खांदेरीच्या पोटात दडली विजयगाथा

Submitted by ASHOK BHEKE on 14 November, 2018 - 11:07

पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, तसेच या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला.... खांदेरी. खांदेरी म्हणजे इंग्रजी भाषेत हेनरी. यानंतर सिद्दीने दीड किलोमीटर असलेल्या बेटावर उंदेरी ( इंग्रजीत केनेरी हे नांव ) किल्ला बांधला. अलिबागसमोरील खोल समुद्रात हे जलदुर्ग आहेत. मुंबई समुद्र किनाऱ्यावरून दिसणारे हे जलदुर्ग नेहमीच खुणावत असतात. पण जाण्या-येण्याच्या गैरसोयी आणि या बेटावर वावरण्यास असलेले निर्बंध यामुळे हे दुर्ग पाहणे कठीण होऊन गेले आहे. खांदेरी बेट हे सरकारच्या तटरक्षकाच्या ताब्यात असल्याने पर्यटकांना लाभ घेता येत नाही. परंतु एक पर्याय म्हणजे येथे कोळी लोकांचे दैवत वेताळबाबाचे मंदिर असल्याने त्यांची ये-जा नेहमी सुरु असते.त्यांच्यासोबत मात्र येथे आपला संचार करू शकतो.उंदेरीवर मात्र कोणी जात नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या या बेटांवरील ब्रिटीशकालीन दिपगृहाला कान्होजी आंग्रे यांचे नांव देण्यात आले आहे.
शिवाजीमहाराजांनी आरमाराबद्दल विचार केला तेव्हापासून म्हणजे इ.स. १६७१ पासून त्यांचे खांदेरी- उंदेरी या समुद्रातील बेटावर लक्ष होते. इंग्रज, पोर्तूगीजांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी या बेटावर आपले मजबूत आरमार असावे असे त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली. इ.स.१६७९ साली मायनाक भंडारी यांना काम करण्यास बजावले. काम सुरु होताच इंग्रज खवळले. यावर तेथे आपले अधिकारी पाठवून बेट आपल्या मालकीचे असल्याचा कांगावा केला. पण मायनाक भंडारीने त्यांना न जुमानता काम जोराने सुरु ठेवले. पण मायनाक भंडारीने झाल्या प्रकाराबद्दल महाराजांना निरोप धाडला होता. हे ऐकून महाराजांनी आपल्या आरमाराचा सेनापती दौलतखान यास तातडीने रवाना केले.इ.स. ३ सप्टेंबर १६७९ इंग्रजांनी बेटाचा ताबा घेण्यासाठी ह्युजेस हा अधिकारी नेमला व इ.स. ६ सप्टेंबर १६७९ रोजी ह्युजेस आपल्या तुकडीनिशी बेटावर चालून आला. पाऊस पडत होता. दर्या उसळला होता.बेटावर लाटा येऊन थडकत होत्या त्याचवेळी मुंबई दिशेने अनेक बोटीतून सैन्य खांदेरीच्या दिशेने निघाले होते. मायनाक भंडारीनी बेटावरील तोफांचा ताबा घेतला होता तर त्या खवळलेल्या सागरात दौलतखान गस्त घालीत होता. चाणाक्ष सेनापती दौलतखान याने त्या इंग्रज तुकडी वर असे आक्रमण केले की, ते ज्या बोटीतून आले होते, त्यासहित त्यांना जलसमाधी दिली. तीन अवाढव्य गुराबा आणि साठ एक नांव होत्या.किमान ५००० इंग्रज सैन्य होते. परंतु सुखासुखी कोणी परतला नाही. इंग्रज नरमले. दुसरीकडून जंजीऱ्याचा सिद्दी कासम जागा झाला. दौलतखानने त्याची गत इंग्रजाप्रमाणे केली. हे सुरु असतना मायनाक भंडारीने अल्पावधीतच खांदेरीची मजबूत तटबंदी उभी केली. आज इतकी वर्षे होऊन गेली तरी तुफान दर्याच्या लाटांना तोंड देत खांदेरीची तटबंदी अद्याप ठामपणे उभी आहे. त्या पराक्रमाची गाथा सांगण्यासाठी वर्षानुवर्षे अशीच उभी राहणार आहे. खांदेरीच्या पोटात दडलेली ही विजयीगाथा थोड्या थोडक्या लोकांना ठाऊक असेल. जेव्हा पूर्णपणे खांदेरी उभा राहिला तेव्हा महाराज नव्हते. जर महाराज अजून दहा वर्षे असते तर एकही इंग्रज दिसला नसता किंवा औरंगजेब दख्खन मध्ये दाखल झाला नसता व स्वराज्याची वाताहतही झाली नसती.
