झोप

Submitted by पायस on 28 October, 2018 - 02:48

शुक्रवारचा दिवस असल्याने अनन्याचे लक्ष मॉनिटरकडे कमी आणि घड्याळाकडे जास्त होते. तिच्या वयाच्या अनेकजणांप्रमाणे तिनेही कीबोर्ड बडवायची नोकरी पकडली होती. तिचा या जगाच्या उलथापालथीवर नगण्य प्रभाव होता पण तिला याची फारशी फिकीरही नव्हती. ती कंपनीही काही फार जबरदस्त वगैरे नव्हती पण तिच्या डिपार्टमेंटकडे पुरेसे क्लाएंट्स होते. तिच्या बुद्धिमत्तेच्या मानाने काम अगदीच मामूली असल्याने तिच्याच शब्दात सांगायचे तर "मला ८-९ तास एका जागी बसून कॉफी ढोसण्याचे पैसे मिळतात". पगारही तसा बरा होता. वीकांताला मग एखादा सिनेमा, पुस्तक वाचन वगैरे मध्ये वेळ घालवता येत असेल तर आणखी काय पाहिजे आयुष्यात?

तिने अंदाज घेऊन ब्राऊजरमध्ये होस्ट टू आयपी टूल उघडले आणि फेसबुकचा आयपी काढला. त्या आयपी वरून लॉगईन होताच तिच्या समोर मेसेंजर होता. हूं, आले मोठे फेसबुक ब्लॉक करणारे! ट्राय हार्डर पीपल!
"हे गर्ल"
"हे. बायपासिंग ऑफिस ब्लॉकर्स अगेन?" काही क्षणात गार्गीने उत्तर दिले.
"अरे ते पुरेसे सुरक्षा प्रबंध करत नसतील तर त्यांना त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे की नको?"
"हो ना. तुला त्याच्याकरताच कामावर ठेवलंय. पिंग का केलंस ते सांग"
"इट फॉलोजचा शो आहे साडेनऊचा. तिकिटं काढते आहे."
"अम्म, साऊंड्स लाईक अ प्लॅन! शेवटचा पेशंट सातला येतोय. आठच्यावर नाही जायचं त्याचं सीटिंग. निघाले की टाकते तुला मेसेज."
"पोटॅशिअम"

गार्गी मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती. ती डॉक्टर सोमणांकडे प्रॅक्टिस करत होती. अनिरुद्ध सोमण शहरातले नामवंत मानसशास्त्रज्ञ होते. स्वतःच्या क्लिनिक व्यतिरिक्त त्यांना विविध हॉस्पिटलमधूनही बोलावणे येत असे. त्यांचे क्लिनिक छोटेसे पण सुसज्ज होते. गार्गीला पुढेमागे एखाद्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यात रस होता. त्यासाठी या क्लिनिकचा अनुभव आणि सोमणांची शिफारस मोलाची होती हे वेगळे सांगणे न लगे! गार्गी मेहनती असल्याने अल्पावधीतच तिची चांगली प्रतिमा तयार झाली होती. कधीकधी मग डॉक्टर तिला आपल्यासोबत हॉस्पिटलातल्या सीटिंग्जनाही घेऊन जात असत. पुढच्या आठवड्यात डॉक्टर सोमण एका कॉन्फरन्ससाठी शहराबाहेर असणार होते. त्यामुळे क्लिनिकलाही सुट्टी होती. मग सिनेमा बघून ताणून द्यावी की आणखी काही करावं याचा विचार करत असताना अचानक तिला "एक्सक्यूज मी" ने भानावर आणले.
"सहा वाजून पंचावन्न मिनिटे झाली आहेत. माझी सातला अपॉईंटमेंट होती. तर ... "
"अं, सात.. राईट! एकच मिनिट हां. तुमचं पहिलं सीटिंग नाही का? आपण पटकन थोडं रुटिन पेपरवर्क करूयात."
गार्गीने त्याच्याकडे प्रथमच नीट बघितले. ती स्वतःशीच पुटपुटली, हा शेवटचा कधी झोपला होता कोणास ठाऊक?

*****

"नीड अ राईड?" मकरंदने विचारले. मकरंद उर्फ मॅक अनन्याच्याच ऑफिसात काम करायचा. गार्गी न आल्याने नाईलाजाने अनन्याला नाईलाजाने मॅकसोबत सिनेमा पाहावा लागला होता. मॅक तिचा चांगला मित्र असला तरी आज गार्गीने ऐनवेळी कल्टी दिल्यामुळे तिचा मूड ऑफ झालाच. थिएटरला दोघे मॅकच्याच युनिकॉर्नवर आले होते. आता तिथून हिला घरी सोडायचे तर मॅकला उलटा वळसा पडणार होता. तरीही त्याने विचारण्याचे सौजन्य दाखवले होते.
"अं, तू मला गार्गी जिथे काम करते तिथे राईड देऊ शकतोस का?"
"हो, उलट मला जास्त सोयीचे आहे. माझ्या घराच्या वाटेवरच आहे ते."
थोड्याच वेळात मॅक आणि अनन्या क्लिनिकपाशी पोहोचले. सोमणांचे क्लिनिक म्हणजे एक छोटी बंगली होती. त्या बंगलीचाच एक भाग ते क्लिनिक म्हणून वापरत. घरातले काही दिवे चालू होते. म्हणजे डॉक्टर अजूनही जागे होते.
"चला, डॉक्टर अजूनही जागे आहेत तर. मी पण येऊ का? बरेच दिवस गार्गीशी गाठभेट नाही. यानिमित्ताने तिलाही भेटणं होईल.
"ओह, शुअर. विचारायचं काय त्याच्यात?"

डिंग डाँग! .....
डिंग डाँग!! ....
डिंग डाँग, डिंग डाँग, डिंग डाँग, डिंऽऽऽऽऽऽऽऽग डाँऽऽग!!!!!
मॅकने अनन्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. काहीतरी चुकत होते खास. तिच्या चेहर्‍यावरही चिंता दिसून येत होती. त्याने फोन बाहेर काढला. इतक्यात दार उघडण्याचा आवाज आला. समोर गार्गी उभी होती. तिच्या कपाळावर घर्मबिंदू चमकत होते. अंगावर सकाळी बाहेर पडताना घातलेला सलवार कुडता होता. बाकी डॉक्टरांचा काही मागमूस नव्हता.
"अनन्या तू इथे कशी?"
"इट फॉलोज बघून मी इन्स्पायर झाले. सो अनन्या फॉलोज" अनन्याने तिरकस शेरा मारला.
"सॉरी यार, पण एक खूप सीरिअस केस आली आहे. डॉक्टर अजूनही त्यांच्या स्टडी रूममध्येच आहेत. प्लीज, आत्ता डिस्टर्ब नको करूस. मी घरी आले की सांगते तुला सगळं. आणि ये मूव्ही मेरे पे उधार रही. ठीक हैं? ओह आणि हाय मॅक, लाँग टाईम नो सी. कसा आहेस? एनीवे कॅच यू लेटर!"

