वर्तुळ : भाग ०१

Submitted by दिपक. on 8 December, 2018 - 22:23

29 मार्च 1987
सकाळी १० वा.

कॉलेजचा शेवटचा दिवस. लीला, पार्वती आणि विशाखा तिघीही आपला निकाल बघण्यासाठी घाई घाई ने आपल्या वर्गाजवळ येऊन पोहोचल्या..
वर्ग मुलांनी गच्च भरला होता आपापला नंबर शोधून निकाल बघण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू होती. ती गर्दी बघून पार्वती लीलाकडे डोळ्याने खुणवत म्हणाली
पार्वती : आता काय करायचं ?
लीला : काय म्हणजे.. तू हो बाजूला

लीला पार्वतीला डाव्या हाताने मागे सारत वर्गामध्ये शिरली आणि एका कर्कश आवाजात ती ओरडली..
लीला : ए....

लीला ची ती डरकाळी ऐकून सर्वांचं लक्ष अचानक तिच्याकडे वेधलं गेलं.. लीला परत त्याच आवाजात म्हणाली..
लीला : ए काय चाललंय तुमचं.. सर्वांना रिजल्ट बघायचा आहे ना.. तर चला आधी बाहेर निघा.. आणि मी इथून गेल्याशिवाय वर्गाकडे कुणी फिरकला तर याद राखा..

लीला ची ती धमक एेकूण सर्वांची हवा ताईट झाली होती. एक एक करून सगळेजण बाहेर निघाले. आणि बघता बघता संपूर्ण वर्ग रिकामा झाला होता..

( लिलाची अशी दहशत असण्या मागचं कारण तिचे वडील दगडू पाटील होते. त्यांचा बंदुकीचा व्यवसाय होता. त्यावेळी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील प्रत्येक बंदूक दगडू पाटील यांनी विकलेलीच असायची.. गेल्या २५ वर्षात दगडू पाटलाने संपूर्ण जिल्ह्यात आपली दहशत निर्माण केली होती.. पोलिसा पासून कोर्ट कचेरी पर्यंत सगळं काही यांच्या मर्जीनुसार चालत होतं.. तरीही दगडू पाटलाच्या मनाला अजून काही पूर्णतः संतुष्टी लागली नव्हती.. आपल्या २४ वर्षाच्या मुलालाही त्याने आता त्या धंद्यात सामील केलं होतं..
दगडू पाटलाचा मोठा मुलगा “विक्रम” हा चांगला सुशिक्षित होता.. १२ वी पास झाल्यानंतर तो बि.ए करण्यासाठी मुंबईला गेला.. आणि तिथं एका भांडणात त्याने तिघांना छातीवर ६ गोळ्या घातल्या.. त्यानंतर त्याने आपलं शिक्षण थांबवलं आणि परत भिंगेवाडीला येऊन दगडू पाटलाच्या धंद्यात तो सामील झाला..)

वर्ग रिकामा होताच, पार्वती आणि विशाखा दोघींनी आत येऊन एकमेकींचा निकाल तपासला. तिघीही उत्तीर्ण झाल्या होत्या. पण लीलाच्या तोंडावर त्या गोष्टीचा अजिबात आनंद दिसत नव्हता.

विशाखा : लिले.. पास झाली आहेस तू.. तोंडावर थोडातरी आनंद असुदे..
लीला : गप्प बैस.. आजारी होते म्हणून एकाही पेपरला बसले नव्हते मी.. तरीही ८०% निकाल आलाय.. आता ह्यात कसला आनंद होणारे ?
पार्वती : अगं सोड ना.. तुझे बाबा काहीतरी बोलले असतील प्राध्यापकांना. म्हणून त्यांनी पास केलंय तुला.
लीला : तेच तर.., मला नाही गं आवडत असं बाबांनी दुसऱ्यावर जबरदस्ती चालवलेली.
विशाखा : हो का.. आता ५ मिनिटं अगोदर तूच त्या मुलांना जबरदस्ती हाकलून दिलंस ना वर्गातून ?..
लीला : ते तर मज्जेत म्हटलं ग मी.. त्याला ते घाबरले तर मी काय करणार.

