लघुकथा – निरोप समारंभ

Submitted by भागवत on 26 November, 2018 - 01:01

तुषारचा आज ऑफिस मध्ये शेवटचा दिवस होता. त्याच संध्याकाळी त्याने ऑफिस मधील मित्रांना पार्टी साठी बोलावले होते. त्यासाठी त्याने सगळ्यांना तशी ई-मेल केली होती. त्यात मंगेशला सुद्धा आमंत्रण दिले होते. तुषार आणि मंगेश मध्ये काही विशेष मित्रत्वाचे संबंध नव्हते. पण त्याला स्वत:ला मंगेशला आमंत्रित करावेसे वाटले. यांचे उत्तर तुषार कडे नव्हते.

पण मंगेश पार्टीला आला आणि त्याने खूप मौज मस्ती केली. तुषारला वाटले की तो स्वतः कंपनी सोडून जाणार आहे आणि त्यामुळे मंगेशच्या मार्गातील काटा निघाला म्हणून मंगेश खुष आहे का? की मित्राच्या आनंदात मंगेश खुष आहे हे समजत नव्हते. पण दोघांनी जेवण मस्त पैकी एन्जॉय केले. त्यांच्या सोबत बरीच मित्र मैत्रिणी सुद्धा होत्या. सगळे एकमेकांच्या आठवणी सांगण्यात मशगुल झाले होते.

पार्टी संपल्यानंतर मंगेश आणि तुषार बोलत थांबले. त्या दोघांचे घर एकाच भागात होते त्यामुळे तुषारला मंगेश गाडीत त्याच्या घरी सोडणार होता. तुषार म्हणाला मंगेश तू आलास मला खूपच आनंद झाला.

“अरे तुझा ऑफिस मधील शेवटचा दिवस आणि मी नाही येणार असे होईल का”

“तू जरी बोलवले नसतेस तरी मी आलोच असतो. कारण मी आज खूष आहे. तू चाललास आणि मला अडवणारे आता कोणीच नाही.”

"असे तुला वाटत असेल तर असे काही नाही. तुलाही माहीत आहे मला छुपे वार करणाऱ्या मित्रा पेक्षा समोरून वार करणारा विरोधी आवडतो."

मित्रा तुला भविष्या साठी खूप-खूप शुभेच्छा!!!

असे म्हणून मंगेशने कार सुरू केली. आणि त्यांना त्यांचे मागील दिवस आठवले.

तुषार बोल घेवडा, प्रचंड महत्वाकांक्षी आणि बहिर्मुख मनुष्य होता. तुषार हसतमुख आणि आनंदी व्यक्तिमत्वाचा धनी होता. तो प्रत्येकाशी संवाद साधण्याची त्याची विशेष हातोटी होती. तुषार कंपनीत आपल्या प्रभावी कौशल्या मुळे भराभर हुद्दे मिळवत गेला. त्यात त्याला कोणत्याही परिस्थितीत आपला फायदा करून घ्यायचा हे तंत्र माहिती होत.

त्यात मंगेश बुजरा पण त्याची तत्त्वे प्राणपणे सांभाळणारा आणि त्यासाठी लढणारा होता. त्याला काही विशेष संवाद कौशल्य नव्हते आणि पण एखादी गोष्ट न बोलता कृतीतून दाखवणे हे त्याला चांगले जमायचे. मंगेश त्याच्या मेहनतीच्या आणि बौद्धिक संपदेच्या जीवावर गोष्टी साध्य करायचा.

पण जेव्हा तुषार त्याच्या टिम मध्ये आला त्यामुळे तेथील वातावरण बदलले. सुरवातीला दोघांत मैत्रीपूर्ण व खेळीमेळीचे वातावरण होते. पण जसा- जसा त्यांच्या दोघांतील फरक स्पष्ट होत गेला तसे दोघांत ताण तणाव निर्माण झाले. एखादी समस्या तुषार आणि मंगेश त्यांच्या विचारसरणी नुसार दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडवायचे. त्यात मग दोघ आपले विचार हिरीरीने मांडायचे आणि दुसर्‍यांना पट‍वून द्यायचे की आपलीच समस्या सोडण्याची पद्धत कशी बरोबर आहे. यात कोणाचे जास्त बरोबर यावर वादा वादी व्हायची.

आणि बरेच वेळेस तुषार त्याच्या संवाद कौशल्याचा वापर करून जिंकायचा. पण मंगेशची पद्धत बऱ्याच वेळेस स्वयंपूर्ण असायची आणि चातुर्य पूर्ण संवादात मंगेश हरायचा. त्यामुळे त्याच्या दोघांत दुरावा वाढला होता.

कार मध्ये बसल्यावर तुषार ने सांगीतले. तुला ते टिम प्रकरण लक्षात असेल. त्यात आपला खूप वाद झाला होता आणि आपल्यात भांडणाची ठिणगी पडली होती आणि आपण एकमेकाचे अघोषित शत्रू झालो होतो.

