शोधलं की सापडतंच

Submitted by nimita on 15 December, 2018 - 21:21

"शोधलं की सापडतंच!"

काही महिन्यांपूर्वी जवळजवळ प्रत्येक मराठी घरात हे वाक्य सतत ऐकू यायचं. रोज रात्री टीव्ही वर अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री निदान एकदा तरी ऐकवायची तिचा हा सिद्धांत! पण जेव्हा माझ्या मुलीनी ते ऐकलं तेव्हा ती पटकन बोलून गेली.." कोणीही नाही काही, फक्त आई नी शोधलं तर च सापडतं."

तिचं ते वाक्य ऐकून आम्ही सगाळेच खूप हसलो, मी पण मनातल्या मनात सुखावले....चक्क चक्क माझं कौतुक आणि तेही इतकं उत्स्फूर्त....पण नंतर विचार केला तेव्हा लक्षात आलं की तिच्याही नकळत तिनी या जगातलं एक अजरामर असं सत्य सांगितलं होतं.

माझ्या मते, एखादी स्त्री जेव्हा आई होते ना, तेव्हा माया, ममता, वात्सल्य या सगळ्या qualities बरोबरच अजून एक गुण येतो तिच्या व्यक्तिमत्वात....तिला 'दिव्य दृष्टी' प्राप्त होते. घरातल्या तमाम व्यक्तींना न सापडणारी वस्तू त्या घरातल्या 'आई' ला बरोब्बर दिसते. मग ती कॉटखाली गेलेली छोटीशी सेफ्टी पिन असो नाही तर कपाटात कोंबलेल्या कपड्यांमधला ठराविक रंगाचा शर्ट असो.... तिच्या नजरेतून काही सुटत नाही.

"आई, मी सगळीकडे शोधलं पण मला नाही सापडत गं, प्लीज तू दे ना शोधून." हे वाक्य रोज निदान एकदा तरी प्रत्येक घरात ऐकायला मिळत असावं. आमचं घर ही याला अपवाद नाही.

हे वाक्य ऐकल्यावर माझा एक ठरलेला सल्ला असतो," तुझ्या डोळ्यांनी नको शोधू, माझ्या डोळ्यांनी बघ- म्हणजे लगेच सापडेल!"

सुरुवातीला काही दिवस माझ्या मुली हे ऐकून खरंच पुन्हा शोधायचा प्रयत्न करायच्या. पण मग अजूनच वैतागलेल्या स्वरात माझी आळवणी व्हायची, जोडीला तीन चार 'प्लीज, प्लीज' असायचे!

कालांतरानी (आणि अनुभवांनी) त्याही शहाण्या झाल्या.त्यांच्या विनंती अर्जात कायमस्वरूपी बदल करण्यात आला..."आई, मी तुझ्या डोळ्यांनी शोधलं तरी नाही सापडत, प्लीज तू दे ना शोधून!" त्यामुळे आता त्यांची परतफेरी वाचते...कधी कधी मला शंका येते की त्या खरंच शोधायचा प्रयत्न तरी करतात का ? का आपला वेळ आणि श्रम वाचावे म्हणून सरळ माझा धावा करतात! असो....

अश्या वेळी मी माझ्या शोध मोहिमेवर निघाले की त्या पण माझ्या मागे मागे येतात, चेहेऱ्यावर आधीच एक ओशाळलेपणाचा भाव असतो..हो, कारण त्यांना न सापडलेली वस्तू मी पुढच्या काही क्षणांत त्यांच्या हातात ठेवणार हे त्यांना माहीत असतं.

मी जेव्हा disputed site च्या दिशेनी नजर फिरवते तेव्हा मागून हळूच एक वाक्य ऐकू येतं," अगं, मी शोधलंय तिथे आधीच!" आणि गंमत म्हणजे ते वाक्य संपायच्या आधी ती वस्तू समोर प्रकट होते.आणि त्या पाठोपाठ " डोळे आहेत का बटणं? जरा नीट शोधत जा." अशी माझी बडबड सुरू होते.

मग पुढची काही मिनिटं -" मी बघितलं होतं तिथे नीट, पण मला कसं नाही दिसलं" या आणि अश्या स्पष्टीकरण रूपी शंका ऐकायला लागतात.

