मला काहीच आठवत नाहीये भाग ३ - अनोळखी ओढ...

Submitted by अज्ञातवासी on 26 December, 2018 - 08:47

भाग १
https://www.maayboli.com/node/68392

भाग २
https://www.maayboli.com/node/68439

"मने, उठतेय ना?"
मला ओरडून सांगावं वाटत होतं, तुम्ही जा, मला नाही यायचंय त्या नाटकाला. पण आई बाबा मला एकटं सोडून नसते गेले, आणि मला बाबांचा आनंद घालवायचा नव्हता.
न जाणे का, मला जमदग्नी नाव ऐकल्याबरोबर अंगाला काटे यायला लागले होते. हेच नाव माझ्या डोक्यात फिरत होतं.
एक अनामिक भीती जी मला खात होती. मला तोडत होती.
शेवटी मनाचा हिय्या करून मी उठले, आणि आम्ही निघालो.
रस्ताभर बाबांची बडबड चालू होती, जणूकाही जमदग्नीने त्यांना संमोहित केलंय. फक्त त्याचं कौतुक, बाकी काही नाही!
आणि मला कुणीतरी कृष्णविवरात ओढतंय असं वाटत होतं.
नाट्यगृहाच्या दाराशीच मला बघून आयुषीने हात हलवला. मला तिला बघून काय हायसं वाटलं म्हणून सांगू! आयुषीचे बाबा आणि तिची आई दोन्हीही आमच्याजवळ येऊन आई बाबांशी गप्पा मारत बसले.
"आयुषी हा जमदग्नी कोण आहे ग?"
"तुला जमदग्नी माहिती नाही?" आयुषी अक्षरशः डोळ्यातून आग ओकत होती. पण परत तीच स्वतःशीच म्हणाली,
"शांत हो आयुषी, शांत हो. कुणी कितीही विचित्र प्रश्न विचारू दे, त्यांचं अज्ञान दूर करण्यातच जीवनाच सार्थक आहे. तर तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उतर माहिती नसलेला कुठलाही माणूस या गावात नसेल. जमदग्नीची ओळख करून द्यायला मी खूप लहान आहे. जमदग्नी हा नाट्यदैवतेचा पुत्र. जमदग्नी हा नटसम्राटांचा राजा. जमदग्नी म्हणजे रंगभूमीवरचा ध्रुवतारा. वयाच्या ९ वर्षी त्याने नाट्यदेवतेची आराधना करण्यासाठी घर सोडलं. घर सोडून तो अंकलेश्वर पवार 'अंकु' यांच्याकडे गेला."
मलाही त्याही अवस्थेत हसू फुटलं...
"हसू नकोस, अंकु म्हणजे आपल्या वर्गातला दातपड्या अंकु नाही, तर त्याकाळचे रंगभूमीचे नावाजलेले कलाकार. पण त्यांनी जमदग्नीला थारा दिला नाही."
मग?
"जमदग्नी भ्रमिष्ट झाला, रानोमाळ फिरला, फळे खाऊन राहू लागला. अशाच एका गावात फिरत असतांना गुलाम कुसुणुस यांना देवीने दृष्टांत दिला, आणि गुलाम त्याला घरी घेऊन आले. त्याकाळी रंगभूमीवर अंकुच्या 'साता जन्माचा मी तुझा सखा'चा दरारा होता. गुलाम हेही जुन्या काळातील गाजलेले लेखक. पण अंकुच्या कौटुंबिक नाटकांपुढे त्यांची मात्रा चालेना. देवीचा दृष्टांत म्हणून त्यांनी जमदग्नीला घेऊन 'कुमार तांडवम' ची निर्मिती केली, आणि कुमार तांडवमने इतिहास रचला. अक्षरशः जमदग्नीला बघण्यासाठी लोकांनी मारामाऱ्या केल्या, आणि अंकुची सद्दी संपली.
आज जमदग्नीच 'सुखांतीका' लागलंय, ते बघायला आपण इथे आलेलो आहोत." आयुषी नाक उडवून रागात म्हणाली.
"आयुषी, किती हुशार आहेस ग तू," मी भारावून म्हटले.
आयुषीने नाक फेंदरल. बहुतेक तिला राग आला होता माझा.
"चल जाऊयात, घंटा वाजली बघ..."
आम्ही आत गेलो.
आत अक्षरशः जत्रा भरली होती. सभागृहाची क्षमता १०,००० असूनही एकही खुर्ची रिकामी दिसत नव्हती.
नाट्यगृह गोलाकार होतं, वर अतिशय उंचीवर एक घुमट होता. डाव्या व उजव्या बाजूला वाद्यवृंद असून मध्ये रंगमंच होता.
आयुषी तिच्या जागेवर जाऊन बसली, मीही बाबांच्या मध्ये बसले.
मला काहीतरी ओढत होतं, काहीतरी खुणावत होतं. मी जिवाच्या आकांताने तिथून बाहेर पडण्यासाठी तडफडतेय असं मला वाटत होतं...
तेवढ्यात एक उंचपुरा माणूस रंगमंचावर आला.
"रसिकजनहो, नाट्यप्रभुहो, दानशूरहो आणि आश्रयदात्याहो! कलेसाठी आम्ही जगतो, आणि कला आम्हाला जगवते, अर्थात तुमच्या रूपाने...
तर आयुष्यात कोण कुठल्या रूपाने येईल नाही सांगता येत. अरे जिथे देवाला अवतार घ्यावे लागले, तिथे मनुष्याची काय कथा! देवाने अवतार घेतले, फक्त सर्व सुखकारक करण्यासाठी. सुखांत जसा देवाला हवा असतो, तसा माणसालाही...
म्हणून सादर करत आहोत, एका अवताराची कथा, 'सुखांतीका'..."
टाळ्यांचा कडकडाट झाला. नाटक सुरू झालं. माझी अवस्था बिकट होत होती, पण अजून जमदग्नी आला नव्हता.
नाटकात एक स्त्री स्वगत म्हणत होती...
'मेलाय वाडयातला पुरुष... सगळे एकजात नपुंसक... आज माझा सारंग असता तर...'
...रणमंचावर विजांचा कडकडाट झाला, एक दार धडकन उन्मळून पडलं...
लोक बेभान झाले होते... टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता...
जमदग्नी आला होता!!!
आणि मी बेशुद्ध पडले...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy
लवकर लिही पुढचा भाग..
उत्सुकता लागलीये पुढे काय झालं ,जाणून घ्यायची..

OMG मेघा इज बॅक!!!!
आनंदाने उड्या मारणारा बाहुला अशी ईमोजी कशी टाकायची?

धन्यवाद गुगु.
चलायचं? आधी पूर्ण करावी लागेल, तिचा प्लॉट खूप गुंतागुंतीचा आहे.
ही कथा खूप मोठी होईल असं वाटतंय, त्यामुळे सावकाश पूर्ण करतो.