बोलता बोलता लीलाचं लक्ष अचानक बाहेर एका मुलाकडे गेलं आणि ती उठून बाहेर आली.. त्या मुलाचं नाव “जयंत चौगुले” होतं. जयंत लीलाच्याच वर्गात शिकत होता आणि त्याचा मोठा भाऊ “परशुराम चौगुले” त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवत होता.. पण गेल्या काही वर्षात लीलाशी जयंतचा इतका जास्त सबंध कधीच आला नव्हता. तरीही त्याला याची जाणीव नक्कीच होती की लीलाला तो इतरांपेक्षा जास्त प्रिय होता.. लीला एक टक लावुन त्याच्याकडे बघत असायची पण आपल्या मनातील भावना त्याला सांगण्याचं धाडस अजून तिला झालं नव्हतं..
पण त्यादिवशी जणू लीला ठरवूनच कॉलेजला आली होती.. आणि आता त्याच्याकडे बघत असताना लीलाने हिम्मत गोळा करून त्याला हाक मारली
लीला : जयंत...

ती हाक ऐकून जयंत आधी थोडा दचकला.. ती हाक लीलाचीच आहे हे ओळखण्यासाठी त्याला जास्त वेळ लागला नाही. लगेच त्या हाकेच्या दिशेने येऊन तो लीलासमोर खाली मान घालून उभा राहिला..
लीलाने काही क्षण त्याला निरखून पहिलं... आणि हळूच त्याचा हात आपल्या हातात घेतला. आणि त्यात एक चिठ्ठी ठेवून ती काहीच न बोलता तिथून निघून गेली..

जयंतच्या मनाचा थरकाप उठला. थोड्या क्षणासाठी तर त्याला काय चाललंय याचं भानच झालं नाही.. इतक्यात त्याला पुन्हा एक “जयंत” म्हणून हाक आली. ह्यावेळी ती त्याच्या एका मित्राची होती. कुणी आपल्याकडे बघत नाही याची खात्री करून जयंतने झटपतीने ती चिठ्ठी आपल्या खिश्यात घातली. आणि तसाच तो चालून आपल्या मित्राजवळ आला.

सुबोध : काय जयंत साहेब.. काय म्हणत होत्या लीलाबाई ?
(सुबोधचा तो प्रश्न ऐकून जयंत आणखीनच घाबरला.. आता ह्याला काय उत्तर द्यावं त्याला काहीच कळत नव्हतं.. तरी तो विषय कसाबसा मिटवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला.)
जयंत : कोण लीला ??.. अरे काही नाही.. परशुराम दादा कुठं आहे ते विचारत होती.. ते जाऊदे.. तू सांग ना.. तुझ्या निकालाचं काय झालं ?
सुबोध : मी झालोय पास.. पण लीलाने हातात हात घेऊन पत्ता विचारणे म्हणजे थोडं अनपेक्षितच वाटतं.. नाही का ?

(जयंतची अवस्था बघून तो काहीतरी लपवत आहे याची भणक सुबोधला सुरुवातीलाच लागली होती.. तरी त्याने विषय बदलून जयंतला comfortable feel करवण्याचा प्रयत्न केला..)

सुबोध : बरं ते जाऊदे.. तुझा दादा कुठं आहे ते सांग. त्या निखिल चा एक विषय राहिला आहे. त्याविषयी थोडं बोलायचं आहे.
जयंत : दादा.. तो आता ऑफिस मधे असेल.
सुबोध : बरं मी निघतो मग.. थोडा घाईत आहे.. आपण नंतर भेटू.
जयंत : हो..

सुबोध ला जाताना पाहून जयंतने सुटकेचा श्वास घेतला.. आपली चोरी पकडली जाणार की काय या भीतीने जयंतचं हृदय जणू त्याच्या गळ्याशी येऊन आडकलं होतं.. पण शेवटी त्याने कसंबसं स्थितीला सांभाळून घेतलं..
काही वेळ शांततेत गेला.. आणि अचानक जयंतला आठवलं की लीलाने दिलेली चिठ्ठी अजुनही त्याच्या खिश्यातच आहे.. त्याने एका हाताने ती चिठ्ठी आपल्या खिश्यातच दाबून धरली. आणि तो गेटच्या दिशेने धावत सुटला..

