११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

Submitted by कुमार१ on 26 December, 2018 - 04:28

“डोकेदुखी? अंगदुखी? त्यामुळे अगदी बेजार झाला आहात? मग एक अ‍ॅस्पिरीन घ्या अन या त्रासापासून लगेच मुक्ती मिळवा, ढँ ट ढँण... !” यासारख्या अनेक माध्यमांतील जाहिरातींनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मनावर गारूड केले आहे. मला खातरी आहे की आपल्यातील बहुतेकांनी ही गोळी आयुष्यात कधी ना कधी नक्की घेतली आहे. अ‍ॅस्पिरीनयुक्त अनेक औषधी गोळ्या औषध-दुकानात कुणालाही अगदी सहज (ओव्हर द काउंटर) मिळतात. अ‍ॅस्पिरीनचा तात्पुरता वेदनाशामक आणि तापविरोधी गुणधर्म यामुळे रुग्णास त्याने काहीसे बरे वाटते. अ‍ॅस्पिरीन हे आधुनिक वैद्यकाच्या इतिहासातील एक मूलभूत आणि आश्चर्यकारक औषध (wonder drug) आहे. आज त्याच्या गुणधर्माची कित्येक नवी औषधे उपलब्ध असतानाही त्याने बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवले आहे यात शंका नाही. अंगदुखी व तापाखेरीज हृदयविकार आणि अन्य काही आजारांतही त्याची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. अशा या वलयांकित औषधाचा शोध, त्याचे उपयोग, दुष्परिणाम आणि त्याबद्दलचे नवे संशोधन या सर्वांचा या लेखात आढावा घेत आहे.

अ‍ॅस्पिरीनचे रासायनिक नाव Acetyl salicylic acid असे आहे.

अ‍ॅस्पिरीनचा शोध:
अनेक आजारांचे एक महत्त्वाचे लक्षण असते ते म्हणजे वेदना. तिच्या तीव्रतेनुसार रुग्ण कमी-अधिक अस्वस्थ असतो. त्यामुळे वेदनाशामक औषधांचा शोध ही वैद्यकातील फार प्राचीन गरज होती.
Salicylic acidच्या वेदनाशामक उपयोगाची पहिली नोंद सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुमेरिअन संस्कृतीत झालेली आढळते. हे आम्ल अनेक झाडांच्या खोडात असते. त्यात प्रामुख्याने ‘विलो’ या झाडाचा समावेश आहे. हेच ते झाड, ज्यापासून क्रिकेटची बॅट बनवली जाते. पुढे चिनी व ग्रीक संस्कृतीमध्येही वेदना व तापनिवारणासाठी त्याचा वापर केला जाई.

* विलोचे झाड (चित्र):
willo.jpg

त्यानंतरचा आधुनिक वैद्यकाचे पितामह Hippocrates यांनी त्याचा महत्त्वाचा वापर केला. ते रुग्णांना विलो झाडाचे खोड चघळण्यास देत. तसेच स्त्रियांच्या प्रसूतिवेदना कमी होण्यासाठी या खोडापासून केलेला चहा त्यांना पिण्यास देत असत.
नंतर १८व्या शतकाच्या उत्तरार्धात अ‍ॅस्पिरीनचा वापर थंडी वाजून ताप येणाऱ्या रुग्णांवर केला गेला. पुढे एक शतकानंतर विलोच्या खोडाच्या पावडरीचा प्रयोग rheumatismसाठी केला गेला आणि अशा रुग्णांची सांधेदुखी व ताप त्यामुळे कमी झाला.

यापुढील टप्प्यात विलोपासून पिवळ्या रंगाचा एक पदार्थ वेगळा करण्यात यश आले आणि त्याला Salicin हे विलोचे लॅटिन नाव दिले गेले. पुढे Salicin हे शुद्ध स्फटिक स्वरूपात तयार केले गेले आणि मग जर्मनीतील एका कंपनीने Salicylic acidचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. आता त्याचा रुग्णांसाठी सररास वापर होऊ लागला. या रुग्णांना त्याचा गुण आला खरा, पण त्याचबरोबर खूप उलट्याही होत. हा अर्थातच औषधाचा दुष्परिणाम होता. त्यावर मात करता आली तरच हे औषध रुग्णांसाठी वरदान ठरणार होते.

