उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 September, 2018 - 00:11

मनस्वी मुक्त जगताना जगाला भीत नव्हते मी
फरक इतकाच होता की विसरले रीत नव्हते मी

तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी

बरे केलेस दाखवलीस तू जागा मला माझी
किती पाण्यात होते नेमकी माहीत नव्हते मी

सदा कोषात वावरल्यामुळे दुर्लक्षिले गेले
कुणालाही कधीही टाकले वाळीत नव्हते मी

तुझ्या माझ्यातले हे साम्य बहुधा आडवे आले
कण्यातुन वाकले नाही जरी, मोडीत नव्हते मी !

खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी

स्वतःच्या अनुभवांवर बेतले एकेक शेराला
कुणालाही कधीही फारसे वाचीत नव्हते मी

तुझ्या कुवतीप्रमाणे काढले अनुमान माझे तू
तुझ्या प्रेमात, कुठल्याही चढाओढीत नव्हते मी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान!!
तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी>>
खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी>>>
हे फार आवडले

1 नंबर

अप्रतिम,

खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी >> हे तर खासच

खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी>>>
हे फार आवडले

तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी

खुप सुन्दर .....!