मॅकला "आय अ‍ॅम फाईन" म्हणण्याची संधीही न देता तिने धाडकन दार लावून घेतलं. गार्गी मागे वळली तर तिला खुर्चीपाशी ठेवलेले लोटी भांडे दिसले. तिने तशीच लोटी तोंडाला लावून घटाघटा सगळे पाणी संपवले. लोटी खाली ठेवली तर तिला दचकवण्यासाठी तो उभा होता. तळमजल्यावर आत आल्या आल्या उजव्या बाजूला एक प्रशस्त दिवाणखाना होता. तर डाव्या बाजूला वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना आणि त्या जिन्यामागे काहीसे लपलेले अभ्यासिकेत जाण्याचे दार. या दिवाणखान्यातच एक टेबल खुर्ची लावून गार्गीचा डेस्क तयार केला होता. ती डेस्कपाशी उभी होती तर तो स्टडी रुमच्या दारात उभा होता. त्याच्या हातात कॉफीचा मग होता. त्याने वाफाळत्या कॉफीचा घोट घेऊन तिला आत येण्याकरिता खुणावले. संपूर्ण तळमजला कनेक्टेड होता. अभ्यासिकेतून स्वयंपाकघरात आणि स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात जाणे शक्य होते. मधल्या व्हरांड्यात टॉयलेट बांधली होती. दोघे स्वयंपाकघरात आले. त्याने तिला कॉफी देऊ केली.
"घाबरू नकोस, नि:शंक होऊन कॉफी पी. मी कॉफी उत्तम बनवतो, तुला नक्की आवडेल. तुला टॉयलेटला जायचंय का? मी खिडक्या सील केल्या आहेत. सो डोन्ट वरी अबाऊट इट. मी तुला अडवणार नाही. इन फॅक्ट जोपर्यंत तू मी सांगेन ते ऐकशील तोवर मी तुला कसलीही आडकाठी करणार नाही."
"पण तू आहेस तरी कोण? आणि हे सर्व का करत आहेस?"

******

"सर?"
"कम इन, हॅव अ सीट" गार्गी आणि तो अभ्यासिकेत आले. डॉक्टर सोमणांची अभ्यासिका काही फार फॅशनेबल नव्हती. एक दोन आल्हाददायक रंगसंगतीची इंप्रेशनिस्ट चित्रे भिंतीची शोभा वाढवत होती. विविध विषयांच्या पुस्तकांनी भरलेली शिडाळी त्यांच्या व्यासंगाची साक्ष देत होती. खोलीत दोन सोफे आणि दोन आरामखुर्च्या होत्या. त्याखेरीएज मधोमध एक अंडाकृती टेबल होते आणि टेबल टॉप काचेचा होता. त्यावर काही कागद आणि लिखाणाचे साहित्य होते. तसेच एक छोटा टेपरेकॉर्डर होता.
"हाय, मी डॉक्टर सोमण. तुम्ही मला अनिरुद्ध म्हणू शकता. गार्गीला तुम्ही भेटलाच आहात. गार्गी माझी अत्यंत विश्वासू सहकारी आहे. तुम्ही इथे जी काही माहिती द्याल ती पूर्णपणे गोपनीय असेल. मी आणि गार्गी वगळता ती कोणत्याही त्रयस्थाला कळणार नाही याची मी हमी देतो. आपले सर्व संभाषण मी रेकॉर्ड करणार आहे. या टेप्स मी वगळता कोणालाही ऐकता येणार नाहीत. तरीदेखील तुम्हाला हे संभाषण रेकॉर्ड होण्याबद्दल काही आक्षेप असेल तर मला लगेच सांगा. आपण काहीतरी वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तर तुमचे नाव जयंत मित्रा नाही का? तर जयंत ......"
जयंतचे लक्ष सोमणांकडे नव्हते. तो भिंतीवरची चित्रे बघत होता. सोमणांनी गार्गीकडे पाहिले. तिने हलकेच "हे काहीतरी विचित्र प्रकरण दिसते आहे" अर्थाची खूण केली.
"मला कॉफी मिळू शकेल का?"
"हो. गार्गी?"
"कोणती कॉफी आहे तुमच्याकडे?"
हा भलताच कॉफीबाज असावा. "नेसकॅफे"
"इन्स्टंट?"
"हो."
"५० मिलिग्रॅमपेक्षाही कमी. नको मग."
"आमच्याकडे चांगल्या प्रतीचा दार्जिलिंग चहा आहे. तो चालेल का?" सोमणांनी विचारले.
"चहा, हं. ३० मिलिग्रॅमपेक्षाही कमी. नको राहू द्या. माझ्याकडे एक रेडबुल आहे. मी ते पिता पिता तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली तर चालेल का?"
हा गुगली होता. पण नमनालाच आडकाठी नको म्हणून सोमणांनी मानेनेच रुकार दिला. प्रथमच दोघांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. एप्रिलमध्येही त्याच्या अंगावर एक ढगळ शर्ट आणि त्यावर अनेक खिशांचे कंबरेखाली येत असलेले जाकीट होते. जोडीला मळकट जीनपँट होती, तिलाही असंख्य खिसे होते. केस नुकतेच कापलेले वाटत असले तरी ते निश्चितच कोणा न्हाव्याने कापलेले दिसत नव्हते. मागच्या बाजूचे केस खासकरून कमीअधिक कापलेले होते. खुरटी दाढी राखलेली असली तरी नजरेत भरण्यासारखे होते त्याचे गुंजेसारखे लाल डोळे! कित्येक दिवसांचे जागरण घडल्याशिवाय असे डोळे होऊ शकत नाहीत.
"तुमची झोप झालेली दिसत नाही. तुम्हाला मी उद्याची पहिली अपॉईंटमेंट देऊ शकतो. इतकं कॅफिन प्रकृतीला बरं नाही. तुम्हाला डॉक्टरची नाही झोपेची गरज आहे."
"नाही!!" तो जवळपास किंचाळला. त्याचे कोरडे पडलेले आणि फाटलेले ओठ आता थरथरत होते. सोमणांनी गार्गीकडे डोळ्याच्या कोपर्‍यातून बघितले. त्याच्या नजरेतून ते सुटले नाही.
"माझी गोष्ट तुम्ही ऐकून घ्या, मग कोणाला फोन लावायचा तो लावा. पण प्लीज आधी मी काय म्हणतो ते ऐकून घ्या." शब्द करड्या सुरात उच्चारले असले तरी त्या शब्दांमध्ये एक जादू होती. गार्गी निमूटपणे तशीच बसून राहिली.
"तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी गेले कितीतरी दिवस झोपलो नाही आहे. किंबहुना मी झोपूच शकत नाही डॉक्टर! मी झोपलो तर ती मला मारून टाकेल."
"ती? कोण ती? तुम्ही तिला ओळखता का?" सोमणांनी मनोमन स्किझोफ्रेनियाची शक्यता नोंदवली.
"नाही."
"या आधी तुम्ही तिला कुठे भेटला आहात का?"
"नाही."
"तुम्ही एकटेच राहता का सोबत कोणी असतं?" त्याने एकटाच अर्थाने एक बोट उंचावले.
"तुम्हाला ही स्त्री, जी तुमच्या जीवावर उठली आहे, ती केव्हापासून दिसू लागली?" तो गप्प राहिला. त्याच्या नजरेत एक विचित्र झाक आली होती.
" जयंत, ही स्त्री ......"
"तुम्हाला हा प्रश्न आधी विचारावासा वाटत नाही की मी या स्त्रीचा आणि माझ्या झोपेचा संबंध का जोडतो आहे?"
सोमण आणि गार्गी दोघांनाही एव्हाना हे प्रकरण गंभीर असल्याची खात्री पटली होती. काहीही करून याला इथे डांबून ठेवून पोलिसांना बोलावणे गरजेचे होते. ज्या कोणा स्त्रीविषयी हा बोलत आहे ते त्याचे सायकोटिक इल्युजन होते की नाही हे शोधणे गरजेचे होतेच. पण याची अवस्था बघता हा एखाद्या खर्‍या स्त्रीवर संशय घेऊन तिला इजा पोहोचवण्याचा संभव होता. ही नक्कीच प्राथमिक दर्जाची केस नव्हती. सोमणांनी प्रसंगावधान दाखवून विचारले.
"माय बॅड, माय बॅड! बरोबरच आहे तुमचं म्हणणे. ही जी कोणी बाई आहे, ती तुम्हाला झोपेतच मारायचा प्रयत्न का करते आहे हे शोधायला हवेच की. परफेक्ट! मग तुम्हाला याची काही कल्पना आहे की ही तुम्हाला झोपेतच का मारायचा प्रयत्न करते?"
"कल्पना? मला पूर्ण खात्री आहे, कारण ती मला इतर कोणत्या वेळी मारूच शकत नाही."
"ओके. हे इंटरेस्टिंग आहे. मला जरा सविस्तर सांगू शकता की नक्की तुमच्या आयुष्यात काय घडतं आहे?"
"सीईंग इज बिलीव्हिंग डॉक्टर. व्हाय डोन्ट आय शो इट टू यू?" क्षणार्धात त्याच्या खिशातून एक छोटी हतोडी बाहेर आली होती आणि त्या हतोडीने त्याने सोमणांच्या डोक्यावत विजेच्या चपळाईने प्रहार केला. त्यांच्या कपाळातून रक्ताची धार निघाली आणि थोड्याच क्षणांत त्यांची शुद्ध हरपली. गार्गीला काय घडते आहे हे कळेपर्यंत तो तिच्यापाशी पोहोचला होता. गार्गी फारशी उंच नव्हती. तिच्या मानाने तो फारच धिप्पाड भासत होता. त्याच्या चेहर्‍यावर स्मितहास्य खेळत होते. त्या अवस्थेत ते स्मितहास्य फारच भयानक दिसत होते.