मग जर्मनीतील ‘बायर’ कंपनीने यात विशेष रस घेतला. त्याकामी Felix Hoffmann या तंत्रज्ञाची निवड करण्यात आली. खुद्द त्याच्या वडिलांना खूप सांधेदुखीचा त्रास असल्याने त्याने या कामात अगदी जातीने लक्ष घातले. मग खूप विचारांती त्याने Salicylic acid च्या रेणूत एक रासायनिक बदल केला. तो म्हणजे त्यात Acetyl group घालून Acetylsalicylic acid हे नवे रसायन तयार केले. मग या नव्या औषधाचे रुग्णांवर बरेच प्रयोग झाले. आता त्यामुळे उलट्या होण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याचे दिसले. अखेर या औषधाच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन मार्च १८९९मध्ये ‘बायर’ने ‘अ‍ॅस्पिरीन’ या व्यापारी नावाने त्याची रीतसर नोंदणी केली. वेदनाशामक औषधांच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण म्हटला पाहिजे!

felix.jpg
(Felix Hoffmann)

या मूलभूत औषधाच्या शोधासाठी अनेकांकडून समांतर संशोधन चालू होते. त्यामुळे हा शोध नक्की कोणी लावला याबाबत काही प्रवाद आहेत.
आता ही कंपनी दवाखान्यांना व रुग्णालयांना अ‍ॅस्पिरीनची पांढरी पावडर पुरवू लागली. ‘अ‍ॅस्पिरीन’ शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे:
A = acetyl,
Spiraea हे विलो झाडाच्या गटाचे शास्त्रीय नाव आणि
in हा अंत्य प्रत्यय त्याकाळी औषधी नावांना लावला जाई.

asp bottle.jpg

ही औषधी पावडर आता मोठ्या प्रमाणावर वापरात आली. मात्र रुग्णांना ती पुडीत बांधून देणे हे तसे कटकटीचे वाटे. मग वर्षभरातच कंपनीने अ‍ॅस्पिरीनची गोळी तयार केली. त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. किरकोळ अंगदुखीसाठी कुणालाच डॉक्टरकडे जायला नको वाटते. त्या दृष्टीने ही गोळी डॉक्टरांच्या चिठ्ठीविना उपलब्ध होणे आवश्यक होते. मग तिला या औषध नियमातून मुक्त करण्यात आले. १९१५पासून अ‍ॅस्पिरीन हे औषध दुकानात कुणालाही सहज (OTC) मिळू लागले. किंबहुना OTC हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला. त्यानंतर आजतागायत या गोळीने बहुतेक कुटुंबांत औषधांच्या घरगुती बटव्यात स्थान मिळवले आहे.

आता जरा अ‍ॅस्पिरीनचा औषधी गुणधर्म व्यवस्थित समजावून घेऊ. ते मुख्यतः वेदनाशामक आहे आणि काही अंशी तापविरोधी. जेव्हा एखाद्याला जंतुसंसर्ग अथवा कुठलीही इजा होते, तेव्हा शरीरपेशी त्याचा प्रतिकार करतात. या प्रतिकाराला दाह (inflammation) असे म्हणतात. या दाह-प्रक्रियेत पेशींत अनेक रसायने सोडली जातात. त्यांच्यामुळे मग रुग्णास वेदना व ताप ही लक्षणे जाणवतात. ती कमी करण्यासाठी ही दाह-प्रक्रिया नियंत्रित करावी लागते. अ‍ॅस्पिरीन नेमके हेच काम (anti inflammatory)करते. आता सूक्ष्म पातळीवर हे नेमके कसे होते हे जाणून घेणे ही संशोधनातील पुढची पायरी होती. त्या दृष्टीने संशोधकांचे अथक प्रयत्न चालू होते.

ही उकल व्हायला १९७१ साल उजाडावे लागले.

