©गिअरवाली सायकल

Submitted by onlynit26 on 27 November, 2018 - 05:10

©गिअरवाली सायकल

मी दुपारच्या वेळेत ऑफिसमधून घरी फोन केला.
"नैतिक शाळेतून आला का?"
"शाळेतून यायला तो शाळेत गेलाय कुठे? सुमा म्हणाली
"म्हणजे? "
"सकाळपासून रूसुन बसलाय, गालावरचे फुगे काही कमी झालेले नाहीत."
" मी काय म्हणतोय सुमा, देऊया ना गिअरवाली सायकल त्याला." मी नैतिकचा रूसवा घालवण्यासाठी सुमाला म्हणालो.
"काही नको हा. मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलेली सायकल आहे ना त्याच्याकडे? शिवाय नलूने या वाढदिवसाला डेलचं नोटबुक दिलंय. आपणही त्याला हवं असलेलं सारं काही दिलयं." सुमा आपल्या मतावर ठाम होती.
फोन चालू असताना काहीतरी पडल्याचा आवाज झाला.
"काय झालं गं?"
"नैतिक वादळ.." असे बोलल्याबरोबर मी समजलो.
"त्याला काहीतरी खायला दे", असे सांगून मी फोन ठेवला.
घरातली नैतिकची आदळआपट सुमा जोरात ओरडली तेव्हा थांबली.
ऑफिसचे काम आटपून मला दुसऱ्या दिवशी साईट व्हिजिटला जायचे होते. रात्री आठ वाजेपर्यंत काम आटपून मी घरी आलो. नैतिकचा वडा अजून फुगलेलाच होता. असे हट्ट करायला तो आता लहान नव्हता. माझ्या हाताने नैतिकला जबरदस्तीने थोडं दुध भरवलं आणि माझ्या बाजुलाच झोपवलं. नैतिकसाठी त्याची आई त्याला दुष्मन वाटत होती. हट्टापायी त्याने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते.
दुसऱ्या दिवशी मी रोजच्यापेक्षा लवकरच बाहेर पडलो. मी घरातून निघत असतानाच नैतिक उठून बसला. त्याने माझ्या पायाला विळखा घातला. माझ्या सोबत येण्यासाठी रडू लागला. मला वाईट वाटले. सुमाची समजूत काढून त्याची पटापट तयारी करायला लावली. फिरण्याच्या नादात सायकलचे विसरून जाईल असा माझा समज त्याने घराच्या गेटजवळच चुकीचा ठरवला.
"बाबा, आपण येताना सायकल घ्यायची ना?"
" हं" त्याचे मन राखण्यासाठी मी नुसताच हुंकार भरला.
मला आज तळोजा साईटवर जायचे होते. आम्ही साईटवर पोचलो तेव्हा उन्हं बरीच वर आली होती. रोजच्या वातानुकुलीत वातावरणाच्या सवयीमुळे अंगातून चांगलाच घाम निघत होता. नैतिकही दमल्यासारखा वाटत होता. सारे कामगार कामात मग्न होते. मी साईट ऑफीसमध्ये बसून माझी तिथली कामं आटपू लागलो. नैतिक बाहेर बघत बसून राहीला. नैतिकचे मध्येच येणारे कुतूहल मिश्रित प्रश्न ऐकून मला हसू येत होतं. त्यामुळे वॉचमन काकांचीही चांगलीच करमणूक चालली होती. बिल्डिंगचे बरेचसे काम पूर्ण होत आले होते. किरकोळ सामान वगळता बिल्डिंग समोरचे मैदान रिकामे झाले होते. एका कोपऱ्यात कामगारांच्या पत्र्याच्या खोल्या होत्या. तिथे समोरच कामगारांची काही मुलं वाळुच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. इतक्यात एक मुलगा जोरजोरात रडू लागला. पण त्याच्या रडण्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. त्याचे वडील कामात गुंतल्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्षच नव्हते.
मी ऑफिसच्या बाहेर आलो. माझ्या मागून माझे नैतिक शेपूटही बाहेर आले. मी त्या रडणाऱ्या मुलाजवळ गेलो. तो खुपच कुपोषित वाटत होता. चेहऱ्यावर कमालीचे कारूण्य होते.
"काय झालं?" मी त्याच्या जवळ जात विचारले.
त्याने छोटी प्लास्टिकची गाडी ओढत नेणाऱ्या मुलाकडे बोट दाखवले.
