरला जऊन नक्की पाहा त्याशिवाय मजा नाही येणार..
विशेष म्हणजे अमराठी पब्लिक सुद्धा सब टायटल्स वाचत चित्रपट पाहत होतं.. पण त्या लोकांना सन्दर्भ कसा कळला असेल हे कोडे आहे..
उत्तरार्ध जरूर पाहणार

या पूर्वीही अतुल परचुरे ने साकारलेला पु. ल. यांच्या जीवनपटाचा वेध घेणारा चित्रपट टी व्ही वर पाहिलेला आठवतो. (साधारणपणे २ - ३ वर्षांपूर्वी)
कुणी पाहिला होता का ?

आम्ही पण सहकुटुंब भाई पहायला मल्टिप्लेक्सला गेलो पण मुलं आणि भावाने आग्रह केल्याने ऐनवेळी सिंबाची तिकिटं काढली.
चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना भाई पाहुन बाहेर पडणार्‍या तुरळक गर्दीतील चेहरे बघुन सिंबा पाहिल्याचं डबल समाधान वाटलं.

सिम्बा पण मस्त आहे..
दोन्ही सिनेमां,चा प्रकार खुप वेगळा आहे, नो तुलना!! Proud

>>दोन्ही सिनेमां,चा प्रकार खुप वेगळा आहे, नो तुलना!!<< हो.. नो तुलना अ‍ॅट ऑल.. मला जबरदस्ती सिंबा बघावा लागला हे खरंय पण तो पाहुन डोक्याला शॉट नाही लागला हेही खरं

मला जबरदस्ती सिंबा बघावा लागला हे खरंय पण तो पाहुन डोक्याला शॉट नाही लागला हेही खरं>>>
हे सेम माझ्याबाबतीत पण घडल.. पण मी रडून भाई ची तिकीट काढायला लावली नवरोबाला Lol
त्यामुळे दोन्ही दोघांनी पाहिलेत

>>पण मी रडून भाई ची तिकीट काढायला लावली नवरोबाला<< बायकांचं हे एक बरं असतं... नवर्‍याला बिचार्‍याला सिंबा बघायचा असला तरी भाई बघावा लागतो.. वाघाची शेळी होते ती अशी..! Lol Lol Lol

@ सूलू_८२ : >>सध्या सिम्बानी भाईची सिन्गल स्क्रीन्स बळकावली यावरुन चर्चा चालू आहे.<< अहो चर्चेचं काय घेऊन बसलात... शिव्या-शाप देण्यासोबत 'मराठी असल्याची लाज वाटणे' असले प्रकार सुरु आहेत. Proud Proud Proud

https://www.esakal.com/maharashtra/i-feel-ashamed-be-marathi-says-direct...

छान परीक्षण !
मला हा मूव्ही वाईटच असेल असं आधी वाटत होतं कारण एकतर मांजरेकर अनेकदा खूप वाईट मुव्हीज बनवतो आणि पुलं स्वतः इतक्या वेळा व्हिडियोत पाहिले आहेत की अतिपरिचित आहेत त्यामुळे त्यांचं बायोपिक करणं कठीण काम होतं. मी तर ट्रेलरही पाहिला नाही.
पण मूव्ही रिलीज झाल्यापासून सगळे पॉझिटिव्हच रिव्ह्यू येतायत. त्यामुळे मग ट्रेलर पाहिला आणि आवडला.
आमच्याकडे काल शो होता पण आधीच 'वाईट असेल' असं डोक्यात असल्याने तिकीट काढलं नाही, आता वाईट वाटतंय. पुढच्या वीकमध्ये शो असला तर बघू.