वर उल्लेखिलेल्या पेशींतल्या दाह-प्रक्रियेत पेशींत जी रसायने सोडली जातात, त्यापैकी एक प्रमुख म्हणजे Prostaglandins. त्यांच्यामुळेच वेदना जाणवते. अशा वेळेस जर रुग्णास अ‍ॅस्पिरीन दिले, तर ते या रसायनांच्या निर्मितीत अडथळा आणते. परिणामी दाह कमी होऊन वेदनेपासून आराम मिळतो. अत्यंत मूलभूत स्वरूपाचे हे संशोधन होते. म्हणून कालांतराने त्यासाठी नोबेल परितोषिक दिले गेले.

एव्हाना अ‍ॅस्पिरीन हे वेदनाशामक औषध म्हणून प्रस्थापित झाले होते. तरीही त्यावरील संशोधन अद्याप चालूच होते. त्यातून त्याच्या आणखी एका पैलूचा शोध लागला. हा पूर्णपणे वेगळ्या संदर्भात होता. आपल्या रक्तात बिम्बिका या वैशिष्ट्यपूर्ण पेशी (platelets) असतात. जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा रक्तस्राव होतो आणि थोड्याच वेळात तो थांबवण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत बिम्बिकांमध्ये Thromboxane हे रसायन तयार होते आणि ते या पेशींना घट्ट एकत्र आणते. एक प्रकारे त्यांचे ‘बूच’ तयार होते आणि ते जखमेला ‘सील’ करते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घ्यावा. जेव्हा जखमेतून रक्त वाहते तेव्हाच हे ‘बूच’ तयार झाले पाहिजे. परंतु, या बिम्बिकांची एक गंमत आहे. एरवीही जेव्हा त्या रक्तप्रवाहात असतात, तेव्हासुद्धा त्यांच्यात एकत्र येऊन चिकटण्याचा गुण असतो. जर का हे नेहमीच्या रक्तप्रवाहात होऊ लागले, तर मात्र आफत ओढवेल. कारण आता त्यांची गुठळी तयार झाली तर त्यामुळे रक्तवाहिनीत अडथळा होईल. त्याचे परिणाम अर्थातच गंभीर असतील. अर्थात असे होऊ न देण्याची नैसर्गिक यंत्रणा रक्तवाहिन्यांत असते. त्यांच्या पेशींतून असे एक रसायन सोडले जाते, ज्यामुळे बिम्बिका एकत्र येऊ शकत नाहीत.

काही रुग्णांत मात्र हा नैसर्गिक समतोल बिघडतो आणि बिम्बिका विनाकारण एकत्र येऊन चिकटण्याची प्रक्रिया जास्तच होऊ लागते. परिणामी रक्तवाहिन्यांत गुठळ्या होउन रक्तप्रवाहास अडथळा होतो. जर ही प्रक्रिया कॉरोनरी वाहिनीत झाली, तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तर मेंदूच्या रक्तवाहिन्यातील अडथळ्याने Strokeचा आजार होतो. अशा रुग्णांवर उपचार करताना बिम्बिका एकत्र येण्याला विरोध करणारी औषधे देतात. त्यामध्ये अ‍ॅस्पिरीनचा समावेश आहे. त्याचे दीर्घकालीन उपचार या रुग्णांसाठी लाभदायी असतात. अ‍ॅस्पिरीनच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यामुळे आता ते निव्वळ किरकोळ अंगदुखीवरचे औषध न राहता एका ‘वरच्या’ पातळीवरचे औषध म्हणून मान्यता पावले. आता रक्त- गुठळीने होणाऱ्या ह्रदयविकाराच्या आणि मेंदूविकाराच्या रुग्णांसाठी ते प्रतिबंध आणि उपचार अशा दोन्ही आघाड्यांवर सररास वापरले जाते.

हृदयविकाराच्या प्रतिबंधात्मक वापराबद्दल मात्र तज्ज्ञांमध्ये काही मतभेद आहेत. या संदर्भात रुग्णांचे दोन गट पडतात:
१. ज्यांना हा विकार होण्याचा धोका अधिक संभवतो - यात आनुवंशिकता, मधुमेह, रक्तदाब व लठ्ठपणा हे घटक येतात.
२. ज्यांना विकाराचा प्रत्यक्ष एक झटका येऊन गेलेला आहे.