मी त्या गाडी ओढत नेणाऱ्या मुलाला हाक मारली. पण तो थांबायला तयार नव्हता. पण एका ठिकाणी तो थबकला.
"बा, गण्यानं आपली सायकल पळीवली" असे बोलून तो समोर आलेल्या माणसाला बिलगला.
"काय झालं साहेब?" तो कामगार मला विचारू लागला.
" बहुधा या मुलाची सायकल तुमच्या मुलाने घेतलीये. नक्की काय ते मला माहिती नाहीये, पण हा खुप रडतोय." मी रडणाऱ्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो.
" सायेब, आसं काहीबी न्हाई, ही सायकल माझ्या माघारणीनं भंगार गोळा करताना कालच्याला माझ्या पोरासाठी आणली व्हती" हे ऐकून मी अवाक झालो.
इतक्यात रडणाऱ्या पोराचाही बाप तिथे आला.
"व्हय सायेब, ती सायकल त्यांचीच हाय, हा लयच रडत हूता, तवा वयनीस्नि सांगून दोन दिसासाठी मागून घेतलीया"
"अरे पण , दोन दिवसानी परत द्यावीच लागली असती ना"
"व्हय, पर पोरगं लयच रडत व्हतं"
"ते ठीक आहे पण, इतरही मुलं दुसरे खेळ खेळतात ना.."
" व्हय सायेब, पर आसले पळापळीचे खेळ खेळले की पोरास्नी भुक लागतीया. माझ्या मजुरीत येका येळचं भागताना मुश्कील, त्यात माघारीण आजारी आसतीया. तिनंच पोराला बजावलयं.. खेळू नगंस भूक लागंल. मग पोरगं असं दारात बसून आसतया. कालच्याला लयच दया आली तवा ती गाडी मागून घेतली" असे बोलून त्याने आपल्या पोराला जवळ घेतले. पोराला नवीन गाडी आणून देण्याचे आश्वासन देत त्याला पत्र्याच्या झोपडीत सोडले. ते पोरगंही बापाचे ऐकत झोपडीच्या दाराशी बसून राहीले. या सगळ्या प्रकाराने मी हादरलो होतो. बराच वेळ माझ्या मागे उभा असलेला नैतिक माझ्या पायाना मिठी मारून रडू लागला.
"हे बेटा काय झालं रडायला?"
"बाबा आपल्याकडे माझी छोटी सायकल आहे ती गणूला देऊया का?" तो रडत रडतच मला विचारू लागला. त्याला हा प्रकार न समजण्या इतका तो आता छोटा नव्हता.
मी हो म्हणाल्याबरोबर तो धावतच गणूच्या झोपडीकडे निघाला. सोबत आणलेला केक गणूला देत त्याच्या बाजूला बसला. माझं लक्ष नैतिककडेच लागले होते. तो त्यांच्या झोपडीत शिरला तसा मी तिकडे निघालो. मी तिथे पोहचेपर्यंत तो बाहेर आला आणि दुसऱ्या झोपडीत शिरला. मी त्याला न अडवता त्याच्या त्या कृतीकडे पाहतच राहिलो. त्याने भराभर साऱ्या झोपड्या नजरेखाली घातल्या. त्याचा चेहरा कमालीचा दुःखी झाला होता.
"बाबा , मला गिअरवाली सायकल नको. त्याच पैशात आपण या सर्वांसाठी काहीतरी आणूया" नैतिकच्या देहबोलीतून तो असं काहीतरी बोलेल असं मला वाटले होते. त्याचा योग्य वेळी बदललेला गिअर पाहून बरे वाटले. पण गरीब सामान्य लोकं असा पण विचार करतात याने मला धक्का बसला होता.
इतक्यात घरून सुमाचा फोन आला.
"हॅलो, कधी निघताय? आणि आपले नैतिक वादळ शमले की नाही?"
"आपल्या नैतिकने गियर बदललाय गं, आम्ही निघतोय इकडून.." माझा आवाज जड झाला होता. नैतिकचा गोड पापा घेवून मी मोटारसायकल स्टार्ट केली.
समाप्त...

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - २७.०९.२०१८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहीलयं. मुलांना लहानपणीच शेअर करण्याची जाण आली ना की ते समाजात लवकर मिसळतात.

खूपच सुंदर... देण्याची भावना मुलानंमध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे...या परोपकार बुद्धीनेच समाज सुधार होऊ शकतो