कादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी!

Submitted by फारएण्ड on 3 January, 2019 - 08:07

हा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. "बाप नंबरी बेटा दस नंबरी" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स!

गोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी

नट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला

जाली नोट छापनेकी मशीन

हे तिन्ही सीन्स मी असंख्य वेळा पाहिले आहेत. यातला विनोद काही फार ब्रिलियंट वगैरे नव्हे. पण सगळी मजा सादरीकरणात आहे. वेगवेगळे वेष, बेअरिंग आणि भाषेचा लहेजा घेउन कादर खान आणि शक्ती कपूर ने जी धमाल उडवली आहे त्याला तोड नाही. हे सीन्स पाहताना जाणवते की प्रत्येक वेळेस दोघेही त्या त्या भूमिकांमधे पूर्ण शिरले आहेत. ते बोलत नसतानाही त्यांचे हावभाव पाहा, त्या कॅरेक्टर्स च्या व्यक्तिमत्त्वात त्यांनी घातलेली भर पाहा - सगळेच खतरनाक आहे. विशेषतः कादर ने एकदा पारशी बावा, एकदा गुज्जू आणि एकदा मराठी हवालदार म्हणून धमाल उडवली आहे. हा गुज्जू अवतारात बोलत असताना मधेच शक्ती कपूर फोनची वायर कानात घालतो आणि त्यामुळे यांचा फ्रॉड उघडकीस येइल याची भीती वाटल्याने हळूच त्याला जेव्हा सांगतो, तेव्हा नॉर्मल हिंदीत सांगतो. ही अशी 'मेथड इन मॅडनेस' अनेकदा दिसते त्याच्या सीन्स मधे. ज्या प्रेक्षकवर्गाकरता हे सीन्स लिहीले जातात त्यांना पांचट कॉमेडी आवडते असे गृहीत धरल्याने असे न्युआन्सेस लक्षात ठेवले जात नाहीत असे आपण अनेक हिंदी व विशेषतः मराठी चित्रपटात पाहतो. त्यामानाने कादर खान च्या सीन्स मधे ते पाळलेले लगेच जाणवतात.

कादर खानचे गेल्या दोन दशकांत असे अनेक सीन्स/स्किट्स आहेत. चालबाज मधे शक्ती कपूरला लुटतानाचा एक सीन असो, नाहीतर हीरो नं १ मधला तो सासरा, किंवा कोणत्यातरी चित्रपटात कायम फोटोतून आपल्या मुलाशी बोलणारा - असे अनेक अचाट आणि अतर्क्य कॉमेडी रोल्स त्याने केले. आधी ८०ज मधे जितेंद्रच्या चित्रपटांमधून कॉमेडी व्हिलन नावाचा प्रकार जबरी होता त्याचा, आणि नंतर गोविंदाच्या "नं १" टाइप चित्रपटांतील सासरा किंवा इतर तसेच रोल्सही.

पण एकूणच लहानपणीपासून जे पिक्चर पाहिलेत त्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कादर खान सतत असेच. कधी स्वतः केलेले काम तर अनेकदा चित्रपटाचे संवाद.

८० च्या दशकातील सुरूवातीच्या चित्रपटात व्हिलन म्हणून तो तसा सरधोपट होता, नंतर कॉमिक व्हिलन झाला. पण मला सर्वात आवडला तो थोडा नंतर आलेल्या 'अंगार' मधला जहाँगीर खानचा रोल. कदाचित त्याचे मूळ अफगाण व्यक्तिमत्त्व हा रोल साकारताना नैसर्गिकरीत्या पुढे आले असावे. बाकीही रोल्स इतके आहेत की आता पटकन आठवतही नाहीत. ८० आणि ९० च्या दशकात त्याने इतके विविध रोल्स केले आहेत की कादर खान चित्रपटात नाही अशीच उदाहरणे कमी असतील.