"तुझ्या लक्षात आले असेलच की माझं खरं नाव जयंत मित्रा नाही. माझं खरं नाव सांगायची मला जरुरही वाटत नाही. आता मी सांगतो ते नीट ऐक. याचे हातपाय बांधायला ही दोरी. जर तुम्हा दोघांना जिवंत राहायचे असेल तर गपचूपपणे याचे हात पाय बांधून इथेच बसून राहा. तुझा फोन मला दे."
गार्गीकडे दुसरा काही पर्याय नव्हता. त्याच्या हातात रक्ताळलेली हतोडी दिसत होती. तिने आपला मोबाईल त्याच्याकडे दिला. त्यानेही तो त्याच्या जीनला असल्या असंख्य खिशांपैकी एकात तो सरकवला. दोरी घेऊन ती सोमणांकडे वळली. तिचे डोके पूर्णपणे बधीर झाले होते.
"घरात आणखी कोण आहे?"
"एक केअरटेकर बाई आहेत. त्या ...."
"शू...." तोंडावर बोट ठेवून तो स्वयंपाकघराच्या दाराकडे वळला. त्याने एका झटक्यात दार उघडले आणि कान लावलेल्या बाई दाणदिशी जमिनीवर आपटल्या. त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट भीति दिसत होती. हातात स्वयंपाकघरातली सुरी होती. त्यांनी ती सुरी हवेतच वेडी वाकडी फिरवली. तो तसाच स्तब्ध उभा होता. त्याला ती सुरी लागत नव्हती. वार करण्याकरता त्यांना थोडे जवळ सरकणे गरजेचे होते पण जणू त्यांचे संपूर्ण अंग सुन्न पडले होते. तो गुडघ्यांत त्यांच्या समोर बसला. निर्वाणीचा उपाय म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सुरी फिरवली पण त्याने सुरीचे पाते हाताने पकडले. त्याच्या हातात राक्षसी ताकद होती. त्याने ते पाते धरून एक हिसडा दिला आणि सुरी आता त्याच्या हातात होती. त्याने एकदा गार्गीकडे बघितले आणि निर्विकारपणे सुरी केअरटेकर बाईंच्या गळ्यावरून फिरवली. आता घरात फक्त तो सोबत घेऊन आलेली फिल्टर कॉफी बनवण्याचा आवाज येत होता. या आवाजात गार्गीच्या दोर्‍या आवळण्याची बारीकशी खुडबूड आणि केअरटेकर बाईंचे शेवटचे आचके कोणालाही ऐकू येत नव्हते.

~*~*~*~*~*~

गार्गीला भयातिरेकाने रडताही येत नव्हते. हा इसम कोण आहे आणि तो हे सर्व का करत आहे हे कळायला काहीही मार्ग नव्हता. मध्येच तो बिचकल्यासारखा इकडे तिकडे बघत होता. क्लिअरली कॅफिनच्या अतिरेकी सेवनामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. मध्ये जाऊन तो दाढी करून आला. केअरटेकर बाईंचे शव त्याने रस्त्यातून बाजूला करून तसेच पडू दिले होते. सोमणांना वरच्या मजल्यावरच्या एका बेडरूममध्ये हलवले होते. चादरीचे तुकडे कापून त्याने त्यांना बिछान्याला बांधून टाकले होते. गार्गी त्यांना खायला घालून आली खरी पण ती त्यांना काय धीर देणार होती? तो खाली नुसताच बसून होता. गार्गीला काही केल्या हा काय करायचा प्रयत्न करतो आहे हे कळत नव्हते. अचानक त्याने तिला शांत बसण्याचा इशारा केला. हलकेच तो प्रवेशद्वाराकडे वळला. व्हरांड्यात हलके चांदणे वगळता अंधार होता. त्या शांततेत दाराशी होत असलेली खुडबुड अजूनच कळून येत होती. खट्, आवाज होऊन दार उघडले गेले आणि अनन्या आत शिरली. तिने गार्गीला हाक मारली. गार्गी सापडायच्या आधीच तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. शुद्धीवर आली तेव्हा तिला एका खुर्चीला बांधले होते. समोर गार्गी आणि तो बसले होते.

"तू हिला ओळखतेस?" गार्गीने होकार दिला.
"गार्गी हा कोण आहे? हे काय चाललं आहे?" उत्तरादाखल त्याने अनन्याच्या मुस्काटात वाजवली. डोक्यावर त्याने मारलेली फुलदाणी अजूनही ठसठसत होतीच.
"तुम्हा दोघींना एव्हाना लक्षात आले असेलच की ही काही गंमत नाही आहे. मला गंमती जंमती अजिबात आवडत नाहीत. इथे मी माझा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी मला काही प्रयोग करून बघणे गरजेचे आहे. जर तुम्ही मला सहकार्य केलेत तर मी तुम्हाला काहीही करणार नाही."
एव्हाना गार्गी अनन्याला बिलगली होती. तिच्या मुसमुसण्याचा आवाज आता घरात घुमत होता. तिच्या डोळ्यांतली भीति पाहून अनन्याला प्रकरण हाताबाहेर गेलंय हे लक्षात आले. त्याच्या परवानगीने गार्गीने अनन्याला सर्व प्रकार थोडक्यात सांगितला. त्याच्या हातात पाण्याने भरलेला ग्लास होता. तो गटागटा पाणी प्यायला.
"आधी मला हे सांग की तू परत का आलीस?" आता गप्प बसून काही फायदा नाही हे अनन्याने ताडले.
"गार्गीने मला सांगितलं की डॉक्टर आणि ती स्टडी रुममध्ये काम करत आहेत. अर्थातच ती खोटं बोलत होती. मी आधी एकदा इथे येऊन गेले आहे. स्टडी रुम तळमजल्यावर आहे आणि दिवे फक्त वरच्या मजल्यावरचे चालू होते. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड होती. मग मी परत येऊन बघायचे ठरवले. त्यासाठी मॅकला थाप मारून मागेच थांबले. घराचे निरीक्षण करता करता बाथरुमच्या खिडक्यांवर लाकडी पट्ट्या ठोकल्याचे लक्षात आल्यावर मी गप्प बसणं शक्य नव्हते."
"स्मार्ट गर्ल! आय लाईक क्रिटिकल थिंकर्स. ओके, लेट्स मेक अ डील. तू मला हे कोडं सोडवायला मदत कर आणि मी तुम्हा दोघींना जाऊ देईन."
"कोडं? कसलं कोडं?"
"सांगतो. चला माझ्यासोबत."
ते सर्व वरच्या मजल्यावर गेले. सोमण एव्हाना शुद्धीवर आले होते. त्यांच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबलेला असल्याने ते काही बोलू शकत नव्हते. पहिल्यांदा त्याने दोघींना धाक दाखवून सोमणांना एका खुर्चीला बांधले. तोंडातला बोळा काढला. ते त्वेषाने त्याच्यावर थुंकले. थुंकी पुसून टाकत, त्याने मोठ्या प्रेमाने त्यांच्या गालावर टिचकी मारली. दोघींनाही आणखी दोन खुर्च्यांना बांधून मग त्यांचाच टेपरेकॉर्डर पुन्हा सुरू केला.

