माझी शाळा : पूर्व भायखळा....!

Submitted by ASHOK BHEKE on 30 November, 2018 - 11:08

रोज जाता येता शाळा पाहतो. तीन मजली इमारत. विटांच्या खोल्या नाहीत तर साक्षात विद्येचे मंदिर. त्या मंदिरात घंटा देखील आणि रोज प्रार्थना देखील होते. सहज त्या दिवशी बाहेरच्या खिडकीतून आंत डोकावले. एक साथ नमस्ते गलका ऐकू आला.... नव्हे माझा मलाच भास झाला. सभोवताली भिंतीचे कुंपण आणि सुगंधी फुलांच्या बगीच्यात ताठ मानेने उभी असलेली माझी शाळा.ज्ञानाचं बीजारोपण करणारा फळा थकला होता. आवाज करणारी खिळखिळी बाकं शांतपणे भिरभिरत माझ्याकडे पाहत विचारती झाली, ओळखलं का आम्हाला....! भूतकाळातले ते क्षण आठवले. निरागस, अल्लड, अबोल बालपण... आयुष्यातील स्वप्नवत काळ. शाळेत येताना भीती तर जाताना भक्ती निर्माण होत होती. येताना पाटी कोरी पण जाताना ज्ञानभांडारातील रत्ने शिगोशिग भरलेली होती. येताना आम्ही मातीचा गोळा होतो पण त्याचं सुंदर शिल्प घडविण्याचे काम या शाळेने केले.त्या काळात घडलेल्या गमतीजमती आठवणीत कायम कोरल्या जातात. बालपणाचा अद्वैत ठेवा मनात रुतून बसतो.आयुष्याची पायाभरणी करणारी आमची शाळा. आयुष्याला आकार देणारी आमची शाळा. खूप शिकायचं होतं. गुरुजींनी विचारले तुम्ही कोण होणार...? तर आम्ही कापड गिरणीत काम करणार... हे निर्लज्जपणे तोंडावर सांगणारे अवखळ बालपण अनुभवले. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असायला परिस्थिती कारणीभूत असते. त्यामुळे आम्ही इनमिन दहा बुके शिकावं आणि कामाला जुपावं हा घरच्यांचा आग्रह. त्या सुखाच्या बंद पिंजऱ्यात तशी परिस्थितीच होती. आता मुले शूज घालून शाळेत जातात, तेव्हा आमचे अनवाणी पाय हेच आमचे बूट होते. पुढच्याला ठेच लागताच मागच्याला शहाणपण आणणारा आमचा काळ होता. मधल्या सुट्टीत मिरचीचा ठेचा आणि लोणचं हा पोषणहार असायचा. तांब्या फिरवून शाळेचा कडक गणवेश दिसायचा. आयते ढगळं खमीस आणि चड्डीला मागून थिगळ असायचा.ते पण खाकीला खाकी नसून रे बेरंगी असायचे. आजच्या भोकवाल्या आणि फाटक्या जीन्सपेक्षा लयभारी. चामड्याला फिके पाडणारा करदोडा चड्डीवरचा आमचा बेल्ट असायचा. नळाचे पाणी ओंजळीने प्यायचे हीच वाटरबँग आमची. पावसाळ्यात कधी छत्री रेनकोट पाहिलाच नाह, पोत्याच्या घोंगटा किंवा दप्तर डोक्यावर टाकून गाड मुडद्या शाळत.... म्हणणाऱ्या आईचे ते आपुलकीचे शब्द आज आठवणीत आले तेव्हा गहिवरून आले. आजच्या दप्तरातचे ओझे न पेलविण्यासारखे पण आईने विणलेली पिशवी हेच आमचे पाठीवर मारलेले दप्तर ते जबाबदारीचे होते. केस कापताना सलून कधी पाहिले नाही घरी आलेल्या न्हाव्याकडून टक्कल करीपर्यंत गप्प बसून राहायचो. शाळेत जाताना कासवगती, पण सुटताच मात्र ससा होऊन धावायचो. घंटा वाजविताना थोडंफार उशीर झाला की त्या वाजविणाराचे पित्तर आम्ही खाली आणायचो.
शाळेच्या आठवणीचा पट हा नेहमी बोलका राहील. भूतकाळातल्या रम्य आठवणीचा रतीब घालताना बालपणीचे सोनेरी पान चाळविताना मेंदूला तान दिला की, वर्गातल्या अनेक सवंगड्याची नांवे फेर धरू लागतात. त्या वल्ली डोळ्यासमोर उभ्या राहतात. पंपूशेट असो वा जपानी गुडिया, स्काउटचा कॅम्प असो वा सहल.... रुसवे फुगवे, भांडण तंटे, कट्टी बट्टी यांच्या मुळे चविष्ट गेले बालपण. खिडकीतून भिरकावलेली वह्यांच्या पानाची विमाने अलगद खाली झेप घेतात. पोटात गोळा आणणारा गणिताचा तास चक्रवाढ व्याज, लसावी मसावि समजून घेताना डोक्यावरून जायचा. रुक्ष वातावरणाच्या कल्पनेने अंगावर काटा आणणारा इंग्रजीचा गंध नसताना तो तास झिंगलेला होत असे. जे शिकवीत ते शाळेतच. गृहपाठ क्वचितच. असला तरी फावल्या वेळेत तेथेच पूर्ण करणारे बौद्धिक मुले आणि त्यांचं पाहून झटपट लिहिणारे अल्पबुद्धी गटातले आमच्यासारखे शाबासाकीला पात्र ठरत असत. कितीही उकडले तरी खिडक्या उघडून बसायला आणि ते कबुतरांचे गुटटर्र गुम पाहायला मजा वाटायची. वातानुकुलीत ऑफिसपेक्षा पंखे नसलेली शाळा हेच आमचे घर होते. हस्तकला, चित्रकला संगीत या आवडत्या विषयाची मेजवानी होतीच शिवाय PT चा तास हा विसरून कसा चालेल. ज्ञानोबा, तुकाराम,सावतामाळी कुसुमाग्रज आचार्य अत्रे, बालकवी एडिसन न्यूटन यांची ओळख तर येथेच झाली.