पण बच्चन फॅन्स करता त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे बच्चन च्या इमेजला त्याने सर्वसामान्यांना आपला वाटेल असे 'पॅकेज' केले. १९७७ सालची सिच्युएशन पाहा. अमिताभ प्रचंड लोकप्रिय झाला होता, अँग्री यंग मॅन म्हणून. तोपर्यंत दीवार आणि शोले रिलीज होउन दोन वर्षे झाली होती. हे दोन चित्रपट, आणि त्याचबरोबर आनंद, नमक हराम, अभिमान आणि कभी कभी अशा चित्रपटांमधून अमिताभची एक सतत धुमसणारा, कमी बोलणारा, रागीट अशी प्रतिमा निर्माण झालेली होती. अपवाद दोनच - बॉम्बे टू गोवा आणि चुपके चुपके. या दोन्हीत त्याने विनोदी रोल्स केले असले तरी ते ट्रेण्डसेटर्स झाले नाहीत. बॉम्बे टू गोवा मधला अमिताभ त्याचे मॅनरिजम्स नंतर ओळखीचे झाल्याने थोडा उशीराच गाजला असावा, तो चित्रपट लागला तेव्हा मेहमूदच जास्त छाप पाडून गेला असेल असा माझा अंदाज आहे. तसेच चुपके चुपके मधला अमिताभ धमाल असला, तरी ती हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटातील व्हाइट कॉलर कॉमेडी. अमिताभच्या 'मास इमेज' मधे पुढे फारशी दिसली नाही.

अशा वेळेस मनमोहन देसाईं आणि कादर खान यांनी ती अँग्री प्रतिमा पूर्ण बदलवणारा "अँथनी" निर्माण केला, आणि त्यानंतर लगेच कादर खानने प्रकाश मेहरा करता "सिकंदर" लिहीला. या दोन्ही रोल्स नी अमिताभ आम जनतेत पोहोचला. दीवार, जंजीर, त्रिशूल, शोले हे त्याला सुपरस्टार करायला पुरेसे होते, पण अ‍ॅंथनी आणि सिकंदर ची मजा वेगळीच होती. तुम्हाला सलीम जावेदचा "विजय" भेटला तर तो काहीतरी शार्प डॉयलॉग रागाने मारून तेथून निघून जाईल, पण अँथनी किंवा सिकंदर तुमच्याशी गपा मारतील, ते ही बम्बैय्या हिंदीत. अमिताभला सर्वसामान्य पब्लिककरता अ‍ॅप्रोचेबल करण्याचे काम कादर खानच्या कॅरेक्टर्सनी केले. ती त्याची माझ्या दृष्टीने सर्वात मोठी कामगिरी आहे.

कादर खानची एक मुलाखत बघितली होती. अमर अकबर अँथनी च्या वेळेस हे तिन्ही लोक कसे काम करत वगैरे बद्दल. मजेदार आहे एकदम. तसेच नंतर अजून एका मुलाखतीत त्याच्यात आणि अमिताभमधे कसा दुरावा आला ते ही त्याने सांगितले आहे. अमिताभचे त्याबाबतीत मत काय आहे कल्पना नाही, पण कादर खान ने जे सांगितले ते तसेही विश्वासार्ह वाटते. या दोन्ही क्लिप्स यू ट्यूबवर आहेत.

अमिताभचे अनेक लोकप्रिय संवाद त्याने लिहीले आहेत. गेल्या एक दोन दिवसांत त्यातले बरेचसे चुकीचेच (म्हणजे विशेष खास नसलेले) पेपर्स मधे आलेत. मला सर्वात आवडणारा सीन म्हणजे मुकद्दर का सिकंदर मधला कब्रस्तानातील संवाद - जेव्हा तेथील "फकीर" कादर खान ज्यु अमिताभ व त्याच्या बहिणीला समजावतो. ज्यांनी मुकद्दर का सिकंदर थिएटर मधे पाहिलेला आहे त्यांना हा सीन पुढे सरकतो तसे थिएटर मधे कल्ला वाढू लागतो, शिट्ट्या आणि अनेकदा नाण्यांचे आवाजही - ते सगळे लक्षात असेल. मी पुण्यात "मंगला" मधे अनेकदा अनुभवले आहे. अमिताभच्या असंख्य "एण्ट्रीज" पैकी ही माझी सर्वात आवडती आहेच पण एण्ट्रीच्या आधी ज्यु अमिताभला कादर खान ने जे सांगितले आहे त्याचे सादरीकरणही भन्नाट आहे. आधी ती दोन लहान मुले रडत असताना तो येतो आणि शांत गंभीर आवाजात त्यांची समजूत काढायला सुरूवात करतो. "मौत पे किसकी रस्तगारी है, आज इनकी तो कल हमारी बारी है". तेथून पुढे संगीतामधे "क्रेसेण्डो" म्हणतात तसा त्या डॉयलॉग्ज मधला जोर वाढत जातो आणि मग मोठ्या अमिताभची मोटरसायकलवरून एण्ट्री होते. हा "लीड अप" कादर खाने ने सुंदर लिहीला आहे आणि तितकाच जोरदार सादरही केला आहे. त्याची इथली संवादफेक जबरदस्त जमली आहे.