"मी आता या बिछान्यावर झोपणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही मुलींना आणि डॉक्टरांना बांधले आहे. माझी झोप सध्या २ तासांची आहे. त्यातली शेवटची साधारण पंधरा वीस मिनिटे माझा स्लीप पॅरालिसिसचा एपिसोड असतो. हे तिघे माझ्या लेटेस्ट एपिसोडचे साक्षीदार असतील. माझा खरा प्रॉब्लेम त्यांना यानंतर मी सांगेन." त्याने रेकॉर्डिंग थांबवले आणि एक कॅमेरा काढून त्याचा अँगल सेट केला. मग कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता त्याने सरळ बिछान्यावर अंग टाकले आणि पाचच मिनिटात तो झोपी गेला होता. त्याची झोप बघता कॅफिन खेरीज हा जागा राहणे अशक्य होते.
"स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय?" अनन्याने त्या दोघांना प्रश्न विचारला. गार्गीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. सोमण मात्र खूपच गोंधळलेले होते.
"तू अनन्या ना? तू इथे कशी ..... फर्गेट इट. मला आत्ता हे कळत नाही आहे की स्लीप पॅरालिसिस असताना हा इतका का घाबरलेला आहे. स्लीप पॅरालिसिस इज नॉट रेअर आणि जनरली थेरपीने त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. हे काहीतरी भलतं आहे. लेट्स वेट अ‍ॅन्ड वॉच!"
"पण स्लीप पॅरालिसिस म्हणजे?"
"जेव्हा आपण जागे होत असतो किंवा झोपण्याच्या तयारीत असतो, तेव्हा कधी कधी आपल्याला आजूबाजूला घडणार्‍या घटनांची जाणीव असते. पण आपण एक प्रकारच्या जडावस्थेत असतो आणि आपल्याला त्या जडावस्थेत प्रतिक्रिया देता येत नाही. या जडावस्थेला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. जर हे वारंवार घडत असले तर वन कॅन हॅलुसिनेट, विच इज व्हॉट मस्ट बी हॅपनिंग टू हिम!"

बघता बघता दीड पावणे दोन तास निघून गेले. त्या तिघांच्या लक्षात आले की याचे डोळे आता किंचित उघडे आहेत. अनन्याने तिकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याच्या शरीराची कमीत कमी हालचाल होत होती पण त्याही अवस्थेत तो शरीर आक्रसून घेत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये मूर्तिमंत भीति दाटून आली होती. कपाळावर घामाच्या धारा लागल्या होत्या. अचानक कर्णकटू असा गजराचा आवाज झाला. त्याच्या मोबाईलमधल्या गजराच्या व्हायब्रेशनने त्याची जडावस्था अखेर तुटली आणि तो दचकल्यासारखा जागा झाला. त्याला जबरदस्त धाप लागली होती. शेजारीच असलेल्या ग्लासातून त्याने गटागट पाणी प्यायले. हे सर्व तो इतक्या घाईघाईत करत होता की ते पाणी त्याच्या घशाखाली उतरलेच नाही. ठसका लागून तो मोठमोठ्याने ठसकला.
"ते.... तिला पाहिलंत?"
"तिला?" ते तिघेही आता गोंधळले होते. याचा नक्की मुद्दा काय आहे?
"ओह.. मी विसरलोच होतो. सॉरी, हा प्रयोगाचा फक्त पहिला भाग झाला नाही का? डॉक्टर आता तुमची पाळी."
त्याने डॉक्टरांना बिछान्यावर आपल्या जागी बांधले. मग कॅमेरा रिसेट केला. टेपरेकॉर्डर सुरू करून तो बोलला "आता डॉक्टर अनिरुद्ध सोमण माझ्या जागी झोपतील. अर्थातच तिच्यामुळे त्यांनाही स्लीप पॅरालिसिसचा झटका बसेल. आशा करतो की ते वेळेत जागे होतील. मग आपल्याला या समस्येवर अधिक माहिती मिळेल आणि आम्ही सर्व मिळून या समस्येचे निराकरण करू शकू." त्याने बिनदिक्कत एक इंजेक्शन काढून ते सोमणांच्या मानेजवळच्या शीरेत खुपसले. मग तो शांतपणे खाली जाऊन तीन कॉफी घेऊन आला. सोमण आता गाढ झोपेत होते. त्याने दोघींची बंधने खोलली. हातातली हातोडी दाखवून त्याने मूक इशारा दिला. गार्गीने अनन्याला घट्ट मिठी मारली.
"गार्गी, टेंशन घेऊ नकोस. याने आपल्यासाठी कॉफी आणली आहे म्हणजे याला आपण हे सर्व बघितलेले हवे आहे."
"करेक्ट! तुझं डिडक्टिव लॉजिक सॉलिड आहे, राईट? मला आधी भेटलेल्या सर्व मुली हिच्यासारख्या होत्या. ऑपोझिट्स अ‍ॅट्रॅक्टच्या न्यायाने नक्की तू माझ्यासारखी असणार. नाऊ ऑबजर्व्ह रिअली केअरफुली, ओके?"

********

कितीतरी तास होऊन गेले होते. सोमणांना जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण अजूनही बिछान्यातच आहोत. त्यांना डोळे उघडायला प्रचंड परिश्रम पडत होते. किलकिल्या डोळ्यांनीच त्यांनी पाहिले समोर गार्गी, अनन्या आणि तो बसलेले आहेत. त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीही बोलता आले नाही. इतक्यात त्यांना आपल्या पायाशी कसली तरी जाणीव झाली. काहीतरी होतं तिथे खास! त्यांना त्यांच्या पायांवर मजबूत हाताची पकड असल्याचे जाणवले. ते जे काही होते ते धीम्या गतीने त्यांच्या दिशेने सरकत होते. त्यांच्या लक्षात आले की मुद्दाम त्यांची मान किंचित तिरकी ठेवली गेली आहे. त्यांनी महत्प्रयासाने त्यांच्या पायांकडे बघितले. ती निश्चितच कोणीतरी स्त्री होती. तिचे काळेभोर केस मोकळे सोडलेले होते. काही बटा तिच्या चेहर्‍यावर येऊन तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. घामाची एक धार त्यांच्या मानेवरून ओघळून, पाठीवरून वाहत बिछान्याच्या चादरीत शोषली गेली. तिचा स्पर्श आक्रमक होता. त्या स्पर्शात एक हव्यास होता. आपले पंजे रोवत आता ती कंबरेपर्यंत वर सरकली होती. हे जे काही होतं ते सामान्य नक्कीच नव्हतं. आता त्यांना एक कुबट दर्पही जाणवत होता. मृत शरीराला सुटतो तो सडका गंध त्यांना असह्य होत होता पण ते हात हलवून नाकही दाबू शकत नव्हते. स्लीप पॅरालिसिसविषयी वाचलेले सर्वकाही क्षणार्धात त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेले. स्लीप पॅरालिसिसमध्ये तुम्हाला कसलेही भास होऊ शकतात. ती असहाय अवस्था पेशंटला जिवंत जाळत राहते. पण हे काहीतरी वेगळे होते. त्यांच्या छातीवर तिच्या तोंडातून गळणारी लाळ सांडत होती. ती जाणीव त्यांना पदोपदी सांगत होती की हे निराळे आहे. समोर गार्गी आणि अनन्याला तो धमकावत होता. त्या दोघी त्यांच्याकडे येऊ शकत नव्हत्या. अनेकदा भूताखेतांच्या किश्श्यांचे स्लीप पॅरालिसिसच्या मदतीने स्पष्टीकरण देता येते. पण हे? त्यांना आता दिसत असलेला चेहरा? इतका भयानक तरीही इतका सुंदर? तिच्या गालांवर माराचे व्रण दिसत होते. तिचे डोळे फुटलेले होते. तोंडातून लाळ गळत होती. हाताने तिने चेहरा चाचपला. तिच्या चेहर्‍यावर कमालीची घृणा होती. अंदाजानेच तिने ओठांकडे धाव घेतली. या मृत्युचुंबनातून त्यांची सुटका नव्हती. त्यांना फक्त एकच कोडे होते - मी का? माझी काय चूक होती?