सिंबा आणि भाई.... काही कंपेरिझनच नाही.... काहीच्या काही!
हे म्हणजे बीबीसीआयच्या इंजिनाला जीआयपीचा डब्बा जोडल्यासारखे झाले Wink

मला आवडला हा पिक्चर. डोंबिवलीत सोमवारी दुपारच्या शोलाही चांगली गर्दी होती. उत्तरार्ध लागून असता आणि अजून तासभर जास्त असता तरी चाललं असतं. अभिनय सर्वांनी चांगला केलाय. सागर देशमुख परफेक्ट भाई वाटले.
काही ठिकाणी ट डो पा आले, टचिंग वाटले काही सीन्स. एक दोन ठिकाणी मला किंचित संथ वाटला पण एरवी ओघवता आहे. माझ्या भावा बहिणीला कुठेही किंचित संथ वाटला नाही मात्र.

शेवटची मैफील तर अतिउत्तम झाली.. >>> अगदी अगदी.

मी नक्की बघा सांगेन.

कालच पहिला इकडे हा चित्रपट. गर्दीपण होती बऱ्यापैकी.
एक उत्तम कलाकृती, सगळ्याच कलाकारांनीं काम उत्तम केली आहेत, फक्त पात्रांची जरा भाऊ गर्दीच वाटली ... काही पात्र तर का होती हे कळलेच नाही ...

शेवटची मैफिल तर वाह वाह क्या बात है ... पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय

काही विषयात potential इतकं असतं की तो विषय hit जातोच.भाई हा तसाच आहे पण त्यात पु.लं.च्या चरित्रापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर भर द्यायला हवा होता तिथे तो कमी पडला आहे काही प्रसंग उदा. वडिलांची मृत्यू, पहिले लग्न हे अनावश्यक वाटते त्यामुळे पसरटपणा आला आहे

वडिलांची मृत्यू, पहिले लग्न हे अनावश्यक वाटते >> पण त्या महत्वाच्या घटना आहेत ना त्यान्च्या आयुष्यातल्या. तरी पहिले लग्न आणि तिचा मृत्यू किती थोडक्यात दाखवलाय !

पण त्या महत्वाच्या घटना आहेत ना त्यान्च्या आयुष्यातल्या. तरी पहिले लग्न आणि तिचा मृत्यू किती थोडक्यात दाखवलाय !>> +१
मी नक्की बघा सांगेन.>> +१

तेच तर असे उरकून टाकलेले प्रसंग टाकणे गरजेचे होते का?संवादातून व्यक्त झाले असते की तसेही या प्रसंगातून खरंच त्यांच्या जीवनावर काही परिणाम झाला का आणि किती हे दाखवायला ममा कमी पडले आहेत

मला वाटत भाईंपेक्षा सुनिताबाईंवर सिनेमा जर काढला असता तर आणखी छान झाला असता. कारण बाईंच्या साहित्यातून त्यांच्या जीवनाचे अनेक चढउतार आणि भावनिक प्रसंग जिवंत उभे राहतात. पुलंचे लिखाण उत्तम आहेचं पण ते वाचून भाई समोर उभे राहत नाही.

मल नाही आवडला इतका. सुनिल बर्वे ओधून ताणून जब्बार बनायचा प्रयत्न करत होता असे वाटले उगाच ओठ खाली ओढुन... राम गबाले येतात त्या प्रसन्गात तर तो हसतोय असा भास झाला. इरावतीचे डोळे काळे आहेत आणि वयस्क सुनिताबाईंचे तपकिरी....चित्रपटाचा प्रवास सहज वाटत नाही. तु़कडे जोडल्यासारखा वाटत राहतो. शेवटची मैफल सोडली तर कोणताही प्रसंग पकड घेत नाही. इरावती चा अ‍ॅक्सेंट इंग्रजा़ळलेला आहे. तिच्याजागी दुसरे कोणीच नव्हते का? बाळ ठाकरेंना शाळेत शिक्षा करण्याचा प्रसंग तर प्रचंद नाटकी वाटला. सुनिता बाई म्हणतात कि भाई नि सिनेमा सोडला नाही त्यांना सोडावा लागला.... पण त्याचे स्प्ष्टीकरण नाही.