पण माझ्या मुलींना जास्त त्रास कशाचा होतो माहितीये ...त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर.."समोर असूनही सापडलं नाही या बद्दल जास्त वाईट नाही वाटत कारण आता ते अपेक्षित च असतं.. पण ती वस्तू शोधून आमच्या हातात देताना आईच्या चेहेऱ्यावर जे expression असतं ना, त्याचा खूप त्रास होतो जीवाला!"

माझ्या छोट्या मुलीच्या मते, मी जेव्हा एखादी वस्तू शोधायला जाते तेव्हा जातानाच ती वस्तू लपवून बरोबर घेऊन जाते आणि तिचं लक्ष नसताना हळूच तिच्या सामानात ठेवते..

एखादी वस्तू 'न मिळण्याचं' अजून एक कारण तयार असतं शोधणाऱ्या कडे....ती वस्तू ज्या ठिकाणी सापडते तिकडे एक तुच्छ नजर टाकून -" तिथे नव्हतंच बघितलं मी!" असं काहीसं पुटपुटत यशस्वी माघार घेतली जाते.

तर अशी ही गृहलक्ष्मी रुपी शेरलॉक होम्स घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला अगदी हसतमुखानी तयार असते.

काही वेळा तर तिला बसल्या जागेवरूनही शेजारच्या खोलीतल्या कपाटातल्या वस्तू दिसतात ..." खालून दुसऱ्या कप्प्यात डाव्या हाताला मागच्या बाजूला बघ.." असं खात्रीपूर्वक सांगणारी घरातली एकमेव व्यक्ती ती हीच !

माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीनी एकदा म्हटलं होतं," माझ्या आईला डोक्याच्या मागच्या बाजूला पण डोळे आहेत.…आणि म्हणूनच तिला न शोधताच सगळं दिसतं."

इतर मातृवर्गाचं माहीत नाही पण त्या अस्मिता अग्निहोत्री सारखा माझाही एक असिस्टंट आहे. आणि माझ्या प्रत्येक शोधमोहिमेत मला त्याची मदत होते....त्याचं नाव आहे 'कार्तिवीर्य'! खरं म्हणजे तो एक भला मोठा मंत्र आहे - आणि माझ्या आईकडून मला असं कळलं होतं की एखादी वस्तू शोधताना जर तो मंत्र म्हटला तर ती वस्तू लवकर सापडते.. (त्यावेळी माझ्या न सापडणाऱ्या वस्तू माझी आई मला शोधून द्यायची!)

संपूर्ण मंत्र तर काही माझ्या लक्षात नाहीये, पण इतक्या वर्षांच्या अनुभवावरून माझ्या असं लक्षात आलंय की पूर्ण मंत्र नाही म्हटला तरी चालतं, नुसता 'कार्तिवीर्य' चा जप करायचा..बस्स्.... आपल्या नकळत आपण योग्य जागी शोधायला लागतो आणि बरोब्बर ती वस्तू सापडते.

पण इतर नियमांसारखाच या नियमाला पण एक अपवाद आहे बरं का.... जर कधी मला माझीच एखादी वस्तू शोधायची असेल तर मात्र हा 'कार्तिवीर्य' दगा देण्याची दाट शक्यता असते! आणि खास करून जर मी ती वस्तू 'अगदी जपून' ठेवली असेल तर मग हमखास...भरवश्याच्या म्हशीला टोणगा!

अशा आणीबाणी च्या प्रसंगी मदतीच्या आशेनी जर घरातल्या इतर सदस्यांकडे बघावं तर त्यांची उत्तरं ठरलेली असतात. मुली म्हणतात," तुलाच सापडत नाहीये, तर आम्हांला कसं मिळणार?"

आणि नवऱ्याचं ठरलेलं वाक्य-" खूप 'जपून' ठेवलंयस का? मग राहू दे. उगीच शोधण्यात वेळ नको घालवू."

यातल्या 'जपून' या शब्दावर जो अकारण जोर दिलेला असतो ना, त्याचा खूप त्रास होतो हो मनाला!