~*~*~*~*~*~

सोमणांची हालचाल बंद पडताच त्याने सोमणांकडे धाव घेतली. "डॉक्टर, डॉक्टर टेल मी डॉक्टर. ती कोण आहे? तिचा चेहरा कसा दिसतो? टेल मी डॉक्टर, यू हॅव टू टेल मी! डॉक्टरऽऽऽऽऽऽ!!!!" त्याने अक्षरशः हंबरडा फोडला आणि तो हमसून रडू लागला. त्याचा तो अवतार पाहून त्या दोघींनाही काही सुधरेना. अनन्याने या परिस्थितीचा फायदा घेत गार्गीला इशारा केला. दोघी चोरपावलांनी बाहेर पडू लागल्या. त्याच्या हे लक्षात येताच तो ताडदिशी उठला. त्याच्या चेहर्‍यावर हिंस्त्र भाव तरळले. "गार्गी पळ", दोघी वाट फुटेल तशा जिन्याकडे पळाल्या. घाईगडबडीत त्या धडपडतच जिन्यावरून खाली पडल्या. त्या दारापाशी पोहोचल्या तर दाराला खेटून एक सोफा होता. हा सोफा हलवेपर्यंत त्यांना वेळ लागणार होता. वरच्या मजल्यावरून त्यांना खदाखदा हसण्याचा आवाज आला. "निष्फळ प्रयत्न करायचे नसतात हे लोक कधी शिकणार आहेत कोणास ठाऊक? मी म्हटलं ना की मी जसं सांगतो तसं वागणार असाल तर तुम्हाला काहीही होणार नाही. आता मला सांगा की तुमची निरीक्षणे काय होती? हवं तर आपण रेकॉर्डिंग पुन्हा बघू. त्यासाठीच तर ते रेकॉर्ड केलं आहे. चला या परत."
"किचनची खिडकी!" अनन्या चित्कारली. किचनच्या खिडकीला त्याने सील केलेलं नव्हतं. एवढा वेळच त्याला मिळाला नव्हता. कॅफिनची झिंग उतरत आल्यामुळे त्याला फारसा विचारही करता येत नव्हता. आरोळी ठोकून त्याने वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्याच्या हातात ती सुरी होती. तिच्यावरचे रक्त एव्हाना सुकले होते. तो दोघींच्या मागे मागे धावला. त्यांनी जितकी शिताफी दाखवता येईल तितकी दाखवत स्वयंपाक घर गाठले. अनन्याने जवळच पडलेला मिक्सर उचलून खिडकीवर फेकला. सुदैवाने खिडकीला ग्रिल नव्हते. गार्गीला ओट्यावर चढवून ती बाहेर जाण्यासाठी मदत करणार इतक्यात तिच्या केसांना हिसडा बसला. त्याने दोघींना गाठले होते. स्वयं संरक्षणाचे प्राथमिक धडे गिरवलेले असल्याने अनन्याने आपल्या केसांची पर्वा न करता त्याचे बखोट धरून त्याला हिप थ्रो दिला. आपटतानाही त्याने तिचे केस घट्ट धरून ठेवलेले होते. तिच्या केसांचा एक पुंजकाच त्याच्या हातात आला. कळवळतच अनन्याने गार्गीला पळायचा इशारा केला आणि पुढच्याच क्षणी ती किंचाळली. त्याने तिचा घोटा कापला होता. धडपडत तो उठला आणि त्याने सुरी उंचावली. अनन्याने गच्च डोळे मिटून घेतले. तिला फक्त मार्बलच्या फरशीवर सुरी पडल्याचा आवाज आला. गार्गीने सिंकमधले चहाचे भांडे सर्वशक्ती एकवटून त्याच्या डोक्यात मारले होते.
"अनन्या, तू ठीक आहेस?" गार्गीने चटकन आपली ओढणी टरकावली आणि अनन्याच्या पायांवर तिची चिंधी बांधली. तिच्या आधाराने अनन्या उभी राहिली. त्याचे डोके गरगरत होते. तो जणू काहीतरी शोधत होता. त्याने फ्रीज उघडला आणि त्यातून एक रेडबुल बाहेर काढले. कॅफिन!! त्याला कॅफिनची आवश्यकता होती.
"यू बिचेस! मी झोपू शकत नाही त्याचा फायदा घेत आहात. याद राखा, सोडणार नाही मी तुम्हाला!!"
"ते आम्ही बघून घेऊ. गार्गी, शेजारी पाजारी झोपलेत का? एवढा आवाज होऊन कोणीच कसं आलेलं नाही?"
तो यावर भेसूर हसला. "आधीच बंगला मध्यवर्ती वस्तीत न बांधता असा दूर बांधलेला. त्यात शेजारी वीकएंडसाठी भटकायला गेलेले. प्रयोग करण्याआधी सर्वेक्षण करायचे असते हे मला माहित आहे." त्याचे छद्मी हास्य कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवायला पुरेसे होते. तसा तो फार वयस्कर दिसत नव्हता. त्या दोघींपेक्षा निश्चितच तो वयाने किमान दहा वर्षे मोठा असावा. एकेकाळी तो बराच रुपवानही असावा. अखेर असे काय घडले होते की ज्याने याचे एका नराधम सैतानात रुपांतर झाले?