_________________________________________

त्याच दिवशी,
थोड्या वेळानंतर..

जयंत ती चिठ्ठी आपल्या हातात दाबून धरून आपल्या घरी येऊन पोहोचला.. त्याची आई दारातच त्याची वाट बघत उभी होती. जयंतला बघताच ती आत जाऊन साखरेची चीमट घेऊन आली. जयंतने येऊन आईचा आशीर्वाद घेतला आणि ती साखरेची चीमट आपल्या तोंडात टाकत तो गडबडीने म्हणाला
जयंत : पास झालो..
शकुंतलाबाई (जयंत.ची आई) :. मला आधीपासूनच खात्रीच होती..
जयंत : बर आई, मी खूप दमलोय.. मागे बागेत जाऊन बसतो थोडावेळ..
शकुंतलाबाई : आणि जेवण?
जयंत : ते मी येऊन करेन.
शकुंतलाबाई : बर.. पण गेलास की तिकडेच बसू नकोस.. आज जेवणात तुझ्या आवडीची पुरण पोळी केली आहे.
जयंत : हो.. मी आलो लगेच.

आईचा निरोप घेताच जयंत घाई घाईने बागेतील एका बाकावर येऊन बसला.. बागेत आपल्या आसपास कुणीच नाही याची खात्री होताच त्याने ती चिठ्ठी बाहेर काढली.. आणि वाचायला सुरुवात केली –

प्रिय जयंत,

मी अशी अचानक तुला चिठ्ठी दिल्यामुळे तू नक्किच घाबरला असशील. पण माझ्याकडे त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. खूप दिवसांपासून मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय. पण ते शक्य होत नव्हतं. आणि आता कॉलेजही जवळ जवळ संपलच आहे. आणि यानंतर आपली भेट होणही मला साध्य दिसत नव्हतं.. म्हणून मी तुला हे पत्र लिहीतेय.

मला तू आवडतोस जयंत..
आता नव्हे. तर अगदी आपण शाळेत होतो तेव्हापासून. पण लहान असताना हे सांगण्याची बुद्धी मला नव्हती. आणि जेंव्हा मी मोठी झाले तेव्हा माझ्या बाबांच्या भीतीमुळे सर्वांनी माझ्याशी बोलणं टाळायला सुरुवात केली. त्यात तूही एक होतास..

माझ्याशी बोलण बंद केलंस. मी डोळ्यासमोर असूनही माझ्याकडे एकदा फिरकुनही बघत नाहीस.
का जयंत ?..
असा कोणता मोठा गुन्हा केलाय मी ??..
इतक्या वर्षात माझं तुझ्यावर कितपत प्रेम आहे याची तुला एकदाही जाणीव नव्हती का रे झाली?.
सगळं काही माहीत असूनही तू का असं वागतोयस माझ्याशी?..

जयंत..,
माझ्या बाबा आणि भावाच्या कर्मांची शिक्षा मला देऊ नकोस. मला हे सगळं नकोय जयंत.. ही दहशत, हिंसा, रोज रोज त्या बंदुका आणि रक्त मला आता बघवत नाहीये.
मला एका सामान्य मुलीप्रमाणे आपलं आयुष्य जगायचंय..
प्रेम करायचंय..
इतका देखील हक्क नाही का रे मला ?

मी तुला कसलीही बळजबरी किंवा सक्ती करणार नाही. फक्त इतकीच विनंती करेन की तू कोणताही निर्णय घेण्या आधी ह्या सगळ्यात माझी काय चुकी आहे एवढाच विचार कर..

उद्या सकाळी ५:३० वा मी आपल्या कॉलेजच्या मागे तुझी वाट बघेन.. आणि जर ह्यावेळी तू नाही आलास तर तुझी ही लीला संपली म्हणून समज.

फक्त तुझीच,
लीला.

