काली पलक तेरी गोरी...!

Submitted by अतुल ठाकुर on 23 December, 2018 - 00:51

maxresdefault_0.jpg

बरेचदा काही गाणी ही त्यांच्या सतत गुणगुणाव्याशा वाटणार्‍या गोड चालींमुळे लक्षात राहतात. ही जादु आरडीच्या अनेक गाण्यांमध्ये होती. मात्र "काली पलक तेरी गोरी" मध्ये याही पेक्षा खुप काही जास्त आहे. हे गाणं नुसतं ऐकलं तर असं वाटतं कुणा प्रियकर प्रेयसीचं अतिशय खेळकर मूडमध्ये प्रणयाराधन सुरु आहे. याला कारणीभूत आहे ती आरडीची चाल हे तर खरंच. पण त्याबरोबरच लताने लावलेला जीवघेणा असा, लाडिक, अल्लड प्रेयसीचा सूर आणि किशोरचा लागलेला मिस्किल आवाज. त्यात किंचित थट्टा, अवखळपणा आणि प्रेम यांचं एक मुष्किल मिश्रण आहे.

मजरूह सुलतानपुरींनी १९७२ साली आलेल्या "दो चोर" चित्रपटातील या गाण्याला त्याचा बाज ओळखून शब्द दिले आहेत. त्यातून हे पुन्हा एकदा जाणवतं की त्या काळात साध्यासुध्या गाण्यातही हे शायर कमाल करत असत. त्यांच्या लेखणीची जादू कुठल्याही सिच्युएशनमध्ये लपून राहात नसे. पाट्या टाकणं हा प्रकार तेव्हा नव्हताच. मात्र मजरूह सुलतानपुरींच्या शब्दाची जादू अनुभवायची असेल तर गाणं पाहायलाच हवं. नुसतं ऐकून एक अर्थ कळेल. पण लताच्या मधाळ आवाजात गाताना जेव्हा तनुजा पडद्यावर दिसते तेव्हा "नाज़ुक कमर से लगाए अदा की कटारी जालिमा फेरेगी धीरे-धीरे तु मेरे गले पर यह बाहों के खंज़र...!" या शब्दामागचा खरा अर्थ लक्षात येतो.

आमच्या काव्यशास्त्रात "ध्वनि" हा काव्याचा आत्मा आहे सांगणारा आनंदवर्धनाचा सिद्धान्त आहे. शब्दार्थ एक असतोच पण त्या पल्याडही अनेक अर्थांच्या शक्यता लपलेल्या असतात. त्या ओळखता येणे महत्त्वाचे असते. एकवस्त्रावर असलेली तनुजा पाहणार्‍यांचे श्वास जड करीत पडद्यावर सहज वावरताना लाडिक आवाजात जेव्हा,

ना तो मै डोर से बाँधू ना जाल बिछाऊं ना तीर चलाऊं
नाज़ुक कमर से लगाऊं छुरि ना कटारी सजना
मै तो तेरा दिल लूँगी तुझिसे छुपा के नज़र को बचा के
यूँ ही ज़रा मुस्करा के कहूँगी अनाड़ी सजना

असे म्हणते तेव्हा त्या हालचालींमध्ये, कटीमध्ये, नजरेमध्ये, तीर कुठे आहे, सुरी कुठे आहे हे उमगणे हेच तर खर्‍या रसिकाचे लक्षण. बाकी हा शृंगार रस निर्माण होण्यासाठी धर्मेंद्रच्या शरीरात जणू परकायाप्रवेश करुन किशोरकुमारने लावलेला तो मिस्किल आवाजही कारणीभूत आहेच. संपूर्ण गाण्यात धर्मेंद्रने हे मिस्किलपणाचे काहीशा इरसालपणाचे आणि त्याचबरोबर मदनिकेच्या रुपात समोर उभ्या राहिलेल्या प्रेयसीला पाहून पेटलेल्या प्रियकराचे बेयरींग मस्त घेतले आहे. तनुजा नेहेमीच सुरेख दिसते पण या गाण्यात मात्र कसलिशी किमया होऊन त्या सौंदर्याला मादकता लाभली आहे.

गाण्यात शृंगार निर्माण करण्यासाठी फार काही लागत नाही हेच खरं. गोड, गुणगुणावीशी वाटणारी चाल हवी, त्याला परीसस्पर्श करणारा, समोर उर्वशीलाच उभे करणारा लताचा आवाज हवा आणि तो खुलवणारी नजरेतून आव्हान देणारी तनुजासारखी अप्सरा हवी...!

अतुल ठाकुर

हे गाणे येथे पाहायला मिळेल.
https://www.youtube.com/watch?v=6TiNABGkMvM

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय...