*******

त्याला खुर्चीला जेरबंद करताना त्याने कोणतीही हालचाल केली नाही. गार्गीने चपळाईने त्याचे रेडबुल हिसकावून घेतले होते. त्याला कोणत्याही परिस्थितीत झोपायचे नसल्यामुळे तो नाईलाजाने गप्प बसला. अनन्याला प्रथमोपचार पेटी सापडली होती. जखम खूप खोल नसली तरी चिंताजनक नक्कीच होती. गार्गी तिला एकटी सोडून जायला तयार नव्हती. या झटापटीत अनन्याचा फोन फुटला होता. गार्गीचा फोन त्याने कुठे ठेवला ते सांगायला तयार नव्हता. त्याच्या फोनमध्ये शून्य बॅलन्स होता. घराच्या फोनलाईन्स काम करत नव्हत्या.
"सोमण सरांचा फोन?" गार्गीने मुद्दा काढताच तो कुत्सित हसला. तो पर्यायही आपल्याला उपलब्ध नसल्याचे त्यांना कळून चुकले.
"आता काय करायचे अनन्या?" दोघी कुजबुजत होत्या. काहीही झाले तरी याला आपले बोलणे त्या कळू देणार नव्हत्या.
"डोन्ट वरी. मी इकडे येताना मॅकला सांगून आले होते. त्याला हे माहित नाही की इथे काहीतरी गडबड आहे पण त्याला हे ठाऊक आहे की मी शेवटची इथे होते. आत्ता पहाट होत आली आहे. मॅकची गर्लफ्रेंड आत्ता शहरात नाही. त्यामुळे त्याला कंपनी म्हणून आपण दोघी लंच त्याच्यासोबत करू अशी ऑफर मी त्याला दिली होती. आता माझा फोन लागत नाही हे पाहून मॅक नक्की इथे येईल. होपफुली तोवर आपण काहीतरी करून वेळ काढू शकू. जमल्यास रस्त्यावरच्या कोणाचे तरी लक्ष वेधता आले तर बरं होईल. यांचा पेपरवाला किंवा दूधवाला येत कधी येतो?" गार्गीने माहित नसल्याची नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात दारावर थाप पडली. त्या दोघी धावतच गेल्या. सोफा हलवायला जेमतेम दोन मिनिटेच लागली असतील. दार उघडून बघतात तो पेपर आणि दुधाची पिशवी दाराबाहेर होती आणि सायकलवर शीळ वाजवत एक तरूण जात होता. कानातल्या भोकांमध्ये फुल्ल व्होल्युमने गाणी लावलेली असावीत कारण अनन्या आणि गार्गीच्या हाका त्याला ऐकू गेल्या नाहीत. अनन्याने वैतागून एक शिवी हासडली.
"आता?" दोघी आत आल्या तर याला ग्लानी आलेली होती.
"प्लीज! रेडबुल, चहा, कॉफी, अगदी ती इन्स्टंट कॉफी सुद्धा चालेल. पण प्लीज मला कॅफिन द्या. मी तुम्हाला काहीही करणार नाही. आय स्वेअर! तुम्ही बघितलंच असेल मी अजूनपर्यंत तुमच्याशी खोटे बोललेलो नाही. माझं एवढं तरी ऐका."
"काय करायचं?" त्या दोघींनी आधी त्याची संपूर्ण झडती घेतली. त्याच्या खिशांतून सारा संसार बाहेर पडला. सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती इंजेक्शने! अनन्याने ती सर्वात आधी ताब्यात घेतली. एव्हाना त्याची शुद्ध हरपली होती. आधी दोघींनी एक-एक कप चहा घेतला आणि त्यांना जरा बरे वाटले. एव्हाना उजाडले होते. पण रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. अनन्याने एवढ्या वेळात गार्गीच्या लॅपटॉपला डोंगल जोडून इंटरनेट बघायला सुरुवात केली होती.
"काय शोधते आहेस?"
"याची स्टोरी काय आहे अजूनही कळत नाही. तू कॉफी करत होतीस त्या वेळात मी याचा कॅमरा चेक केला. याने अगदी डिट्टेलवार नोंदी केल्या आहेत. याच्यामुळे कितीतरी जण मृत्युमुखी पडले आहेत. निव्वळ या कॅमेरातच आठ क्लिप्स आहेत."
"काय?" ऐकताना गार्गीच्या आणि सांगताना अनन्याच्या अंगावर शहारे येत होते.
"पण हा कधीच कोणाला ठार मारताना दिसलेला नाही. त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे हे एक कोडे बनून राहिले आहे."
"तो जे इंजेक्शन देतो, त्यात काही विषारी पदार्थ तर नाही?"
"शक्यता अगदीच नाकारता येत नाही. डॉक्टर तू आहेस, वायलवरचं नाव वाचून सांग मला."
"नाव वाचलं मी. त्यातलं केमिकल एक प्रकारचं अँटी हिस्टामिन आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे सोप्या शब्दात झोपेचे औषध. याने माणसाला झोप तर येईल पण तो मरू शकत नाही. याने ओव्हरडोस दिला किंवा कोणाला अ‍ॅलर्जी असली किंवा याने त्यातला द्रावच बदलला असला तर गोष्ट निराळी."
"यातली कोणतीच शक्यता दिसत नाही. अ‍ॅलर्जी इंटरेस्टिंग मुद्दा आहे पण इतक्या सगळ्यांना अ‍ॅलर्जी?"
"हे सत्र नक्की किती मोठं आहे?"
"आय हॅव नो गॉड डॅम क्लू! मी साधारण शोध घेतला. झोपेत जाणारे लोक असे असून असून किती असणार? सर्व प्रमुख शहरांत अशा स्टोरीज येत आहेत. अख्खीच्या अख्खी फॅमिली झोपेत वारली. छोटेखानी ऑफिसातले सगळे लोक झोपेत गेले. या सर्वांत समान धागा म्हणजे रहस्यमयीरित्या खिडक्या आतून सील केलेल्या. इतर फारशा डिटेल्स तर मिळत नाहीत पण हृदयविकाराच्या झटक्याने एक संपूर्ण परिवार झोपेत जातो? माझा नाही विश्वास बसत."
"म्हणजे याने? पण कसं शक्य आहे? आपण दोघी तिथे होतो."
"तू जोवर आवराआवर करत होतीस तोवर मी याचे व्हिडिओज चेक केले. याची या सगळ्याबद्दल एक थिअरी दिसते आहे. उघडपणे तर हा मान्य करत नाही पण यात काहीतरी अतिमानवी प्रकाराचा वास आहे."
"सविस्तर सांग. माझ्या डोक्याचा आधीच भुगा झाला आहे. आता तू पण असं कोड्यात बोलणार असशील तर अवघड आहे."
"याच्यामते कोणीतरी एक बाई याला मारण्याचा प्रयत्न करते आहे. कोण ते याला ठाऊक नाही. ती कायम हा जडावस्थेत असतानाच याच्या पायांशी प्रकट होते. जर ती त्याच्या डोक्यापर्यंत सरपटत वर येण्याच्या आत हा उठला तर हा वाचतो. काही तरी कारणाने तो शेवटचा जिथे झोपला होता तिथे दुसरा कोणी झोपला तर तो मारला जातो, अनलेस मध्ये हा कुठेतरी झोपला तर टार्गेट अपडेट होतं."
"भूत आहे का हीट सीकिंग मिसाईल?"
"बीट्स मी. पण पुरावा आपल्या डोळ्यांसमोर आहे. तुझे सोमण सर मरण्याचे दुसरं कुठलंही कारण आपण देऊ शकत नाही. त्यांचं हृदय इतकं कमकुवत नक्कीच नव्हतं."
"मग आता?"
"आता तुमची पाळी." त्याला आपली बंधने सोडवता आली होती. हातातला रेडबुलचा कॅन एका दमात संपवून त्याने दूर फेकला. त्याच्या हातात सुरी होती. दोघींना पुन्हा एकदा त्याच्या तालावर नाचणे भाग होते. थोड्याच वेळात अनन्या त्याच खुर्चीत जेरबंद होती जिथे याला बांधून ठेवले होते.