अँथनी आणि सिकंदर हे अमिताभचे माझ्यातरी टॉप ५ मधले रोल्स आहेत. सलीम जावेद च्या कॅरेक्टर्स मधे सहसा न दिसणारी एक "warmth" कादर खान ने लिहीलेल्या अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे दिसते. "मकान ऊंचा बनाने से इन्सान ऊंचा थोडे ही ना हो जाता है" हा वरकरणी (तेव्हाही) चीजी वाटेल असा संवाद, पण त्यानंतर पुढे अमिताभ बोलतो ते ऐकले तर लक्षात येते की ते सिकंदर च्या कॅरेक्टरशी कन्सिस्टंट आहे. अ‍ॅंथनीला ही मिश्किल्/गमत्या करून कादर खान ने अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे विनोद आणला - पुढे जवळजवळ सर्व चित्रपटांत इतर लेखक/दिग्दर्शकांनीही त्याचे अनुकरण केले. सलीम जावेद चा "विजय" बहुतांश विनोद ड्राय ह्यूमर टाइपचे करतो - चेहरा गंभीर ठेवून "मारलेले" पंचेस असत ते. पण कादर खानचा अमिताभ मुळातच कॉमिक होता. हा कॉमिक अँगल इतका झाला की नंतर अमिताभने कॉमिक साइड किक च्या पात्राची गरजच ठेवली नाही असे लोक म्हणत. पुढे परवरिश, सुहाग, देशप्रेमी, सत्ते पे सत्ता, याराना सारख्या अनेक चित्रपटांतून त्याच फॉर्मचे कॅरेक्टर त्याने अमिताभकरता लिहीले.

चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे चांगले किंवा टुकार लेखन त्याला सहज जमत असे. "शराबी" मधे अमिताभचे शेर फेमस झाले होते. काही चांगले शेर आहेत पण अनेक टुकार असल्याने जास्त फेमस आहेत. "शराबी को शराबी नही, तो क्या जुआरी कहोगे? गेहूँ को गेहूँ नही, तो क्या जवारी कहोगे", किंवा "जिगर का दर्द ऊपर से कहीं मालूम होता है, के जिगर का दर्द ऊपर से नही मालूम होता" सारखे. पण कादर खान ने ते तसे लिहीण्याचे कारण चित्रपटात आहे. अमिताभ प्रेमात पडायच्या आधी तो दर्द त्याने अनुभवलेला नसतो त्यामुळे त्याला शेर मारायची अफाट हौस हसूनही ते जमत नसतात. त्यामुळे पहिल्या भागात त्याचे सगळे शेर टुकार आहेत. ओमप्रकाश त्याला त्याबद्दल सतत सांगत असतो, तुझे शेर "घटिया" आहेत म्हणून. मात्र नंतर जयाप्रदाला भेटल्यावर पुढे तो बोलतो ते संवाद कादर खान ने बदलले आहेत.

वरकरणी साधे किरकोळ व अनेकदा टुकार वाटणार्‍या त्याच्या अनेक कॅरेक्टर्सच्या मागे बराच विचार असे, तो ते बरेच सीन पुन्हा पहिल्यावर लक्षात येत असे. बम्बैय्या संवाद ही त्याची खासियत होती. हिंदी चित्रपटातले टॉप ४-५ बम्बैय्या कॅरेक्टर्स बघितली तर आमिरच्या रंगीलामधल्या मुन्ना आणि मनोज वाजपेयीच्या भिकू म्हात्रे च्या बरेच आधी अमिताभचा "अँथनी" आणि अमजद खानचा "दिलावर" ही दोन जबरदस्त उदाहरणे. ही दोन्ही कादर खानने लिहीलेली आहेत.

"ते गेले नाहीत. ते त्यांच्या विचारांच्या/कलाकृतींच्या माध्यमातून आपल्यामधे आहेत" वगैरे वाक्ये आपण अनेक लोक थोरामोठ्यांबद्दल वापरताना आपण वाचतो. पण कादर खानच्या बाबतीत ते शब्दशः खरे आहे. आनंद मधे शेवटी अमिताभ रडत असताना बाजूला सुरू असलेल्या टेप मधून पुन्हा "बाबूमोशाय" ऐकू येते तसेच टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करताना सुद्धा कोठेतरी नक्कीच कादर खान ने लिहीलेले किंवा स्वतःच सादर केलेले एखादे टाइमपास विनोदी वाक्य आपल्या कानावर आत्ता सुध्दा लगेच पडेल, आणि पुढेही येत राहील.