जेव्हा माझ्या पर्स मधे एखादी वस्तू शोधायची असते ना, तेव्हाही माझी अवस्था अशीच दयनीय असते.त्या क्षणी हवी असलेली वस्तू पटकन मिळेल तर शपथ! भूतकाळात कधीतरी हव्या असणाऱ्या वस्तू (ज्या तेव्हा अज्जिबात सापडल्या नव्हत्या) एक एक करून बाहेर निघतात....उत्खननात पुरातन काळातल्या वस्तू मिळाव्या तश्या.....

यावर तोडगा म्हणून मी माझ्या परीनी वेगवेगळे उपाय करून बघितले. आधी माझ्याकडे एक कप्पा असलेली पर्स होती. अलिबाबाच्या गुहेसारखा माझा सगळा खजिना त्या एकाच कप्प्यात सामावलेला असायचा. पण हवी ती वस्तू कधीच नाही सापडायची. पर्स मधे हात घालून चाचपडत असताना कधी कधी वाटायचं, 'बोटांना पण डोळे असते तर किती बरं झालं असतं!'

यावर उपाय म्हणून मी चांगली २-३ कप्पे असलेली पर्स आणली. खूप विचार करून कुठल्या कप्प्यात काय ठेवायचं ते ठरवलं आणि त्या हिशोबानी सगळं सामान नीट सेट केलं. वाटलं,' आता काही शोधायची गरजच नाही. नुसती त्या कप्प्याची झिप उघडायची की वस्तू समोर हजर!'

पण आयुष्य इतकं सोपं नसतं हे लवकरच लक्षात आलं...मी जर अगदी खात्रीनी मागचा कप्पा उघडला तर हवी असलेली वस्तू हमखास पुढच्या कप्प्यातून निघणार! त्यामुळे वस्तू शोधण्यापेक्षा झिप उघडबंद करण्यातच वेळ वाया!

यावरही नवऱ्याचा टोमणा तयार..."जे शोधतीयेस ते राहील बाजूला, उगीच पर्सची झिप मात्र खराब होईल." याला म्हणतात 'जले पे नमक'...

हा सगळा कर्माचा खेळ आहे.....दुसरं काही नाही!

इतरांच्या वस्तू शोधून त्यांच्या हातात ठेवताना माझ्या चेहेऱ्यावर जे भाव असतात ना तेच असे शब्दरूपात मला साभार परत मिळतात... म्हणतात ना 'करावे तसे भरावे!'

पण या सगळ्या गोष्टीतला विनोदाचा भाग बाजूला सारून जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सगळं - ' न सापडणं', 'अगदी समोर असूनही न दिसणं', 'आपलीच वस्तू शोधायला दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहाणं' - वगैरे सगळं आपल्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं... हळूहळू तो आपल्या स्वभावाचा, आपल्या विचारांचा एक अविभाज्य घटक बनतो की काय? का आपण योग्य जागी शोधतच नाही ?

आणि म्हणूनच आपल्या सभोवतालचा चांगुलपणा, माणुसकी, आपुलकी, प्रेम, माया हे सगळं अगदी समोर असूनही आपल्याला दिसतच नाही!

आयुष्यात सुख, समाधान शोधताना आपण स्वतःलाच हरवून बसतो....इतके - की त्या नादात आपल्यासमोर येणारे आनंदाचे, तृप्ती चे कितीतरी क्षण आपल्याला दिसतच नाहीत ....तसेच निसटून जातात आपल्या हातातून !

आणि मग हळूहळू आपण स्वतः ते 'शोधायचा' देखील आळस करायला लागतो...आपलंच सुख शोधायला आपल्याला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते!!

यासारखी दुसरी विडंबना नाही!

पण ही परिस्थिती बदलणं आपल्याच हातात आहे, नाही का! त्यामुळे आता मी ठरवलंय, स्वतःच 'अस्मिता' व्हायचं आणि स्वतः च शोधायचं, कारण

" शोधलं की सापडतंच!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. वाचून अगदी अगदी झालं. आमच्याकडे मी नाही तर माझी ८ वर्षाची लेक चटकन शोधून देते वस्तू.

'अगदी जपून' ठेवली असेल >> +१११ मी जपून ठेवलेली वस्तू तर अजिबातच सापडत नाही. गरज संपली/ alternate solution करून मार्ग काढला की मग अचानक एक दिवस ती वस्तू सापडणार.

भारी..
वाचून अगदी अगदी झालं+!११