यातील दुसऱ्या गटातील रुग्णांना पुढचा झटका येऊ नये म्हणून अ‍ॅस्पिरीनचा उपयोग बऱ्यापैकी होतो. परंतु, पहिल्या प्रकारच्या रुग्णांना ते झटका न येण्यासाठी कितपत उपयुक्त आहे यावर अलीकडे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. किंबहुना यावर वैद्यक विश्वात खडाजंगी चालू आहे. विशेषतः सत्तरी ओलांडलेल्या लोकांना ते न देण्याची सूचना पुढे आली आहे. एखाद्या औषधाचा प्रतिबंधात्मक वापर करताना त्याच्या दीर्घकाळ वापराने होणाऱ्या दुष्परिणामांकडेही लक्ष द्यावे लागते. तेव्हा अपेक्षित फायदा आणि संभाव्य धोका यांचा तुलनात्मक विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्णतपासणीनुसार हा निर्णय वेगवेगळा असतो.
एव्हाना आपण अ‍ॅस्पिरीनची उपयुक्तता पहिली. वैद्यकात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की ते एक आम्ल आहे आणि त्याचे काही दुष्परिणामदेखील होतात. त्याबद्दल आता माहिती घेऊ.

दुष्परिणाम:
वर आपण पहिले की मूळ Salicylic acid तर जठराम्लता खूपच वाढवायचे. अ‍ॅस्पिरीन ही जरी त्याची सुधारित आवृत्ती असली, तरी त्यानेही काही प्रमाणात जठराम्लता वाढते. त्यामुळे रुग्णास मळमळ व तोंड आंबट होणे हा त्रास कमीअधिक प्रमाणात होतो. काहींना उलट्या होऊ शकतात. अशा रुग्णांना जर अ‍ॅस्पिरीन दीर्घकाळ घ्यावी लागली तर जठराचा वा आतड्यांचा ulcer आणि त्यानंतर रक्तस्रावदेखील होऊ शकतो.
काही लोकांना या औषधाची allergy असू शकते. त्यांना त्यामुळे अंगावर पुरळ वा गांधी उठू शकतात. तर काहींना श्वासनलिका आकुंचनाचा त्रास होतो. त्यामुळे जरी हे औषध OTC मिळणारे असले, तरी ते नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे, हे बरे !
विशेषतः पोटाचे अल्सर, गाऊट, यकृताचे आजार आणि रक्तस्राव होणाऱ्या रुग्णांनी अ‍ॅस्पिरीन टाळले पाहिजे. अतिरिक्त मद्यपानानंतर ते घेणे धोक्याचे आहे (hangoverमुळे जे डोके दुखते, त्यावर हा उपाय नाही!).
ज्यांना आधीच दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आहे त्यांना ते अत्यंत जपून दिले पाहिजे.
लहान मुलांच्या बाबतीत तर ते चुकूनही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये. मुलांत विषाणू संसर्गामुळे ‘फ्लू’सारखे आजार वारंवार होतात आणि त्यात तापही येतो. अशा वेळेस अ‍ॅस्पिरीन कटाक्षाने घेऊ नये. अन्यथा त्यातून आजाराची गुंतागुंत वाढते आणि मेंदूस व यकृतास गंभीर इजा होते.
गरोदर स्त्रियांनीदेखील ते दीर्घकाळ अथवा मोठ्या डोसमध्ये घेऊ नये. इथेही वैद्यकीय सल्ला अत्यावश्यक.

अ‍ॅस्पिरीन हे वेदना, ताप आणि विशिष्ट हृदयविकार आणि मेंदूविकार यासाठी वापरले जाणारे औषध म्हणून विसाव्या शतकात चांगलेच रुळले आहे. अन्य काही गंभीर आजारांत त्याचा वापर करता येईल का, यावर चालू शतकाच्या गेल्या दोन दशकांत तुफान संशोधन होत आहे. त्यापैकी दोन महत्त्वाचे आजार म्हणजे कर्करोग आणि अल्झायमर आजार. विशेषतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाबाबत खूप संशोधन झाले आहे. त्याचा आढावा आता घेतो.