"मला हुशार लोक आवडतात पण मला माझ्याशी हुशारी केलेली आवडत नाही. बट आय लाईक यू. बर्‍याच दिवसांनंतर कोणा मुलीने माझ्यासोबत हुशारी करण्याचा प्रयत्न केला आहे. माहित आहे मी अशांसोबत काय करतो? मी त्यांना शिक्षा करतो. असं तिरस्काराने बघू नकोस माझ्याकडे, दे लीव्ह मी विदाऊट अ‍ॅन ऑप्शन! मला खात्री आहे त्यांच्यापैकीच कोणीतरी एक हे करते आहे. पण कोण? बाकी तुझ्या भुताटकी थिअरीवर माझा बिलकुल विश्वास नाही. देअर मस्ट बी अ वे! आणि तो शोधून काढण्यासाठीच मी हे प्रयोग करतो आहे. शांतपणे लॉजिकली विचार केला की उत्तर सापडेलच! राईट?"
"तू एक राक्षस आहेस बाकी काही नाही. प्रयोग म्हणे? आणि डॉक्टरांप्रमाणे जीव गमावलेल्या इतर लोकांचे काय?"
"तो खरेच दुर्दैवाचा भाग आहे. आता तिच्या या सिस्टिममध्ये समहाऊ सर्वांना स्लीप पॅरालिसिस होतो. आता माझी इच्छाशक्ती तीव्र असल्याने मी पहिल्या हल्ल्यातून वाचलो. मग मी पद्धतशीररित्या स्वतःच्या शरीराला ट्रेन केलं. वेळच्या वेळी कॅफिन इंटेक मॉनिटर केला. झोप नियंत्रित केली. आता फक्त एकाने धोका पत्करून तिचा चेहरा दिसताच जागं होऊन मला जर तिचं वर्णन सांगितलं तर मला हे प्रयोग करण्याची गरज उरणार नाही. सोपं आहे की नाही?! मग एवढी मेहनत केल्यानंतर आय डिझर्व्ह टू सर्व्हाव्ह! जीवो जीवस्य जीवनम्! माझं जीवन दुसर्‍या कोणाकडून तरी येणारच. प्रकृतीचा नियम आहे हा. यात माझं काय चुकलं?"
"प्रकृती का विकृती?" अनन्याच्या गालावर जोरदार थप्पड पडली.
"बास!" त्याचा आवाज चढला होता. "आता तुझ्या शिक्षेची वेळ झाली आहे. तरी नशीब समज की मी तुला जगण्याची एक संधी तरी देतो आहे. तुला आता सर्व काही ठाऊक आहे. मला ती कशी दिसते हे समजलं पाहिजे. कळलं?" तो एकीकडे सिरिंज तयार करू लागला. त्याच्या लक्षात आले की वायल रिकामी आहे. चिडून त्याने ती वायल फेकली. "बाकीच्या वायल्स कुठे आहेत?" गार्गी थरथर कापत होती. तिच्या तोंडून आणते हा एकच शब्द कसाबसा निसटला.
"गार्गी मला कॉफी पण आण!" अनन्याला उलट्या हाताची आणखी एक पडली. तिच्या ओठातून रक्ताची एक हलकी धार निघाली. तिने आलेले रक्त खाली थुंकले.
"कॉफी? तुला काय वाटतं तू कॉफी पिऊन जागी राहू शकशील? कॉफीपेक्षा हे औषध कितीतरी जास्त प्रभावी आहे."
"बरं मग मला पाणीतरी पाज गार्गी! यांना कॉफी दे हवं तर." अनन्या असं का बोलते आहे? गार्गीचे विचारचक्र वेगाने धावू लागले.
"ए तू! कोणतीही चलाखी करण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला मी मोजून पंधरा मिनिटे देतो. तेवढ्या वेळात कॉफी, पाणी आणि औषध इथे हजर झाले नाही तर .. " त्याने गळ्यावरून आपले बोट फिरवले. गार्गीला त्याचा मतितार्थ चांगलाच ठाऊक होता.
थोड्याच वेळात गार्गी सर्व काही घेऊन परत आली. अनन्याने दोन घोट पाणी प्यायल्यानंतर त्याने पुन्हा एकदा कॅमेरा सज्ज केला. आपला आवाज रेकॉर्ड केला,
"या वेळेस माझ्या झोपण्याचे रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. तिचा चेहरा मला अर्धवट दिसला होता, इट वॉज अ क्लोज कॉल. पण चेहर्‍यावर केसांच्या बटा आहेत. नोंद घेतली आहे. खुर्चीवर जर कोणी झोपले तर चेहरा दिसण्याची शक्यता अधिक जास्त आहे. तिलाही कमी अंतर पार करावे लागते. भविष्यासाठी नोंद घेतली आहे. आता हिचा स्लीप पॅरालिसिस एपिसोड" अनन्याकडे बोट दाखवून तो एका खुर्चीत स्थानापन्न झाला. कॉफीचे घुटके घेत तो निरीक्षण करत होता. कधी त्याला ग्लानी येऊन त्याच्या हातातून कप खाली पडला त्याला कळलेच नाही. तो बघता बघता कोसळला. शुद्ध हरपण्यापूर्वी त्याला अनन्या आणि गार्गी एकमेकींना टाळी देताना दिसल्या. दोज बिचेस! त्याची शुद्ध हरपली.

~*~*~*~*~*~

"हायला, तुम्हाला ब्रेव्हरी अवार्डच द्यावा लागेल." मॅक दोघींच्या हातात लिंबू सरबताचे ग्लास देता देता म्हणाला. दोघींनी चहा-कॉफीला ठामपणे नकार दिला होता. त्या धक्क्याचा प्रभाव आता कमी झाला असला तरी ओसरला नव्हता. त्यांनी तो बेशुद्ध पडताच थोड्याच वेळात मेसेंजरवरून मॅकशी संपर्क साधला. मॅकही शक्य तितक्या लवकर दोन हवालदार सोबत घेऊन आला. इथली परिस्थिती बघताच त्यांनी आणखी पोलिस फोर्स मागवली. तोवर तो या खुर्चीत बांधलेल्यावर लक्ष ठेवत बसला.
"पण मला अजूनही हे सर्व अनाकलनीय वाटतं आहे. हे सर्व काय होतं? ही भुताटकी होती की अजून काही होतं?" दोघींनी एकमेकींकडे पाहिले. मग एक सुस्कारा सोडून अनन्या बोलू लागली.
"घडल्या प्रकारावर आम्हा दोघींचा अजूनही विश्वास बसत नाही. पण यापेक्षा अधिक चांगले स्पष्टीकरण आत्तातरी देता येत नाही. त्याच्याच म्हणण्यानुसार त्याने अनेक मुलींना शिक्षा केली होती. त्याने कितीही गोड गोड शब्दांत आपली पापं झाकायचा प्रयत्न केला तरी त्याचा गर्भितार्थ सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. आमची काल एका अत्यंत नीच, विकृत नराधमाशी गाठ पडली होती. त्याच्या तावडीत याआधीही कोणीतरी निनावी स्त्री सापडली असणार. पार हतबल करून, असहाय अवस्थेत तिचा त्याने निर्दयतेने जीव घेतला असणार यात मला अजिबात शंका नाही. यावेळी तिच्या मनात पराकोटीचा संताप आल्याशिवाय राहणार नाही. हा संतापच त्याच्या जीवावर उठला असावा. क्रोध आंधळा असतो. त्यामुळे त्याला फक्त एक टार्गॅट मिळाले की त्या संतापाचे मॅनिफेस्टेशन जाऊन त्या टार्गेटच्या ठिकाणी असलेल्याचा जीव घेते. या ओल्या सुक्यात भेदभाव केला जात नाही. या सर्व निष्पाप जीवांच्या दुर्दैवाने त्याने आपली बुद्धि वापरून यातही एक पळवाट शोधून काढली."
"पण आता हे सर्व थांबेल." गार्गी अनन्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
"तरी एक शेवटची शंका, स्लीप पॅरालिसिसच का?" अनन्या आणि गार्गी दोघी हसल्या.
"कारण त्या जडावस्थेत तो संपूर्णपणे असहाय असतो. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण जाणीव असूनही तो आपल्या बचावास असमर्थ असतो. तो संताप त्याशिवाय शांत होईल असे मला तरी वाटत नाही." अनन्याच्या हातात त्याचा फोन होता. तिने बसल्या बसल्या तो फोन दूर भिरकावला. एव्हाना आतमध्ये बसलेले हवालदार बुचकळ्यात पडलेले होते. त्याचे डोळे किंचित किलकिले झाले होते. शरीर आक्रसले होते. त्याला ती वर सरकत असल्याची जाणीव होत होती. सर्व इच्छाशक्ती पणाला लावूनही काही फायदा नव्हता. त्या गजरासारखा काही आवाज तो करू शकत नव्हता. ते दोन्ही हवालदार मात्र बुचकळ्यात पडले होते. जे घडत होते ते त्यांच्या आकलनापलीकडचे होते. एव्हाना तिचा चेहरा त्याला दिसत होता, अर्थातच त्याला ओळख पटली होती. पोलिस दफ्तरी त्याची नोंद "कॅफिनच्या अतिरेकी सेवनाने हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यु" इतकीच घेतली जाणार होती. कारण ते मृत्युचुंबन कोणालाही दिसू शकले नाही, परत कधी दिसलेही नाही.

(समाप्त)

...............

प्राथमिक स्वरुपाची चौकशी झाल्यानंतर त्या तिघांना घरी जायची परवानगी देण्यात आली. मॅकच्या स्विफ्टमध्ये बसून ते बोलत होते.
"बाय द वे, त्या उरलेल्या वायल्सचं काय झालं?"
"काय रे मॅक, तुला कशाला पाहिजे झोपेचे औषध?"
"आधी तू सांग तर खरं ....."
"अरे दोनच उरल्या होत्या. एकीतलं औषध मी प्रसंग ओळखून हळूच ओतून दिलं आणि मगच ती त्याला परत दिली. सुदैवाने त्याच्या ते पटकन लक्षात आलं नाही. दुसरीतलं औषध गार्गीने कॉफीत मिसळलं. का रे?"
"मी विचार करत होतो की त्याने वायल मधलं औषध बदललं का नाही हे फॉरेन्सिक मध्ये चेक करण्याची विनंती करता आली असती. वेल, पण लेबल आहेच म्हणा त्या वायल्स वर. सीलबंद वायलमधलं औषध बदलणं इतकं सोपं तर नक्कीच नाही, राईट?"
गार्गीने उत्तरादाखल खिडकीची काच खाली केली आणि ट्रॅफिकचा गोंगाट आत शिरला. मॅकची उर्वरित बडबड या गोंगाटात हरवून गेली.

