हाक अंतरीची

Submitted by शिवाजी उमाजी on 5 December, 2018 - 21:29

हाक अंतरीची

अस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषा कुणी का ओढल्यात? माहित नाही? मी नाही मानत उगीच काही परंपरा. मनात नसता कुणाच्याही पाया पडणं किंवा चार लोक जातात म्हणून त्यांच्या मागे देवळात जाणं मला नाही पटत, भले मग कुणी मला नास्तिक म्हणो. माझ्या बाबतीत खुपदा असं होतं, का ते माहीत नाही. पुर्वी कामानिमित्त दौऱ्यावर जावं लागत असे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भटकंती व्हायची, काम संपल्यावर त्या त्या वेळी व ठिकाणानुसार सोबतीचे कधी मंदिर, पार्क किंवा अन्य प्रेक्षणिय व प्रसिध्द स्थळांना भेटी द्यायचा बेत करीत, मलाही आवडायचं, एरवी सर्व ठिकाणी मी जायचा पण मंदिर वा अन्य धार्मिक ठिकाणी मी खुपदा जात नसे, याचं कारण मला आजही सांगता येत नाही परंतु बाकि लोकांच्या मते तेव्हा मी नास्तिक ठरायचो.

एकदा सोलापूर दौऱ्यावर असतांना सोबत्यांच्या हट्टाखातर श्री सिध्देश्वर मंदिरात पोहचलो, सुरेख नक्षीकाम केलेलं दगडी हेमाड पंथी बांधकाम, चहुबाजुला बसविलेल्या किंवा कुणी भक्तांनी आणुन ठेवलेल्या वेगवेगळ्या आकारातील अनेक शिवलिंग प्रतिमा फारच विलोभनीय, मंद दरवळणारा कर्पुर, अगरबत्ती व धुपाचा सुगंध सोबत नित्य नविन येणार्‍या भक्तांकडून होणारा घंटानाद खुप छान वातावरण होते, तरीही मी काही तरी वेगळ शोधत होतो. एका विस्तृत अशा दगडी महिरपी असलेल्या सभामंडपात कुणा बाबांचे कानडी भाषेत प्रवचन सुरू होते, आम्हा सर्वांचे दर्शन सोपस्करही उरकले होते, काही काळ बसावं म्हणुन आम्ही तेथे कठड्यावरच बसलो. माझं ध्यान त्या बाबांच्या शब्दांवर, ते मी एकाग्रतेने ऐकत होतो, काय झालं ते समजलं नाही, त्या बाबांची भाषा कळत नव्हतीच परंतु त्यांच्या शब्दांत इतकं माधुर्य होतं कि मी तीथं गोठल्यागत झालो, अर्धातास उलटला, सोबती म्हणु लागले चल निघु, पण मी हललो नाही. काय होतं ते? त्यांते शब्द माधुर्य, वातावरणाचा प्रभाव? कि अंतरीची हाक? आजपावेतो न उमगलेलं कोडं, तसाच अनुभव श्री स्वामी विवेकानंद मेमोरीयल, कन्याकुमारी येथला आरपार भारून टाकणारा.

परमात्म्याचा अंश कधी नादातून, कधी स्वरातून तर कधी गंधातून जाणवतो, तेंव्हा आत्मा बरोबर तिथे ओढला जातो, मग ठिकाण मंदिर, दर्गा वा चर्च कोणतेही असो, स्वर उमजणारा,समजणारा जरी नसला तरीही तो मनाला भावतो व पर्यायाने आत्म्याला तेथे ओढून नेतो, कदाचित जीवा शिवाची भेट अशीच होत असावी? परम शांततेचा स्वर ॐकार असो किंवा मंदिरातल्या घंटेचा नाद, पहाटे पहाटे कानावर पडणारे अजानचे अविट स्वर नाहीतर चर्चमधे घुमणारा धीर गंभीर चर्चबेलचा आवाज असो, नकळत मनाला शांत करीत असतात, ही स्पंदणं हृदयाशी एकरूप होतात, काही वेळ तरी स्वतःला विसरायला लावतात.

चौदाएक वर्षांपुर्वी दक्षिण भारतात दौर्‍यावर गेलो होतो, निटसं लक्षात नाही बहुतेक रामेश्वरचा बस स्टँड असावा, वेळ पहाटे सव्वा ते साडे चारची, डिसेंबरातली बोचरी थंडी, कोपर्‍याला शेकोटी करून ड्रायव्हर, कंडक्टर असे जोडी जोडीने शेकोटीच्या भोवती बसलेले, टेप रेकाँर्डवर कुठलसं दाक्षिंणात्य सुरावटीच भजन सुरू होतं, संगीताच्या त्या सुरांची काय जादू झाली कुणास ठावूक? मी आपसुक त्या शेकोटी कडे वळलो त्यांच्या पाठीमागे शांतपणे ऐकत उभा राहीलो, माहित नाही एक विलक्षण अनुभुती जाणवत होती, भजनातील एकही शब्द समजत वा कळत नव्हता, पण सुरांनी बांधुन ठेवलं होतं मला, कसा मग्न झालो त्यात समजलंच नाही, काही वेळने बरोबरचे लोक विचारू लागले काय झालं? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते, ज्या टोळक्यात उभा होतो ते सुध्दा चक्रावलेले, त्यातील एकाने विचारलंच "मल्याली?" मी नकारार्थी मान हलवित म्हटलं "महाराष्ट्र".

बहुदा असाच असावा आतला नाद, परम्यात्म्याशी नकळत कधी तरी जुळणारा, स्वतःतल्या "स्व" ची ओळख करून देणारा, म्हणुनच असावं कि सुर, स्वर, व नादाला जात धर्म नसतो, प्रांत वा देश नसतो, असतो तो केवळ जीवाशिवाचा ॠणानुबंध न दिसणारा न उमजणारा कुठेतरी निराकार ईश्वराच्या नाळेशी जोडलेला.

© शिवाजी सांगळे, मो.+९१ ९५४५९७६५८९

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच...

तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!
-ज्ञानेश.

खूपच सुंदर लेख, माझ्या मनातल्या भावना. मी पण नास्तिक आणि तरीही काही प्रसंगी अशाच भावना निर्माण झाल्या होत्या. असे काही सूर, वास आणि जागा आठवून गेल्या.

तुमच्या बस स्टँडच्या अनुभवाशी लगेच रिलेट करता आलं कारण मैसूरच्या सेंट फिलोमीना चर्च मध्ये कन्नड मध्ये इव्हनिंग मास ऐकला होता, तेव्हा जे फिलिंग्ज होते ते हेच.

खूपच सुंदर लेख, माझ्या मनातल्या भावना. मी पण नास्तिक आणि तरीही काही प्रसंगी अशाच भावना निर्माण झाल्या होत्या. असे काही सूर, वास आणि जागा आठवून गेल्या.>> +११११११११११११११११११११११११११११११११११११११

तुमच्या बस स्टँडच्या अनुभवाशी लगेच रिलेट करता आलं कारण मैसूरच्या सेंट फिलोमीना चर्च मध्ये कन्नड मध्ये इव्हनिंग मास ऐकला होता, तेव्हा जे फिलिंग्ज होते ते हेच. >> +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

काही ठिकाणी गेल्यावर खरेच खूप शांत वाटते, त्या जागेचा प्रभाव असेल किंवा तिथल्या चांगल्या ऊर्जेचा असेल. लेख मस्त झालाय.

नन्द्याजी, वेडोबा, जागू प्राजक्ता व अनन्त् यात्रीजी आपणां सर्वांचे मनापासून आभार