इ.स.१५८८ ची एक गोष्ट सांगाविशी वाटते. स्पेनचा स्पँनिश आरमाडा म्हणून जगातील अव्वल दर्जाचे आरमार. काटक, धिप्पाड, कष्टाळू स्पँनिश सैन्य अटलांटा महासागरातील उत्तर समुद्रात त्यांचे राज्य होते. ते स्वत:ला बलवान आम्हीच असे म्हणत आणि त्यांच्या वाटेला कोणी जाण्याची हिमंत करीत नव्हते. ब्रिटनच्या मनात त्यांच्याविषयी सल होती. दळणवळण यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे इंग्रज चवताळले होते. योग्य संधीची वाट पाहत त्यांनी स्पँनिश आरमाराला आम्ही खऱ्या अर्थाने बलवान आहोत, असे सांगितले. त्यामुळे स्पँनिश सैन्य इंग्रजावर धावून गेले. कुमक कमी असलेल्या आणि आरमारात प्रवीण नसलेल्या इंग्रजांनी स्पँनिश नौकांना सैन्यासहित जलसमाधी दिली आणि विजय संपादन केला. तेव्हा तसे कारणही घडले एक मोठ्या वादळाचा तडाखा युध्द सुरु असताना झाला. अन इंग्रजांच्या पथ्यावर पडले. त्यानंतर इंग्रज सर्वत्र संचार करू लागले. राज्याचा विस्तार होत गेला. पण त्यांनी त्या बुडविलेल्या नौका समुद्रातून बाहेर काढल्या. खर्च अमाप आला. परंतु आपल्या विजयाचे स्मरण भविष्यात आपल्या पिढीला व्हावे म्हणून त्या नौकाच्या लाकडापासून त्यांनी टेबल बाकडे बनविले आणि *ग्रीनव्हीच नेव्हल अँकँडमी* या सैनिकी शाळेत ठेवले. येथे शिक्षणास आलेल्या सैनिकांना आपण बसत असलेल्या आसनाविषयी माहिती दिली जात असते. एक विजयी भावना त्याच्या मनात जागृत होत असते. ते टेबल बाकडे या आधुनिक युगात अडगळीतील सामान न करता आजही त्या सैनिकी शाळेत आपल्या मुठभर पूर्वजांनी पराकोटीचा संघर्ष करीत पराक्रमाचा पूर्वेतिहास लिहिला आहे, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.
आपल्या सैनिकांनी देखील असाच पराक्रम केला होता हे आपल्या भावी पिढीला प्रेरणादायक ठरावे म्हणून आपल्या समजूतदार आणि शहाणपणा अंगी मुरलेल्या लोकशाहीतील नेत्यांनी आपली चुणूक दाखवायला हवी होती. पण साधा सत्ताधीशांनी खांदेरीच्या पोटात काय काय दडलंय याचा कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. वरचेवर देशप्रेमाची गाथा सांगणारे बेंबीच्या देठापासून कोकलतील, पण भूतकाळातल्या या स्मृती खणून काढण्याचे प्रयत्न कोणी करणार नाही. आपल्याला बलवान राष्ट्र घडवायचे असेल तर सैनिकी शाळामध्ये असे विषय तरी घ्यायला काही हरकत नसावी.

*अशोक भेके*

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर आहे. शालेय पुस्तकातला ईतिहास वरवरचा असतो. एक विषय म्हणून या कडे पहीले जाते. अवांतर ईतिहास वाचणारे कमीच.
खुप छान.