अ‍ॅस्पिरीन व आतड्याचा कर्करोग:
पन्नाशीनंतर सतावणाऱ्या कर्करोगांत हा एक महत्त्वाचा आणि गंभीर आजार आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर बरेच लक्ष केंद्रित झालेले आहे. या रोगाचा धोका अधिक संभवणाऱ्या लोकांना अ‍ॅस्पिरीन कमी डोसमध्ये दीर्घकाळ दिल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो, असे गृहीतक आहे. यासंबंधीचे अनेक प्रयोग जगभरात झाले आहेत. ५०–५९ या वयोगटांतील लोकांना जर १० वर्षे सलग अ‍ॅस्पिरीन दिले, तर रोगप्रतिबंध होऊ शकेल असे काही संशोधकांना वाटते. तसेच प्रत्यक्ष हा रोग झालेल्या रुग्णांना जरी ते देत राहिले, तरी या पूरक उपचाराने त्यांचा जगण्याचा कालावधी वाढू शकेल असेही काहींचे मत आहे.

“कर्करोगावर अ‍ॅस्पिरीन? कसे काय बुवा?” हा प्रश्न सामान्यांना तसा बुचकळ्यात टाकणारा आहे. या संदर्भात ते नक्की कसे काम करते हे अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ती प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. कर्करोगाच्या पेशींचा शरीराच्या प्रतिबंधक यंत्रणेकडूनच नाश करवणे, अशी काहीशी ती क्रिया आहे. अ‍ॅस्पिरीनच्या या उपयुक्ततेबाबत संशोधकांत अद्याप एकवाक्यता नाही. एखादी वैद्यक संघटना त्याचा हिरिरीने पुरस्कार करतेय, तर दुसरी एखादी त्याचा तितकाच विरोध करतेय. सध्या याबाबतचा पुरेसा पुरावा नसल्याने ही स्थिती आहे. तसेच दीर्घकाळ अ‍ॅस्पिरीन दिल्याने आतड्यांत रक्तस्राव होऊ शकतो, हाही मुद्दा दुर्लक्षिता येत नाही. भविष्यातील संशोधन यावर अधिक प्रकाश टाकेल. अ‍ॅस्पिरीनच्या सखोल आणि व्यापक संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्पिरीन ‘फाउंडेशन’ची स्थापना झालेली आहे. यावरून अ‍ॅस्पिरीनचे वैद्यकातील महत्त्व अधोरेखित होते.

‘विलो’चे खोड चघळण्यापासून या औषधाचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला. आज अ‍ॅस्पिरीन विविध प्रकारच्या गोळ्यांच्या आकर्षक रूपात उपलब्ध आहे. अचंबित करणारे हे वैविध्यपूर्ण प्रकार असे आहेत -
१. साधी गोळी
२. पाण्यात लगेच विरघळणारी
३. चघळण्याची गोळी व च्युइंग गम
४. लेपित (coated) गोळी
५. शरीरात हळूहळू विघटित होणारी आणि
६. दीर्घकाळ प्रभाव टिकणारी कॅप्सूल
७. गुदद्वारात ठेवायची गोळी (suppository)

Aspirin tab.jpg

रुग्णाचा आजार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार यांपैकी योग्य त्या गोळीची निवड केली जाते. अर्थातच आजारानुसार तिचे ‘डोस’ वेगवेगळे असतात. गोळ्यांचे काही प्रकार हे OTC मिळतात, तर अन्य काहींसाठी (नियमानुसार) डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. हे औषध दीर्घकाळ स्वतःच्या मर्जीने कधीही घेऊ नये. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यकच. तसेच हृदयविकाराच्या व मेंदूविकाराच्या ज्या रुग्णांना अ‍ॅस्पिरीनचे उपचार चालू आहेत, त्यांनी कधीही स्वतःच्या मनाने ते बंद करू नयेत. गोळी थांबवणे अथवा डोसचे फेरफार करणे हा सर्वस्वी डॉक्टरांचा अधिकार आहे.
अ‍ॅस्पिरीन हे Salicylates या कुळातील औषध आहे. त्याच प्रकारातील एक रसायन हे विविध वेदनाशामक मलमांच्या रूपात उपलब्ध असते. अंगदुखी, सांधेदुखी इ.साठी बरेचदा अशी मलमे त्वचेवरून चोळण्यासाठी वापरतात.