पत्र संपता संपता जयंतचा हात थरथरू लागला होता.
त्याला माहित होतं की तो लीलाला आधीपासून आवडत होता. पण लीला असं काही बोलेल याची त्याला कसलीही अपेक्षा नव्हती. आणि आता पुढे काय होईल याची कल्पना करणही त्याला शक्य होत नव्हतं.
इतक्यात जयंतचा मोठा भाऊ परशुराम तिथे आला.
परशुराम : काय जयंत साहेब, आज घरी येण्याचा विचार आहे की नाही ?
जयंत : अरे दादा, तू कधी आलास ?
परशुराम : हे काय आत्ताच आलोय.. चल, बास झालं तुझं वाचन आधी जेवून घे चल.. आई सुद्धा जेवली नाही अजून
जयंत : हो.. तू चल मी आलो २ मिनिटात
परशुराम : अरे असलं काय महत्त्वाचं वाचतोयस?.. आन बघू तो कागद इकडे.
जयंत : अरे नाही दादा.. काही खास नाही.. तू घरी जावून हात पाय धुवून घे तोवर मी आलो.
परशुराम : बर.. पण मला परत इकडे यायला लावू नको म्हणजे झालं. ये लगेच
जयंत : हो रे.. तू चल तरी

परशुराम तिथून निघताच जयंतने त्या चिठ्ठीचे बारीक बारीक तुकडे केले. आणि ते जमिनीत पुरून टाकले.. आणि तो घराच्या दिशेने चालू लागला..

____________________________________________________
जेवणानंतर,

शकुंतलाबाई : काय रे जयंत.. पुरण पोळी कशी झाले ते सांगितलं नाहीस.
जयंत : अगं आई.., खूप छान झाली आहे नेहमी प्रमाणे..
शकुंतलाबाई : तुला आवडली ना ?
जयंत : म्हणजे काय.. खूपच आवडली..
शकुंतलाबाई : मग इतका गप्प–गप्प का आहेस आज?.. सुबोधशी भांडण वगैरे करून आलायस की काय ?
जयंत : नाही गं आई.. तसं काहीच नाही. आणि तसं काही असतं तर मी तुला न सांगता राहिलो असतो का.. बरं ते जाऊदे.. दादा झोपला का ?
शकुंतलाबाई : नाही अजून.. ते कॉलेजची कसली तरी रिपोर्ट का काय ते पूर्ण करायची आहे म्हणाला.
जयंत : बर.. तू जा झोप जा.. मलाही थोडं काम आहे.. ते संपवून मी झोपेन
शकुंतलाबाई : बर ठीके.. पण जास्त वेळ जागत बसू नकोस रे.. उरलेलं उद्या कर
जयंत : हा हा.. तू जा आता.

जयंतच्या मनात एक विचित्र दुविधा निर्माण झाली होती. जर लीलाला नाही म्हणावं तर लीला स्वतःच्या जीवाला काही बर वाईट करून घेईल याची त्याला प्रचंड भीती वाटत होतीच.. आणि दुसऱ्या बाजूला लीलाशी कोणताही संबंध ठेवणे म्हणजे स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालण्यासारखं होतं..
फिरून फिरून जयंतच्या मनात तो एकच प्रश्न येत होता.

जयंत सारख्या साधारण मुलाने दगडू पाटलाच्या मुलीशी प्रेम करण्याचा परिणाम काय असेल हे त्यावेळी सगळ्या सांगली जिल्ह्याला माहीत होतं. त्यामुळे गावात कोणताही मुलगा लीलाशी बोलणं तर दूर.., तिच्याकडे वर मान करून बघण्याचीही हिम्मत कोणात नव्हती.

पण काही म्हटलं तरी लिलाचं जयंतवर अपार प्रेम होतं. आणि जयंत सुद्धा त्या गोष्टीला पूर्णतः नकारू शकत नव्हता की त्याचंही लीलावर एकेकाळी प्रेम होतं.. पण जस जसं तो मोठा होत गेला आणि त्याला कळालं की लीला कोणाची मुलगी आहे, तिचे वडील काय करतात.. याची जाणीव होताच त्याने माघार घेतली..

रात्रभर आपल्या खोलीत तो एकच विचार करत बसल्यानंतर जयंतने शेवटी एक निर्णय घेतला. घड्याळात ४:३० वाजले होते.. जयंत घाईने उठून तयार झाला.. त्याला लवकरात लवकर कुणी बघायच्या आधी लीलाला भेटून परत यायचं होतं..

____________________________________________________

To be Continued...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users