(समाप्त!!)

Group content visibility: 
Use group defaults

छान कथा. मध्येच त्याने या मुलींवर हल्ला केला तेव्हा पुढे वाचायचं धाडस होईना. वाचणं सोडून उठलेच. थोड्यावेळाने जरा धैर्य गोळा केलं आणि वाचून पूर्ण केली. Happy

पण मला एक कळलं नाही. या मुलींनी पहिल्या वेळी त्याला खूर्चीला बांधून ठेवल्यावर तिथेच चर्चा करत बसायची गरज नव्हती. तो इतका निर्दय आणि चलाख असताना या दोघींनी तिथून चान्स मिळताच किमान घराबाहेर जाऊन काही मदत मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा होता.

जबरदस्त कथा
फक्त ते मारणारं खरच अमानवीय असतं का? मला शेवटपर्यंत वाटत होतं की तो त्याला होणारा भास आहे आणि सोमणांना मरण कदाचित त्या इंजेक्शनमुळे आलं असेल.
शेवटी तो कॉफी पितांना बेशुद्ध कसा होतो? गार्गी कॉफीत काही मिसळते का?

ज ब र द स्त...
पण एकच शंका
तो त्या बाईचे नाव समजून घेऊन काय करणार असतो?

Opposites attract म्हणजे अनन्या त्याच्यापेक्षा वेगळी असायला हवी नाही का? त्याच्यासारखी नाही. अनन्या आणि गार्गीला सोमणांचा फोन वापरता आला नसता का? तो आधी जिथे झोपला होता तिथे कोणी झोपलं तर ती व्यक्ती मरते हे माहित असूनही त्याने सोमणांना तिथे का झोपवलं? कारण त्यांचा उपयोग करून त्याला त्या स्त्रीचा चेहेरा पहायचा होता ना?

सर्वांचे खूप आभार! सर्व प्रतिसाद खूप चांगले आहेत. त्यातल्या काही प्रतिसादांनुसार काही बदल केले आहेत.
फक्त ते मारणारं खरच अमानवीय असतं का? >> चैत्रगंधा यांच्या प्रतिसादानुसार एक परिच्छेद, हवं तर याला पोस्ट क्रेडिट सीन म्हणू :), वाढवला आहे.
अनन्या आणि गार्गीला सोमणांचा फोन वापरता आला नसता का? >> स्वप्ना यांच्या प्रतिसादानुसार आता एक्स्प्लिसिटली सोमणांचा फोन यांना वापरायला उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. लँडलाईन्स काम करत नसल्याचे आधीच लिहिले आहे.

इतर प्रश्नांची उत्तरे जर मी दिली तर कथेविषयक जरुरीपेक्षा जास्त माहिती फोडली जाईल. त्यामुळे उत्तरे देत नाही. यातल्या काही गोष्टी एक विशिष्ट काँट्रास्ट आणण्यासाठी मुद्दाम तशा ठेवल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे असू शकतात.

यातल्या काही गोष्टी एक विशिष्ट काँट्रास्ट आणण्यासाठी मुद्दाम तशा ठेवल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे असू शकतात. >>>

वाचताना भरपूर प्रश्न डोक्यात आले पण हे वरचे वाचताच ते विचारण्यात अर्थ नाही असे वाटले. विशिष्ट कॉन्ट्रास्ट ठेवण्यासाठी खूपच ओढाताण झालीय गोष्टीची.

तरी 2,3 विचारते. गोष्ट् रात्री घडते. साडेनवाचा शो संपवून दोघे डॉक्टरांच्या बंगल्याकडे येतात तेव्हा साडेअकरा ते बारा तरी व्हायला हवेत. कुठली सैपाकिनबाई इतका वेळ थांबेल? आणि ती तिथेच राहत असेल तर तिला केअरटेकर वगैरे नाव द्या.

गडबड झाली हे अनण्याला पहिल्यांदाच कळते, मग तेव्हाच का नाही काही करत?

अनन्याकडे वाहन नसते. ती परतते तेव्हा नक्कीच 12 वाजून गेले असणार. मग ती कशी आली? एका बाजूला असलेला बंगला, मग कुणी रिक्षावाला येईल का इतक्या रात्री?

आणि सकाळी दूधवाला आल्यानंतर यांना घराबाहेर पडता आले असते. परत का घरात येतात याचे कारण कळले नाही.

कुठली सैपाकिनबाई इतका वेळ थांबेल? आणि ती तिथेच राहत असेल तर तिला केअरटेकर वगैरे नाव द्या. >> केअरटेकरचा मुद्दा मान्य, बदल केला आहे
ती परतते तेव्हा नक्कीच 12 वाजून गेले असणार. मग ती कशी आली? >> हाही मुद्दा मान्य, बदल केला आहे.

जयंतचे सुरुवातीचे वर्णन वाचून रमन-राघव-२ .० आठवत होता.

चांगली आहे कथा. पण
> पण मला एक कळलं नाही. या मुलींनी पहिल्या वेळी त्याला खूर्चीला बांधून ठेवल्यावर तिथेच चर्चा करत बसायची गरज नव्हती. तो इतका निर्दय आणि चलाख असताना या दोघींनी तिथून चान्स मिळताच किमान घराबाहेर जाऊन काही मदत मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा होता.> +१

पायस धन्यवाद.

तुमच्या कादंबऱ्या व कथा खूप आवडलेल्या आहेत. त्यामुळे ही लगेच वाचली गेली. थोSSSडासा अपेक्षाभंग झाला इतकेच.

फ्री.... सारखी एखादी कादंबरी परत कधी येतेय याच्या प्रतीक्षेत...

कथेतील जे काही असेल ते जीव घेणारे स्त्री पात्र जर भुत असेल तर वीडियो रेकोर्डिंगचा काय फायदा ? मुळात इतराना ती दिसत नाही फक्त विक्टिमला जाणवते/दिसते, म्हणजे काहीतरी अमानवीय आहे असा क़थेचा रोख आहे असे वाटले.
फ्री.... सारखी एखादी कादंबरी परत कधी येतेय याच्या प्रतीक्षेत...+१

सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी एक मस्त थरार/साहस कथा! प्रत्येक प्रसंग/साहस दृश्य व्यक्तिरेखांसकट डोळ्यासमोर उभं राहतं. मजा आली वाचताना...अशा कथा खूप कमी असतात मराठी मध्ये...खूप शुभेच्छा!

थोSSSडासा अपेक्षाभंग झाला इतकेच. >> +१. मधे मधे फारच ओढाताण झाली असे वाटतेय.

फोन available नसल्याचे लिहिलेयस नि त्या नंतर लगेच डोंगल वापरूनinternet वापरले असा उल्लेख आलाय. तिथेही मेसेंजर वापरता आला असताच कि.

शेषनाग पुराणा नंतर चा हा अध्याय एकदम अनपेक्षित होता Happy
मस्त जमली आहे.
त्याने एका झटक्यात दार उघडले आणि कान लावलेल्या बाई दाणदिशी जमिनीवर आपटल्या.>>> गार्गी कडे इकडे संधी होती पळायची असं वाटलं. आणि असं वाटणं म्हणजे कथा आणि लेखनशैली खिळवून ठेवते याचं उदाहरण Happy

तुमच्या कादंबऱ्या व कथा खूप आवडलेल्या आहेत. त्यामुळे ही लगेच वाचली गेली. थोSSSडासा अपेक्षाभंग झाला इतकेच.

फ्री.... सारखी एखादी कादंबरी परत कधी येतेय याच्या प्रतीक्षेत... >>>+१