हो त्या वेळी एका महत्त्वाच्या कामातून मंगेशला काढून टाकण्यात आले. मंगेशला वाटले की तुषारच्या सांगण्यावरून त्याला काढण्यात आले आहे. त्याने हे आरोप तुषार वर लावले. पण तुषारने आरोप सरासर अमान्य केले. त्यामुळे आपल्या मधील संवाद खुंटला होता. त्या प्रकरणात तू माझ्यामुळे नाही तर आपल्या मॅनेजर सौरभ मुळे आपल्यात फुट पडली होती. सौरभने आपल्यात जाणीव पूर्वक दरी निर्माण केली कारण आपण जरी भांडत असलो आणि आपल्या समस्या सोडवायच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी त्या दोन्ही पद्धती खूपच चांगल्या होत्या आणि आपण एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी त्या आपण जास्त अभ्यास करून व्यवस्थित रित्या सादर करायचो. त्यामुळे सौरभच्या विचाराकडे सगळ्यांचे दुर्लक्ष व्हायचे. आणि सौरभला असे वाटायचे की त्याची टिम वरील पकडीला तडे जातात की काय. ही भीती त्याला ग्रासली होती त्यामुळे त्याने आपल्यात फुट पडली आणि आपल्यात भांडण लावल्या मुळे आपण दुरावलो आणि त्याचा फायदा मात्र सौरभला झाला. त्याची टिम वरील पकड मजबूत झाली.

तुला माहीत आहे का? आपली विचारसरणी जरी वेगळी असली तरी आपला उद्देश संवाद साधून समस्या मार्गी लावणे असा होता. पण काही लोकांना ती समस्याच सोडवायची नव्हती. कारण त्याच्यात त्यांचे हितसंबंध गुंतलेले होते. यात राजकारण झाल्यामुळे आपल्याच त्याचे नुकसान भोगावे लागले. कारण जेव्हा आपण वादविवाद करायचो त्यावेळेस आपण-आपले ठाम मत मांडायचो. त्यामुळे नकळत आपल्या विचारांना मुक्त उजेड मिळायचा आणि आपल्या पद्धती आणि विचार तावून-सुलाखून निघायचे. मंगेश मी तुझ्याशी भरपूर वादविवाद केले आहेत पण मा‍झ्या मनात तुझ्या विषयी काहीच आकस नव्हती. आपल्या मैत्रीची आठवण मला आधीपेक्षा आता जाणवत आहे. कारण टाईमपास मित्रा पेक्षा आपल्या मध्ये सकारात्मक बदल घडवणारा विरोधक कधीही चांगला.

तुषार तुला माहिती आहे, माझ्या उणीवा भरून काढण्यात मला तुझी खरच मदत झाली. मला माहीत आहे. लोकांशी संपर्क साधण्याची कला आणि आपला मुद्दा व्यवस्थित मांडण्याची कला वाढण्यास मला तुझी खरच मदत झाली. कारण मी आधी पासून बूजरा आणि आत्मकेंद्रित होतो. पण जो पर्यंत तुमच्या मतांना आव्हान देणारे कोणी देत नाही तो पर्यंत तुमच्या मतांची परीक्षा झालेली नसते. त्यामुळे मा‍झ्या विचारात आणि कृतीत फरक पडायचा पण तुला हरवायच्या नादात मी या दोन गोष्टीवर मात केली कारण तुझ्या रुपात मा‍झ्या समोर आव्हान देणारे कोणी तरी आले होते. ज्याकडे स्वत:ची अशी प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघायची दृष्टी होती. आणि तुला आव्हान देण्यासाठी मी मा‍झ्यात सुद्धा भरपूर सकारात्मक बदल घडवून आणले.

मंगेशला जाणवले की तुषारचे घर जवळ येत आहे. मंगेश म्हणाला की मित्रा आपण दोस्त झालो, चढाओढ केली, भांडलो आणि मैत्री सुद्धा तोडली पण तिरस्कार केला नाही. त्यामुळे तुझ्या या निरोप समारंभाच्या पार्टीत मी आपली मैत्री कायम राहावी हीच सदिच्छा घेऊन आलोय. या व्यतिरिक्त माझा काहीही उद्देश नव्हता. आणि तुषार तू माझा कायमच चांगला मित्र राहशील याची मी ग्वाही देतो आणि निघतो. तुषार मंगेश कडे बघून एक स्मितहास्य केले आणि तो घरी जाण्यास वळला.

डिसक्लेमर: ही कथा लेखकाची कलाकृती असून काल्पनिक आहे. कथेचा कोणत्याही व्यक्तीशी, जागेशी, संस्थेशी संबंध नाही.

Group content visibility: 
Use group defaults

छान वाटली कथा. वेळच्या वेळीच बोलुन गैरसमज दूर केले, तर पुढचे अनेक धोके टळतात. ( आणी अशावर हिंदी सिनेमे पण बनत नाहीत)