......
एक सामान्य रसायन असलेले अ‍ॅस्पिरीन हे आज कुठल्याही स्वामित्वहक्कापासून मुक्त आणि सहज उपलब्ध असलेले औषध आहे. पुन्हा बऱ्यापैकी स्वस्त आणि जगभरात उपलब्ध. वर उल्लेखिलेल्या गंभीर आजारांत जर ते भविष्यात खरोखर उपयुक्त ठरले, तर ते आपल्यासाठी वरदान असेल. अनेक संशोधक त्या बाबतीत आशावादी आहेत. या पिटुकल्या गोळीचा एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे अनेक आजारांत उपयोग व्हावा असे त्यांना मनोमन वाटते. अशा या बहुमूल्य संशोधनास मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.
**********************************************************************************************
लेखातील सर्व चित्रे जालावरून साभार.
(मिपा : दिवाळी अंक, २०१८ मध्ये पूर्वप्रकाशित)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुग्णाचा आजार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार यांपैकी योग्य त्या गोळीची निवड केली जाते. अर्थातच आजारानुसार तिचे ‘डोस’ वेगवेगळे असतात. गोळ्यांचे काही प्रकार हे OTC मिळतात, तर अन्य काहींसाठी (नियमानुसार) डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. हे औषध दीर्घकाळ स्वतःच्या मर्जीने कधीही घेऊ नये. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यकच. तसेच हृदयविकाराच्या व मेंदूविकाराच्या ज्या रुग्णांना अ‍ॅस्पिरीनचे उपचार चालू आहेत, त्यांनी कधीही स्वतःच्या मनाने ते बंद करू नयेत. गोळी थांबवणे अथवा डोसचे फेरफार करणे हा सर्वस्वी डॉक्टरांचा अधिकार आहे.>>>>>. डॉ. कुमार , ही वरची वाक्ये बोल्ड करा. आपल्याकडे स्वतःच्या मनाने औषध घेणारे बरेच महाभाग व भागा आहेत.

बाकी लेख उत्तम व चांगल्या माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

वेलकम बॅक डॉक्टर!
उत्तम लेख.

ऍस्पिरिनने मला गॅस्ट्रिटीसचा खूप त्रास होतो. त्यामुळे क्वचितच कधी घेतो, अगदीच असह्य वेदना असतील तर.

@ कुमार१,
गुणांबरोबर दोष सांगितले ते योग्यच केलेत.
स्वतःच स्वतःचे डॉक्टर होणाऱ्या मंडळीत हे औषध सर्वाधिक वापरले जात असावे. Happy

खुपच छान माहिति व लेख.
डॉक्टरांना विचारुन अ‍ॅस्पिरिन घेणारे आहेत? किमान डोकेदुखी साठी तरी नसावेतच.

छान माहिती अन लेख

आमच्या घरी सुद्धा पूर्वी कॉम्बिफ्लॅम अन क्रोसीन सर्रास घेतली जायची पण आता शक्यतो टाळतात.

Asprin चे तोटे बरेच ऐकले/वाचले होते सो ही गोळी रादर sprin शेवटी असलेल्या गोळ्या टाळलेल्याच बऱ्या असे वाटते. माझ्या एका मित्राचे वडील वारले या गोळीच्या ओव्हरडोस मुळे. ब्लड थिनर म्हणून डॉक ने त्यांना इको स्प्रिंन दिली होती त्यामुळे त्यांना इंटर्नल ब्लिडिंग झाली जी कुणाच्या (डॉक च्या सुद्धा) लवकर लक्षात आली नाही अन खूप रक्त गेल्यामुळे त्यांना वाचवता आले नाही

नेहमीप्रमाणे चांगला लेख!
आपल्याकडे स्वतःच्या मनाने औषध घेणारे बरेच महाभाग व भागा आहेत.>>>> मुलगा लहान असताना सी.एल. वाचवण्यासाठी,सर्दी ताप जाण्यासाठी २ दिवसात ७ डिस्प्रिन घेतल्या होत्या.दुसर्‍याच दिवशी हाताकडे हात नाही,पायाकडे पाय नाही अशी अवस्था झाल्यावर डॉ.कडे गेले.डॉ.म्हणाले,नशीब तुमचे रक्ताच्या उलट्या झाल्या नाहीत .

