प्रिय हिमालय...

Submitted by मुक्ता०७ on 10 December, 2018 - 12:18

प्रिय हिमालय,
अल्झायमर झालेली आजी जशी हसते तसा हसला होतास तू माझ्याकडे बघून; आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा. डोळ्यातली ओळख नक्की खरी आहे आहे की नवखी हे नीट सांगू नाही शकले मी. पण मला अजूनही न समजलेली आस जाणवत राहिली तेव्हापासून. प्रत्येक वेळेस आपण भेटतो आणि मी अजूनच अपूर्ण होत जाते. गंमत म्हणजे आपल्या प्रत्येक भेटीत असं वाटतं की बास हेच सत्य आहे. याहून कुठल्या गोष्टीत पूर्णत्व असूच शकत नाही. पण मग जसजशी मी लांब जाते तुझ्यापासून तसं सगळ ढवळून निघत पोटातून. असं प्रत्येक वेळी होऊनही कसं काय वाटत तुला भेटावसं? माहिती नाही.
तुझं वय कस काय होत नाही रे? दहावीच्या सुट्टीत सारपासला भेटलास तू मला. मी प्रेमातच पडले तेव्हापासून. लोकं जेव्हा म्हणतात ते येतायत तुला भेटायला तेव्हा त्यांच्याहून जास्ती मीच excited असते. मी तुझ्यासोबत असते तेव्हा मी नसतेच; तूच असतोस. म्हणजे असं चालता चालता मला फक्त माझा श्वास ऐकू येत असतो. माझं अस्तित्व मला पूर्णपणे जाणवतं. मी पूर्णपणे भानावर असते. तुला बघत असते. तू किती सुंदर आहेस रे! त्या पूरानंतर आपण भेटलो होतो पिंडारी ला? त्या अवस्थेतसुद्धा तू सुंदर दिसण कसं काय रे manage केलंस? किती सोसलं होतस तू तेव्हा तर. कशाकशातून गेलास तुझं तुलाच माहिती! का तूच घडवून आणलेलंस सगळ? माहिती नाही.
तुझ्यासोबत असताना माझा मेंदू जर आरसा किंवा तत्सम काही असता ना तर तुला फक्त तूच दिसशील. आधी वाटायचं, तू मोठा, पसरलेला, हिरवागार, तुफान झाडांनी व्यापलेला मधूनच बर्फानी नटवलेला, पायवाटांनी नांगरलेला, कुठलही icing असलं तरी छानच लागणारा केक आहेस. खरंतर तुझ्यापर्यंत पोचण्याची मला कधीच घाई नसते. तू जवळ आलास कि सैरभैर व्हायला होत ना मला. का भीतीच वाटते आपल्या भेटीची? मला तू भेटतोस? म्हणजे तू दिसतोस. पण आपण नक्की काय बोलतो, हे नंतर format होऊन जातं. आणि तुझ्याकडे येताना backupची काही सोयच नसते. आपण काय बोलतो रे नक्की? मी खूप बालिशसारखी काहीतरी बोलत असेल नं तुझ्यापाशी? का तुझ्यासोबत तुझ्यासारखीच असते? आपण बोलतो ना नक्की? माहिती नाही.
Valley ला सगळ्या पर्यटकांना एवढी फुलं दाखवून नंतर त्या botanistच्या थडग्यासमोर आणून नक्की कुठल्या भावना दाटून येणं अपेक्षित आहे? त्या अभ्यासिकेला भेटावस वाटलं रे कडकडून! अशी कशी घसरून गेली ती? तू बोलावून घेतलस वाटत तिला लवकर तुझ्यापाशी. म्हणजे तुलापण एकट वाटत तर! पिंडारीला तू असा जखमी होऊन काय सिद्ध करायचं होतं तुला? माहिती आहे तू काहीही सहन करू शकतोस. तुझ्या या शक्तीने डिवचतोस कशाला समोरच्याला? ढानाकुनु आणि सारपासला तू जे एकदम सोज्वळ, राजेशाही रूप दाखवलंस ते किती फसव होत रे? का मी लहान होते म्हणून माझ्या कुवतीनुसार समोर आलास माझ्या? तुझ्यावर इतकं चिडूनसुद्धा आपण परत का भेटत राहतो? व्यसन झाला आहेस कि काय तू? माहिती नाही.
लंपन नंतर तूच आहेस ज्याला भेटूनही न भेटण्यासारख आहे. यावेळेस कसा असणार आहेस? त्या सगळ्या overwhelming परिस्थितीत आपण एकत्र रहाव असा विचार बऱ्याचदा येऊन जातो माझ्या मनात. पण मग तूच राहशील आणि मी राहणार नाही अशी भीती पण वाटत राहते. बा.भ. बोरकरांच्या संधीप्रकाशाच feeling येत राहील आयुष्यभर असं वाटत आपण एकत्र असलो तर. ते सहन नाही होणार. तेवढी शक्ती अजूनतरी नाही माझ्यात. पण आपण भेटत तर राहूच शकतो ना! मी तुला miss नाहीच करत कधीच; कारण तू माझ्यातला एक भाग बनला आहेस. कधीकधी वाटत कि लंपनही भेटेल मला तुझ्यासोबत असतानाच! मी कशी मला भेटत नाही तुझ्यासोबत असताना? माहिती नाही.
- मुक्ता

Group content visibility: 
Use group defaults

प्रकाश नारायण संत ह्यांनी वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर अशी पुस्तकं लिहिली आहेत. त्या पुस्तकांमधील पोरगेलासा कथानायक.

चार वर्षांपुर्वीच्या अरुणाचलनंतर आता.
हिमालयात कधी जाणार नाही, बघू कुणाचे लेख वाचून जावेसे वाटले तर जाईन.
छान आहे ललित.