मला तर पालकसभा कधी झाल्याचे आठवत नाही.आता मुलामुलींची बौद्धिक क्षमता बघताना त्यांच्या पालकानां तोलून पाहतात. बाळू फार मस्तीखोर होता. वर्गात न बसता हुंदडत असायचा. मारामारी करायचा. एकदा कंटाळून त्याला सांगितले तू तुझ्या पालकांना घेऊन ये. आता हा पालकांना सांगणार थोडा...! त्याने चाळीतल्या केशवनाना यांना हात जोडले आणि नाना बनून शाळेत यायला विनविले. नाना तयार झाले.शाळेत गेले. बाईनी बाळूचा पाढा नानांपुढे वाचला. ते ऐकून नानाचा तोल ढासळला. त्यांनी बाईसमोरच बाळूला असा चोपून काढला की, बाळू यापुढे नको नाना, नको धिंगाणा.अनेक बहुरूपी काका नाना दादा शाळेत येत होते. पण या नानांचा उग्रावतार अनेक बहुरूपीजणांना आत्मसात करावा वाटला. पूर्वी शाळेत हातावर वेताच्या छड्या मारायचे.दिवसभर ती वेदना म्हणजे शिक्षा ठसठशीत राहत होती. आता मुलांकडे साधे डोळे वटारून बघायला शिक्षक घाबरतात. शिक्षा तर सोडा. त्यावेळी गुरुजीच्या धाकापूढे आमच्यात कधी टिळक संचारलाच नाही. नाहीतर खडसावून म्हटले असते.... ‘मस्ती करणे आमचा हक्क आहे. तो आम्हांला हवाच. धोंड्या नावाचा एक खट्याळ बालपणात अनुभवला. घरचा श्रीमंत. बापाचे दुकान. आई पोराला शाळेत पाठविताना डोक्यावर तेल थापवून पाठवायची. मस्ती करताना गुरुजींनी त्याच्यावर खडूचे मिसाईल सोडले. ते इतक्या वेगात धोंड्याच्या कपाळाला येऊन थडकले की, काही क्षण बधीर झाला. तेव्हाच धोंड्यांनी मनोमन ठरविले. आता गुरुजीला अद्दल घडवायची. दुसऱ्यादिवशी फळ्यावर आपल्या डोक्यावर थापलेले तेल लावले. गुरुजी आले फळ्यावर लिहायला लागले पण अक्षर काही उमटेना. कुणीतरी कामगिरी केल्याचे लक्षात येताच *कोण आहे सूर्याजी पिसाळ....?* एका विद्यार्थ्याला धाकात घेतले आणि त्याने पोपटासारखे सारे काही सांगितले. मग काय गुरुजींनी केली धोंड्याची धुलाई.अनेक गमतीजमती घडल्या. सुखाचे सोबती *किशोर गुरव, दीपक राणे, प्रभाकर हिंगे, धोंड्या पारखे, भगवान कुंभारकर,धनाजी धामणकर* आदि सवंगडी आम्हांला दु:खात सोडून परलोकवासी झाले.
पूर्व भायखळा शाळेचे आम्हांवर अती उपकार आहेत. तिच्या छायेत जे संस्कार मिळालेत, जे शिकलो किंवा जितके शिकलो त्याच्या जोरावर आज मी माझ्या लेखणीतून आपल्या आठवणी ताज्या करायला लिहित आहे. प्रत्येकाच्या वाट्याला मर्यादित बालपण का दिले.... हे संपल्यावर त्याला पर्याय शोधून सापडणार नाही.
बालपण देगा देवा... आम्हाला असलेली कविता.या कवितेचा अर्थ आता कळू लागला. पुन्हा एकदा त्या वयात जायची तीव्र इच्छा आहे. ती शाळा, ती मस्तीचा अनुभव घ्यावासा वाटतो. शाळेत असताना बाहेरच्या दुनियेची भुरळ आणि आता मात्र शाळेची भुरळ.शाळेत जावं म्हणून आईच्या धपाट्याने रडायचो, आता शाळेच्या आठवणीने रडतो. याच शाळेने बाहुपाशात घेऊन शिकविले,स्वाभिमानाने जगायला शिकविले. सुखदु:खाचा समतोल उपभोग घ्यायला शिकविले. समाजासाठी झटायला शिकविले. आयुष्याचा खरा अर्थ येथेच शिकविला. पहिल्या ३५ मार्कासाठी धडपड होती पण बाकीच्या ६५ मार्कात जीवन घडण्याची शक्ती साधली जात होती. सावलीची किमंत उन्हांत उभे राहिल्याने कळते. शाळेची किमंत आता कळली आहे. दोनचार बुकं अजून शिकायला मिळाली असती तर....! अभिमानाने सांगावेसे वाटते, *माझी शाळा पूर्व भायखळा....!*

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक मस्त लेख.
फार छान लिहिता तुम्ही.. खासकरुन तुमच्या सहवासात येऊन गेलेल्या लोकांबद्दल.
लिहीत रहा.. पुढील लेखनासाठी शुभेच्छा

<<<<अजून एक मस्त लेख.
फार छान लिहिता तुम्ही.. खासकरुन तुमच्या सहवासात येऊन गेलेल्या लोकांबद्दल.
लिहीत रहा.. पुढील लेखनासाठी शुभेच्छा>>>>
अनुमोदन.