नाहीतर मग शक्ती कपूर/गोविंदा बरोबरच्या त्याच्या क्लिप्स पाहा, मनोरंजनाची गॅरण्टी!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलाय लेख!
मला स्वतःला आवडलेला रोल म्हणजे बोल राधा बोल मधला जुगनू! त्याला संध्याकळी सहा वाजल्यानंतर काहीच दिसत नाही, म्हणजे तो रातांधळा असतो. अशा माणसाचं नाव जुगनू( काजवा) हाच एक मोठा विनोद होता आणि कादर खानने तो सुण्दर उभा केला होता. ( क्लायमॅक्समधे त्याला सहा वाजून गेले तरी दिसू लागतं, पण ऐकू येणं बंद होतं :-ड)>>>>>.जबरी होते ते सीन. त्यात कळस म्हणजे त्याच सिनेमात कादरखान एका गिर्‍हाईकाला घेऊन रिक्षा चालवत असतो. रात्र झाल्याने त्याला दिसणे बंद होते. तेवढ्यात एक जण येऊन त्याला थांबवतो आणी म्हणतो एवढा मोठा ट्रक तुला दिसला नाही का रे, आंधळा आहेस का? तर हा म्हणतो, तो ट्रक होता का? मुझे लगा सामनेसे दो बाईकवाले आ रहे है, मै उन दोनों के बीचमेंसे आपनी रिक्षा लेकर जाऊंगा. हा सीन पाहुन जाम हसले मी .

फारएंड, खूप छान, मनापासुन लिहीले आहेस.

तो घर हो ऐसा पण धमाल पिक्चर होता. पुरी कौटुंबीक करमणूक होती. अनिल कपूर , मीनाक्षी शेषाद्रीने धमाल उडवली होती. कादरखान यांचे चांगल्या घराचे स्वप्नच असावे बहुतेक, कारण त्यांच्या कथानकात कायम प्रेमळ घराची झलक असायची.

वाईट याचेच वाटते की लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात, आणी मावळत्या कडे पाठ फिरवतात. अमिताभची ते शेवटपर्यंत आठवण काढत होते, असे आज लोकसत्ता मध्ये वाचले, खूप वाईट वाटले. इगो पुढे माणुसकी आणी मैत्री शून्य? अमिताभकडुन ही अपेक्षा कधीच नव्हती. ए के हनगल गेले तेव्हा सुद्धा त्यांच्या निरोपाला दोन - चारच टाळकी !! Sad तिथे पोहोचलेल्या रझा मुरादने हे स्पष्ट पणे बोलुन दाखवले. खूप वाईट वाटले वाचल्यावर.

भारी लेख रे फारेन्डा! तुझा जबरी अभ्यास जाणवतोय लेखातून. मला नटवरलाल किंवा मुकद्दर का सिकंदर च्या काळापुढचा कादरखान माहीत नाही. पण लेख वाचायला मजा आली.

मस्त लेख. आता काही सीन्स पाहिले पाहिजेत Happy
कादर खान हॉस्पिटलमध्ये असताना अमिताभचे दुआ संदर्भात पोस्ट होते. त्या दोघांमध्ये नक्की बेबनाव का, कसा झाला होता देवजाणे.

दुख जब मेरी कहाणी सूनता हैं तो खुद दुख को दुख होता है!
-- रामन (बाप नंबरी बेटा दस नंबरी)

औरत चाहे तो घर को नर्क बना सकती है और वोही औरत चाहे तो उसे स्वर्ग से सुंदर बना सकती हैं
-- मिलावट राम (स्वर्ग से सुंदर)

छान लिहिलंय
कादर खान संवादलेखकही आहेत हे माहीत होतं, पण त्यांच्या लेखणीतून कोणत्या चित्रपटांचे आणि काय प्रकारचे संवाद आलेत, हे ते गेल्यावरच कळलं.

http://vidmixz.com/watch/0Z_-IeYq9jo

विविधभारती - उजाले उनकी यादों के - कादर खान.
तीन भागांत आहे ही मुलाखत.

हा लेख वाचायचा राहून गेला होता. खूप छान लिहिलंय फारेण्डा !
...नाहीतर मग शक्ती कपूर/गोविंदा बरोबरच्या त्याच्या क्लिप्स पाहा, मनोरंजनाची गॅरण्टी! +१

Pages