कधीही स्वतःच्या मनाने ते बंद करू नयेत. गोळी थांबवणे अथवा डोसचे फेरफार करणे हा सर्वस्वी डॉक्टरांचा अधिकार आहे>>>>>>मध्यंतरी कुठेतरी एका पेड सीट घेऊन डॉक्टर बनलेल्या महाशयाने एक पुरुष पोट दुखतंय म्हणून आल्यावर काहीतरी भरमसाट टेस्ट्स करून घेतल्या आणि गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला .. मी ती बातमी शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडत नाहीये . कोणत्याही डॉक्टर कडे जाण्यापूर्वी त्याची माहिती काढत चला

किमान डोकेदुखी साठी तरी नसावेतच.>>>>बरोबर. १-२ गोळ्या तात्पुरत्या इतपत स्वतः होऊन ठीक आहे.
जास्त काळ अर्थात डॉ च्या सल्ल्यानेच.
वरील सर्वांचे आभार !

उत्तम माहितीप्रद!! >> +1234..

देवकी, बापरे! Happy

आमच्या घरात पण असे स्वतःच स्वतःचे डाॅक्टर आहेत. किती समजावलं तरी फरक नाही.

टायलेनॉल =Paracetamol हे तुलनेने सुरक्षित; अर्थात योग्य डोस मध्ये.
विशेषतः लहान मुलांच्या तापात अ‍ॅस्पिरिन देऊ नये.

ए १ लेख डॉक्टरसाहेब ! छान माहिती. बरेच दिवसांनी आपण इथे काही लिहिलेत.

आमच्या लहानपणी APC गोळ्यांची चलती होती. त्यात व aspirin मध्ये काय फरक आहे? की फक्त तेव्हाचे व्यापारी नाव ?

साद, धन्यवाद.

APC गोळ्यांची चलती होती. >>> बरोबर. ही गोळी खालील ३ औषधांचे मिश्रण असायची.

APC = Aspirin + phenacetin + caffeine
अत्यंत अशास्त्रीय असे हे मिश्रण होते. त्याच्या वापरातून असे लक्षात आले की Phenacetin मुळे मूत्रपिंडाला धोका पोहोचतो .

त्यामुळे, पुढे APC वर भारतासह अनेक देशांत बंदी घालण्यात आली.

चर्चेत सहभागी सर्वांचे आभार ! सर्वांचे अनुभव दखलपात्र आहेत आणि इतरांना त्यातून शिकता येईल.
प्रतिसादांतून आलेल्या सूचनांची नोंद घेत आहे.
लोभ असावा .

वेल्कम बॅक डॉक.

माहितीपूर्ण लेख. मिपावर आधी वाचला होता.
ताप असेल तर क्रोसिन आणि सर्दी असेल तर सिनारेस्ट डॉक्टरकडे न जात घेतो आम्ही, दिवसातून एक, ताप/सर्दी जाईपर्यंत ie ५-७ दिवस. हे ठीक आहे का?

धन्यवाद अमी .
क्रोसिन २ दिवसांपर्यंत ठीक आहे.
सिनारेस्ट शक्यतो कमीत कमी घ्यावी , टाळता आल्यास उत्तम.
अधिक माहिती रुग्णतपासणी केल्यावरच.

नाही हो. एकदाच केला होता तो प्रकार.>> देवकी, तुम्हाला नव्हतं हो काही म्हणायचं. वरच्या काही प्रतिसादांतून स्वतःच स्वतःचे डाॅक्टर होण्याबद्दल आलंय. त्याला अनुसरुन लिहिलंय मी ते.
आमच्या घरातले ज्येना रोज एक चाॅकलेट खावं तश्या क्रोसीनच्या गोळ्या खातात. आज काय जरा डोकं दुखतंय, उद्या जरा सर्दीची लक्षणं दिसतायत. परवा मानच मोडून आलीय अशी अनेक कारणं तयार असतात. Angry

हम्म..निधी अश्याना 'क्रॉसिन/ऍस्पिरिन रोज घेण्याचे दुष्परिणाम' अशी माहितीपूर्ण व्हॉट्सअप पोस्ट बनवून फॉरवर्ड आहे असं दाखवून ग्रुप वर पाठवणे हा एक प्रभावी उपाय.
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चांगल्या उद्देशाने वापरता येऊ शकते ☺️☺️

Pages