माझे खूप आवडते गाणे, पण पडद्यावर कधी पाहिले नाही. आज प्रथमच पाहिले.

काली पलक तेरी गोरीचा अर्थ कळायला मुश्किल Happy शब्दांवर मस्त खेळ केलाय.

नुजा मला प्रचंड सुंदर वाटते, रात अकेली है, बुझ गये दिवे मध्ये तर खूपच जास्त. च्रप्स माझेही मत अगदी तेच आहे. अतिशय सुंदर आणी अतिशय दुर्दैवीसुद्धा. कारण तिच्या अभिनयाचा कस लागेल अशा भुमिका तिला मिळाल्या नाहीत असे मला वाटते. कदाचित तिच्या कारकिर्दित नुतनसारख्या जबरदस्त नायिका आजुबाजुला होत्या म्हणूनही असेल. किंवा तनुजाचा लूक टिपिकल भारतीय नारीचा नसेल हे देखिल कारण असेल. तिच्याचसारखी दुसरी एक अभिनेत्री सिमी गरेवाल. तिच्याहीबाबतीत मला तसेच वाटते.

गाणं ऐकलं नाही.ऐकते.
काली पलक हे जरा पिवळा पितांबर सारखं झालं.मी अजून कोणाची ब्लॉन्ड, बरगंडी किंवा तपकिरी, लाल पलक पाहिली नाहीय.

लेख छानच. तनुजा आव् डती आहे. तिच्यात एक प्रकारचा खट्याळ पणा आहे जो नूतन बडी दीदी मध्ये नव्हता ते सोज्वळ क्लासी काम. जसे लता व आशा. दोन बहिणी वेगळे व्यक्तिमत्व असलेल्या. हे गाणे आमच्या अहोंचे फार लाडके होते. आज काल असा खोडकर पण निरागस अनुनय शरारत फार अभावाने आढळ ते.

तुमचे लेख वाचले की जुने गाणे नव्याने भेटल्यासारखे वाटते. एकदा " तू चंदा, मै चांदनी" या गाण्यावर लिहा ही विनंती.

>> मी अजून कोणाची ब्लॉन्ड, बरगंडी किंवा तपकिरी, लाल पलक पाहिली नाहीय.
>> Submitted by mi_anu on 26 December, 2018 - 14:03

Lol
थायरोइड किंवा अन्य आजार असल्यास कलर बदलतो. थोडक्यात, ती खूपच निरोगी आहे असे सुचवले असावे असे मानूया Proud

मी अजून कोणाची ब्लॉन्ड, बरगंडी किंवा तपकिरी, लाल पलक पाहिली नाहीय अहो हा काव्यशास्त्राचा प्रान्त आहे येथे पुनरुक्ती, अतिशयोक्ती हा दोष मानला जात नाही. शिवाय काली आणि गोरी या विरुद्धार्थी शब्दांचा सुरेख खेळ केलाय. अर्थात हा खेळ ज्याला आवडतो त्यालाच त्याचा आनंद घेता येणार. हे खरंच होऊ शकते का असा प्रश्न मनात आला कि संपली जादु!

तुमचे लेख वाचले की जुने गाणे नव्याने भेटल्यासारखे वाटते. एकदा " तू चंदा, मै चांदनी" या गाण्यावर लिहा ही विनंती.
आभार धनवन्ती Happy

>> काव्यशास्त्राचा प्रान्त आहे येथे पुनरुक्ती, अतिशयोक्ती हा दोष मानला जात नाही.
अगदी सहमत आहे. मी सुद्धा हेच लिहिणार होतो. पण त्यांनी विनोदाने लिहिल्यामुळे मी सुद्धा तसाच प्रतिसाद दिला.

मी अजून कोणाची ब्लॉन्ड, बरगंडी किंवा तपकिरी, लाल पलक पाहिली नाहीय>> अरे ह्या सर्व रंगांचे प्लस व्हाइट सिल्व्हर गोल्ड पीकॉक ब्लू ब्लू रंगाचे पण आय लायनर असतात. सर्व मेजर मेकप बनव णार्‍या कंपन्या बनवतात. भारतात नसेल पण परदेशात रंगीत पलकें एकदम नॉर्मल आहे. पापण्यांना पण मधून व्हाइट गोल्ड हायलाइट करतात. डोळ्यांवर बारके मोती चमकीचे मणी, टिकल्या पण लावतात पार्टी मेकप मध्ये. माहीत नाही वाट्टं Wink

चांगल्या गाण्याचे बाल की खाल निकालना टाइप ट्रिवि यलायझे शन करण्यात अर्थ नाही.